एक ऐतिहासिक विजय
एप्रिलमध्ये लिहीलेला हा लेख आता इथे प्रकाशित करतोय. बातमी एव्हाना अगदीच शिळी झाली आहे, पण त्याला इलाज नाही. :D ---संकेत -------------------------------------------------------------------- २७ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारतासह आग्नेय आशियाला पोलियो मुक्त जाहीर केले व यासोबतच भारताने दरवर्षी हजारो मुलांना पंगू करणार्या एका भयावह रोगावर सुमारे २० वर्षे चाललेल्या लढ्यात एक ऐतिहासिक विजय मिळवला. जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया गटातली इतर राष्ट्रे पोलियो मुक्त झालेली असताना भारतामुळे आग्नेय आशिया गटाला अद्याप प्रमाणपत्र जाहीर झाले नव्हते. भारत पोलियो मुक्त करणे हे सर्वात मोठे आव्हान मानले जात होते. भारताने पोलियो लसीकरण मोहीम हाती घेण्यापूर्वी दरवर्षी हजारो मुले पोलियो ग्रस्त होत, कायमची लुळीपांगळी होत किंवा मृत्यूमुखी पडत. आरोग्याच्या पुरेशा सोयींचा अभाव, दुर्गम वस्त्या, रोजगारासाठी स्थलांतर करणारी कुटुंबे, लसीकरणा विषयीचे गैरसमज अशी अनेक गंभीर आव्हाने भारतापुढे होती....