’सोपा’ उपाय ??

’फुकट ते पौष्टिक’ च्या ’पिपा’सेला आळा घालणारा ’सोपा’ उपाय.

कथा - कारखान्यातले भूत

भुतांच्या अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या मुलाची कथा

भेटूया ब्रेक के बाद

     आता कदाचित ३ महिने तरी मी लिहिणार नाही. अगदी प्रणच केलाय तसा मी. फार धकाकीचे, धावपळीचे, त्रासाचे, तणावाचे,जे जे वाईट प्रकारात मोडते तश्या प्रकारचे जीवन जगावे लागणार आहे मी या तीन महिन्यांत. त्यामुळे लिहायला वेळच मिळणार नाही. कदाचित मी मार्चपासून परत लिहिणे चालू करेन. आणि हो, मी इतर ब्लॉग्स पण वाचणार नाही, त्यामुळे माझ्या प्रतिसादला तुम्ही मुकणार खरे! मी परत आल्यावर सगळा कोटा पूर्ण करायचा प्रयत्न करेन.तीन - सव्वातीन महिन्यांत ब्लॉगविश्वात किती बदल होतात ते बघणे मजेदार ठरेल.
  आपल्या शुभेच्छा घेऊनच जायचा विचार आहे.विसरू नका मला! ;)
  जाता जाता एक चारोळी लिहूनच जातो,सॉरी येतो ! ;)

                     
वाटेवरल्या सावल्या,
                      मला विचारत्या झाल्या,
                      माहीत आहे का तुला,
                      कोणी सोडले आम्हाला ?

  
चला तर मग,राम राम!! रजनी रजनी !! भेटूच!!
            
                      

नया सूरज

 आज फिर धूप में चलें
एक नये सूरज के तले

ना कोई सीमा हो
और`ना हो कोई बंधन
हर घर अपना हो
हर कोई हो स्वजन
रंग रूप भाषा ना छले
एक नये सूरज के तले

द्वेष ना किसीके प्रति
हर मन हो निर्मल
भय में ना कोई जीएँ
नेत्र ना कोई सजल
प्रेम ही हर मन में पले
एक नये सूरज के तले

आशाओं के बादल
संभावनाओं के सागर
भरी रहें हर पल
खुशियों की हर गागर
ना हो हम संपूर्ण भले
एक नये सूरज के तले

---नागपुर,
२३-०२-२०१०

पाडाडी - कैपाक(कैच्याकै पाडलेली कविता)

     आम्ही यापूर्वी आपणांस यपाक व गपाक या दोन पाडकृती कृतीसकट दिलेल्या आहेत.तसेच यपाकपासून सायपाक कसे तयार करावे तेदेखील सांगितले.आता आम्ही ज्या पाडाडीची ओळख करून घेणार आहोत तिचे नाव आहे "कैपाक" म्हणजेच "कैच्याकै पाडलेली कविता".
     कैपाक हा तसा बर्‍यापैकी लोकप्रिय असलेला प्रकार आहे. कैपाक करण्यात अगदीच पारंगत असलेले एक कैपाडे म्हणजे "मन्नू चलिक" हे होत. आपल्या कैपाकाने ते सातत्याने श्रोत्यांचे मनोरंजन करत असतात. मात्र त्यांनी कैपाकाची ही दीक्षा आमच्याकडूनच घेतली आहे हे आम्ही नमूद करू इच्छितो. अजून दुसरे  कैपाडे म्हणजे मर्‍हाटी मुलुखात गाजत असलेले हास्य-द्रुतवाहनाचे कवीराज होत.हे आमच्या नकळतच कैपाक बनवत असल्याचे आमच्या ध्यानात आले आहे. कदाचित त्यामुळेच त्यांचे कैपाक तितकेसे प्रभावी नसतात.त्यामुळे तुम्हालादेखील कैपाडे बनावयाचे असल्यास आमच्याकडे दीक्षा घेणेच योग्य ठरेल.
   कैपाक ही यपाकचेच छेटे रूप आहे. इथेसुद्धा यमकाचे नियम कटाक्षाने पाळावे लागतात. मात्र यपाक आणि कैपाकमधे काही मूलभूत फ़रक आहेत.

१. कैपाक ही कितीही ओळींची, कुठल्याही विषयावरून कुठल्याही विषयाचे फ़ाटे फ़ुटलेली, कोणतेही शब्द वापरलेली असू शकते.
२. कैपाककरिता कागदाचे बोळे बनविण्याची गरज नाही.
३. कैपाककरिता विचार करण्याची गरज नाही.यपाकमधे आपण अगदीच थोडा विचार करत असू, तोदेखील इथे करू नये.

लागणारे साहित्य :- 

१.  कोरे कागद-एक असला तरी पुरेसा, कागद नसला तरी चालेल.
२.  पेन(शाई असलेला, काळी,निळी, लाल कोणतीही चालेल. ) किंवा ..
३. सगळ्या कळा व्यवस्थित दाबल्यास आवश्यक तो शब्द टायपेल असा कळफलक असलेला, चालू       स्थितीतला कॉम्पुटर किंवा laptop आणि तो वापरता येण्यापुरती अक्कल.
४. शब्द लिहेपर्यंत किंवा टायपेपर्यंत लक्षात राहील एवढी स्मरणशक्ती.
५. यमक जुळवता येईल इतका शब्दसंग्रह. हाताशी शब्दकोश असण्याची गरज नाही.

कृती:- 

१. सर्वप्रथम पेनाचे टोपण काढून हाती धरावे, टोक कागदाच्या बाजूने.
२. कुठलीही एक ओळ लिहावी.ही ओळ लिहितांना अजिबात विचार करू नये, गद्य-पद्य कुठलीही ओळ चालेल.
३. आता त्या ओळीखाली लगेच दुसरी ओळ लिहावी.लक्षात घ्या पहिल्या व दुसर्‍या ओळीचा संबंध असला-नसला तरी बिघडत नाही. फ़क्त तिथे यमक जुळायला हवे.
४. खरेतर आता तुम्ही एक कैपाक बनविलेला आहे. मात्र समाधान झाले नसल्यास खाली अजून एक- दोन ओळी पाडू शकता.


   आता आपण हे कैपाक मित्रमंडळींना किंवा शत्रूंना वाढू शकता. आपल्या कैपाकची चव त्यांच्या डोक्यावर बराच काळ रेंगाळत राहील. ते आपल्या कैपाकने प्रभावित होऊन स्वतः कैपाक बनवतील आणि आपल्याला वाढण्यास उताविळ असतील. अशाप्रकारे कैपाडीचा सिलसिला चालू होतो. कैपाक बनवणे आणि वाढणे हा अतिशय लोकप्रिय छंद होतो.जर आपण कैपाक बनवत नसाल तर फ़ारच मागासलेले म्हणून ओळखले जाउ शकता. त्यामुळे आपण लगेच कैपाक बनवायला सुरुवात करा व कैपाडे म्हणून प्रसिद्धी मिळवा.

    वेगवेगळ्या प्रकारचे कैपाक आम्ही सुचवतो..

१. कैशपाक(कैच्याकै शेर पाडलेली कविता) :- हा प्रकार आमचे शिष्य "मन्नू चलिक" यांनी लोकप्रिय केलेला आहे. इथे कैपाक हा दोनच ओळींचा असतो.

२. कैहापाक(कैच्याकै हायकू पाडलेली कविता) :- या प्रकारात कैपाक हा तीन ओळींचा असतो.

३. कैचापाक(कैच्याकै चारोळी पाडलेली कविता):- आपण ओळखले असेलच की येथे कैपाकमधे चार ओळी लिहील्या जातात.

इशारा:- जर तीन वा चार ओळींचे यमक पाडण्याची कुवत वा शब्दसंग्रह नसेल तर कैहापाक आणि कैचापाक पाडू नये.

    आता आम्ही आपल्याला तिन्ही प्रकारांचे काही उदाहरण देतो. यावरून आपली कैपाकाची कल्पना अधिकच स्पष्ट होईल.

१. कैशपाक :-  

१.  काफ़िया काफ़िया खेळतो आम्ही, रदीफ़ आम्हाला आवडत नाही..
     माफ़िया वॉर्स खेळतो आम्ही, फ़ार्मविल आम्हाला आवडत नाही..

 २. उधाणलेल्या वार्‍याने दवबिंदू गेला उडत..
      हरकतनाय म्हणत, भिंतीवर बसला रडत..

३.  सर्व ब्लॉगर्समधे स्वामी दिसतात वेगळे..
     आमच्यासोबत रहा , कैपाडे बनतील सगळे..

४.   लवकरच आप्पाची बोहल्यावर स्वारी..
       चूक करेल ती, तरी हाच म्हणेल सॉरी..
 
२. कैहापाक :-
   
 १.   कैपाकची कृती मी ब्लॉगवर देतो
       फ़ुकटात आहे तर फ़ायदा घेतो..
      रजनीच्या नावाने ,सगळ्यांना पिडतो..

 २.  यपाक,गपाक,कैपाकचा सुरू झालाय खेळ
       मी खाल्ली होती काल गणेश भेळ...
      आज खातोय तुमचा कवडीमोल वेळ

३. कैचापाक:- 

१.  वरच्या कैपाकात, ही अजून एक भर..
    मी आहे कवितेतला सचिन तेंडूलकर..
    माझी कविता आवडली नसेल तुला जर..
    ओंजळभर पाण्यात जा आणि बुडून मर..

२.  मी कैपाकीचा भयंकर रवंथ केला..
     आज नक्कीच कुणीतरी आहे मेला..
    आता फ़क्त अजून एक ओळ झेला..
    पुढची पाडाडी येईल डिसेंबरला..


      या उदाहरणांतून आपल्या कैपाकाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या असतीलच. सध्या बझ्झविश्वात कैपाकींचा पूर येत आहे. आमच्यापासून प्रेरणा घेऊन कित्येक जण कैपाडत आहेत. निकट भविष्यात आम्ही आपल्याला आमच्या कैपाड्या शिष्यांनी निर्मीलेल्या कैपाकांचा आस्वाद घेण्याची संधी देऊ..

आपला स्नेहांकित,
स. दा हितकरे ( कैपाडे स्वामी )

पाडाडी - कविता कशा पाडाव्या ??


