’सोपा’ उपाय ??

’फुकट ते पौष्टिक’ च्या ’पिपा’सेला आळा घालणारा ’सोपा’ उपाय.

कथा - कारखान्यातले भूत

भुतांच्या अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या मुलाची कथा

ये ज़मीं हैं सितारों की

हम कहें क्या कहानी अजी , बदगुमाँ इन बयारों की
जब समझ ही न पाए ज़ुबां, आज भी यह इशारों की

चंद बूँदें लहू की गई , तो क़यामत नहीं आई
तलब तो मिटेगी सही, कुछ लहू के बिमारों की

अब यहाँ जिस्म तो बिक गया, मोल तो हो अनाजों का 
ये कहानी नहीं काफिरों , हैं हकीकत बज़ारों की

बख्श दो फिसल जो हम गए, आपकी आशिकी में यूँ
कुछ खता तो हमारी रही, कुछ रही इन बहारों की

आज अखबार पढ़ के मुझे, ये पता तो चला यारों
ये नहीं अब हमारी रही, ये ज़मीं हैं सितारों की 

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

पृथ्वीची तिरडी
(एरव्ही परडी
फुलांनी भरली !)
जळो देवा,भली !!
...कविता संपली आणि वर्गात शांतात पसरली. 'प्रेमाचे लव्हाळे ’या कवितेचे वर्गात वाचन सुरु होते. बारावीला सगळे विषय केवळ गुणांच्या आकडेमोडीत अभ्यासले जातात. मराठी काही अपवाद नव्हे, त्यामुळे अभ्यासक्रमाला असलेल्या कवितादेखील परीक्षेनंतर लक्षात राहत नाही की मनावर परिणाम सोडत नाही. या कवितेबाबत मात्र काही वेगळे घडले. मर्ढेकर या कवीचे 'नव्याने' ओळख झाली.
बाळ सीताराम मर्ढेकर नावाच्या जादूची ओळख झाली ती त्यांच्या 'गणपत वाणी बिडी पितांना' ह्या कवितेतून. पुढे अजून एक कविता वाचनात आली, ' पिपांत मेले ओल्या उंदीर'. ह्या दोन्ही कविता शाळकरी पोरवयात वाचलेल्या होत्या. तेव्हा 'आधुनिक कविता' वगैरेंची फारशी मैत्री नव्हती, बालकवी,केशवसुत, कवी बी, ह्यांच्यापलीकडे झेप घेतली नव्हती. त्यामुळे ह्या दोन्ही कविता मला कितपत कळल्या होत्या ठाऊक नाही.फार भारावून जाणे अशातला प्रकार घडला नव्हता. शाळेला पाठ्यक्रमात मर्ढेकरांची पहिल्यांदा कविता अभ्यासाला आली, 'पितात सारे गोड हिवाळा'. मुंबईच्या हिवाळ्यातील पहाटेचे एक चित्रदर्शी पण नेहमीच्या वर्णनापेक्षा काहीसे हटके चित्रण होते.हा कवी वेगळा आहे ही जाणीव पहिल्यांदा झाली. 'भारावून जाणे' म्हणजे काय असते हे मात्र 'प्रेमाचे लव्हाळे ’या कवितेने जाणवले. द्वितीय महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ही कविता लिहिली होती. 'मर्ढेकर' अभ्यासायला हवा हे मनात आले. 'मर्ढेकरांची कविता' हे छोटेखानी पुस्तक वाचनालयातून आणले.
mardhekaranchi_kavita.jpg
'मर्ढेकरांची कविता' हा संग्रह म्हणजे त्यांच्या हयातीत प्रकाशित झालेल्या तीन कवितासंग्रहांचे(शिशिरागम,काही कविता, आणखी काही कविता ) आणि मोजक्याच(एकूण ९) अप्रकाशित कवितांचे संकलन आहे.
'शिशिरागम' मधील कविता रविकिरण मंडळाशी इमान राखणाऱ्या आहेत, तरल आणि भावप्रधान. बहुतेक कविता 'सुनीत' वृत्तात रचल्या आहेत.
" सूर कशाचे वातावरणी ?
सळसळ पानांची ? वा झरणी ?
खळखळ, ओहोटीचे पाणी ?
किलबिल शिशिरी केविलवाणी ?
कुणास ठाऊक ! डोळयां पाणी
व्यर्थ आणता; नच गार्‍हाणी
अर्थ; हासुनी वाचा सजणी
भास !- जरी हो खुपल्यावाणी.
या कवितेने काव्यसंग्रहाची सुरवात होते. कवितांना शीर्षक नाहीत, क्रमांक आहेत. 'शिशिरागम' ही पहिली कविता. बहुतेक कविता या शृंगाररसातील आहेत. चित्रदर्शी आणि गेय आहेत,बालकवी किंवा गुरुदेव ठाकुरांची आठवण करून देणार्‍या.
उदा.
" माळावरल्या बांधावरती विलोलनयना जरा
थांबली कटी ठेवुनी करा "
किंवा
" वाचन-मग्न पर्णकुटीच्या दारि उभी टेकुनी
कपोला अंगुलीवर ठेवुनी "
ही कविता.
" कोणी नको अन काही नको, देवता तू एकली !
हृदय जीते अर्पिले हे होऊनी बद्धांजली ! "
अशा प्रेयसीला देवतेच्या स्थानी ठेवणाऱ्या कविताही आहेत.(ज्या प्रकाराची आचार्य अत्र्यांनी थट्टा उडवली होती.)
एकूण वीस कवितांचा हा संग्रह खरेतर 'अमर्ढेकरी' आहे. पहिलाच काव्यसंग्रह म्हणून कदाचित मर्ढेकरांनी धोका पत्करला नसावा असे वाटत राहते.
दुसऱ्या काव्यसंग्रह आपण एक नवा काव्यप्रकार मराठी साहित्यात आणत आहोत ह्याची त्यांना जाणीव होती, हे त्याच्या प्रास्ताविकात दिसून येते. त्यांनी या काव्यसंग्रहाचे नाव 'कांही कविता' बुद्ध्याच ठेवले असावे हेदेखील लक्षात येते.
"
'शिशिरागम' प्रसिद्ध झाल्याला आठ वर्षे झाली. त्यानंतरच्या ह्या पाचपन्नास कविता.
शब्दांवर थोडी हुकमत असली आणि लय तोंडवळणी पडली म्हणजे कविता लिहिणं फारसं कठीण नसतं. त्यापलीकडे काही पुढील लिखानांत आहे किंवा नाही हे वाचकाच ठरविणार. त्यांचं मत अनुकूल पडलं नाही तर लेखकाने योग्य तो बोध घ्यावा. पण 'भूमिके'चा टोप चढवून आणि तळटिपांचे पैंजण घाकून नकटीला शारदेचे सोंग घ्यायला लावणं हा त्यावर तोडगा खास नाही.'
"
ज्ञानदेव- तुकारामांनी क्रांती घडवून आणायला ओव्या-अभंगांचा वापर केला.मर्ढेकरसुद्धा 'कांही कविता'ची सुरवात अभंगाने करतात,हा योगायोग नव्हे. आधुनिकतेचा साज लेउनी आलेल्या अभंग-ओव्या हे या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य ! नमनालाच
माझा अभंग माझी ओवी | नतद्रष्ट गाथा गोवी,
इंजिनावीण गाडी जेंवी । घरंगळे ॥
कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ | कुठे तुकाराम पवित्र,
कुठे समर्थ धीरोदात्त| संत सर्व ||
संत शब्दांचे नायक | संत अर्थांचे धुरंदर ;
एक शब्दांचा किंकर | डफ्फर मी ||
ही कविता आहे. या कवितेतून असे वाटते की या नव्या उपक्रमाबद्दल मर्ढेकर थोडे साशंक असावेत. ते शेवटी म्हणतात,
अहो शब्दराजे, ऐका । लाज सेवकाची राखा;
नाही तरी वरती काखा । आहेत ह्या ॥
"कांही कविता"तील कविता उघड्यानागड्या आहेत, रोखठोक आहेत,उपहासगर्भ आहेत, दुसर्‍या महायुद्धाच्या क्रौर्याचा परिणाम इथे दिसेल नि मुंबईतील चाकरमान्यांच्या जीवनशैलीतील अपरिहार्यावर केलेले भाष्यही दिसेल. इथे प्रतिमांचा मुक्त वावर आहे.शब्दांची नाविन्यपूर्वक योजना आहे, इंग्रजी शब्दांचा आणि मराठी काव्यपंक्तींचा कल्पकतेने केलेला वापर आहे. पुढे जी ’मर्ढेकरी शैली ’म्हणून ओळखली गेली तिचा प्रत्यय "कांही कविता"त येतो.
लेखाच्या सुरवातीला आलेली 'प्रेमाचे लव्हाळे' ही या काव्यसंग्रहातील पहिली कविता. दुसऱ्या महायुद्धाची भीषणता, त्यातून दिसलेली संवेदनाहीनता ह्यांचे दर्शन करवणारी ही कविता.
" प्रेमाचे लव्हाळे '
सौंदर्य नव्हाळे,
शोधूं ?
-आसपास "
असा सवालच मर्ढेकर करतात.
दुसऱ्या अभंगरूपी कवितेत मर्ढेकर म्हणतात,
" अज्ञानी जनांस | ज्ञान पाजू नये
मारुनी उरावे | धडरूपे ||
दे गा हेची दान | देवा, माझी हाडे
खाउनी गिधाडे | तृप्त व्हावी ||
तिसरी कविता म्हणावी तर तुकारामांच्या 'जे का रंजले गांजले' चे विडंबन आहे, म्हणावी तर राजकारणाच्या खालावत्या स्तरावर केलें प्रहर आहे.
" जे न जन्मले वा मेले | त्यांसी म्हणेजो अपुले,
तोचि मुत्सद्दी जाणावा | देव तेथे ओळखावा ||
मोले धाडी जो मराया | नाही आंसू आणि माया
त्यासी नेता बनवावे | आम्हां मेंढरांस ठावे ||
पाकिस्तानच्या मागणीवरून उसळलेल्या दंगलीवर केलेले,
"कां हो माजवितां दुही । माखतां स्वातंत्र्याची वही
स्वजनरक्ताने प्रत्यहीं । लळथळां ॥ "
खरे तर "कांही कविता"तील कवितांविषयी इतके काही सांगण्यासारखे आहे की प्रत्येक कवितेवर स्वतंत्र लेख व्हावा. मर्ढेकरांनी योजलेल्या काही शब्दरचना थेट अंगावर येतात.
’विज्ञान-उणे-माणुसकी’ वर भाष्य करणारी,
" जाणे शुद्ध शुचिर्भूत ।एक प्रायोगिक सत्य ,
जरी त्याचेंच अपत्य । हिरोशिमा ॥
किंवा
संवेदनाहीनतेवर भाष्य करणारी
" गळे अश्रूंवीण चरबी । तीच अज्ञानाची छबी ;
झाले ते खत आणि बी | तुझ्या मळां ॥ "
किंवा
" टिर्‌र्‍या अर्धपोट ।जोवरी आहेत,
ओंगळ समस्त । आम्ही नंगे ! ॥ "
"पिपांत मेले ओल्या उंदिर" ही या काव्यसंग्रहातील एकविसावी कविता. प्रथम ’अभिरुचि’ मासिकात प्रकाशित झालेल्या या कवितेने घडविलेला इतिहास सर्वज्ञात आहे. ह्या कवितेत वापरलेल्या प्रतिमांचा मागोवा घेणे मनोरंजक ठरते. नाझी छळछावण्यांतील ज्यू कैदीं की गिरणी कामगार ? हे द्वंद्व बाजूला सारले तरी दोहों अर्थांनी कविता सखोल परिणाम करणारी ठरते.
गिरणी कामगारांच्या जीवनशैलीचे चित्र चितारतांना,
काळ्या बंबाळ अंधारीं
धपापतें हें इंजिन;
कुट्ट पिवळ्या पहाटीं
आरवतो दैनंदिन
भोंगा.-
"घन:श्यामसुंदर श्रीधरा गिरिणोदय झाला,
उठि लवकरि दिनपाळी......"

