पोस्ट्स

marathi kavita लेबलसह पोस्ट दाखवत आहे

हिरव्या कुरणांबाहेर

हिरव्या कुरणांबाहेर बसले आहेत अजस्र देहाचे अक्राळविक्राळ चौकीदार भालेबंदुकातोफा घेऊन हिरव्या कुरणांबाहेर बुभुक्षित गुरांचा आशाळभूत कळप माती उकरून सुकलेल्या गवतांच्या मुळ्या खात आहे हिरव्या कुरणाला आहे  उंचच उंच गंजलेले लाल काटेरी कुंपण गंजलेल्या कुंपणावर चढण्याचा प्रयत्न करत आहेत गुराखी सोलवटलेल्या कातडीने हिरव्या कुरणांत आपसूकच खत वाहत येत असते आणि हिरवी कुरणे हिरवीकंच होत असतात -संकेत

झाडीबोली कविता- लाल

पहाडावरची लाल माती एक दिवस खसली खसत खसत जाऊनस्यानी सयरामंदी पोचली वावरावरची लालमाती माट्यासंग उडली उडत उडत जाऊनस्यानी सयरामंदी बसली सयर झाले लाललाल सप्पाच्या सप्पा लाल लाल रंग परसाच्या फुलाईचा जंगलाच्या विस्तूचा लाल रंग उगोत्या सूर्याचा जरत्या निव्याचा खोकलून खोकलून छाती होते लाल पायाले काटा गडते माती होते लाल लाल रंग धमनीच्या पान्याचा जवसाच्या घान्याचा लाल रंग तिखट बुकनीचा कपार कुकवाचा हा सप्पायचा सप्पाय लालरंग सयरात असा जाऊन बसला घरात घुसला, नळात धसला रस्त्यात वायला, गाडीत परला सयरावर लाललाल कापन बसून रायली दिवस का रात बी लाल होऊन रायली काऊन विचारता, 'मंग का झाला?' रंगारंगाचा सयर लालरंग झाला हाच त जी बोहोत होऊन गेला --------------------------------- खसली= खचली माट्या= वावटळ बुकनी= तिखट आणखी काही शब्द कळले नसल्यास विचारणे. प्रो टीप:- य च्या जागी ह आणि र च्या जागी ळ वाचल्यास बरेचसे अर्थ लागू शकतात. -संकेत

अनाहत

साकळली पावसाळी रात्र गाते गहिऱ्या व्रणाचे गूढ ऐकूनी तो अनाहत नाद गायी गोठ्यातल्या दिग्मूढ़ पाचोळा नीजलेला शांत येई दचकून त्याला जाग शीरांच्या त्या शिळ्या स्वप्नांस मंत्रोच्चारात लावी आग घुबडांचे थांबले घुत्कार छपराला टांगले वाघूळ माळावरच्या कुबट कोषात निर्वाताची व्यथा गाभूळ घाबरला वळचणीचा जीव सैरावैरा पळे फडताळ केविलवाणे दडे ते बीळ काळोखाला चरे विक्राळ पागोळ्यांच्या भिडे हृदयास भिजलेला आर्त अंतर्नाद कातर सूरात देती हाक देणारा ना कुणी प्रतिसाद गहिवरलेल्या घराची भिंत घेते पिऊन ते नि:श्वास डोळे थिजले कुणाची आस पावा वाजेल हा विश्वास --  नवी दिल्ली २ ऑगस्ट, २०१५,

निरर्थक कविता

कधी कधी निरर्थका लिहा बघू ज़रा उगा असाच मी लिहूनिया प्रसिद्ध जाहलो जगा असाच खेळ खेळलो पिळून शब्द काढले अजून केस ओढतो कशास काव्य वाचले इथून चार चोरले तिथून चार ढापले करून भेळ चट्पटी विका म्हणून आपले म्हणेल तो बळेबळे, "कळेल त्यांस चांगले" छळेल प्रश्न हो मला, "कशास लोक पांगले?" तुम्ही मला बघूनिया कशास दूर भागता तुम्हास सोडणार का न काव्य हे सुनाविता? पळा पळा छळेन मी विडंबने करेन मी उदार काव्यप्रेमिका कशास लाइका कमी? -- स्वामी संकेतानंद नवी दिल्ली,  २४ जुलै, २०१५ 

