पोस्ट्स

2015 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चेहरे

आश्वासनास भुलले चेहरे काळोख पीत निजले चेहरे हातात आंधळ्यांच्या, बंदुका.. रक्तात हाय, भिजले चेहरे! त्यांची नज़र ढगांना बोचली अन् वावरात रडले चेहरे मी कळवळून गातो मर्सिया अन् दाद देत बसले चेहरे लिहतोस तू कुणासाठी गझल त्यांचे कधीच थिजले चेहरे -- संकेत, नवी दिल्ली,  ३० ऑगस्ट , २०१५  -------------------------------------------------- आणि जाताजाता ग़ालिबच्या एका शेराचा अनुवाद:- सगळेच काय दडले चेहरे? काही फुलांत दिसले चेहरे मातीत काय शोधीशी अता? झाले विलीन, लपले चेहरे मूळ शेर :- सब कहाँ, कुछ लाल:-ओ-गुल में नुमायाँ हो गईं ख़ाक में क्या सूरतें होंगी, कि पिन्हाँ हो गई -- नवी दिल्ली, १९ ऑगस्ट,२०१५ 

अनाहत

साकळली पावसाळी रात्र गाते गहिऱ्या व्रणाचे गूढ ऐकूनी तो अनाहत नाद गायी गोठ्यातल्या दिग्मूढ़ पाचोळा नीजलेला शांत येई दचकून त्याला जाग शीरांच्या त्या शिळ्या स्वप्नांस मंत्रोच्चारात लावी आग घुबडांचे थांबले घुत्कार छपराला टांगले वाघूळ माळावरच्या कुबट कोषात निर्वाताची व्यथा गाभूळ घाबरला वळचणीचा जीव सैरावैरा पळे फडताळ केविलवाणे दडे ते बीळ काळोखाला चरे विक्राळ पागोळ्यांच्या भिडे हृदयास भिजलेला आर्त अंतर्नाद कातर सूरात देती हाक देणारा ना कुणी प्रतिसाद गहिवरलेल्या घराची भिंत घेते पिऊन ते नि:श्वास डोळे थिजले कुणाची आस पावा वाजेल हा विश्वास --  नवी दिल्ली २ ऑगस्ट, २०१५,

निरर्थक कविता

कधी कधी निरर्थका लिहा बघू ज़रा उगा असाच मी लिहूनिया प्रसिद्ध जाहलो जगा असाच खेळ खेळलो पिळून शब्द काढले अजून केस ओढतो कशास काव्य वाचले इथून चार चोरले तिथून चार ढापले करून भेळ चट्पटी विका म्हणून आपले म्हणेल तो बळेबळे, "कळेल त्यांस चांगले" छळेल प्रश्न हो मला, "कशास लोक पांगले?" तुम्ही मला बघूनिया कशास दूर भागता तुम्हास सोडणार का न काव्य हे सुनाविता? पळा पळा छळेन मी विडंबने करेन मी उदार काव्यप्रेमिका कशास लाइका कमी? -- स्वामी संकेतानंद नवी दिल्ली,  २४ जुलै, २०१५ 

समाधी

ओली शेवाळलेली दगडी जन्मठेप कदंबकाठावर कोण उसळून घेई झेप चोरटा एक कटाक्ष मध्यान्ही काळोखात पेंगले निवांत नेत्र मायाळू मंद सूरात गारढोण श्वासस्पर्श युगे धरला अबोला अजागळ अजस्र देह आतून अथांग ओला स्पर्शून गंगामाई घाबरे परत फिरे दुधाळ स्तनामधुनि पाझरती नीलहिरे चुनखड़ी गा त्याचा अनंत उच्छवास सालीना मिळतो आहे लोबानी मुखवास -- संकेत  नवी  दिल्ली,  २२ जुलै, २०१५   

विडंबन- चालवून टाक चीप

चालवून टाक चीप, जागतीक अर्थ मंद   राजना रिसेशनात कोण बैंक होय बंद त्या युरोकुली भरीस, भांडते अजून ग्रीस बाय तू करू नकोस, एक वर्ष स्टॉक बंद  गीत गात 'टू बिगा'चं, बेलआउटी उगाच  सावकार आधुनीक, की मती असेल मंद  गार गार एक्सपोर्ट चीन मोरली सपोर्ट  गाउनी गुलाबगीत खात जा गुलाबकंद  ते तुलाच रे कळेल, कोण कोण रे जळेल  सांग ना अता खरेच, टोकियो कि ताशकंद? हाय ते इझी मनीत, क्यूइने कबर खणीत सांग घेउनी बुडेेल, सैमला अनर्थछंद -- स्कैमी संकेतानंद  ;) नवी दिल्ली,  ०८ जुलै , २०१५