- गोंगाटला सारा
कामगारवृंद आणि
कोंबटशा पिळी धारा
अशी रचना मर्ढेकरच करू शकतात.
"आणखी कांही कविता" हे "कांही कविता"चाच पुढचा भाग आहे म्हणायला हरकत नाही.
मर्ढेकरांच्या आधुनिक कविता जेव्हा प्रकाशित होऊ लागल्या होत्या, तेव्हा त्या अनेकांच्या पचनी पडल्या नव्हत्या. त्यांच्या कवितेची साहित्यवर्तुळात बरीच टर उडवण्यात आली होती. दुर्बोधतेचे आणि अश्लीलतेचे आरोपही ठेवण्यात आले होते. ह्या सार्‍या घडामोडींचे प्रतिबिंब "आणखी कांही कविता"त उमटते.
"काळ्यावरती जरा पांढरे
ह्या पाप्याच्या हातुन व्हावे
फ़क्त तेधवा:आणि एरव्ही
हेंच पांढर्‍यावरती काळें ! "
ह्या ओळींतून
किंवा
" भंगुं दे काठिन्य माझें
आम्ल जाऊं दे मनीचें;
येउं दे वाणींत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे " या कवितेतून त्याची साक्ष पटते.
"आणखी कांही कविता" "कांही कविता"पेक्षा अधिक भेदक आहे. आशय, प्रतिमांचा वापर ह्याबाबत अधिक मर्ढेकरांची प्रतिभा अनेकविध अंगांनी बहरते.
एकूण पस्तीसच कविता असल्या तरी प्रत्येक कविता अगदी बावनकशी आहे. इथे आपण हरखून कवितांचा आस्वाद घ्यायचा आहे. एकेका कवितेअंती आपल्या जाणीवा विस्तारत जातात. त्यांच्या कविता वाचतांना कुठेकुठे बांग्ला आधुनिक कवी आणि मर्ढेकरांचे समकालीन जीबोनानन्दो दासांची आठवण येते,विशेषत: मुंबई शहरी जीवनाच्या अनुषंगाने येणार्‍या कवितांमध्ये.
"मी एक मुंगी, हा एक मुंगी " या कवितेतल्या.
- सर्वे जन्तु रुटिना : । सर्वे जन्तु निराशया: ॥
सर्वे छिद्राणि पंचन्तु । मा कश्चित्‌ दु:ख-लॉग भरेत्‌ ॥
ह्या ओळी हल्लीच्या आय.टी.च्या कारकुनांना अगदी आपल्यासा वाटल्या तर नवलाई नाही.
"जिथे मारते कांदेवाडी ", "गणपत वाणी ", " ह्या गंगेमधि गगन वितळले" ,"खप्पड बसली फ़िक्कट गाल"," किती दिवसांत नाही चांदण्यांत गेलो" ह्या अजून काही "वाचाव्याच" अशा आणखी काही कविता.
"मर्ढेकरांची कविता" हा संग्रह वाचायचा नाही तर अनुभवायचा आहे. पन्नास वर्षांनंतरही ह्यांतल्या कवितांची प्रासंगिकता कायम आहे. एकेक कविता निवांत वाचावी,प्रतिमा हळूहळू उलगडत जातांना आपल्या हाती मर्ढेकरांना केवळ सलाम करणे राहते. ’शिशिरागम’ ते ’आणखी कांही कविता’ हा प्रवास मर्ढेकरांच्या कवितांचाच नसतो तर मराठी साहित्याच्या एका महत्त्वाच्या स्थित्यंतराचा इतिहास असतो. ’रविकिरण संप्रदायी’ कविता ते ’मर्ढेकरी’ आधुनिक कविता हा इतिहास आपण अनुभवत असतो. त्याचक्षणी विश्वयुद्ध क्र.२ आणि त्यानंतरचे १०-१५ वर्षे हा काळ एका संवेदनशील कवीच्या नजरेतून अनुभवत असतो. उण्यापुर्‍या १२८ कवितांचा हा संग्रह अलगद मनात व्यापून उरतो अन्‌ एक गुणगुण ऐकू येते,
" ह्या सृष्टीच्या निवांत पोटीं
परंतु लपली सैरावैरा,
अजस्र धांदल, क्षणात देइल
जिवंततेचे अर्घ्य भास्करा.
थांब ! जरासा वेळ तोंवरी-
अचेतनांचा वास कोवळा;
सचेतनांचा हुरूप शीतल.
उरे घोटभर गोड हिवाळा!
"