समाधी

ओली शेवाळलेली दगडी जन्मठेप कदंबकाठावर कोण उसळून घेई झेप चोरटा एक कटाक्ष मध्यान्ही काळोखात पेंगले निवांत नेत्र मायाळू मंद सूरात गारढोण श्वासस्पर्श युगे धरला अबोला अजागळ अजस्र देह आतून अथांग ओला स्पर्शून गंगामाई घाबरे परत फिरे दुधाळ स्तनामधुनि पाझरती नीलहिरे चुनखड़ी गा त्याचा अनंत उच्छवास सालीना मिळतो आहे लोबानी मुखवास -- संकेत  नवी  दिल्ली,  २२ जुलै, २०१५   

विडंबन - अशी कबुतरे येती

अशी कबुतरे येती; आणिक घाण ठेवुनी जाती दोन घरांची पुण्यकमाई दहा घरांच्या खाती कपोत आला, पहिला वहिला खिड़कीमागे उभा राहिला तया मागे, येई साजणी गूटर्गूच्या साथी... दुरून येती थवे देखिले मी ग्याल्रीचे दार लोटिले धड़क मारती तरी निरंतर गंधित झाल्या भिंती पंख दोन ते हळु फ़डफ़डले खोलीभर मायेने फिरले हॉलकिचनाच्या भिंतीमधुनि लागेना मज हाती 'पुण्यवान' तो येता गाठी शिव्या पाच मोहरल्या ओठी त्या तुटल्या दातांची गाथा क्रूर कबुतरे गाती -- स्वामी संकेतानंद, १५ ऑक्टोबर, २०१३, नवी दिल्ली

टॉरेंटगाथा

ह्या प्रकाराला ’पोस्टमॉडर्नोत्तर काव्य’ म्हणतात म्हणे. म्हटलं आपणही पाडून बघावी एक पोएम. तर काल रात्री पाडलेली ही रेसिपी चाटुनि आता बघणे.  डार्केस्ट क्लाउडी राती लैपटॉप मांडी असतो लेटेस्ट कोणती मूव्ही मी लगेच आयमडिबतो* टॉरेंट साइटी जाता मी हज़ार नावे बघतो वेचून क्लीन टॉरेंटा सीडणारि* तेची धरतो डाऊनलोडुनी घेतो बँडविड्थ सारी युझुनी रात्रीच पाहुनी मूव्ही गूगलून घेतो अजुनी पिंगूनि मित्र तो बोले ’पाहिलास मूव्ही अमका?’ देऊन आणखी लिंका आणवेल मोठा झटका ’येईल तो नवा सीझन्‌*’ ’एपिसोड आला बघ रे’ यूट्यूब वर चाले गाणी बँडविड्थ सारी विसरे डाऊनलोडण्याची ही सूटणार नाही व्यसने टॉरेंट-कुंपणी ’स्वामी’ थांबवाल आता चरणे? -- स्वामी संकेतानंद, नवी दिल्ली, १३-०९-२०१४ ------------------------------------------------------------------------------------------ आयमडिबणे = imdb.com वर सिनेमाचे रेटिंग/रिव्ह्यू/प्लॉट समरी बघणे सीडणारि = चांगला seed count असणारी टॉरेंट सीझन = इंग्रजी मालिकांचे पर्व.

पोएटिक लिबर्टी

ढिंगच्याक ढिंकच्याक पोएटिक लिबर्टी कूल, हॅपनिंग, फ़ूल्टू डर्टी आला आला श्रावण झोपाळ्यामागे रावण अमेरिकेची गार्‍हाणी गणपत वाणी सिग्गी पितांना मॉलमध्ये फ़िरतांना हाथों में हाथ तेरा मेरा साथ हाड हूड कमॉन डूड व्हॉट्स योर प्रॉब्लम ? नेव्हर माइंड डियर इट हॅप्पन्स हियर अहाहा ! ते दृष्य पहा मला पहा फ़ुले वहा जीवन त्यांना कळले हो कळले ते पाजळले हो हो-हल्ला क्यूँ है भाई ? किसकी मर गई माई ? जीयो जी  भर के एक और पराठा मख्खन मार के हू वन दि मॅच ? डन्नो, आय हॅव फ़्लाइट टू कॅच केल्याने होत आहे रे थांबल्याने मौत आहे रे चला चला पुढे चला पुढच्याच्या पुढे चला समझौता करनेका नहीं कुचल डालो,रुकनेका नहीं छोटी बातों की चिंता छोड़ दो भक्तगणों, गहरी साँस अंदर लो डूड, इट्स क्वाएट ऍब्सर्ड बट आय डू केअर अबाऊट दि वर्ल्ड नवे-पुराणे अधिक-उणे साहित्याचा कागद कागदावरचे साहित्य भेळपुरी भेळपुरी !! होता है अक्सर ऐसा चाहिए प्रसिद्धी या फ़िर पैसा सुबह घर से निकला था कोई पर वो उसका घर था ही नहीं व्हॉट मॉडर्निस्ट ? व्हॉट पोस्ट-मॉडर्निस्ट ? दि होल वर्ल्ड इज ब्लडी अपॉर्च्यु...

