अनाहत

साकळली पावसाळी रात्र
गाते गहिऱ्या व्रणाचे गूढ
ऐकूनी तो अनाहत नाद
गायी गोठ्यातल्या दिग्मूढ़
पाचोळा नीजलेला शांत
येई दचकून त्याला जाग
शीरांच्या त्या शिळ्या स्वप्नांस
मंत्रोच्चारात लावी आग
घुबडांचे थांबले घुत्कार
छपराला टांगले वाघूळ
माळावरच्या कुबट कोषात
निर्वाताची व्यथा गाभूळ
घाबरला वळचणीचा जीव
सैरावैरा पळे फडताळ
केविलवाणे दडे ते बीळ
काळोखाला चरे विक्राळ
पागोळ्यांच्या भिडे हृदयास
भिजलेला आर्त अंतर्नाद
कातर सूरात देती हाक
देणारा ना कुणी प्रतिसाद
गहिवरलेल्या घराची भिंत
घेते पिऊन ते नि:श्वास
डोळे थिजले कुणाची आस
पावा वाजेल हा विश्वास

-- नवी दिल्ली२ ऑगस्ट, २०१५,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More