निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

हलवा माझे आवडते पक्वान आहे. तसे ते अनेकांचे आहे, पण माझे विशेष आहे. आता विशेष म्हणजे खास आहे. खास ह्या शब्दातच ’खा’ असल्याने हलवा जास्तच खाल्ला जातो. हलवा अनेक प्रकारचा असतो.मला गाजराचा जास्त आवडतो. तसा तो अनेक मोठ्या हिरोंना पण आवडतो. हिरोला त्याची आई खूप आवडत असते. मात्र हिरोची आई हलवा विशेष प्रसंगी बनवते. पण आमची आई कधीही हलवा बनवते, म्हणून मला माझी आई हिरोच्या आईपेक्षा जास्त आवडते. हलव्याचे दागिने बनतात. मला हलव्याचे दागिने आवडतात.आईला मात्र सोन्याचेच दागिने जास्त आवडतात. बाबांसाठी आईच एक दागिना आहे. ताईचे दागिने विचित्र असतात. संस्कृतच्या गुरुजींनी, ’लज्जा हा स्त्रीचा दागिना आहे’ ह्या अर्थाचे सुभाषित शिकवले होते. ’म्हणजे ’लज्जा’ हा तस्लिमा नसरीनचा पण दागिना आहे का गुरुजी?’ हा प्रश्न विचारल्याबद्दल मला बाकावर का उभे केले गेले ह्याचे उत्तर मात्र गुरुजींनी दिले नाही.मात्र तरीही मला गुरुजी आवडतात कारण संस्कृतमध्ये खूप मार्क मिळतात. मात्र गुरुजींना गणिताच्या अवचट बाई आवडतात.गणित मला नाही आवडत कारण बाई नेहमी ’समजा तुमच्याकडे १०० रुपये आहेत, दहा सफरचंदे आहेत’, असे म्हणत असते, पण प्रत्यक्षात काहीच देत नाही. बाईला माझे प्रश्न आवडत नाही.  हौदाला भोक आहे तर तो बुजवण्याऐवजी तो किती वेळात रिकामा होईल ह्याचे उत्तर का शोधायचे ? एकदा ’हौद किती वेळात भरला ? ’ ह्याचे उत्तर मी ’नळ लवकर गेला.’ असे दिल्यामुळे बाईने मला कोंबडा बनवले होते. मी शाकाहारी असल्याने मला ते आवडले नव्हते. हलवा शाकाहारी पदार्थ आहे. मात्र हलव्यावर मागच्या बाकावरची मुले मांसाहारी विनोद करतात. मला ते आवडत नाही. मी करतो का चिकन टिक्क्यावर शाकाहारी विनोद ? ’हलवणे’ म्हणजे 'हलवा बनवणे' हा वाक्प्रचार मराठी भाषेत आणायला पाहिजे. मराठी माझी मातृभाषा आहे, पण मातृभाषा हा शब्द मात्र संस्कृत आहे. मराठी संस्कृतापासून आली असे संस्कृतचे गुरुजी म्हणाले होते. मात्र माझा मामा म्हणतो की मराठी प्राकृतापासून आली आहे. मामा विद्वान आहे, म्हणून मला तो आवडतो. मात्र त्याला पुस्तके आवडतात. ’चुलीत घाला तुमची पुस्तके !’ अशी मामी मामाला आज्ञा करते, मात्र तो पाळत नाही. आमचा जिमी आमची प्रत्येक आज्ञा पाळतो.त्याला शेजारच्या रेड्डींची डॉली आवडते. रेड्डींची स्वाती डॉलीला बागेत घेऊन येत असते. मग मीही जिमीला बागेत घेऊन जातो.मला स्वाती आवडते. मात्र तिला चॉकलेट बॉईज आवडतात. आमीर खान चॉकलेट बॉय आहे म्हणून मला तो अजिबात आवडत नाही. स्वाती मला लाडाने हवला म्हणते. मला हलवा आवडत असल्याने म्हणत असेल. पण यस.यम. रामारावांचा वेंकट म्हणतो की तेलुगूत ’हवला’ म्हणजे ’वेडा’, पण माझा त्याच्यावर विश्वास नाही. विश्वासबाबू आमच्या सोसायटीचे कोषाध्यक्ष आहेत. ते बंगाली आहेत. मी त्यांच्या घरी गेलो की, मला रसगुल्ला देतात, म्हणून मला विश्वासबाबू आवडतात. मात्र विश्वासकाकू बसवून त्यांचे वीणावादन ऐकवते, ते मला आवडत नाही. त्यांना मी हलव्यात तुरटी मिसळून देणार आहे. हलव्याचे अनेक फायदे आहेत. म्हणून मला हलवा आवडतो.

४ टिप्पण्या:

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More