पुस्तकाचे नाव : मर्ढेकरांची कविता
प्रथमावृत्ती : १९५९
पुनर्मुद्रण : १९९४
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह
किंमत : ४० रुपये


स्वामींचे अभंग -१

 

आयटीचे अभंग

 
 क्युबिकली दिन । कंटाळवाणा सारा ॥ कामाचा भारा । रोजचाच ॥ कीबोर्डवरी नुस्ती । बोटे चालली ॥ रात्र विझली । कामापायी ॥
आयटीत गेला । गुदमरून जीव ॥ कोणा नाही कीव । स्वामी म्हणे॥
 
 
कळपाचा मेंढर । तैसा मी चाललो ॥ रुततच गेलो । गाळात या॥
स्वतंत्र प्रज्ञा । विझुनिया गेली ॥  निर्बुद्ध हमाली । केली सारी ॥
आता गा देवा । करावी सुटका ॥ झालो मी फाटका । स्वामी म्हणे॥
 
 

श्रावणमासी हर्ष-मानसी

माझ्या लाडक्या कवींच्या, बालकवींच्या ’श्रावणमासि हर्ष मानसी’ या माझ्या आवडत्या कवितेचे हे विडंबन त्यांची क्षमा मागूनच सादर करत आहे.


श्रावणमासी हर्ष-मानसी, फिरायला जाती सिंहगडी
रुटीन चूकवून,बाईक दामटून,वाट करती वाकडी

विकेंड बघता ओघ गाड्यांचा गडावरी चाललासे
जत्रा भरली काय गडावरी, क्षणोक्षणी मज भासे

झालासा सूर्यास्त वाटतो, क्यामेरा त्वरेने तो काढे
तानाजी कड्यावर पोज दिली, फ़ोटो काढा ना गडे

उठती वरती जलदांकडे पाहण्यास वेळ नसे
सर्व प्रेयसीवर होय रोखिले क्यामेर्‍याची लेन्से

दुकानमाला दिसता भासे शॉपिंग कॉम्प्लेक्स इथे
चढूनि येती गडावरती, खादाडीस की एकमते

कचरा करूनि प्लास्टिकचा गडावरी वावरती
सुंदर ललना हिरव्या कुरणी मित्रासंगे बागडती

पार्ट्याही होती रानी, डीजे आसमंती घुमे
फ़ेसाळ पेला बोले, हवी कशाला परमिट रुमे

व्हिस्की कॅन उघडला विपिनी,धुंद गंध दरवळला
बघता तिथे पोलिसमामा, मन अति कळवळला

महागडी गाडी घेऊन साथी घाटावरूनि चढती
आले मनी, निघाले झणी,गोंधळ घालाया वरती

गडदर्शना निघती ललना, हर्ष येई कराया क्लिक
वॉलवर त्यांच्या बघून घ्यावे, श्रावण महिन्याचे ’पिक’


---पुणे,
२ ऑगस्ट, २०१२

पाडाडी- विडंबनासाठी कच्चा माल- भाग १

माझ्या काव्यरसिक मित्रहो,
विसरलांत तर नाही ना ? प्रदीर्घ कालानंतर परत सार्वजनिक जीवनात येत आहे म्हणून विचारले. जे विसरले त्यांना माझी ओळख करून द्यावयाचा विचार आहे. तर मी कवी स.दा.हितकरे. हो, हो तेच ते कविता पाडण्याची रेसिपी लिहून ज्यांनी होतकरू नवकवींवर अनंत उपकार केले आहेत आणि ज्यांच्या कृपाप्रसादामुळे आज प्रत्येक दुसर्‍या व्यक्तीस कविता प्रसवू लागली आहे तेच ते काव्यभूषण, काव्यकलानिधी, काव्यकुसुमरत्नाकर, काव्यपंडित, काव्यशिरोमणी, काव्यसम्राट कवीश्रेष्ठ स.दा.हितकरे. तसे मला ह्या पदव्या नावापुढे जोडायला आवडत नाही,पण काव्यरसिक चाहत्यांनी इतक्या प्रेमाने हा बहुमान दिला आहे त्याचा अव्हेर करता येत नाही. आता माझ्या काव्यरसिक काव्यप्रेमींपुढे प्रश्न पडला असेल की मी अचानक असा अज्ञातवासात कसा गेलो आणि कसा प्रकटलो. मागील वर्षी एका काव्यसंमेलनात काव्यवाचन करत असतांना माझ्या काव्यतृषार्त श्रोत्यांनी मजवर जो ’प्रेमाचा वर्षाव’ केला त्याचा स्वीकार करून अज्ञातवासात जाण्याचे प्रयोजिले जेणेकरून माझ्या काव्यसाधनेस व्यत्यय येऊ नये. आज अचानक माझ्या सर्व काव्यरसिक काव्यप्रेमींच्या दारावर काकपक्षी कोकलला असेत त्याचे हेच कारण, आमचे आगमन !
   आम्ही अज्ञातवासात जाण्याचे तर कारण कळले, आता अज्ञातवासातून बाहेर येण्याचे कारण सांगणेही क्रमप्राप्तच आहे. आमच्या एका कवीमित्राच्या आग्रहावरून आम्ही येते झालो. त्यांची आम्हांस मागणी की हल्ली विडंबन करण्यास कच्चा माल क्वचितच मिळतो आणि मजला विडंबन करण्याचे भरते येत आहे, तरी आपण कृपा करावी. त्यांच्या विनंतीस मान देऊन आम्ही काही कविता प्रसवित आहोत. ह्या कविता म्हणजे खास विडंबनास्तव असलेला कच्चा माल असून होतकरू नवविडंबनकारांनी ह्याचा सढळ हस्ते वापर करावा. तसेच ह्या कवितांपासून प्रेरणा घेऊन तेही स्वतंत्र अशा कविता प्रसवतील हा दुहेरी फायदा. 
 असो, आता आम्ही ’विडंबनरेडी’ कच्चा माल आपल्या समक्ष सादर करीत आहोत.