श्रावणमासी हर्ष-मानसी

माझ्या लाडक्या कवींच्या, बालकवींच्या ’श्रावणमासि हर्ष मानसी’ या माझ्या आवडत्या कवितेचे हे विडंबन त्यांची क्षमा मागूनच सादर करत आहे. श्रावणमासी हर्ष-मानसी, फिरायला जाती सिंहगडी रुटीन चूकवून,बाईक दामटून,वाट करती वाकडी विकेंड बघता ओघ गाड्यांचा गडावरी चाललासे जत्रा भरली काय गडावरी, क्षणोक्षणी मज भासे झालासा सूर्यास्त वाटतो, क्यामेरा त्वरेने तो काढे तानाजी कड्यावर पोज दिली, फ़ोटो काढा ना गडे उठती वरती जलदांकडे पाहण्यास वेळ नसे सर्व प्रेयसीवर होय रोखिले क्यामेर्‍याची लेन्से दुकानमाला दिसता भासे शॉपिंग कॉम्प्लेक्स इथे चढूनि येती गडावरती, खादाडीस की एकमते कचरा करूनि प्लास्टिकचा गडावरी वावरती सुंदर ललना हिरव्या कुरणी मित्रासंगे बागडती पार्ट्याही होती रानी, डीजे आसमंती घुमे फ़ेसाळ पेला बोले, हवी कशाला परमिट रुमे व्हिस्की कॅन उघडला विपिनी,धुंद गंध दरवळला बघता तिथे पोलिसमामा, मन अति कळवळला महागडी गाडी घेऊन साथी घाटावरूनि चढती आले मनी, निघाले झणी,गोंधळ घालाया वरती गडदर्शना निघती ललना, हर्ष येई कराया क्लिक वॉलवर त्यांच्या बघून घ्यावे, श्रावण महिन्याचे ’पिक’ ---पुणे, २ ऑग...

पाडाडी- विडंबनासाठी कच्चा माल- भाग १

माझ्या काव्यरसिक मित्रहो, विसरलांत तर नाही ना ? प्रदीर्घ कालानंतर परत सार्वजनिक जीवनात येत आहे म्हणून विचारले. जे विसरले त्यांना माझी ओळख करून द्यावयाचा विचार आहे. तर मी कवी स.दा.हितकरे. हो, हो तेच ते कविता पाडण्याची रेसिपी लिहून ज्यांनी होतकरू नवकवींवर अनंत उपकार केले आहेत आणि ज्यांच्या कृपाप्रसादामुळे आज प्रत्येक दुसर्‍या व्यक्तीस कविता प्रसवू लागली आहे तेच ते काव्यभूषण, काव्यकलानिधी, काव्यकुसुमरत्नाकर, काव्यपंडित, काव्यशिरोमणी, काव्यसम्राट कवीश्रेष्ठ स.दा.हितकरे. तसे मला ह्या पदव्या नावापुढे जोडायला आवडत नाही,पण काव्यरसिक चाहत्यांनी इतक्या प्रेमाने हा बहुमान दिला आहे त्याचा अव्हेर करता येत नाही. आता माझ्या काव्यरसिक काव्यप्रेमींपुढे प्रश्न पडला असेल की मी अचानक असा अज्ञातवासात कसा गेलो आणि कसा प्रकटलो. मागील वर्षी एका काव्यसंमेलनात काव्यवाचन करत असतांना माझ्या काव्यतृषार्त श्रोत्यांनी मजवर जो ’प्रेमाचा वर्षाव’ केला त्याचा स्वीकार करून अज्ञातवासात जाण्याचे प्रयोजिले जेणेकरून माझ्या काव्यसाधनेस व्यत्यय येऊ नये. आज अचानक माझ्या सर्व काव्यरसिक काव्यप्रेमींच्या दारावर काकपक्षी कोक...

