निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा
हलवा माझे आवडते पक्वान आहे. तसे ते अनेकांचे आहे, पण माझे विशेष आहे. आता विशेष म्हणजे खास आहे. खास ह्या शब्दातच ’खा’ असल्याने हलवा जास्तच खाल्ला जातो. हलवा अनेक प्रकारचा असतो.मला गाजराचा जास्त आवडतो. तसा तो अनेक मोठ्या हिरोंना पण आवडतो. हिरोला त्याची आई खूप आवडत असते. मात्र हिरोची आई हलवा विशेष प्रसंगी बनवते. पण आमची आई कधीही हलवा बनवते, म्हणून मला माझी आई हिरोच्या आईपेक्षा जास्त आवडते. हलव्याचे दागिने बनतात. मला हलव्याचे दागिने आवडतात.आईला मात्र सोन्याचेच दागिने जास्त आवडतात. बाबांसाठी आईच एक दागिना आहे. ताईचे दागिने विचित्र असतात. संस्कृतच्या गुरुजींनी, ’लज्जा हा स्त्रीचा दागिना आहे’ ह्या अर्थाचे सुभाषित शिकवले होते. ’म्हणजे ’लज्जा’ हा तस्लिमा नसरीनचा पण दागिना आहे का गुरुजी?’ हा प्रश्न विचारल्याबद्दल मला बाकावर का उभे केले गेले ह्याचे उत्तर मात्र गुरुजींनी दिले नाही.मात्र तरीही मला गुरुजी आवडतात कारण संस्कृतमध्ये खूप मार्क मिळतात. मात्र गुरुजींना गणिताच्या अवचट बाई आवडतात.गणित मला नाही आवडत कारण बाई नेहमी ’समजा तुमच्याकडे १०० रुपये आहेत, दहा सफरचंदे आहेत’, असे म्हणत असते, पण प्रत्य...