       "पाडकृती" किंवा ज्याला सामान्यजन "पाडाडी" म्हणतात अशा वर्गीकृत केलेले अनेक जिन्नस आहेत.बुंदी पाडणे, विटा पाडणे, मुख्यमंत्री पाडणे, मंत्री पाडणे,आमदार- खासदार पाडणे,सरकार पाडणे,
प्रेमात पाडणे ,ब्लॉग पाडणे,लेख पाडणे,शब्द पाडणे(ही कृती आमचे  मित्र श्री. सत्यवान वटवटे उत्कृष्ट पाडतात. ते सातत्याने नवीन शब्द पाडत असतात.उदाहरणांसाठी त्यांचा ब्लॉ तपासावा. )अशा अनेक पाडाडी लोकप्रिय आहेत.पण कविता पाडणे ही नाविन्यपूर्ण पाडकृती आम्ही सर्वप्रथम निर्मिली. आमच्या स्नेह्यांना आम्ही ही पाडकृती चाखायला दिल्यावर अनेकांना प्रचंड आवडली. त्यांपैकी एक स्नेही कवी ता. पाडे यांना आम्ही त्याची कृतीही लिहून दिली.मग त्यांनी कविता पाडण्याचा स्वतंत्र व्यवसाय चालू केला जो छान चालतही आहे.त्यांच्या या व्यवसायाला आमच्या शुभेच्छादेखील आहेत.
     मात्र कविता पाडण्याचा मक्ता आमच्याकडेच आहे आणि ते trade secrete आम्ही कुणाला देणार नाही अशी एक भावना त्यांच्यात बळावत आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे. तसेच आमच्या पाडलेल्या कविता सर्वोत्कृष्ट असतात ही त्यांची दर्पोक्तीही अस्मादिकांस पसंत पडली नाही.कविता पाडण्याचा प्रयोग घरी सर्वांनी करून बघावा आणि त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा हीच आमची इच्छा आहे.कवी ता. पाड्यांच्या व्यवसायाला धक्का लावण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. बाकरवडीची कृती जगजाहीर असतांनादेखील चितळे बंधूंच्या विकल्या जातातच ना ? खणखणीत नाणे असले तर ते वाजतेच की, मात्र कोणते नाणे खणखणीत आहे याचा निर्णय पर्याय उपलब्ध असल्यावरच होऊ शकतो. ही पाडाडी लिहिण्यामागे कवितेसारखी नवीन व रुचकर पाडाडी सर्वांनी घरी पाडावी हा उपरोल्लिखित उद्देश तर आहेच पण यामागे अजूनही एक सद्हेतू आहे.
     अस्मादिकांच्या काही मित्रांना जेव्हा कविता पाडण्याबद्दल कळले तेव्हा त्यांच्या मनीदेखील कविता पाडण्याची इच्छा जागृत झाली.काही मित्रांनी कवी ता. पाड्यांकडून कविता पाडून आपला कार्यभाग साधला. मात्र ज्यांना हे शक्य नव्हते तसेच ज्यांना घरीच स्वहस्ते कविता पाडायच्या होत्या ते फार खिन्न राहू लागले. असेच एक परमस्नेही श्री. इटलीकर भिंते ह्यांची कविता पाडण्याची तीव्र इच्छा आणि उत्सुकता जेव्हा बघितली तेव्हा आम्हास राहवले नाही आणि आम्ही ही पाडाडी लिहिण्यास उद्युक्त झालो.
       आता आम्ही कविता पाडण्याचे साहित्य व कृति तसेच आम्ही पाडलेली कविता दाखवू, तरी आपण सर्वांनी आपापल्या लेखण्या तयार ठेवाव्यात.देश-काल-परिस्थितीप्रमाणे, व्यक्ती-परत्वे व मनुष्याच्या आवडी-निवडीनुसार अनेक प्रकारच्या कविता पाडल्या जाऊ शकतात. इथे विस्तारभयास्तव आम्ही त्या सर्व पाडाडींचा उल्लेख करण्यास असमर्थ आहोत.तरी अतिशय चविष्ट अशा दोन कवितांची कृती आम्ही इथे लिहू. 

१. यमक पाडलेली कविता (यपाक):-  

लागणारे साहित्य :-
 
१.  कोरे कागद-जितके जास्त तितके उत्तम, किंवा एक कोरी वही.
२.  पेन(शाई असलेला, काळी,निळी, लाल कोणतीही चालेल. ) किंवा ..
३. सगळ्या कळा व्यवस्थित दाबल्यास आवश्यक तो शब्द टायपेल असा कळफलक असलेला, चालू       स्थितीतला कॉम्पुटर किंवा laptop आणि तो वापरता येण्यापुरती अक्कल.
४. शब्द लिहेपर्यंत किंवा टाय्पेपर्यंत लक्षात राहील एवढी स्मरणशक्ती.
५. यमक जुळवता येईल इतका शब्दसंग्रह. हाताशी शब्दकोश असणे उत्तम.
६. दुर्बोधता चवीनुसार
७. भय,विनोद, खट्याळपणा, चावटपणा,सामाजिक, धार्मिक, संवेदनशील,प्रेम, शृंगार, नाजूक भावना, राजकीय वक्तव्य, छुपा संदेश आवश्यकतेप्रमाणे.

कृती :- 
 
१. सर्वप्रथम पेनाचे टोपण काढून हाती धरावे, टोक कागदाच्या बाजूने.
२. डोक्यात एखादा विषय आणावा, तो विषय लगेच कागदावर लिहून काढावा.
३. मग पुढे सुचत नसल्याचे आव आणत कागद फाडून त्याचे बोळे बनवावे व ते जमिनीवर भिरकावे.
४. दुसऱ्या कागदावर परत तोच विषय लिहावा.
५. आता कोणतीही एक ओळ लिहावी.
६. कृती क्र. ३ परत करावी.
७. २री ओळ सुचल्यावर आता घाई-घाईत दुसऱ्या बोळ्याचा शोध घ्यावा. तिथे लिहिलेले शब्द एकत्रित करून आणि नव्या सुचलेल्या ओळी नव्या कागदावर लिहाव्यात. शेवटी यमक जुळेल अशा पद्धतीने शब्दांची रचना करावी. अशा रीतीने आपले पहिले कडवे पाडून झाले आहे.
८. विषयानुसार एखादी अतिदुर्बोध ओळ टाकावी.दुर्बोधता आवडत असेल तर दुर्बोध ओळींची संख्या वाढवता देखील येईल.
९. एखादा मोठा संदेश देत असल्याचा सुरेख रंग दिसावा म्हणून संदेशपर ओळी टाकाव्या.
१०. प्रत्येक यमकाला यमक जुळवण्याची काळजी घेत कमीतकमी तीन कडवे पाडावेत.
११. ह्या सर्व ओळी व कडवे लिहित असतांना कृती क्र.३ व ७ वारंवार करण्याची काळजी घ्यावी. अन्यथा यपाकची चव बिघडू शकते व सर्व मेहनत वाया जाऊ शकते.
१२. आता तुमचे यपाक तयार आहे.
१३. हे यपाक गरजेनुसार कॉम्पुटरवर टंकू शकता.
         अशाप्रकारे आपण इतरही प्रकारच्या कविता पाडू शकता. उदा. जर  ओळींमध्ये सामाजिकतेचा रस जास्त ओतला तर सामाजिक यमक पाडलेली कविता (सायपाक) तयार होईल.
          कृती तर सांगितली, मात्र यपाकचा योग्य अंदाज यावा यास्तव आम्ही एक यपाक सादर करत आहोत.
                     तो खुदकन हसतो


    तो माझ्याकडे पाहून खुदकन हसतो
    आणि मग तो एक कविता करतो              --- नाजूक भावना 

    त्याची कविता आवडते मला फार
    त्याच्यासोबतच आता माझा संसार
    पण तो मला विचित्र प्रश्न करतो,
    फ़क्त  कवितेवर कुणी कसा जगू शकतो           -- सामाजिक प्रश्न उचललाय बघा
    आणि मग तो एक कविता करतो

    काजळकाळ्या भयाण निःशब्द राती
    त्याच्या कवितेत गूढ  रातकिडे गाती
    अडखळत अडगळीत तो दिवा शोधतो
    आगकाडीने अंधार घुसमटलेला विझवतो
    आणि मग तो एक कविता करतो                    --चवीपुरती दुर्बोधता
 

     तो एक वेडापीर होता खरा
     कोमेजलेला माळण्याआधीच गजरा
     समुद्र हिमशिखरावर चढू पाहतो
     वारा वडवानल विझवू पाहतो
     आणि मग तो एक कविता करतो

      ओल्या पापण्यांआड मी खुदकन हसते
      आणि मग मीपण एक कविता करते
 
आता आपणही उत्कृष्ट अशी यपाक पाडू शकता असा आमचा विश्वास आहे. चला तर मग, लागा कामाला! आणि हो , आपल्या यपाकची चव आम्हाला चाखायला नक्की द्या बरे.

आता आपण दुसरी पाडकृती बघू.

२. गद्य पाडलेली कविता (
गपाक) :-

साहित्य :-
   वरीलप्रमाणेच, फक्त यमकाची अट शिथील आहे.

कृती:-
 
       गपाक ही करण्यास अतिशय सोपी अशी पाडाडी आहे. त्यामुळे नवोदितांसाठी ही पाडाडी उत्तम ! 

१.कोणत्याही विषयावर  एखादा छोटेखानी १०-१५ ओळींचा निबंध लिहावा.
२. निबंध लिहिताना कर्ता-कर्म-क्रियापद यांची फेरफार करावी, नाही केली तरी हरकत नाही.
३. आता प्रत्येक वाक्यासमोर जास्तीचे टिंब जोडावेत आणि कुठेकुठे उद्गारवाचक वा प्रश्नार्थक चिन्ह जोडावेत.
४. पुढचे वाक्य त्यासमोर न लिहिता खालच्या ओळीत लिहावे.
५. सरतेशेवटी तुमचे गपाक तयार असेल.
६. आता या गपाकला कोणतेही शीर्षक द्यावे.
७.
हे यपाक गरजेनुसार कॉम्पुटरवर टंकू शकता.
  
   आता एक छोटेसे गपाक सादर करतो 
 
  निबंध :- 
 
     बाजाराचा काल  दिवस होता. मित्रांसोबत एक फेरी मारावी म्हणून निघालो. आणि समोर ती उभी होती.लाल ड्रेसमध्ये कातील दिसत होती. एक कटाक्ष टाकला तिने माझ्याकडे फक्त, आणि मी घायाळ झालो. काय सांगू यार मी, तिची एक-एक अदा म्हणजे उधाणलेला वसंत. मी हा असा गबाळ. ती माझी कशी होईल. आम्ही बघावीत फक्त दिवास्वप्ने. तिची दुनियाच वेगळी.माझ्या नशिबी फक्त एक चोरटी झलक. चंद्रप्रकाशाची सवय असलेल्या चांदण्या सुर्यासोबत राहतील का? मनाच्या आकांक्षा फेर धरून नाचतील का? ती उद्या कुणाचीतरी होईल. माझे प्रेम अधुरेच राहील.खंत मानावी का मी? मानावी तर कशाची? तिच्यावर प्रेम केल्याची? की ती माझी होऊ शकली नाही याची? ती मिळाली मला म्हणजे माझे प्रेम सफल झाले, कसे म्हणता येईल असे? किती महान प्रेमकथांची मिलनात सांगता झाली? प्रेम हे कदाचित अधुरेच असावे लागते, महान होण्यासाठी... माझे प्रेम अधुरेच आहे, नाकारत नाही मी. पण महानही आहे.सगळ्या महान प्रेमकथा या अधुऱ्याच आहेत.म्हणूनच कदाचित, प्रेम या शब्दात एक अर्धा शब्द आहे.प्रेमाचे अधुरेपण दर्शवणारे. आणि प्रीती , प्यार, इश्क, मोहब्बत सगळ्या शब्दांत कसा काय किमान एक अर्धा शब्द आहे? पण या शब्दांत एक जोडाक्षरपण आहे. दोघे सोबत असतील तर ते प्रेम.कोणतेही  एक नसले तर शब्द पूर्ण होणार नाही.मग मी पुन्हा एक प्रयत्न करावा का? दोघांचे मिळून एक प्रेमाचे जोडाक्षर बनवावे का? 