१. प्रेमकविता :- आम्ही प्रथम प्राधान्य प्रेमकवितेस दिले यांस कारण की हल्ली भारतात तरुणांची संख्या लक्षणीय झाली आहे, ह्यात चिरतरुणांची संख्या गृहीत धरली की प्रेमकवितेचे ’मार्केट’ किती तेजीत आहे हे लक्षात येईल.

अ) उपप्रकार:  पहिल्या प्रेमाची पहिली कविता :-
अ-१) उपउपप्रकार: कॉलेजकुमार गट :-

वाहू लागली मनात आनंदाची रिव्हर
मला झालाय यारो प्रेमाचा फ़िव्हर
तिला जेव्हा पाहिले मी स्कुटीवर
उन्हाळ्यात पण भरला मला शिव्हर

खुले केस तिचे मानेवर
बॅगेचा बेल्ट खांद्यावर
काळा गॉगल डोळ्यावर
मी खल्लास झालो तिच्यावर

प्रेमात मी झालो पुरता वेडा
कब मिलेगी हाय मेरी केवडा
हार्टचा झालाय आता मेदूवडा
धकधक करतोय बघा केव्हढा

पहिल्या प्रेमाची नशा यारो
लेक्चरको गोली मारो
दोस्तांनो खिसे खाली करो
आता मी करो या मरो

अ-२) उपउपप्रकार :- निरागस गट
 
ती हसते किती गोड
जणू कैरीची फोड
तिचे लाजणे गोजरे
जणू फणसाचे गरे

ती मज मिळावी अशी
जणू सागरा
मिळे धरणी
माझे प्रेम व्हावे अमर
कोणाची न व्हावी करणी 

अ-३) उपउपप्रकार :- चिरतरुण गट
आयुष्याच्या संधीकाली
कृपा तव झाली
रुपेरी झळाळी
रवीस अस्ताचली

गे षोडषे, कोमलिके
का आलीस आता जीवना
कृतांतकटकामलध्वज जणू
शिरी मम आहेत खुणा

गे तव सुहास्यवदन
अन्‌ मम गात्रांचे रुदन
ही तव नयनी चंचलता
अन्‌ मम दृष्टीस अधूता

परि तव लाघवी स्मित ते
मज करिती विस्मित ते
नवउन्मेषांचे अंकुर फुटले
मम हृदय व्याकुल जाहले

की आषाढधारा तृषार्त धरित्रीस
की पल्लवी वठलेल्या वृक्षास
की तोय मधाळ वाळवंटी
की निशीथिनीस ज्योत एकटी

अ-४) उपउपप्रकार :- ’मिडलाईफ़ क्रायसिस’ गट
आज पुन्हा मी
असा कातर का झालो...
मेघगंभीर मी, पुन्हा...
असा आतुर का झालो...

ही पहिली प्रेमाची चाहूल...
आता का लागावी..
हाय ही परवशता..
आता का भोगावी...
आयुष्य जळले अर्धे..
आधी बाप, आता मुले..
अन्‌ सुकली फुले..
तारुण्याची केव्हाच...

तारुण्य सडले ते..
चिमूटभर इंक्रीमेंटची
अन्‌ वेतन आयोगाची
वाट पाहण्यात ते..

आता मोहरला वसंत आहे..
दोन क्षण जगावे म्हणतोय मी...
झुगारून द्यावे जोखड मानेवरून..
एकदा प्रेम करावे म्हणतोय मी...

ब)
उपप्रकार: प्रेमात पडल्यानंतरची प्रेमकविता
ब-१) उपउपप्रकार :- ’दुनियाको गोली मारो’ गट

ती माझ्या हृदयाची राणी
आणि मी तिच्या मनाचा राजा
ती शहनाई बिस्मिल्लांची
मी लग्नातला बॅंड्बाजा

मी तिच्या प्रेमात धुंद
हवा झाली आहे कुंद
तिने माळलेला गजरा
मला करतो बावरा

तू अशीच मला रहा भेटत
आपले प्रेम नेऊ रेटत
जर आपल्याआड आली दुनिया
आपण झुगारून देऊ दुनिया

ब-२) उपउपप्रकार : ’हळवा’ गट

आज ती आली भेटायला मला...
जशी झुळूक अंगावरूनी...
अमाप सुख देऊन गेली..

ती हसते तेव्हा..
मला हसवते
ती रडते तेव्हा
मला रडवते..

तिच्या गालावरची खळी
मला करते बेभान
तिच्या डोळ्यांतला काजळ
मनात घालतो थैमान

माझ्या मनाचे पाखरू
तिच्या जीवाचे कोकरू
माझ्या मनाचा पारवा
तिच्या डोळ्यांतला शिरवा

नको कधी सोडुनि जाऊस गं
मी तुझ्याविणा कसा जगेल गं
माझ्या आसवांचा पाउस गं
तुझी क्रोधाग्नि विझवेल गं

क) उपप्रकार : प्रेमभंगाच्या कविता
क-१ ) उपउपप्रकार :- ’देवदास’ गट


ती गेली ....
गेली ती...
मज सोडून
वार्‍यावर ती
दु:खाच्या गर्तेत लोटून ती..
ती गेली..
गेली ती..

दोन दिवसांसाठी आली ती..
पाहुणी हृदयात राहून गेली ती..
ती गेली..
गेली ती...

कोसळलो मी आज पुरा..
मृत्यो, दे मज तू थारा...
माझ्या जीवनात करून अंधार ती..
माझ्या भावनेवर करून वार ती..
ती गेली..
गेली ती..

ही वारुणीच आता मज साथी..
हा जामच हवा आता मज हाती
मैफ़िल अर्ध्यात सोडून ती..
संसार स्वप्नांचा मोडून ती..
ती गेली..
गेली ती..

क-२) उपउपप्रकार :- ’भ्रमिष्ट’ गट
ती गेली ???
नाही..
ती आहेच इथे..
माझ्यादेखत..
इथे.. या बाकावर..
बकुळीखाली बघा...
रोज ती येते मला भेटावया..
ती गेली म्हणता तुम्ही ???

कशी जाईल ती ..
मला सोडुनि असा एकटा ??
अजून अबोलीची फुले माळलीच नाही तिने..
बागेतून माळ्याचा ओरडण्याचा आवाज आलाच नाही आज..
ती गेली ??
शक्यच नाही...
गजरा माळल्याविण ती जाणारच नाही..

ती गेली ???
मग मी इथे काय करतो ?
नाही ती आहेच इथे...
ती जाणे शक्यच नाही...

अरे..
मला इथे ठाण्याला का आणलंत ???

क-३) उपउपप्रकार : ’गेली तर जाऊ दे ’ गट
ती गेली...
जाऊ दे..
एक ना एक दिन..
सबको जाना हैं..