वही

जुनी काही पाने दुमडलेली स्वप्नांच्या वहीत... काही होत्या विस्मृतीत  गेलेल्या  कविता.. वेड्या वयातल्या वेड्या मनाच्या संहिता.. कोणाचे अल्लड स्मित  आठवणींच्या कुपीत.. काही रोजच गोंजारलेले मोरपिसांचे गुपित... थोडे शब्द बापुडे चिंब ओले आठवणींत.. काही भावना कोसळत्या जलप्रपातात ... होते काही मौक्तिकबिंदू गळालेले कातरवेळी... होती चाहूल लागलेली  कुणाची वेळी - अवेळी.. एक प्रयत्न उधाण वारा कवटाळण्याचा.. नि होता एक  प्रयत्न आसमंत गवसण्याचा होते काही क्षण रेंगाळलेले उंबर्‍यावर एक पिंपळपान भरकटलेले वार्‍यावर चाळता ती पाने  जाणीव झाली मजला.. संसार माझा स्वप्नांच्या सरणावरी  सजला.. वही जाळली मी आज माझ्या  स्वप्नांसहित ....

जी ढूँढता हैं....

जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन... हिवाळ्यात कोवळ्या उन्हात.. अंगणात बसून चटईवर... बेकंबे घोकणे,बाराखडी कोरणे मग उग्गाच थोडे लोळणे.. आईने केस विंचरून दिले की.. शाळेला पळत सुटणे दप्तर टाकून पाठीवर.. जी ढूँढता हैं फिर वोही... उन्हाळ्यात पेंगुळलेल्या दुपारी.. छपरांतून डोकावणारे कवडसे.. ते कासव टाकीतले इवलेसे.. किती गार गार वाटायचं.. हात लावलं त्याला की ते बेटं अंग चोरायचं.. तळाला जाऊन लपत असे.. जी ढूँढता हैं फिर वोही... पावसाळ्यात डबक्यात.. शाईची कलाकारी.. भेपकी उडवणे.. अन्‌ ’त्या’ तळ्यात माझा पाय ’खपणे’... उधाणलेल्या वार्‍यात फिरवलेली चकरी.. जी ढूँढता हैं फिर वोही... पावसाळी नदीतल्या कागदी होड्या.. भिंतीवरून मारलेल्या रेतीत उड्या.. कैर्‍या तोडणे..लाखोळी चोरणे.. गुरांच्या मागे धावत जाणे.. टोपलं घेऊन शेण गोळा करणे.. चाक ’पजवत’ गावात भटकणे अन्‌ भातुकलीत राजा-राणीच्या जोड्या.. जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन... - १८ एप्रिल, २०१२ ,  पुणे 

काही चारोळ्या - १

कधी काळी सहजच लिहील्या गेलेल्या ह्या चारोळ्या... पहिली वगळता इतर सर्व बझ्झवर टाकल्या होत्या.  १ ) त्याचे नशीब माझे असते तर बरे झाले असते दगडावरची रेघ खोडणे एवढे पण सोपे नसते   २) तुझ्या त्या आठवणी, तुझे ते भास.. रखरखत्या वाळवंटी , मृगजळाचे आभास.. कधी दचकून उठावे, रात्री अवचितच.. तूच निजलीस शेजारी, खोटा ठरतो विश्वास..   ३) सावध असतो मी , आता स्वप्न बघतांना  स्वप्नातली तू , काल प्रत्यक्षात दिसलीस.... माझ्या बंद पापण्यांच्या कैदेतून गं तू  कशी काय फरार झालीस ?   ४) सारेच बंध तोडून ये.. अशी धाव सैरभैर ये.. रातीला कवेत घेतो मी.. चांदण्यांना लपेटून ये..   ५) काळोखाच्या सावलीत... उदास कुजबूज... काजव्यांच्या ओठी.. चांदण्यांचे गुज..    ६) रक्तिम क्षितिजावर.... स्वप्न उदयास आले.. पंखातील चैतन्य.. आसमंत झाले...  