गपाक :-
                    बाजाराचा कालचा दिवस 

  बाजाराचा काल  दिवस होता........
 मित्रांसोबत एक फेरी मारावी म्हणून निघालो..........
 आणि समोर ती उभी होती.......
 लाल ड्रेसमध्ये........
 कातील दिसत होती !!!!!
 एक कटाक्ष टाकला.......
 तिने माझ्याकडे फक्त....
 आणि मी घायाळ झालो.........
 काय सांगू यार मी, तिची एक-एक अदा........
 म्हणजे उधाणलेला वसंत !!!!!!
 मी हा असा गबाळ...........
 ती माझी कशी होईल........
 आम्ही बघावीत फक्त दिवास्वप्ने..............
 तिची दुनियाच वेगळी.........
 माझ्या नशिबी फक्त एक चोरटी झलक........
 चंद्रप्रकाशाची सवय असलेल्या चांदण्या सुर्यासोबत राहतील का?
 मनाच्या आकांक्षा फेर धरून नाचतील का?
 ती उद्या कदाचित कुणाचीतरी होईल.......
 माझे प्रेम अधुरेच राहील........
 खंत मानावी का मी?
 मानावी तर कशाची?
 तिच्यावर प्रेम केल्याची?
 की ती माझी होऊ शकली नाही याची?
 ती मिळाली मला म्हणजे माझे प्रेम सफल झाले.........
 कसे म्हणता येईल असे?
 किती महान प्रेमकथांची मिलनात सांगता झाली?
 प्रेम हे कदाचित अधुरेच असावे लागते.......
 महान होण्यासाठी...
 माझे प्रेम अधुरेच आहे............
 नाकारत नाही मी............
 पण महानही आहे.......
 सगळ्या महान प्रेमकथा या अधुऱ्याच .....
 म्हणूनच कदाचित........
 प्रेम या शब्दात आहे एक अर्धे अक्षर ........
 दर्शवणारे प्रेमाचे अधुरेपण ........
..... आणि प्रीती , प्यार, इश्क, मोहब्बत........
 सगळ्या शब्दांत कसे काय किमान एक
अर्धे अक्षर आहे?
.......पण........
 .....पण या शब्दांत एक जोडाक्षरपण आहे.......
 दोघे सोबत असतील तर ते प्रेम........
कोणतेही  एक नसले तर शब्द पूर्ण होणार नाही.........
मग मी पुन्हा एक प्रयत्न करावा का?
दोघांचे मिळून एक प्रेमाचे जोडाक्षर बनवावे का? 

    या उदाहरणानंतर  गपाकबद्दलच्या  आपल्या सर्व शंकांचे निरसन झाले असेलच. आता आपणही घरच्याघरी गपाक पाडू शकता.
पाडण्याची सवय झाल्यास हळूहळू आपण कविता करू शकता. कित्येक "पाडाडे" पुढे यशस्वी "कर्ते" झाल्याची उदाहरणे आहेत. तथापि आम्ही आपल्याला सदैव पाडाडे राहण्याचे सुचवतो.
    
होममेड चविष्ट यपाक आणि गपाक यांच्या प्रतीक्षेत...
                                                                               आपला स्नेहांकित,
          स. दा. हितकरे      
                                                                                      

    

एक पाडलेली कविता-बाबा बोंगाळे महात्म्य !

आता या ६ तारखेला, जाम बोर मारत होतं.मग सौरभला पिंग टाकली. त्याला  सहजच म्हटले ," एखादा विषय सुचव, मग त्यावर मी कविता पाडतो. " पठ्ठ्याने विषय सुचवला " सौरभ महात्म्य !" हा स्वतःची महती वाचायला उत्सुक होता तर !! मी विचार केला, "कविता तर "पाडायचीच" आहे, मग विषयाचे काय tension घ्यायचे ! यमकाला यमक जुळवून पाडायला सुरुवात करू या की ! तसेही  उसाच्या I .T . मळ्यात काम करणारया आपल्या या मित्राबद्दल चार ओळी खरडायचे मनी होतेच. मग काय, लागलो आम्ही  कविता पाडायला!!!(हा शब्द आला की मला उगाचच एका "सुगंधी पार्श्वक्रियेची" आठवण येते.)१२ मिनटात कविता टायपून तयार !!!

इशारा :-
 
 १. ही कविता निखळ मनोरंजनाच्या हेतूने जाणीवपूर्वक "पाडलेली" आहे, उगाचच साहित्यिक मूल्य वगैरे शोधण्याच्या भानगडीत पडू नये.
२ .इथे व्यक्त केलेल्या मताशी कवी सहमत असेलच असे नाही. इथे ओळी फक्त पाडल्या आहेत, कवीच्या भावना,मत वगैरे संवेदनशील गोष्टींना यात थारा नाही.
३. ही कविता सौरभच्या अनुमतीने प्रकाशित करण्यात येत आहे. चारित्र्यहनन वगैरे झाले म्हणून सौरभच्या वतीने स्वतःच अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा दीडशाहाणपणा करू नये. सौरभला हरकत नाही तर मग तुम्हाला कशाला असायला पाहिजे.    कुठेतरी, कुणाचेतरी  हरवलेले  निरागस  पोर ....  घाबरतो  समोर  दिसताच  भलामोठा  ढोर....
आर्त  स्वर  त्याचा  ऐकुनी , "बाबा , बाबा " ....धावत  येतो  तोची  बोंगाळे  बाबा ||१||

  कुठे  अडकलेली  शोडशवर्षी  ललना ..  गावगुंडांनी  त्रस्त  ती , कुणी  तिची  मदत  करेना ... करते  ती  धावा, "ये  ये  दादा " ..   धावत  येतो  तोची  बोंगाळे   बाबा ||२||
  काय  लीला  वर्णू  मी  ती  ..  आणि  गावी  किती  महती ..  सर्व  कुमारींचा  दादा  अन  सर्व  अनाथ  बालकांचा  बाबा ..  सद्गुणाची  खाण  तोची  बोंगाळे  बाबा ||३||
  माचाफुकोचा  दोस्त  तो  ...  बघा  कसा  दात  काढून  हसतो ..  मौक्तिकपंक्ती  विको  वज्रदंती  ची  आठवण  देती ..... आणि  झुळूक  श्वासाची  डास -चिलटे  मारती ||४||
  
 महात्म्य  जयाचे  सरता  सरेना ....  वर्णन्यास्तव  आता  शब्द  उरेना .... गावे  जयाचे  स्तोत्र  निशिदिनी, काशी ते काबा ..  स्वामी बाबाकांत  तोची सौरभ बोंगाळे  बाबा  ||५||


जाहिरात :- 
                         कवी  ता. पाडे & सन्स कवितावाले
       (उत्कृष्ट पाडलेल्या कविता अगदी वाजवी दरात, ताबडतोब मिळण्याची एकमात्र जागा  !! )

इथे मागणीप्रमाणे कविता पाडून मिळेल. वैयक्तिक, वैश्विक, सामाजिक, असामाजिक, आर्थिक,पारमार्थिक, वैज्ञानिक, आध्यात्मिक,   मार्क्सवादी, भांडवलवादी , डाव्या, उजव्या, भगव्या, लाल, हिरव्या, निळ्या सर्व प्रकारच्या कविता पाडून मिळतील, तत्काळ सेवेची हमी. 

सुचना :-
 
१. प्रत्येक कविता पाडण्याचे दर निश्चित आहेत. घासाघीस करण्याचा चिकटपणा करू नका.उगाचच  वेळ खाऊ नका. आमचा वेळ अमूल्य आहे, तुमचा नसला तरी !
२. सांगितलेल्या वेळेतच कविता मिळेल. आधीच कविता मागण्याची घाई करू नका. आम्हाला रिकामटेकडे समजू नका. कामं आम्हालाही असतात, फक्त तुम्हालाच नाही.
४. एकदा पाडलेली कविता परत घेतली जाणार नाही. तेव्हा विचार करून order द्या. देवाने डोके विचार करण्यासाठी दिले आहे,धडावर शोभून दिसते म्हणून नव्हे.
५. आमची शाखा कुठेही नाही.
 ६. सकाळी १० - ६  या वेळेत कविता पाडण्याची order स्वीकारली जाणार नाही.

                                                                    -- प्रोप्रा. कवी ता. पाडे

आझाद काश्मीर आणि अरुंधती रॉय

         बहुसंख्य भारतीयांना वाटते की सगळे जम्मू-काश्मीर राज्य म्हणजेच काश्मीर.त्यामुळे कुणी जम्मू किंवा लडाखला जाऊन आला की म्हणतो, सध्या तर काश्मीरात शांतता आहे.चूक, शांतता लडाख आणि जम्मूत आहे, काश्मीरात नाही.जम्मू आणि काश्मीर राज्य मुळात तीन वेग-वेगळ्या प्रदेशांचे आहे- जम्मू (हिंदू-६६%), लडाख(बौद्ध -५०%,मुस्लिम-४६%) आणि काश्मीर(मुस्लिम-९७%). आझाद काश्मीरची चळवळ चालू आहे काश्मीर खोर्‍यात; जम्मू आणि लडाखची जनता भारतासोबत खूष आहे.ते स्वतःला भारतीय मानतात. मात्र आझाद काश्मीरची चर्चा करतांना असे चित्र उभे केले जाते(मिडियात तर हमखास!) की सगळ्या राज्याला स्वातंत्र्य हवंय. फ़ुटीरतावादी नेतेसुद्धा शिताफीने काश्मीर खोर्‍याचा प्रश्न सगळ्या राज्याला लावतात आणि सगळे राज्यच पेटत असल्याचे चित्र आपल्य़ा डोळ्यासमोर उभे राहते.
    
     काश्मीर खोरे नेमके कोणते:- 
          काश्मीर खोर्‍याचा एकूण आकार 4700 sq. km आहे, १३० किमी लांब आणि ३२ किमी. रुंद(संदर्भ- विकीपिडीया), म्हणजे जम्मू-काश्मीर राज्याचा २.१% फक्त. सगळ्या समस्यांचे मूळ इथे आहे. या छोट्याशा भूभागामुळे सार्‍या देशात वाद होतोय, गैरसमज पसरवले जातात,मानवाधिकारवाले भारत आणि सैन्याविरुद्ध गरळ ओकतात.