ती गेली..
जाऊ दे..
उद्या दुसरी येईल..
ती हिच्यासारखी नसेल कदाचित..
कदाचित ती असे दिलखुलास हसणारी नसेल..
कदाचित ती अशी निरागस बोलणारी नसेल..
पण ती माझ्यावर प्रेम करणारी असेल..

ती गेली..
जाऊ दे...
छप्पन पोरी आल्या अन्‌ गेल्या..
हीसुद्धा एक त्यांतलीच..
गेली तर..
जाऊ दे..
जिंदगी चलने का नाम हैं..

क-४)उपउपप्रकार :  ’नकार’ गट
का तिने मज नकार द्यावा ?
मी का इतुका नालायक आहे ?
का तिने मज निराश करावे ?
मी का इतुका नालायक आहे ?

मी प्रेम केले तिजवर
तिने केला माझा अव्हेर..
काय करू आता मी ?
की तिने करावा माझा स्वीकार

खरे प्रेम नाही जगात
कळून चुकले मला..
अता पुन्हा प्रेम नाही..
करायचे आहे मला..

क-५) उपउपप्रकार : ’आठवणींचा झुला ’ गट

किती वर्षे झालीत..
ती गेली मज सोडून..
किती श्रावण जळले
तिच्या आठवणींत..

तिची माझी पहिली भेट
अजून आठवते..
अगदी कालच घडल्यासारखी..
डीपीच्या कट्ट्यावर झालेली नजरानजर
अन्‌ मग महाराजबागेत चोरून भेटणे..

आठवतात प्रेमाच्या आणाभाका..
कॉलेजच्या पहिल्या ट्रीपमध्ये घेतलेल्या..
’डोनापावला’वर घेतलेल्या शपथा..
’साथ जिएंगे, साथ मरेंगे’च्या..
ती मात्र आहे सुखाचा संसार करत आता..
मी मरतोय तिच्या वाट्याचे मरण..

ते दिवस सोनेरी,
अन्‌ मोरपिसासारखे ..
तू कशी विसरू शकतेस ?
मला अशी दुःखाच्या सागरात लोटून
तू कशी जाऊ शकतेस ?

तर माझ्या काव्यरसिक मित्रांनो, मी आपणांस काही मोजक्या ’प्रेमकविता’प्रकारांचा कच्चा माल पुरवला आहे. या विषयाचा आवाकाच एवढा मोठा आहे की एक स्वतंत्र ग्रंथच लिहीणे इष्ट राहील. तरी विस्तारभयास्तव काही प्रमुख ’प्रेमकविता’प्रकार देऊन मी इथेच थांबतो. पुढच्या भागात अजून काही विषयांतला कच्चा माल पुरवला जाईल.

टीप :- या मालिकेत वापरलेल्या सर्व कविता या ’पाडलेल्या’ कविता असून त्यांचा ’स्फुरलेल्या’ कवितांशी दुरान्वयेही संबंध नाही. तसे काही आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.


आपला स्नेहांकित,
काव्यभूषण, काव्यकलानिधी, काव्यकुसुमरत्नाकर, काव्यपंडित, काव्यशिरोमणी, काव्यसम्राट कवीश्रेष्ठ स.दा.हितकरे (कैपाडे स्वामी)

ठाकुरांची (आणि माझीही) कृष्णकलि

बंगाली गीतांमध्ये रुचि घेणे सुरु केले तेव्हाची गोष्ट आहे. आबोहोमान चित्रपटातल्या ’For your eyes only ’ गाण्याबद्दल एका बंगाली फ़ोरमवर वाचले नि ते यूट्य़ूबवर ऐकले. त्या गाण्यात रबिंद्रनाथ ठाकूरांच्या ’कृष्णकलि’ आणि जीबोनानन्दो दासांच्या ’बोनोलता सेन’ ( पुढचा लेख हिच्यावरच आहे. ) ह्या दोन काव्यकन्यांचा उल्लेख येतो.  ही मयनापाड्याची मृगनयनी कृष्णकलि कोण असावी हे कुतूहल तेव्हापासूनचे. कृष्णकलि  यूट्य़ूबवर सहज सापडली आणि मी हिच्या प्रेमातच पडलो. आता ही ठाकूरांची न राह्ता माझीही झाली होती. जिंवत चित्रण करणारे काव्य आणि तेही सहजसोप्या भाषेत कसे असावे ह्याचे सुंदर उदाहरण म्हणजे ’कृष्णकलि’. मात्र हे एवढ्यावर थांबत नाही. सुमारे ११० वर्षांपूर्वी लिहीलेली ही कविता अगदी क्रांतिकारी विचारसुद्धा घेऊन आली आहे. कवी एका काळ्या मुलीच्या प्रेमात पडला आहे. मात्र तो तिच्या काळ्या रंगाकडे न बघता फक्त काळ्या, हरिणीसारख्या डोळ्यांकडे बघत आहे. तसेच काळ्या रंगांचे  आणि आनंदाच्या भारतीय संकेतांचे अद्वैत दाखवून तो म्हणतो की  तुम्हाला तिला जे म्हणायचे असेल ते म्हणा, मी तर तिला कृष्णकलिच ( एका प्रकारचे फूल )म्हणेन. गोर्‍या रंगाचे वेड आपल्याकडे अनादि-अनंत काळापासून आहे. आता कमी झाले असेलही,पण ठाकूरांच्या कर्मठ काळात गोर्‍या रंगाचे कौतुक नक्कीच जास्त असावे. सार्‍या गौरांगी ललनांवर कविता रचल्या जात असतांना ठाकूरांनी एका काळ्या मुलीवर कविता लिहीली, ही बाब त्या काळात नक्कीच नवी होती. काळ्या मुलीवर प्रेम करणार्‍या सार्‍या तरुणांना त्या काळी ठाकूरांच्या कृष्णकलिने चांगलाच आधार दिला. काळ्या मुलींकडे पाहण्याची एक नवी दॄष्टी दिली. काळी मुलगीसुद्धा कवितेचा विषय असू शकते हे सांगितले. कृष्णकलि म्हणूनच कदाचित अजूनही जनमानसात आपले स्थान टिकवून आहे, ठाकूरांच्या अजरामर रचनांपैकी एक मानली जाते. ‘For your eyes only’ चा कवीसुद्धा लिहीतो,

’ आज तार नाम जाने बांगाली शॉबाय,
रोबि ठाकूराने जॉय होक
मयनापाडार माठे आजो गिये खोजे
कालो दुटि होरिनेर चोख ’

’ आज रबि ठाकुरांमुळे तुझे नाव सगळे बंगाली जाणतात. मयनापाडाच्या माळावर आजही ते दोन  काळेभोर   हरिणीचे डोळे शोधायला लोक जातात.’

रबि ठाकूरांनी या कवितेत काळा रंग आणि त्याच्याशी निगडित संकेतांचा अगदी सढळ हस्ते वापर केला आहे आणि त्यामुळे कविता अगदी खुलली आहे. काळ्या रंगाचे  भारतीय परंपरेत आनंदाला समानार्थी मानल्या गेलेल्या पावसाशी जे नाते आहे ते सूचवून कृष्णकलि म्हणजे आनंदाचे दान आहे हे कवी इथे मांडतो.   कृ्ष्णकलि आहे काळी, तिच्या गाई काळ्या, ती आपल्या झोपडीबाहेर बाहेर येते ती आकाशात काळे ढग भरून आले म्हणून.  काळे ढग, त्याने भरून आलेला अंधार, माळावर चरणार्‍या दोन काळ्या गाई, आणि लगबगीने बाहेर येणारी काळ्या डोळ्यांची काळी मुलगी, कवीने तिला पाहिले आणि तो त्या काळ्या हरिणीसारख्या डोळ्यांत हरवला अन्‌ तो म्हणतो,
’कृष्णकलि आमि तारेइ बोलि, कालो तारे बोले गाँयेर लोक ’  
गावातले लोक तिला ’काळी’ म्हणत असतीलही , मी मात्र तिला ’कृष्णकलि’ म्हणणार आहे.  कवी तिला कृष्णकलि या सुंदर फुलाची उपमा देतो.  