महानगर

मी जिथे राहतो ते एक महानगर आहे.. इथल्या व्याख्या वेगळ्या आहेत.. इथली परिमाणं वेगळी आहेत.. इथे उंची ब्रॅंड्स मध्ये मोजली जाते  आणि श्रीमंती, स्क्वेअर फूट मध्ये.. खोली लक्षात येते सरकारी कचेऱ्यांत.. आणि झेप, मिळणार्‍या पॅकेजमध्ये.. इथे व्यक्तीस्वातंत्र्य लक्तरांमध्ये मिरवतं.. कधी फसफसतं  आणि मग फुटपाथवर हसतं. इथल्या रात्री आगळ्या आहेत.. काही अंग थिरकत असतात आणि काही कुडकुडत असतात.. काही पाय लटपटत असतात.. आणि काही लगबगत असतात.. काही हात शिवशिवत असतात.. आणि काही विनवणत असतात. इथले दिवससुद्धा गमतीदार आहेत. सकाळ झाली रे झाली.. की  रस्त्यांवर घड्याळे धावतात... सिग्नलवर थांबलेली घड्याळे.. लाल दिव्याखालच्या आकड्यागणिक कॅल्कुलेटरमध्ये बदलतात.. एखादा कॅल्कुलेटर घाईघाईत घड्याळ बनतो.. मग एखादी घड्याळ अचानक बंद पडते, कायमची.. काळ-काम-वेगाचे गणित सोडवतांना.. माणूस कधी वजा केला जातो, कळतंच नाही.. इथे गुलामगिरी आहे.. गगनचुंबी इमारती, मॉल्स आणि झगमगते रस्ते म्हणजे सावज हेरायला बनवलेला आधुनिक साप...

विडंबन - सांग सांग भोलानाथ

कविवर्य श्री. मंगेश पाडगावकरांची मनापासून माफी मागून आणि ज्यांनी ही  कविता लिहिण्याची प्रेरणा दिली त्या सर्वांना मनसोक्त शिव्या घालून "सांग सांग भोलानाथ " ह्या आपल्या सर्वांच्या लाडक्या बालगीताचे आय टी कामगाराच्या " फ्रस्टेशनगीतात" विडंबन करतोय.  सांग सांग भोलानाथ, क्लाएंट चिडेल काय ? प्रोजेक्ट कचर्‍यात जाऊन, रिलीज मिळेल काय ? भोलानाथ मॅनेजर दया दाखवेल काय ? माझे काम स्वतः उरी घेईल काय ? भोलानाथ, भोलानाथ, खरे सांग एकदा  आयटीत डेडलाईन, पाळली जाते कितीदा ?  भोलानाथ उद्या आहे,क्लाएंन्टसोबत मिटींग.. सिक लीवची माझ्या, होईल का रे सेटिंग ? भोलानाथ भोलानाथ हाईक मिळेल काय ? ३५-४० टक्क्यांचा पाउस पडेल काय ? भोलानाथ माझ्या कॉम्प ऑफ्स देशील काय ? भोलानाथ मनासारखे काम मिळेल काय ? एक गरीब बिचारे पिडलेले कोकरू, आर्त, काळजाला पिळवटणार्‍या स्वरात भोलानाथला म्हणाले, " भोलानाथ पुण्याला, जायला मिळेल काय ?  भोलानाथ मॅनेजरचे, हृदय पाझरेल काय ? " आकाशवाणी झाली, " भगवान के घर...

अंतहीन...

अलविदा म्हणताना... वेदना अंतहीन.. 'क्षण' दोन क्षणांचा.. हुरहूर अंतहीन.. नुसतेच कसे गिळावे.. हुंदके कंठातले.... हसरे डोळे जरी.. आसवे अंतहीन.. पाठमोरी आकृती  ठिपका होतांना.. परिघात अडकले.. जीवन अंतहीन.. तू असलास जरी.. परक्या बाहुपाशात.. तुझाच मजला... आधार अंतहीन.. नजरानजर क्षणाची.. मन रे अडकले.. तो विसरायाची.. साधना अंतहीन.. मोहाच्या चांदराती.. बेसावध चांदण्या.. फसव्या स्वप्नांचा  पाठलाग अंतहीन.. आज पुन्हा एकदा.. एकांताची साथ.. विस्कटलेल्या बिछान्याचे. भास अंतहीन.. तुटता तुटेना.. ताण अंतहीन.. सुटता सुटेना.. प्राण अंतहीन.. येऊ दे ते .. मरण अंतहीन.. जळू दे ते.. सरण अंतहीन..