     काश्मीर खोरे आकाराने अतिशय लहान आहे आणि जर ते स्वतंत्र झाले तरी फार काळ टिकू शकणार नाही याची जाणीव गिलानीला(फ़ुटीरतावादी नेता) आहेच. म्हणून तो आझाद काश्मीरची मागणी करतांना जम्मू आणि लडाखच्या लोकांचे काय मत आहे ते जगासमोर येऊ देत नाही, तसेच एकदा काश्मीर स्वतंत्र झाले की त्याला पाकिस्तानसोबत जोडायचे हा त्याचा hidden agenda आहे. तो जाणीवपूर्वक काश्मीरींमधे आझादीचे बीज पेरतोय. आझादीला विरोध नसावा, पण ते स्वातंत्र्य खरंच टिकणार का?त्याने राहणीमान चांगले होणार का? शांतता राहील का? या सर्व बाबींचा विचार काश्मीरी जनतेने करावा.जर तसे होणार नसेल, स्वतंत्र झाल्यावर पाकचे बाहुले बनणार असेल तर या आझादीला अर्थ नाही.
    काश्मीर जर वेगळा करायचाच आहे तर फ़क्त "काश्मीर खोर्‍याला" करा. त्यांची मते जम्मू आणि लडाखच्या लोकांवर लादू नका.काश्मीर खोर्‍यात जर जनमत चाचणी घेतली आणि ती आझादीच्या पक्षात असली तर ते मत फक्त काश्मीर खोर्‍यातल्या लोकांचेच असेल; जम्मू आणि लडाखचे नाही. जनमत चाचणी घ्यायचीच असेल तर ती जम्मू, लडाख आणि काश्मीर अशी वेगळी घ्यायला हवी. फक्त काश्मीर खोरे तेवढे आझादीच्या बाजूने जाईल.
     हा सगळा घोटाळा दूर करण्याचा एक सोपा उपाय आहे - जम्मू आणि लडाखचे वेगळे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनवा.(लडाखच्या लोकांची केंद्रशासित प्रदेशाची मागणी आहेच आणि जम्मूच्या लोकांनापण वेगळे राज्य हवे.) तिथल्या लोकांचा भारतीयांना विरोध नाहीना? मग ते article 370 वगैरे त्या प्रदेशातून काढून टाका.त्या प्रदेशांचा जोमाने विकास होऊ द्या. ते स्वतःला भारतीय समजतात मग काश्मीरी (आझादी मागण्यार्‍या)मुस्लिमांच्या बंडाची शिक्षा त्यांना का मिळावी? काश्मीरचे वेगळे राज्य असू द्या. काश्मीरला आता ज्या सुविधा मिळताहेत त्या तशाच राहू द्या.त्यांना grater autonomy द्यायलापण हरकत नसावी. शेजारचे जम्मू-लडाख विकास करत आहेत, शांत आहेत हे बघून आझादीचे तुणतुणे वाजवणार्‍या काश्मीरींना जराशी अक्कल येईलच. आपण ह्या गिलानी-फिलानींच्या नादी लागून स्वतःच्या पोरांच्या भविष्याचे वाटोळे करत आहोत हे त्यांच्या लक्षात येईल. आझाद काश्मीर फ़ार काळ तग धरून राहू शकत नाही हे त्यांच्या लक्षात यायला हवे.सामान्य काश्मीरींना "आझाद काश्मीर" हवाय, पाकिस्तानची कशी वाट लागलीय त्यांना माहीत आहे, त्यामुळे आता त्यांना पाकिस्तानात जाण्यात रस नाही. मात्र गिलानी वगैरे केवळ पाकिस्तानी आहेत.ते आझादीचे फक्त गाजर दाखवत आहेत या लोकांना.
     जर समजा काश्मीर वेगळा झालाच तर तो एक अतिशय छोटा देश असेल(भूटानच्या दशमांश). सम्पूर्ण जम्मू आणि काश्मीर राज्याच्या फ़क्त २.१% .. असा हा चिमुकला देश, एका बाजूने पाकिस्तान गिळायला टपलेला,किती काळ सार्वभौम राहू शकतो ?? कश्मिरी लोकांना कळत कसे नाही की जर ते स्वतंत्र झालेच तरी फ़ार काळ "सार्वभौम" राहू शकणार नाहीत... आणि आझादीचे गाजर गिलानी एका विशिष्ट हेतूने दाखवतोय. POK तल्या लोकांचे जिणे पाहा. मानवाधिकाराचे जेवढे उल्लंघन POK मधे होतंय त्यामानाने भारतातल्या जम्मू-काश्मीर राज्यांत काहीच होत नाही. भारतात लाख पटीने चांगले जीवन आहे पाकपेक्षा.. 

            अरुंधती रॉय खरेच विचारवंत आहे? :-


          ठीक आहे मी मान्य करतो की कश्मिरी लोकांना स्वातंत्र्याच्या गाजराची बाग दाखवून भडकवत आहेत, पण हे आपले so called विचारवंत(बुद्धीजीवी म्हणतात हिंदीत- कदाचित स्वतःचीच बुद्धी खाऊन जगत असल्याने बुद्धीजीवी! बुद्धी खाऊन संपली यांची) यांना तर समजायला हवं. म्हणे कश्मिर तहामुळे भारतात आला!! अरे भारत मुळातच संस्थानांत पसरलेले देश होते. लोहपुरुषांनी सगळी संस्थाने विलीन केलीत.अशाने तर सगळ्या प्रदेशांनी भारतातून वेगळे व्हावे. भारत हा सीमारेषेने,धर्माने बांधलेला देश नाही तर तो एका सांस्कृतीक वारशाने बांधलेला देश आहे. सध्याचा भारत हाच फ़क्त भारत नाही तर पाकिस्तान,बांग्लादेश आणि नेपाळ पण भारतच आहे.(श्रीलंका सुद्धा कदाचित). नेपाळ वेगळे राष्ट्र बनले कारण तो भाग कधीच ब्रिटिशांच्या ताब्यात आला नाही.तिथे राजेशाही अबाधित राहिली. जर तो भाग ब्रिटिशांखाली आला असता तर ४७ नंतर नेपाळसुद्धा भारतात आले असते.(धर्म,संस्कृती, लिपी,भाषागट सगळे सारखेच). त्यामुळे कश्मिरात मुस्लिम राहतात म्हणून त्याने वेगळा व्हावे, तो त्यांचा हक्क आहे, तो कधी भारताचा भाग नव्हताच मुळी म्हणणे म्हणजे जिनाचा वारसा चालवणे आहे. अरुंधती रॉय जिनाचीच री ओढतेय. आणि तिला support करणारे इतर विचारवंत मूर्खच.. भारतीय मुस्लिम अरेबियातून आलेले नाहीत( ५% आले असतील फारतर), ते इथलेच, हीच त्यांची मातृभूमी, मग त्यांनी ’तिकडे’ loyalti दाखवणे मूर्खपणाचेच( सगळेच मुस्लिम तसे नाहीत. मी आझादीवाल्यांची गोष्ट करतोय). जपान -चीनमधे बौद्ध आहेत म्हणून काय ते भारताशी सलगी करतात काय? (चीन तर भारताचा शत्रू !!).जम्मू आणि लडाखप्रमाणे कश्मिर हाही भारताचाच घटक आहे, कारण सांस्कृतिक वारसा एक आहे. हे सगळे मुद्दे त्या अरुंधतीला आणि आझादीवाल्यांना सांगा रे कुणीतरी..... 

       बरेचसे आझाद काश्मीरवाले "काश्मीर" हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहील अशी ग्वाही देतात आणि काश्मिरी पंडितांना(KP) परत येण्याचे आवाहन करतात.कुणीही काश्मीरी पंडित परतला नाही ह्यावरुनच यांच्या आवाहनाचा बेगडीपणा दिसून येतो. जर यांना KP परत काश्मीरात आणायचे आहे तर त्यांना हाकलून कसे काय लावले बुवा ? धर्मनिरपेक्ष आझाद काश्मीरची ग्वाही देणे तर निव्वळ हास्यास्पद आहे.जगात धर्मनिरपेक्ष मुस्लिम राष्ट्र किती आहेत?? १-२-३??(मला माहीत नाही, कृपया सांगा) आणि धर्मनिरपेक्ष मुस्लिम राष्ट्र नेमके किती "धर्मनिरपेक्ष" आहेत?
    धर्म हा देश बनवणारा मुद्दा बनू नये तर संस्कृती बनावी.. वाईट वाटते की आपल्या सांस्कृतिक बंधांपेक्षा धर्माला जास्त महत्त्व देउन देशाचे तुकडे पाडत आहेत. कैलास यात्रेला जातांना आता विसा लागतो, कदाचित अमरनाथ यात्रेलापण लागेल...   
       भारताने एकदा माघार घेतली की यांची हाव वाढत जाईल यात शंकाच नाही.पण कधी-कधी वाटते की देशात शांतता आणण्यासाठी काश्मीर खोर्‍याला जाऊ द्यावे.मग त्यांना त्यांची चूक लक्षात येईलच.ते रडत बसतील.पण बाकी आपल्या देशाची ह्या वादापासून सुटका तर होईल.(अर्थात हे उद्गार हतबलतेचे आहेत, सरकार काहीच तगडे पाऊल उचलत नाही आहे ना !  ) ह्या देशद्रोह्यांविरुद्ध सरकार काहीच कारवाई कशी करत नाही?
        काश्मीर खोरे(& not jammu-ladakh) जर वेगळे झाले तर ते एक failed state आणि पाकिस्तानच्या हातचे बाहुले असेल.आता त्यांना जी "आझादी " भारतात मिळत आहे ती "आझाद काश्मीरातपण" मिळणार नाही.( देव,अल्ला,god ह्यांना(आझादीवाल्यांना आणि अरुंधति वगैरे विचारवंतांनापण) सदबुद्धी देवो...) 

जॉनी ऍपलसीड


    लहान असतांना "The Wonderworld of Science" या पुस्तकाचे मराठी अनुवाद "विज्ञानाचे नवलपरीचे जग" वाचले होते,नक्की कोणता भाग ते आठवत नाही.हे पुस्तक मला जाम आवडायचे. कित्येकदा पारायणे केली असतील.
खरं तर मी लिहिणे-वाचणे शिकल्यावर वाचलेल्या पहिल्या ५ पुस्तकांतले एक म्हणजे हे पुस्तक.लहान मुलांना लक्षात ठेवूनच लिहिलेले असल्याने विज्ञानाच्या छोट्या छोट्या गोष्टी, सिद्धांत सोप्या भाषेत समजावल्या होत्या.खूप उदाहरणे होती.या पुस्तकामुळे विज्ञानाची गोडी अगदी लहान वयातच निर्माण झाली आणि का? व कसे? यांचे समाधान लहान वयातच झाले. १९४०-५० च्या दशकात ते पुस्तक लिहिलेले होते. मराठी अनुवाद कुणी केला होता ते आता आठवत नाही पण हे पुस्तक मूळ इंग्रजी असेल अशी शंकाही न येण्याइतका सुरेख अनुवाद होता.
     या पुस्तकात असलेल्या अनेक छोट्या कथांपैकी एक म्हणजे जॉनी
ऍपलसीडची कथा.अठराव्या शतकाच्या सुमारास हा भटक्या एकहाती सफरचंदाचे बगीचे उभारत भटकायचा.डोक्यावर टीनाचे टोप आणि खांद्यावर एक काठीला टांगलेली सफरचंदाच्या बियांची पिशवी असे एक रेखाचित्रही होते. याने जेथे सफरचंदाच्या बागा लावल्या तेथे पुढे लोक राहू लागलेत आणि नव्या वसाहती बनल्या असा काहीसा उल्लेख होता.
  परवा अचानक या जॉनीची आठवण आली आणि म्हटलं जरा विकीभाउला विचारून बघू. अपेक्षेप्रमाणे विकीने निराश नाही केले. पुस्तकातल्या महितीहून अधिक आणि जराशी वेगळी माहिती मिळाली विकिवर. म्हणजे त्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे तो डोक्यावर पात्र घालून बिया पसरत भटकत नव्हता तर तो व्यवस्थित नर्सरी लावून जायचा. या एका माणसाने ओहायो,इंडियाना आणि इलिनॉय या अमेरिकेतल्या राज्यांत सफरचंदाचा प्रसार केला; आणि हा मिशनरीपण होता.
     २६ सप्टेंबर १७७४ ते १८ मार्च १८४५ ही त्याची कारकीर्द.खरे नाव जॉन चॅपमन पण त्याच्या सफरचंदाच्या वेडामुळे त्याला जॉनी
ऍपलसीडच म्हणायचे.हा पुढे अमेरिकन लिजंड्समध्ये गणला गेला. ऍपलसीडवर पुस्तकं निघालीत आणि डिस्नीने एक ऍनिमेशनपट काढला.   
     असो, तुम्हाला जर जॉनी ऍपलसीडबद्दल माहिती हवी असेल तर विकिवर वाचू शकता.(टिचकी मारा) मी आता त्याचा मराठी अनुवाद करत नाही,माझा मूड नाही सध्या :-D !!!
    