ती कितीही काळी असली तरी मी फक्त तिचे काळे, हरिणीचे डोळेच बघतो हेसुद्धा कवी शेवटच्या कडव्यात स्पष्ट करतो. ’ काळी ?’ हा प्रश्न खुबीने कवीच्या मनातल्या भावनांना वाट करून देतो. तुम्ही फक्त तिचा काळा रंगच पाहिला, तुमच्या दृष्टीने ती फक्त एक काळी मुलगी कशी असू शकते? तुम्ही तिचे टपोरे हरिणीच्या डोळ्यांसारखे काळेभोर डोळे पाहिले नाहीत का ? हा सवालच कवी इतरांना करतो.
’कालो ? ता शे जतोइ कालो होक, देखेछि तार कालो होरिन-चोख’     कवीची आणि तिची नजरानजर झाली तेव्हा ( कारण कवि पुढे मिश्कीलपणे म्हणतो, ’माझ्याकडे तिने पाहिले की  हे तिला किंवा मलाच ठाऊक आहे ! ’  झालीच असावी, कारण पुढच्याच कडव्यात कवीने मनातल्या भावनांना ज्येष्ठ-आषाढ-श्रावण महिन्यांची उपमा दिली आहे,) तो शेतातल्या बांधावर एकटाच उभा होता. पूर्वेकडून अचानक वारा आला.( पूर्व दिशेने येणारा वारा(हिंदी- पूर्वाई) म्हणजे खास मान्सूनचा वारा, आनंदाला उधाण आणणारा), शेतात कोवळी धानपिके डोलू लागली .( म्हणजे पेरणी झाली होती, श्रावण महिना असावा, निवांत वेळ असतो तेव्हा. हिरवी पिके शेतात डोलत असतात, शेतकरी आनंदात असतो.  ’ घोनो मेघ आँधार ’ मधला काळाघन मेघ साधारणत: श्रावणात बरसतो, श्रावणधारा आपल्या सर्वांच्या आवडत्या, गावोगावी ’सावन के मेले’ लागतात, सासुरवाशिणी माहेरी येतात, गावोगावी आंब्याच्या झाडावर ’झूले’ पडतात. ) ठाकुरांनी ही जी वातावरणनिर्मिती केली आहे ती अगदी विचारपूर्वक केल्याचे लक्षात येते. कृष्णकलि बाहेर येते. बाहेर अंधार भरून आलंय, ढगांचा गडगडाट सुरू झाला आहे, गायी माळावर आहेत. ती त्यांना आणायला जराशी व्याकुळ, त्रस्तच लगबगीने बाहेर आली आहे. आपण डोक्यावर पदर घेतला की नाही ह्याचेही तिला भान नाही, तिची वेणी पाठीवर खेळत आहे. बाहेर आल्यावर आधी ती भुवया आकाशाकडे करून वातावरणाचा एक अंदाज घेते, आणि मग दोघांची नजरानजर झाली. ’ आमार पाने देखलो कि ना चेये , आमि जानि आर जाने शेइ मेये ’ , ’माझ्याकडे तिने पाहिले की नाही हे एकतर मला माहीत आहे किंवा त्या मुलीला तरी’ कवी म्हणतो, कारण ’ माठेर माझे आर छिलो ना केउ ’  माळावर इतर कोणीच नव्हते.

   नजरभेट झाल्यावर काय घडले ?   ’ज्येष्ठ महिन्यात काजळकाळे मेघ ईशान्य दिशेला दाटून आल्यावर मनाची जी अवस्था होते तसेच झाले आहे’ किंवा ’आषाढ मासी काळे कोमल ढग तमालबनांवर उतरतांना पाहून जो आनंद होतो तसाच आनंद झाला आहे’ किंवा ’एखाद्या श्रावणराती अचानक मुसळधार पाऊस कोसळतो आणि मनातही आनंदाचा पाऊस कोसळू लागतो ’ असे काही तिला पाहिल्यावर घडले.   इथे ठाकूरांनी जाणीवपूर्वक मनातल्या भावनांना पावसाळी महिन्यांची उपमा दिल्याचे लक्षात येते.  भारतासारख्या कृषीप्रधान आणि उष्ण देशात वर्षाऋतू म्हणजे खरा आनंदऋतू. आपला सर्वोच्च आनंद श्रावणधारांत कोसळतो. घन ओथंबून आले की आपले मनही ओथंबून येते. ही सगळी किमया ’काळे’ ढग करतात. इथे काळा रंग आनंद घेऊन येतो.  काळा रंग निव्वळ शोकाचे, उदासिनतेचे प्रतिक नाही तर ते आनंदाचेही प्रतिक असू शकते हेच तर इथे कविगुरु सुचवत नाहीत ना ?.   काळ्या कृष्णकलिचे झोपडीबाहेर येणेही असेच काळ्या घनांसारखे आनंद घेऊन आले आहे.   वर मी ज्या ’काळ्या रंगाच्या आणि आनंदाच्या भारतीय कल्पनेच्या अद्वैताचा’ उल्लेख केला ते हेच.

शेवटच्या कडव्यांत कवी अजून निश्चयी झाला आहे. ’कृष्णकलि आमि तारेइ बोलि, आर जा बोले बोलुक अन्यो लोक ’ ; मी तिला कृष्णकलिच म्हणणार, बाकी लोकांना जे म्हणायचे असेल ते खुशाल बोलू देत ! इथे ’गाँयेर लोक ’ नाही, ’अन्यो लोक’ आहे !   आता पुन्हा कवी भूतकाळात जाऊन तिच्या आठवणींत हरवतो. ’ पाहिले होते मयनापाडाच्या माळावर, काळ्या मुलीचे काळे हरिणीचे डोळे’,  ’तिच्या माथ्यावर पदर नव्हता की अनोळखी माणसापुढे आपण पदर न घेता आलो ह्याची जाणीव होऊन लज्जीत व्हायला तिच्यापाशी वेळही नव्हता’.  कदाचित कवीची आणि तिची नजरानजर होताच ती परत आपल्या गाईंकडे पळाली असेल आणि या क्षणिक भेटीत कवीच्या मनात घर करून बसलेत ते दोन काळेभोर हरिणीचे डोळे ! कविता संपते आणि आपल्याही मनात घर करून बसतात ते दोन ’कालो होरिन चोख’ !