विडंबन - नागपुरात

बंगळुरात  लिहून झाले .. आता नागपुरात .. प्रेरणास्रोत मागे  सांगितले आहेच, पुन्हा एकदा सांगतो >> आदी जोशीची " कोंकणात " ही  कविता..  ही कविता मी "बंगळुरात" च्या सुरातच लिहिली आहे. मुद्दाम नागपुरी मराठी वापरली आहे. आनंद घ्यावा..  नागपुरात   मोठ्ठाल्ले रस्ते.. ट्राफिकले हसते .. ढोरं बसते.. नागपुरात.. डी पी ची हिरवळ नागनाल्याचा चिखल उन्हाळ्यात तळमळ नागपुरात नागपुरीचा थाट हिंदी बम्बाट इंग्लिशलेबी वाट नागपुरात के सी पार्कचा पोहा पहाटे चारले चहा उधारीच वाहा नागपुरात माहोल पोट्टे रिकामचोट्टे संत्र्याचे कट्टे नागपुरात मिहानची भरारी लफडे भारी दिल्लीची वारी नागपुरात बी इ करी बेरोजगारी पुण्याची वारी नागपुरात मस्तीत चित्त पाहुणचार मस्त फॅमिली संग नागपुरात  -------------------------------------- बम्बाट = भरपूर . विदर्भात "बम किंवा  बम्बाट " हा शब्द बराच कॉमन आहे.. "अबे,बम मजा आली बे .." एकदम सहज निघणारा उद्गार ! माहोल = हा "भारी /लै भारी" चा समानार्थी..आणि इतरही अनेक अर्थ सुचवतो हा शब्द .. म्हणजे बघा ," क्या...

विडंबन - बंगळुरात

आदी जोशीच्या " कोंकणात " या  कवितेवरुन सुचलेले हे विडंबन ... होसुरची वाट ट्राफिक दाट डोक्याची वाट बंगळुरात फोरमची हिरवळ.. सुगंधी दरवळ     जीवाला कळ बंगळुरात गजर्‍याचा घमघमाट चोरांचा सुळसुळाट खिश्याला चाट बंगळुरात मराठीला काट हिंदीला लाथ कानडी बरसात बंगळुरात आय टी ची भरारी माणूस करारी एकटेपणा मारी बंगळुरात विचलित चित्त चित्त अतृप्त सावली संग बंगळुरात   ( " सुगंधी दरवळ "  इथे आधी  "ब्रिगेडरोडची वर्दळ " हा शब्द होता :) पण मी तो काढला.(कारण विचारू नये ..हेहे ) ही कविता आधी मीमराठी या संकेतस्थळावर प्रकाशित केली होती.तेथे वाचक म्हणाले ," यार बंगळूरावर कविता लिहितोयस आणि ब्रिगेड रोड मिसिंग ?? ".. तर मित्रांनो ,तुम्हाला योग्य ती ओळ वाचावी ;)  )

स्वामी संकेतानंद कहिन

             कधी कधी आपल्या भोवताली एखादी घटना घडते आणि नकळत आपण आपल्या मताची पिंक टाकतो. एखादा कवीमनाचा असेल तर तो कवितेच्या स्वरुपात पिंक टाकेल. आपण अशा कवितांना "वात्रटिका " म्हणतो. वात्रटिकांना  साधारणतः चारोळींचे स्वरूप असते.मी अशाच काही छोट्या छोट्या वात्रटिका लिहिल्या. खरे तर ह्यांना कविता तरी म्हणावे का , हा प्रश्न मला पडलाय. सहज सुचलेल्या काही ओळी, एखाद्या घटनेवर भाष्य करतात. ह्या मुक्तछंदात लिहिलेल्या आहेत,ओळींची संख्या निश्चित  नाही,  अगदीच  स्वैर आहेत.    कोणतेही शीर्षक नसलेल्या ह्या छोटेखानी कविता( की वात्रटिका ? ) मी " स्वामी संकेतानंद कहिन " या प्रकारात टाकतो.                       अशा चार " कहिन " मी इथे देतोय.      स्वामी संकेतानंद कहिन क्र. १ >> ...