जॉनी ऍपलसीडची कथा वाचून मलासुद्धा आपण भारतभर भटकत आंब्याची झाडे लावावीत असे स्वप्नं पडायचे. :-D हे अशक्य नक्कीच नाही. जिद्द नाही माझ्यात तेवढी. 
  [भविष्यात जर खरंच मी आंब्याची झाडं लावत हिंडलो तर माझे नाव काय असेल ?? "संकेत आम्बाकोय" ?? आणि संत्रं लावलीत तर "संकेत संत्राबीज" ?? (हे pj वहिनीसोबत ऍपलसीडबद्दलच्या गप्पा मारताना मारले होते.) ] 
    जर एकाच चांगल्या ध्येयाचा चिकाटीने पाठपुरावा केला आणि त्यासाठी आपले आयुष्य वेचले तरीदेखील अमर होता येते हा आपला जॉनी ऍपलसीड शिकवून जातो.हे काम कुणीही साधारण व्यक्ती करू शकतो.सध्यापण कित्येक जॉनी ऍपलसीड आपल्यात आहेत.राजस्थानमध्ये पाण्यासाठी काम करणारे श्री. राजेंद्र सिंगजी, नोबेल पुरस्कार मिळालेल्या वंगारी मथाई(यांना वृक्षारोपणासाठीच मिळालाय !), झिम्बाम्ब्वेमध्ये लाखो झाडं लावणारे Marthinus Daneel, केरळमध्ये एकहाती जंगल उभारणारे श्री. अब्दुल करीम आणि महाराष्ट्रात संगमनेरपाशी दंडकारण्य चळवळ चालवणारे वयोवृद्ध श्री. बाळासाहेब थोरात हे सगळे जोंनी ऍपलसीडचाच वारसा चालवत आहेत.सामान्यातलं असामान्यत्व दाखवणारे हे सगळे चालतेबोलते उदाहरण! ह्यांच्यापाशी असलेली जिद्द, चिकाटी,संयम माझ्यापाशी नाही म्हणून या सर्व रियल लाईफ हिरोंना माझे नमन!!
    जरी मी ह्यांच्याइतकी मोठ्या प्रमाणात झाडे लावू शकत नाही तरी पर्यावरणाचा कमीत कमी नुकसान करण्याचा प्रयत्न करतच असतो.
    जर आपण किमान विकांताला जॉनी
ऍपलसीड बनण्याचा प्रयत्न केला तरी बरीच हिरवळ येईल. "थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात" ना त्याप्रमाणे प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तरी बरेच काही साध्या होऊ शकते. सगळे आयुष्य फकीरासारखे जगता येत नसेल पण आपण किमान थोडी काळजी घेतली,थोडी जागरुकता दाखवली तरी या लोकांना एकाकी लढावे लागणार नाही.

 
जाता जाता :- हा लेख जॉनी ऍपलसीडची माहिती द्यावी म्हणून लिहिला नाही तर भविष्यात(सध्यातरी मी 'प्रयत्न' करत असतोच.) मी पर्यावरणासाठी काहीच भरीव किंवा "खारी"व(खारीचा वाटा असलेले) केले नाही की हा लेख वाचून मला शरम यावी आणि मी ते करावे अशी प्रेरणा मला मिळावी म्हणून लिहिला.
(पर्यावरणावरून आठवले आम्ही आमच्या घरातल्या सगळ्या कचर्‍याचे आणि निर्माल्याचे गान्डूळखत बनवायचो, आणि आमच्या झाडांना वापरायचो. आता सगळी पांगापांग झाल्याने ते बंद पडले आणि आता घंटागाडी येते की कचरा गोळा करायला! घरातल्या बर्‍याच गोष्ठी रिसायकल व्ह्यायच्या, अजूनही होतात(उदा. जुन्या फाटक्या साड्यांचे पायपोस,कव्हर वगैरे बरेच काही). माझ्या घराचे कार्बन फ़ूटप्रिंट बर्‍यापैकी कमी होते
.(सध्या थोडे वाढलेय असा अंदाज आहे.) गरजा कमी असल्या की आणि उपलब्ध साधनांचा पुनर्वापर करण्याचे प्रमाण वाढवले की तो आपोआप कमी होतो आणि नकळतच पर्यावरणाची रक्षा होते. झाडे लावता येत नसतील तर किमान याद्वारेतरी थोडी पापं फेडता येतील.पण आधुनिकतेच्या नावावर(उदा. use & throw) आपण पर्यावरणाचे भरमसाठ नुकसान करतोय. मला अपराधीपणाची भावना नेहमी बोचत राहावी म्हणून हा लेखप्रपंच.)

    माझ्या मनात दडलेला
जॉनी ऍपलसीड कधीच मरू नये. 

   [ पोस्ट भरकटत गेलीय मान्य आहे, जसे विचार मनात आले तसे लिहित गेलो.]

देवबाप्पा सचिन निवृत्तीनंतर (कल्पनाही करवत नाही !)


     काही वर्षांपूर्वी (जास्त दूर जायची गरज नाही, ३-४ च झाली असतील) ,नेमेची यायचा  क्रिकेट सिझन आणि नेमेची चर्चा व्हायची देवबाप्पाच्या निवृत्तीची. "शेर अब बुढ़ा हो गया हैं !"  थोबाडीत मारलीये सचिनने त्यांच्या. आता बघा ना ; २००६ ला  एक  बोका सचिनच्या जखमांवर मीठ चोळत होता. आता मात्र कसे त्याचे दात त्याच्या घशात गेलेत. जखमांनी त्रासलेल्या सचिनला मानसिक आधार देण्याऐवजी हा 'सिक' बोका " मेरी बिल्ली मुझीसे म्याऊ" म्हण सार्थ करत होता .अरे , तुझ्या अवेळी संपलेल्या कारकिर्दीचे खापर सचिनच्या हेल्मेटवर कशाला फोडतोस ? त्याने तेव्हाच hellशी आपली meeting निश्चित केली! मग २००७ ला सचिनवर ऑस्ट्रेलियातून एक चप्पल भिरकावली गेली, "सचिनने आता निवृत्त व्हावे . तो आपल्याच खेळाची सावली बनलाय आता. " त्याच्या भावाने पण त्याच्या चपलेवर चप्पल ठेवत देवबाप्पाच्या प्रामाणिकतेवरच  शंका घेतली .अरे , तू कोचिंग करायचे पैसे घेतले होतेस कि टीम फोडण्याचे ? न्यूझीलंड विरुद्ध ८०-८१ मध्ये आपल्या भावाला underarm टाकायला लावून खिलाडूवृत्तीचे मस्त दर्शन घडवले होतेस !! किती म्हणून उदाहरणे द्यायचीत ? सगळे बघा आता कसे गप्प झालेत !!
       मी सचिनचा नेहमीच डाय हार्ड पंखा राहिलोय ,ते फक्त त्याच्या खेळामुळे नव्हे तर त्याच्या स्वभावामुळे .आदर्श खेळाडू , नव्हे आदर्श माणूस कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे सचिन. प्रसिद्धीच्या शिखरावर असतांना आणि सारी दुनिया तुमच्यावर टीका करते तेव्हादेखील कसे वागावे याचे आदर्श म्हणजे सचिन. ज्याने त्याच्यावर टीकेचा बाउन्सर फेकला तो सहज मैदानात टोलवत त्याच्या घशात टाकणारा खेळाडू सचिन ,मैदानाबाहेर एक शब्दही बोलणार नाही . सगळे उत्तर बॅटने देणारा सचिन, कदाचित म्हणूनच तो १० वी ला नापास झाला असणार !
सचिनच्या या  बॅटने उत्तर द्यायच्या सवयीमुळे तो अनेकांचे सोपा लक्ष्य राहिलाय. कुणीही यावे आणि टपली मारून जावे असा काही प्रकार वरचेवर सचिनसोबत घडत असतो. एक पत्रकार खेळीया (हा शब्द त्या पत्रकाराचाच शोध बरे का ? आणि तो पठ्ठा स्वतःचा खेळीया आहे !) सचिनवर आपल्या "मुखाद्वारे मलनिस्सारण " करण्याचा प्रयत्न करून स्वतःच्या डोक्यात भिनलेल्या मलकेमिस्ट्रीचे रासायनिक पृथःकरण कागदावर मांडतो. त्याला माहित असते सचिनवर टीका म्हणजे आपली फुकट प्रसिद्धी.. अरे पण सूर्यावर थुंकशील तर तुझाच चेहरा घाण होईल रे! सचिनसारखा प्रसिद्ध होऊ शकणार नाहीस तर किमान त्याचासारखा माणूस बनण्याचा प्रयत्न तरी कर !    
      एकेकाळी भारतीय क्रिकेट संघ म्हणजे " सचिन + नियम आहे म्हणून ठेवलेले इतर १० खेळाडू " असा होता. सचिनच तेवढा खेळायचा , बाकी सारे हजेरी लावून परतायचे, आणि हे  म्हणायचे सचिन सामना जिंकवू शकत नाही !! त्याच्यामुळेच तर तुम्ही ते थोडे  सामने जिंकले होते रे !! पुढे सौरभ आला, सेहवाग आला, सचिनच्या डोक्यावरचे ओझे किंचीत कमी झाले. कित्येकांचा आवडता खेळाडू बदलत राहिला , त्यांच्या प्रवास सचिन ते सेहवाग व्हाया गांगुली असा होता . पण माझ्या मनात सचिनच देवबाप्पा राहिला. सचिनच्या पडत्या काळात त्याला धीर देण्याऐवजी त्याचे मनोबल खच्ची करणारी जमात पाहिली, मुंबईच्या सामन्यात त्याला घराचा आहेर दिला यांनी . माय-बाप म्हातारे झाले म्हणून वृद्धाश्रमात ठेवणारे याच जमातीचे.. " जो तो वंदन करी उगवत्या " या म्हणीची प्रकर्षाने जाणीव सचिनच्या त्या दिवसांमध्ये झाली . 
      सचिन रमेश तेंडूलकर - क्रिकेटचा देव !! तो आहे तोपर्यंतच जिंकण्याची संधी आहे हे जाणून असलेला सबंध भारतवर्ष आणि तो बाद होऊ नये जलसमाधी घेतलेले ३३ कोटी देव ! अशी जादू याआधी कोणत्या खेळाडूने केली होती ? तो बाद होऊ नये म्हणून केले जाणारे अंधश्रद्धा प्रकारात मोडले जाणारे उपाय !! सचिन शतकाच्या उंबरठ्यावर आला की मी त्याला जाम शिव्या घालतो. " हा काय खेळणार आता ! हा सेंचुरी मारूच शकणार नाही बघ ! नाही मारत रे तू आता सेन्चुरी सचिन !! केलीस तर मानेन बुवा तुला !! " असे काही म्हटले की सचिनला चेव येतो  आणि तो सेन्चुरी करून दाखवतो असे मला वाटते. सचिनच्या शतकांच्या अविश्वसनीय संख्येचे कारण माझ्या या शिव्या आहेत असे माझे ठाम मत आहे . प्रत्येक सचिनभक्ताचे असे काही उपाय असतीलच, जर नसतील तर मला तुमच्या भक्तीवरच शंका आहे .
        आता शेवटच्या उंबरठ्यावर तर सचिनची खेळी कैच्याकै बहरली आहे. पिकलेल्या फळासारखं आहे तो , अवीट गोडीचा. त्याची खेळी बघतांना अंगावर शहारे येतात. एक वेगळाच आनंद असतो मनात, सगळे दुःख ,सगळ्या चिंता कुठेतरी उडालेल्या असतात . मी तर सचिन खेळत आहे तोपर्यंतच क्रिकेट बघणार.(हा बराच जुना संकल्प आता अधिकच दृढ झालाय .)  सचिनविना क्रिकेटची कल्पनाही करवत नाही.  gentleman's game मधला सचिन हा अखेरचा gentleman आहे . तो आहे खराखुरा "BAT"MAN !! पण सचिनही कधीतरी निवृत्त होणारच !! तो कधीच होऊ नये यासाठी मी देवाला अनंतकाळ जलसमाधी घ्यायला लावली तरीही !! पुढचे वर्ष त्याचे कदाचित अखेरचे असेल  :-(  .    