अनुवाद :-

कृष्णकली म्हणेन मी तिला, ’काळी’ म्हणती गावकरी जिला
ढगाळ दिनी माळावर पाहिले ,काळ्या मुलीचे काळे हरिणीसम डोळे
पदर नव्हता तिच्या माथ्यावर, मुक्त वेणी खेळे पाठीवर
काळी  ? असो  ती कितीही काळी, पाहिले तिचे मी काळे हरिणीसम डोळे

काळ्या मेघांच्या अंधाराने , कवेत घेतल्या दोन काळ्या गाई
काळी मुलगी व्याकुळ पाऊली, चिंतीत कुटीबाहेर येई  
भुवया उंचावून आकाशाकडे, अन्‌ ऐकी ‍ मेघांचा गडगडाट
काळी  ? असो  ती कितीही काळी, पाहिले तिचे मी काळे हरिणीसम डोळे

आला अकस्मात्‌ वारा पूर्वेचा,  खेळला भातपिकांत कोवळ्या
बांधावर मी एकटाच उभा , माळावर नव्हते आणिक कोणी
मला तिने पाहिले न पाहिले,  हे गुपित आम्हां दोघांमधले
काळी  ? असो ती कितीही काळी, पाहिले तिचे मी  काळे हरिणीसम डोळे

असेच येतात काजळकाळे मेघ, ज्येष्ठ मासी ईशान्येला
अशीच येते काळी कोमल छाया, आषाढ मासी तमालबनांवरती
अशाच येती श्रावणराती,  आनंद उचंबळति  अकस्मात्‌ चित्ती
काळी  ? असो  ती कितीही काळी, पाहिले तिचे मी काळे हरिणीसम डोळे

कृष्णकली म्हणेन मी तिला,  म्हणोत अन्य लोक काहीही तिला
पाहिले होते मयनापाडाच्या माळावर, काळ्या मुलीचे काळे हरिणीचे डोळे
तिच्या माथ्यावर पदर नव्हता  ,लज्जित व्हायला वेळही नव्ह्ता
काळी  ? असो  ती कितीही काळी, पाहिले तिचे मी काळे हरिणीसम डोळे


मूळ कविता :-


कृष्णकलि आमि तारेइ बोलि, कालो तारे बोले गाँयेर लोक
मेघला दिने देखेछिलेम माठे, कालो मेयेर कालो होरिण-चोख
घोमटा माथाय छिलो ना तार मोटे, मुक्तोबेणी पिठेर पारे लोटे
कालो ? ता शे जतोइ कालो होक, देखेछि तार कालो होरिन-चोख

घोनो मेघे आँधार होलो देखे, डाकतेछिलो श्यामोल दुटि गाई
श्यामा मेये ब्योस्तो ब्याकुल पॉदे, कुटिर होते त्रस्तो एलो ताई
आकाश-पाने हानि जुगोल भुरु , शुनले बारेक मेघेर गुरुगुरु
कालो ? ता शे जतोइ कालो होक, देखेछि तार कालो होरिन-चोख

पूबे बाताश एलो हठात्‌ धेये , धानेर खेते खेलिये गेलो  धेउ
आलेर धारे दाँडियेछिलेम ऍका, माठेर माझे आर छिलो ना केउ
आमार पाने देखलो कि ना चेये , आमि जानि आर जाने शेइ मेये
कालो ? ता शे जतोइ कालो होक, देखेछि तार कालो होरिन-चोख

एमनि कोरे कालो काजोल मेघ, ज्येष्ठो माशे आशे ईशान कोणे
एमनि कोरे कालो कोमोल छाया, आषाढ़ माशे नामे तमाल-बोने
एमनि कोरे श्राबोनो-रजोनिते,  हठात्‌ खुशी घनिये आशे चिते
कालो ? ता शे जतोइ कालो होक, देखेछि तार कालो होरिन-चोख

कृष्णकलि आमि तारेइ बोलि, आर जा बोले बोलुक अन्यो लोक
देखेछिलेम मयनापाड़ार माठे, कालो मेयेर कालो होरिण-चोख
माथार पोरे देयो नि तुले बाश, लोज्जा पाबार पाय नि ओबोकाश
कालो ? ता शे जतोइ कालो होक, देखेछि तार कालो होरिन-चोखयूट्यूबच्या कृपेने आपण ठाकूरांच्या आवाजात ही कविता ऐकू शकतो.किंवा

स्वागतलक्ष्मी दासगुप्तोंच्या आवाजात छान चाल लावलेले गीतही ऐकू शकतो.
सालगिरहहर बरस सालगिरह पर यूँ ही हँसते हँसते
हर कोई उम्र में इक साल बढ़ा लेता है
वक़्त एक सेंध लगाता हुआ आहिस्ता से
उम्र के पेड़ से एक शाख चुरा लेता है
वक़्त के अपार इतिहास में झाँको तो ज़रा
कहाँ वर्तमान, कहाँ भूत, कहाँ भविष्य है
उम्र बढ़ती नहीं घटती हैं, हर एक साल के बाद
वक़्त आगे नहीं पीछे की तरफ़ चलता है
वक़्त आज़ाद परिन्दा हैं, ये अमर है
आज तक ये किसी ज़ंजीर से जकड़ा न गया
तर्क और भावनाओं की सब कोशिशें नाकाम रहीं
ये परिन्दा किसी शिकारी से पकड़ा न गया
ज़िन्दगी तो ग़मों की किताब हैं दोस्त
साल के बाद पन्ना जिसका उलट जाता है
पढ़ चुके कितना इसे, बाक़ी बची है कितनी
ऐसा सोचा तो दिल आँखों में सिमट आता है
मौत का ज़िक्र भयानक है, मगर
आज के दिन, उल्टी लटकी हुई तसवीर को
कुछ सीधा करें
फ़िक्र और  अहसास की इक और बुलन्दी छूकर
आओ, कुछ देर तक
माहौल को गंभीर करें..... !!


-- मैंने मूल उर्दू नज़्म का हिंदुस्तानी(हिंदी+उर्दू, बोलचाल की भाषा) में अनुवाद किया है. कवी का नाम तो पता नहीं, लेकिन इतनी खूबसूरत नज़्म लिखने के लिए उन्हें शुक्रिया ज़रूर कहूँगा..

वही


जुनी काही पाने दुमडलेली स्वप्नांच्या वहीत...

काही होत्या विस्मृतीत  गेलेल्या  कविता..
वेड्या वयातल्या वेड्या मनाच्या संहिता..

कोणाचे अल्लड स्मित  आठवणींच्या कुपीत..
काही रोजच गोंजारलेले मोरपिसांचे गुपित...

थोडे शब्द बापुडे चिंब ओले आठवणींत..
काही भावना कोसळत्या जलप्रपातात ...

होते काही मौक्तिकबिंदू गळालेले कातरवेळी...
होती चाहूल लागलेली  कुणाची वेळी - अवेळी..

एक प्रयत्न उधाण वारा कवटाळण्याचा..
नि होता एक  प्रयत्न आसमंत गवसण्याचा

होते काही क्षण रेंगाळलेले उंबर्‍यावर
एक पिंपळपान भरकटलेले वार्‍यावर

चाळता ती पाने  जाणीव झाली मजला..
संसार माझा स्वप्नांच्या सरणावरी  सजला..

वही जाळली मी आज माझ्या  स्वप्नांसहित ....


जी ढूँढता हैं....


जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन...

हिवाळ्यात कोवळ्या उन्हात..
अंगणात बसून चटईवर...
बेकंबे घोकणे,बाराखडी कोरणे
मग उग्गाच थोडे लोळणे..
आईने केस विंचरून दिले की..
शाळेला पळत सुटणे
दप्तर टाकून पाठीवर..

जी ढूँढता हैं फिर वोही...