 सचिन निवृत्तीनंतर काय करावे ??
 
१. IPL :- सुदैवाने या बहाण्याने त्याला खेळताना बघता येईल .

२ . कोच :- सचिन म्हणजे क्रिकेटचे विद्यापीठ, तेही सर्वोत्कृष्ट !! क्रिकेटचे हार्वर्ड , MIT , CAMBRIDGE , IIT ,IIM , जे अव्वल ते सचिन !! सर्वाधिक पिचेसवर खेळायचा अनुभव आहे त्याला. प्रत्येक मैदानाची वैशिष्ट्ये त्याला तोंडपाठ असतील. तो जर कोच झाला तर कदाचित त्याच्या प्रचंड अनुभवाचा फायदा टीमला होईल.

३. सचिन तेंडूलकर क्रिकेट अकादमी :- व्वा व्वा !! प्रत्यक्ष सचिन बॅटिंग शिकवतोय म्हटल्यावर और क्या चाहिये !! त्याच्या अनुभवाचा फायदा सध्याच्या संघात असलेल्या बच्च्यांना होत असल्याची कबुली ते स्वतःच देतात. आणि सचिन
बॅटिंग शिकवतोय म्हटल्यावर तर रांगच लागेल हो !! आमच्यासारखे सचिनभोवती फिरणारे पंखे तर वाटेल ती किंमत मोजायला तयार होतील !!

४ . समालोचक : - मजा नाही ..

५ .
आत्मचरित्र:- निवृत्तीनंतर सचिनने कदाचित  आत्मचरित्र लिहिले तर ते हातोहात खपेल, विक्रीचे सगळे विक्रम मोडेल .

६. क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद वगैरे :- छे छे !! सचिनने या घाणेरड्या राजकारणात पडूच नये .

       निवृत्तीनंतर सचिन एका Legend चे आयुष्य जगणार. माझी पिढी , जी सचिनला खेळतांना पाहत लहानाची मोठी झालीय ती आपल्या नातवंडांना सचिनच्या कथा , त्याच्या खेळ्या bed time story म्हणून , आजोबांच्या गोष्टी म्हणून ऐकवणार ..दंतकथा बनलेला सचिन आम्ही प्रत्यक्ष खेळतांना बघितलाय हे सांगतांना गळणारे दोन थेंब त्यांच्या नकळत पापण्याआड लपवण्याचा प्रयत्न केला जाईल . त्याच्या  रेकॉर्ड करून साठवलेल्या खेळ्यांची पारायणे केली जातील . 
      महागाई, आतंकवाद , भ्रष्टाचार, पगार , रोज झोपेचे खोबरे करणाऱ्या चिंता यांचा विसर पाडायला लावणारी खेळी , अवघ्या भारताला एका सूत्रात बांधण्याची  ताकद असणारी खेळी, करोडो भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची ताकद असलेली खेळी आणि ही खेळी अगदी सहजतेने, क्रिकेटच्या मुलभूत नियमांनी खेळता येते हे दाखवणारा
सचिन रमेश तेंडूलकर !!!  तो फक्त एक gladiator आहे ??? छे छे !! तो ह्याहून बरेच अधिक आहे !!! तो क्रिकेटचा शेवटचा सभ्य खेळाडू आहे !! He is The Last Gentleman of Cricket !!!
    
       निवृत्तीनंतरचा सचिन अजून लिहवत नाहीये माझ्या हातून !! सचिन निवृत्त होऊ नये हीच माझ्या (जलसमाधी घेतलेल्या) देवांकडे प्रार्थना !!


जाता जाता :- सचिनबद्दल बरेच काही लिहीले गेले.....  पण मला आता एक नवीनच सुचले म्हणून मीपण लिहून मोकळा होतो ....

  जगात दोनच प्रकारची माणसे असतात :-

१ . ज्यांना सचिन आवडतो.
२. ज्यांना बरे-वाईट माणूस पारखण्याची बुद्धी नाही. 


( पुण्यात येऊन थोडेच महिने झालेत पण हा " जाज्ज्वल्य अभिमान " रोग मलासुद्धा संक्रमित करत आहे. छ्या !! पुणेकर भलत्याच वेगाने रोग पसरवतात हो !!)

केला होता करार जरी

केला होता  करार जरी मी, नियतीने कधीच पाळला नाही
रात्रच अशी भयाण काळी होती, सूर्य देखील उगवला नाही

दिवस नवा उजाडता, फक्त स्वप्नांचीच लक्तरे
ढगांनीच नेहमी बरसावे, नियम बनला नाही

हातावरच्या रेषा माझ्या,वळत्या हो कुणी केल्या
मार्ग असा नागमोडी,सावलीपण सोबतीला नाही

अस्वस्थ मनाचे हुंदके, सरणावरच अखेर थांबले
अस्थी गोळा करायला, कुणीच कसा थांबला नाही

पापण्या मिटल्या म्हणे, फक्त स्वप्नांच्याच ओझ्याने
पण सूर्य निजलेला दिवसा, मला कधीच दिसला नाही

एन्दिरन स्तोत्र - ३

   -----भाग २ पासून पुढे ----                                                                          भाग १ इथे वाचा       
          
शांतीचा संदेश जरी चिट्टी  वदला । परी तो न कुणा पटला ॥ जगी कायदाच हा भला । निश्चीत असे ॥१०६ ॥
वसीगरनचा पारा चढला । चिट्टीसी घेऊनी आला ॥ बोल बहु  लाविला ।  रागाच्या भरात ॥१०७॥
प्रेम करण्याची केली याचना ।  आणिक जगू देण्याची याचना । परि वसी ऐकेचना । चिट्टीची विनंती ॥१०८॥
जग हे अमानुष खरे । प्रेम करणार्‍याला म्हणती भले-बुरे ।शरण न येती जोवरे । प्रेममार्गी ॥१०८॥
प्रेमाची ही न्यारी किमया । विरोध करते जरी दुनिया ।। प्रसंगी अपुला जीव देऊनिया । प्रेम अमर करती ॥१०९॥
चिट्टीच्या प्रेमाग्रहाने त्रासुनी । वसी आणिक ती तरुणी ।। थकुनि गेले समजावुनी । चिट्टीस त्या ॥११०॥
वसीने निर्वाणीचे निर्णय घ्रेतले । चिट्टीचे अंगविच्छेद केले ॥ मन गहिवरून जाते अपुले । दृष्य बघुनी ॥१११॥
अंग अंग वेगळे होतांना। प्रेमाचीच करी याचना ॥ विट्टीची ही वेदना । पाहवत नाही ॥११२॥
फ़ेकुनि देतो कचर्‍यात । अपुल्या हस्ते निर्मीत ।चिट्टीची ती गत । हेलावणारी ॥११३॥
चिट्टीचा हा अंत नसे खरा । दुष्ट तो डॉ. बोहरा ॥ त्याच्या हाती लागला झरा । विषाचाच बघा ॥११४॥
चिट्टीला जीवनदान दिले । तयासी अपुला केले ॥ त्याला विनाशक बनविले । अपुल्या स्वार्थासाठी ॥११५॥
दुष्टांची ती संगती । अनिष्टच असे अंती । चिट्टीची ती गती । बघा जरा ॥११६॥
यंत्रमानवाचा Version 2.0 आला । चिट्टी हा दुष्ट झाला । मारुनिया बोहराला ।दिले बघा ॥११७॥
सनाचे अपहरण नाट्य बघा । चिट्टीचा हिंसाचार बघा । आणिक तुम्ही बघा । तंत्राची कमाल ॥११८॥
प्रेमवेडा जो असतो । विश्वासी भारी पडतो । हे सत्य तुम्हा सांगतो । साक्षात रजनीदेव ॥११९॥
परि शक्तीहून युक्ती श्रेष्ठ असे । हे जयाच्या मनी ठसे । तोचि विजेता असे । युद्धभूमीवर ॥१२० ॥
चिट्टी अतिप्रगत रोबोट जरी । परि तयाहून भारी ॥ मानवाची बुद्धी खरी । हेचि सत्य ।।१२१॥
प्रबळ झालेला चिट्टी । निर्मीतो सहस्त्र प्रतिचिट्टी । कळपात जसे हत्ती । मदमस्त सारे ॥१२२॥
सना जी विश्वसुंदरी । तिला अपुली राणी करी । तिजकरिता आणली सारी । दुकाने लुटुनिया ॥१२३॥
सनाला वाचविण्यासाठी । चिट्टीला मारण्यासाठी । प्रभावी जी युक्तीचीच  काठी । वसी वापरतो ॥१२४॥
आता कथा मी न सांगावी खरी । तुम्ही ती बघणेच बरी ॥  जी असे अचंबित करणारी । सर्व भूमंडळी ॥१२५॥
ही कथा न भूतो न भविष्यति । यात नाही अतिशयोक्ती ॥ करा करा हो रजनीभक्ती । गजर नामाचा ॥१२६॥
तंत्रज्ञानाची कमाल बघा । रजनीदेवांचे चमत्कार बघा ॥ सह्स्त्ररजनी बघा। पडद्यावरी ॥१२७॥
रजनी एके रजनी । दृष्य असावे लोचनी । दुसरे ध्यानी- मनी । कदापि नसावे ॥१२८॥
रजनीदेवांच्या भक्तांनी । भारतीय सिनेमाभक्तांनी । तंत्रज्ञानभक्तांनी । दर्शनास यावे ॥१२९॥
शेवटच्या अर्ध्या तासात । भक्तांनी यावे तालात । रजनीनामाच्या गजरात । दृष्य बघावे ॥१३०॥
रजनीदेवांचा हा चित्रपट आगळा। रजनीभक्तांसाठी आहे सोहळा । रजनीशत्रूंना येतील भोवळा । चित्रपट बघुनि ॥१३१॥
भारतीय सिनेमाच्या इतिहासात । सिनेमा असा अद्भुत । बनला नाही भूतकाळात । एन्दिरन सारखा ॥१३२॥
हा चित्रपट बघावा । बोध मनी घ्यावा । आणिक अनुसरावा ।संदेश यातला ॥१३३॥
एन्दिरन हा आहे सागर । तयाचे दृष्य करण्या साकार । स्वामी संकेतानन्द लाचार ।समर्थ नसे ॥१३४॥
परि मी प्रयत्न केला ।रजनीदेवांची दाखविण्या लीला । काही चुकल्यास मला ।क्षमा असावी ॥१३५॥
हे स्तोत्र व्हावे अमृत । अवघ्या रजनीभक्तांप्रत । रजनीदेवाने साक्षात ।आशीर्वाद द्यावा ॥१३६॥
रजनीनामाचा गजर करावा । श्रद्धेने स्तोत्र वाचावा । अविश्वास न ठेवावा । या स्तोत्राप्रत ॥१३७॥
रजनीदेवांचा असावा आशीर्वाद । देवाजींचा मिळावा कृपाप्रसाद । मान्य व्हावे निर्विवाद । स्तोत्र हे ॥१३८॥
स्तोत्र करिता पठण । दिसतील त्याचे गुण । प्रसाद म्हणून ग्रहण ।यासी करावे ॥१३९॥
स्तोत्राप्रति सद्भाव ठेवावे । नित्य वाचन करावे । रजनीदेवासी भजावे । प्रतिदिनी ॥१४०॥
रजनीदेवांच्या कृपेने । स्वामी संकेतानन्दांच्या लेखणीने । मुक्कामी शहर पुणे ।स्तोत्र रचियले ॥१४१॥
इसवी सन दोन हजार दहा साली । ऑक्टोबर महिन्यात  स्फूर्ती झाली । आणिक स्तोत्ररचना केली। त्याच महिन्यात ॥१४२॥
रजनीनाम स्मरण करुनी । देवाजी आणुनि लोचनी । ठेवितो ही लेखणी । स्वामी संकेतानन्द ॥१४३॥


॥  इति स्वामी संकेतानंदविरचित श्रीएन्दिरन स्तोत्र: ॥

॥ श्रीरजनीकांतार्पणमस्तु ॥
॥ श्री रजनीकांताय नमः ॥
॥ शुभं भवतु ॥

ग़ज़ल - कुछ ज़ख़्म हमारे ....


कुछ ज़ख़्म हमारे यूँ गहरे हो गये
मरहम लगाया फिर भी हरे हो गये   

दोस्त साथ ना दें तो कोई ग़म नहीं
दुश्मन अब जाँ से भी प्यारे हो गये

नाता तोड़ चुकें  बरसात से भी हम
घर में आसुँओं के फ़वारे हो गये

रेत के महल थे, ढह गये तो क्या ग़म
सूरज की तपन के नज़ारें हो गये

हिसाब भी क्या रखना बिती यादों का
कुछ पल मेरे कुछ तुम्हारे हो गये

तन्हाईयों से दूर भागते रहे
’संकेत’ अब उसी के सहारे हो गये

एन्दिरन स्तोत्र - २

------ भाग १ पासून पुढे ------


दोन विनोदी नर । जे चिट्टीला वारंवार ॥ करण्यासाठी बेजार । प्रयत्नरत ॥५२॥
परि चिट्टी नाही बधला । दोघां धडा  शिकविला ॥ तयांसी बेजार केला । मारूनी पैजारा ॥५३॥
पहा या घटनेतून । मनी घ्या ठासून ॥ कुणा विनोद करून । खिजवू नका ॥५४॥
ते सहकारी राहिले । म्हणून वसीने क्षमा केले ॥ दयाभाव दाखविले । त्या दोघांप्रत ॥५५॥
पहा वसीच्या चित्ती । आहे कणवाळू वृत्ती ॥ हीच खरी शक्ती । मानवाची ॥५६॥
आता चिट्टीच्या लीला । अनुभवी ती बाला ॥ अभ्यास तिज करविला । वैद्यकशास्त्राचा ॥५७॥
देवीच्या नामे गोंधळ । करती जन सकळ ॥ थांबविला तात्काळ । चिट्टीने बघा ॥५८॥
अभ्यास हा प्रथम । मग आले देव-धर्म ॥ हेची खरे मर्म । विद्यार्थ्यांचे ॥५९॥
इतरांना त्रास देउन । ध्वनीप्रदूषण करून ।। देवी ती प्रसन्न । होइल का ॥६०॥
इथे एक संदेश दिला । ध्वनीप्रदूषण करणार्‍याला । धडा शिकविला । देवीरूप दाखवून ॥६१॥
परीक्षा उत्तीर्ण करायला । मदतीचा हात दिला ॥ म्हणूनच ती बाला । उत्तीर्ण झाली ॥६२॥ 
चिट्टी खोटे नाही बोलला । मनुष्यस्वभाव हा भला ॥ कधीच न कळला । भावनाहीन चिट्टीस ॥६३ ॥
मग रेल्वेगाडीच्या करामती । त्या वर्णू मी किती ॥ अशक्य काही जगती । चिट्टीस ना ॥६४॥
दृष्य आधी असले । बघाया ना मिळाले ॥ चित्रपट भारतातले । हे पहिलेच ॥६५॥
चिट्टीच्या करामाती बघाया । आणिक हरखून जाया ॥ धन्य मनुष्यजन्म कराया । अवश्य जाणे ॥६६॥
वैज्ञानिक सगळे गोळा झाले | अचंबित बघू लागले || भान हरखून गेले । चिट्टीला बघुनी ॥६७॥
एक वैज्ञानिक  उभा झाला । चिट्टीस विचारता झाला ॥ देव कोण सांगा मला । तत्काळ हो ॥६८॥
ज्याने मला निर्मीला । वसीगरन माणूस भला ॥ तोची देव झाला । मजसाठी ॥६९॥
टाळ्यांच्या कडकडात । रजनी नामाच्या गजरात ॥ शिट्ट्यांच्या संगीतात । हे दृश्य पाहा ॥७०॥
आपणा जो घडवितो । तोची आपला देव असतो ॥ हा संदेश मिळतो । या दृश्यातून ॥७१॥
गुरु आणि माता-पिता । हेची आपले कर्ताकरविता ॥ म्हणुनि तेचि आता । देव मानावे ॥७२॥
थोर सामाजिक संदेश । दृश्या-दृश्यांतून विशेष ।। आणि गीतेचा सारांश । या चित्रपटात ॥७३॥
वसीगरन हा देशभक्त। सैन्यास देण्या फक्त ॥ अपुले आटवुनि रक्त । चिट्टी निर्मीला ॥७४॥
पण बोहरा वदला । अद्याप पुरा नाही झाला ॥ शोध तुमचा भला ॥ जरी असे ॥७५॥
सारासार विचार । मनुष्याचे आचार ॥ नाहीत हजर । चिट्टीमधे ॥७६॥
पढतमूर्ख हा खरा । कुणी म्हटले मारा ॥ तर होईल हत्यारा । चिट्टी हा ॥७७॥
हा धोका सैन्यासाठी । आणिक मनुष्यासाठी ॥ अद्याप समाजासाठी । उपयुक्त नसे ॥७८॥
यांस न आधारा । हा मत्सर होता खरा ॥ दुष्ट तो डॉ. बोहरा । गुरु असा ॥७९ ॥
मत्सरी लोक जगती । प्रगतीचे वैरी होती ॥ चटकन पाय ओढती । पुढे जाणार्‍याचे ॥८ ०॥
पहा मनुष्यस्वभाव उकलून । दाखविला या घटनेतून ॥ रजनी आहे म्हणून । थोर खरा ॥८१॥
इमारतीत भडकल्या ज्वाला । चिट्टीने जीव वाचविला । तारणहार झाला । अनेकांसाठी ॥८२॥
परि एक घोळ झाला । चिट्टी नाही समजला ॥ स्त्रीशीलाच्या महत्त्वाला । जीव वाचवितां ॥८३ ॥
या घटनेपासून । मनी धक्का खाऊन ॥ चिट्टीला भावना भरून । दिल्या वसीने ॥८४॥
भावना येताच अनुभवाला । चिट्टीत आता बदल झाला । आनंद घेऊ लागला। प्रेमाचा ॥८५॥
प्रेम असे अंतरी । प्रेम असे चराचरी ॥ प्रेम हे बाजारी । मिळत नसे ॥८६॥
चिट्टीने मदतीचा हात दिला । एक जीव जगी आला ॥ सनाने चुंबन दिला । दिट्टीच्या गाली ।।८७॥
प्रेमांकुर फुटले । chip-chip शहारले ॥ प्रोग्रामिंग गडबडले । चिट्टीचे॥८८॥
चिट्टीची ती बघा मेमरी । सनाच्या विचारांनीच भरी । आता काम न करी । प्रोसेसर त्याचा ॥८९॥
आता खेळ सुरू झाला । डॉ. बोहरा वदला ॥ बदल ध्यानी न आला । वसीगरनच्या ॥९०॥
पेमरोग जर झाला । उपाय न तयाला ॥ यंत्रमानव जरी झाला । चिट्टी हा ॥९१॥
मध्यरात्री गेला । सनाला भेटायला ।। तिथे डासाला । धडा शिकविला ॥९२ ॥
डासाचा पिच्छा करत । त्याच्याच भाषेत दरडावत ॥  क्षमा मागाया साक्षात । राजी केले ॥९३ ॥
वेळेचे बंधन नाही । भाषेचे बंधन नाही ।। वेडेपणाची सीमा नाही। प्रेमरोगात ॥९४॥
बघा तो प्रेमपुजारी । डासामागे गटारी ॥ कसा गेला तत्वरी । चिट्टी हा ॥९५॥
प्रभाव असा प्रेमाचा । वसीसोबत वाद भेटवस्तूंचा ॥  सनाच्या वाढदिवसाचा । दिवस तो ॥९६ ॥
सनासोबत नृत्य केले । वसीला नाही आवडले ।। बहु बोल लाविले ।  चिट्टीला ॥९७ ॥
फायदा याचा बोहराने घेतला । चिट्टीला हुशारीने वळविला। वसीच्या नकळतच झाला । हा गंभीर प्रकार ॥९८॥
सैन्यासमोर चिट्टी आला । प्रेम-महिमा कथन केला ॥ युद्ध सोडून द्या वदला । सर्व अधिकार्‍यांस ॥९९॥
प्रेमाचे रूप सुंदर । युद्धाचे परिणाम गंभीर ॥ निर्णय घ्या खंबीर । तुम्ही आता ॥१००॥
आग्रह सोडा हिंसेचा । वर्षाव करा  प्रेमाचा । हाच मार्ग शांतीचा । खरा असे ॥१०१ ॥
बघा संदेश अहिंसेचा । आणिक भूतदयेचा ॥ शांती-सद्भावनेचा । रजनी देतो ॥१०२॥
रजनीदेव बघा महान । सद्गुणांची आहे खाण ।। संदेश किती गहन । चित्रपटात या ॥१०३॥
मूर्खांसी ते न कळती । मनोरंजनास्तव जाती ॥ बोध मुळीच न घेती । या चित्रपटातला ॥१०४ ॥
महान विचारांनी भरलेला । छुपा संदेश असलेला ॥ तत्वज्ञानपर हा भला । वित्रपट बघा ॥१०५ ॥