उन्हाळ्यात पेंगुळलेल्या दुपारी..
छपरांतून डोकावणारे कवडसे..
ते कासव टाकीतले इवलेसे..
किती गार गार वाटायचं..
हात लावलं त्याला की
ते बेटं अंग चोरायचं..
तळाला जाऊन लपत असे..

जी ढूँढता हैं फिर वोही...


पावसाळ्यात डबक्यात..
शाईची कलाकारी..
भेपकी उडवणे..
अन्‌ ’त्या’ तळ्यात
माझा पाय ’खपणे’...
उधाणलेल्या वार्‍यात
फिरवलेली चकरी..

जी ढूँढता हैं फिर वोही...


पावसाळी नदीतल्या कागदी होड्या..
भिंतीवरून मारलेल्या रेतीत उड्या..
कैर्‍या तोडणे..लाखोळी चोरणे..
गुरांच्या मागे धावत जाणे..
टोपलं घेऊन शेण गोळा करणे..
चाक ’पजवत’ गावात भटकणे
अन्‌ भातुकलीत राजा-राणीच्या जोड्या..

जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन...


- १८ एप्रिल, २०१२ ,
 पुणे 

ज़िन्दगी गाती हैं मर्सिया


सुर्ख होते सबेरे
जैसे जलते अँगारे
मायूसी की दीवारें
बिखर जाती हैं खुशियाँ
ज़िन्दगी गाती हैं मर्सिया


शब्दों की सिलवटें
नज़्मों की कराहटें
दिल-धड़कन झूटे झूटे
हैरत में हैं काफिया

ज़िन्दगी गाती हैं मर्सिया


सपनों का आँगन
मर गया जोबन
सुखा भादो सुखा सावन
बैसाख जैसे हैं सदियाँ

ज़िन्दगी गाती हैं मर्सिया
 

मैं जो हूँ तर-बतर
शबो-सहर,आठों पहर
अश्के-दिल या खूने-जिगर
अपनी अपनी हैं कहानियाँ
 

ज़िन्दगी गाती हैं मर्सिया

जिस्म के ताबूतों में
बेजान बुतों में
 
दिखावटी रुतों में
रूहों की हैं परछाइयां

ज़िन्दगी गाती हैं मर्सिया


उम्मीदों का मर्सिया
सपनों का मर्सिया
रिश्तों-नातों का मर्सिया
हर लम्हा हैं मर्सिया
ज़िन्दगी गाती हैं मर्सिया


काही चारोळ्या - १

कधी काळी सहजच लिहील्या गेलेल्या ह्या चारोळ्या... पहिली वगळता इतर सर्व बझ्झवर टाकल्या होत्या. 
१ )
त्याचे नशीब माझे असते
तर बरे झाले असते
दगडावरची रेघ खोडणे
एवढे पण सोपे नसते
 

२)
तुझ्या त्या आठवणी, तुझे ते भास..
रखरखत्या वाळवंटी , मृगजळाचे आभास..
कधी दचकून उठावे, रात्री अवचितच..
तूच निजलीस शेजारी, खोटा ठरतो विश्वास.. 

३)
सावध असतो मी , आता स्वप्न बघतांना 
स्वप्नातली तू , काल प्रत्यक्षात दिसलीस....
माझ्या बंद पापण्यांच्या कैदेतून गं तू 
कशी काय फरार झालीस ? 

४)
सारेच बंध तोडून ये..
अशी धाव सैरभैर ये..
रातीला कवेत घेतो मी..
चांदण्यांना लपेटून ये.. 

५)
काळोखाच्या सावलीत...
उदास कुजबूज...
काजव्यांच्या ओठी..
चांदण्यांचे गुज..  

६)
रक्तिम क्षितिजावर....
स्वप्न उदयास आले..
पंखातील चैतन्य..
आसमंत झाले... 


निसर्गाशी एकरूप होतांना - ठाकुरांचे ’आकाश भॉरा शूर्जो तारा ’


आपण या निसर्गाचा एक भाग आहोत ही जाणीव जेव्हा होते तेव्हा मनात नेमक्या कोणत्या भावना येतात ? निसर्गाच्या सौंदर्याचा आविष्कार जेव्हा अनुभवतो, तेव्हा मन कसे पाखरू होते ना ?

   रबिंद्रनाथ ठाकूरांचे ’आकाश भॉरा शूर्जो तारा ’ हे असेच एक सुंदर गीत. निसर्गात रोजच घडणार्‍या गोष्टींकडे बघण्याची एक नवीच दृष्टी इथे आपल्याला दिसते. निसर्गाच्या विविध रूपांत आपले स्थान गवसल्यावर उचंबळून येणार्‍या भावना गुरुदेवांनी सहजसोप्या आणि गेय शब्दांत गुंफ़ल्या आहेत. शेवटच्या ओळी तर हा ’स्वत्वा’चा साक्षात्कार अगदी अचूक पकडतात.

" कान पेतेछी,
चोख मेलेछी,
धॉरार बुके,
प्राण ढेलेछी
जानार माझे ओजानार
कोरेछी शोंधान "

एकदा का स्वत्वाचा साक्षात्कार झाला की नेहमीच्याच ओळखीच्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो आणि मग सुरु होतो ज्ञातांमधल्या अज्ञातांचा शोध..

या गीताचा मी माझ्या परीने मराठीत अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात मला मोलाच्या सूचना देणार्‍या सविताताईंचे आभार. 

         
    आधी मूळ बांग्ला गीत :

आकाश भॉरा शूर्जो तारा
बिश्शो भॉरा प्रान
ताहारी माजखाने
आमी पेछी मोर स्थान
बिश्शोये ताइ जागे आमार गान

ऑशिम कालेर
जे हिल्लोले 
जोआर भाटाय
भुबोन डोले
नाड़ीते मोर रॉक्तोधाराय
लेगेछे तार तान

घाशे घाशे पा फ़ेलेछी
बोनेर पॉथे जेते
फुलेर गॉंधे चॉमोक लेगे 
उठेछे मॉन मेते
छोढ़िये आछे आनोन्दरइ दान

कान पेतेछी,
चोख मेलेछी,
धॉरार बुके,
प्राण ढेलेछी
जानार माझे ऑजानारे
कोरेछी शोंधान

 देबोब्रतो बिश्वास, शागोर सेन, श्राबोनी सेन, श्रीकांतो आचार्य अशा अनेक गायकांनी आपापल्या शैलीत हे गाणे गाईले आहे.  मी जुने देबोब्रतो बिश्वास ह्यांनी गायलेले गीत देतोय आणि नवे श्रीकांतो आचार्य ह्यांचे.मराठी अनुवाद :

आकाशी पसरले
सूर्य चंद्र तारे
विश्वात भरले
जीवन सारे

यात मला गवसले
माझे स्थान
विस्मयाने स्फ़ुरले
माझे गान

असीम काळाची
जी उचंबळते
भरती-ओहोटी
अ‍न जग झुलते
धमन्यांतून माझ्या
रक्तधारांत जाणवते
तीच ओढ

रानवाटांवर चालतां
पाउले चुंबती तृणपाती
गंध फुलांचा हरवी देहभान
वेडावले मन
मिळाले आनंदाचे दान

कान वेधले, डोळे उघडले
धरेच्या कुशीवर प्राण उधळले
ज्ञातांमाजी अज्ञातांचा
सुरु झाला शोध Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More