                                      --एन्दिरन स्तोत्र - ३ वाचायला टिचकी मारा -->

एन्दिरन स्तोत्र - १

श्री गणेशाय नम: हे पार्वतीनन्दन । अग्रपूजा तुझा मान ।। करितो तुज वन्दन । स्वामी संकेतानन्द ।।१॥
व्यासा बुद्धी तुच दिली । तयाची लेखणी चालविली ।। म्हणूनच त्याने निर्मीली । महाभारत काव्यरचना ।।२।।
आता तुज वन्दून । स्तोत्र करितो लेखण ॥ जयाचे नाव एन्दिरन । चित्रपट असे ॥३॥
श्री रजनीकांताय नमः हे देवा रजनीकांता । हे साक्षात अरिहंता ॥ करितो दूर चिंता । अपुल्या भक्तांची ॥४॥
वर्णू मी किती । अशी तव महती॥ तुझीच असे भीती । दुष्टांना ॥५॥
तू हात ठेविला ।तत्त्क्षणी उद्धार झाला ।। महिमा प्रत्ययाला । आला असे ॥६॥
तूच महामेरू । तूच कल्पतरू ॥ दुबळ्यांचा आधारू । तूची असे ॥७॥
तुझिया सिनेमाद्वारे । रजनीभक्तीचे भिनले वारे ॥ तूच तूच  कैवारे ।  आता मज ॥८॥
आता हे रजनीदेवा। तुझा करितो धावा॥ सामर्थ्य मज द्यावा । स्तवनासाठी ॥९॥
तुझा मी भक्त साचा । उदो उदो रजनीनामाचा ॥ mind it मंत्राचा । गजर असो ॥१०॥
तुझी ती संवादफेक । आणि नजर भेदक ॥ धूम्रदंडिका सूचक । तुझ्या ओठी ॥११॥
हे  देवा रजनी । असतो निशदिनी ॥  तुझ्याच चरणी । स्वमी संकेतानन्द ॥१२॥
न दवडिता वेळ । न लावता पाल्हाळ ॥ वर्णितो सकळ । एन्दिरन अवतार ॥१३॥
आले रजनीदेव । लीला करण्यास्तव ॥ एन्दिरन हा तव । अवतारपट असे ॥१४॥
दिग्दर्शन शन्कर करी । रहमान संगीत उद्धारी । सोबतीला विश्वसुंदरी । ऐश्वर्या असे ॥१५॥
सुजाताची पटकथा । वैरामुत्तुची गीतगाथा ॥ संकेत ठेवितो माथा । तुमच्या चरणी ॥१६॥
सन पिक्चर्स द्वारे निर्मीत । भक्तांद्वारे बहुप्रतिक्षीत ॥ अद्भुत आणि आश्चर्यचकीत । करणारी गाथा ॥१७॥
तमिळ भाषेत एन्दिरन । रोबो नामाभिधान ॥ तेलुगु हिंदी कारण । दिले असे ॥१८॥
नामे भिन्न, भिन्न भाषा । परि रजनीदर्शनाची अभिलाषा ॥ भक्तांची निराशा । न होणे ॥१८॥
चिरतरुण देवाजी । द्विभूमिका जयांची ॥ वसीगरन आणि चिट्टी जी । नाम तयांचे ॥१९॥
डॅनी तोच डॉ. बोहरा । गुरु वसीगरनचा होय खरा ॥ परी मत्सराचा वारा । भिनलेला अंगी ॥२०॥
वसीगरन वैज्ञानिक थोर । मोहापासून राहून दूर ॥ संशोधन केले घोर । दहा वर्षे ॥२१॥
सना त्याची मैत्रीण । परी वसीगरन तिजविण ॥ संशोधन कारण । दूर राहिला ॥२२॥
मोहाचा वसीगरनला । स्पर्श नाही झाला ॥ म्हणून त्याने बनविला । अद्भुत यंत्रमानव ॥२३॥
सुखाची कामना । आली नाही मना॥ जरी विश्वसुंदरी ललना । सना असे ॥२४॥
अशा या दृष्यातून । बोध घ्यावा आपणहून ॥ श्रेष्ठ नाही कर्माहून । अन्य काही ॥२५ ॥
लक्ष्यापुढे शरीरसुख कैसा । आणि क्षुद्र तो पैसा ॥ देवाजींनी संदेश ऐसा । दिला असे ॥२६॥
भौतीक सुखाकडे दुर्लक्ष केले । तेव्हा यंत्रमानव निर्मीले ॥ तया आपले रूप दिले । वसीगरनने ॥२७॥
सर्वकलापारंगत केले । युद्धशास्त्र शिकवले ॥ सहस्त्रगज सामर्थ्य दिले । यंत्रमानवा ॥२८॥
सर्व भाषा पण आल्या। परी भावना नाही दिल्या ।। आणिक नाही शिकविल्या । जगाच्या चाली-रिती ॥२९॥
देवाजींचे मत । मनुष्याचे रीतभात ॥ शिकावे साक्षात । जगी राहून ॥३० ॥
चमच्याने भरविता । जगण्याची क्षमता ॥ लढण्याची क्षमता । नष्ट होते ॥३१॥
तो जगतनियंता । देव तुम्ही म्हणविता ॥ मनुजासी सर्व शिकविता । दिसला नाही ॥३२॥
जगी जन्म घ्यावे । बरे -वाईट ओळखावे ॥स्वतःला घडवावे । ही खरी बुद्धीमत्ता ॥३३॥
वसीगरन हेच सांगतो । मनुष्यासी संदेश देतो ॥ जो मुलांसी चमच्याने भरवितो । तो मूर्ख असे॥३४ ॥
मग रोबोसी घरी नेले । जन्मदात्यांसी दाखविले ॥ चरणस्पर्श केले । दोघांनी ॥३५॥
मोठा कितीही कोणी। परि जोडावे पाणि ॥ सांगते रजनीवाणी । आई-वडिलांना ॥३६ ॥
संशोधनाअंती प्रथम घरी आला । जन्मदात्यांसी भेटला ॥ अजिबात न ढळला । त्याचा सदाचार ॥३७॥
अधिकार नामकरणाचा । असतो माता-पित्यांचा ॥ हे दाखवण्याचा । हेतू बघा ॥३८॥
वसीगरनने बनविले । आईने नामकरण केले ।। "चिट्टीबाबू" नाव दिले ।  प्रेमळ ते ॥३९॥
चिट्टी गोजीरवाणा । खरे बोलावे हा बाणा ॥ झाला केवीलवाणा । या खोट्या जगी ॥४० ॥
मनुष्य जो अती सरळ । होते त्याची आबाळ ॥ सर्वत्र होतो छळ । या जगती ॥४१ ॥
संदेश हाच अभिप्रेत । होता चिट्टीकथेत ॥ अतीसरळ या जगात । टिकत नाही ॥४२॥
मग सनाला समजवायला । वसीगरन तोची गेला ॥ थोडा प्रेमसंवाद झाला । दोघांमधे ॥४३ ॥
गाईले दोघांनी गाणे । वेड्या अणुकणांचे तराणे ॥ प्रितीचे हे बहाणे । जुनेच असती ॥४४ ॥
या गाण्यामधूनी । वसीचे प्रेम विज्ञानी ॥ असे उफाळूनी । येते बघा ॥४५॥
चिट्टी इकडे विनोद करतो । वाहतूक पोलीसाला धडा शिकवितो ।  लाचेविरुद्ध शिकवण देतो। नकळतच ॥४६॥
गाणे संपल्यावर। चिट्टीशी भेटल्यावर ॥ सनाच्या आश्चर्यात भर । पडली बघा ॥४७॥
तू रोबो बनविला । एक चमत्कार केला ॥ मज भारी आवडला । तुझा हा चिट्टी ॥४८॥
याला घेउन जाते । आपल्यासोबत ठेवते । याची क्षमता तपासते । अपुल्या सदनी ॥४९॥
सना ही  चतुर बाला । ज्या शोधासाठी वसीला बोल लाविला ॥ तोच रोबो स्वतः वापरिला । वसीआधी ॥५० ॥
इथे नारी स्वभाव दिसतो । विद्वान सुद्धा फसतो ॥ हेच तुम्हा सांगतो । रजनीदेव ॥५१ ॥

                                                एन्दिरन स्तोत्र - भाग २ वाचायला टिचकी मारा -->

श्वेतसुमनांसाठी......

   हे गीत आहे, युद्धात होरपळल्या जाणार्‍य़ा मुलांसाठी. युद्ध होतात, कुणाच्या राजकीय फायद्यासाठी, कुणाच्या खोट्या अस्मितेच्या नावावर. मात्र एक पिढी गुदमरली जाते. युद्धग्रस्त भागात बघा, मुलांना त्यांचे बालपण सुद्धा उपभोगता येत नाही. काश्मिरातल्या मुलांचे बालपण ते काय असणार, AK-47 च्या सावलीत जाणारं! गोळीबाराचा आवाज हेच त्यांचे अंगाईगीत."आज कर्फ्यू है " हे त्यांचे बोबडे बोल. त्यांचे बालपण हरवत असते. आणि आपण "युद्धस्य कथा रम्य" म्हणत असतो. सगळ्या युद्धग्रस्त भागात थोड्याफार फरकाने हीच स्थिती असते.
        महान तमिळ गीतकार/कवी वैरामुथु यांनी हे गीत "कण्णत्तील मुत्तमिटाल "  या मणीरत्नम यांच्या चित्रपटासाठी लिहीले. तमिळ वाघांच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर एका मुलीच्या भावविश्वाचे चित्रण म्हणजे हा सिनेमा. संगीत रहमान सरांचे आहे.हे गाणे त्यांनीच गायले आहे. या चित्रपटाच्या गाण्यांकरता दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. मला हे गाणे खूप आवडते म्हणून मी मराठी अनुवाद करायला घेतला. अगदीच शब्दशः नाही.वैरामुथु सरांना अभिप्रेत असलेल्या भावना पकडण्याचा प्रयत्न केलाय. तमिऴ अनुवादाचा पहिलाच प्रयत्न असल्याने कितपत यशस्वी झाला सांगणे कठीण आहे.
      गाण्याचे तमिऴ नाव आहे " वेल्लइ पूकल " (श्वेतसुमने). हा शब्द शांतता या अर्थाने वापरलाय. असो, आधी मराठी अनुवाद मग तमिळ गाणे ...

श्वेतसुमने सार्‍या विश्वात  बहरावी
पहाटे भूमी शांततेसाठीच उजळावी
ह्रदयावर सोनेरी किरणे  पडावी
फुले आळस झटकून उमलावी


मुल उठावे
आईच्या उबदार कुशीत
पहाट व्हावी
मुलांच्या चिमुकल्या हास्यासहित


वार्‍याच्या संगीतात
वर्षा गाते त्या गाण्यात
एका मौनाचं आनंद देता येईल ?
कोटी किर्तनांत,
कवी निर्मीत शब्दांत,
छोट्या अश्रूचा अर्थ सांगता येईल?


जिथे मुलाचे हात पोहचतात,
चांदोबा, तू तिथे उगवशील?
जिथे मानवजाती युद्ध थांबवेल,
श्वेतकोकीळे, तू तिथे गाशील ?

आता तमिऴ गाणे :-
  वेल्लइ पूकल उलगम  एंगुम मलरहवे
विडीयूम भूमी अमैदिक्कागं विडिहवे
मनमेल मन्जल वेळच्चम विऴहवे
मलरे सोम्बल मुरित्त इऴहवे


कुऴन्दई विऴीकट्टुमे
ताईन कदा कदप्पील
उलगम विडीयट्टुमे
पिल्लईन सिरमुगं सि़ऱिप्पील

काट्रीन पेरीसैयिल
मऴई पाडुम पाडांगळूम 
ओरं मौनम पोल ईन्बम तरुमो.....
कोडी कीर्तनमुम
कवी कौर्तं वार्तईगळूम
तुली कण्णीर 
पोल अर्दम तरुमो.......

एंगं सीरकुऴन्दई
तन कैहल नीतिडमो
अंगं तोन्ड्रायो कोल्लई निलवे.....
एंगं मनिदइनम 
पोर ओयिन्दं सायिन्तीडमो
अंगं कूवादो वेल्लई कुयिले..... video


काय लिहू आज...

काय लिहू आज... एक शनिवार कंटाळवाणा ....
कितीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्या..
खरं तर साधा प्रयत्नही  नाही केला...
पराभव हा माझाच, लाजीरवाणा ..

कित्येक  बघितलेली स्वप्नं...
स्वप्नातच विरलेली...
दिवस  उजाडताच  नवा ...
माझी तीच वाट, अंधारलेली ...


एक काळ असा येईल..
माझ्या स्वप्नाप्रमाणे घडेल..
माझी ताकद  मलाच कळेल ..
पण तोही..कदाचित स्वप्नातच..

काय लिहू आज ..मी  दुर्मुखलेला.
खरडल्या चार ओळीच..
मनस्थिती निराशलेलीच...
थांबतो इथेच.. मी कंटाळलेला ..

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More