’सोपा’ उपाय ??

’फुकट ते पौष्टिक’ च्या ’पिपा’सेला आळा घालणारा ’सोपा’ उपाय.

कथा - कारखान्यातले भूत

भुतांच्या अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या मुलाची कथा

विडंबन- जालाचे भामटं

जालाचे भामटं माझे घरीं प्रकटले। अवघेचि जालें पैसे गुल।। १।। साईटीचे कपट करुनी फसवलें अकाउंट देखिलें भागाकार गे माये।।२।। रोज बसून पूनम बारू सहज 'नीटु' प्याला। कधी ढोसियला खंबाकारे।।३।। -- स्वामी संकेतानंद, १७ फ़ेब्रुवारी, २०१५

लसणाचे आक्षे

लागणारे साहित्य:- तांदूळ, लसणाच्या पाती, जीरे, हिरवी मिर्ची, टोमेटो, कोथिंबीर, चवीपुरते मीठ
कृ्ती:-
पावशेर तांदूळ 3-4 तास पाण्यात भिजवायचे.
मुठीत येतील एवढ्या छान कोवळ्या, लांबसडक लसणाच्या पाती घ्याव्या. बारीक चिरून साधारण 20-30 मिनिटे पाण्यात भिजवावे.
आता भिजलेले तांदूळ, लसणाची चिरलेली पात, थोड़ी कोथिंबीर, हिरवी मिर्ची, एक टोमेटो, आणि चमचाभर जीरे, चवीपुरते मीठ हे सगळे एकत्र करायचे आणि मिक्सरमध्ये थोड़े पाणी टाकून वाटून एकजीव करायचे. बैटर साधारण डोशाच्या बैटरएवढे गाढ असावे.
तव्यावर थोड़े तेल शिंपडून एकसर पसरावे. त्यावर बैटर गोल पसरावे. (त्याआधी तव्याखालची गैस नक्की पेटवा आणि तवा गरम होऊ द्या.) पसरताना फार जाड पसरवू नये आणि फार पातळही नको. पातळ असेल तर तव्याला चिकटेल आणि जळेल. जाड झाले तर वरची बाजू शिजणार नाही.
तव्यावर झाकण ठेवावे. गैस मध्यम आचेवर असावी. साधारण 2-3 मिनिटांनी झाकण काढावे. परत आक्ष्यावर थोड़े तेल सोडावे. आक्षे उलटून 20-30 सेकण्ड शेकावे. तव्यावरुन काढून तूप ओढून चटणी किंवा लोणच्यासोबत गरमागरम हादडावे.
तांदळाचे पीठ झाले कमी:-


आदर्श आक्षे:- उलट बाजूआदर्श आक्षे:- सुलट बाजू


टीप्स :-
1. तांदूळ 3- 4 तास भिजू देण्याएवढा वेळ नसेल तर तांदळाचे पीठही वापरता येईल. पण अस्सल चव भिजलेले तांदूळ पातीसोबत वाटल्यानेच येते- इति मातोश्री.
2. बैटर पसरवायला क्रेडिट कार्ड वापरता येईल. त्याने अगदी एकाच जाडीचे पसरते. पळीच्या उलट बाजूने पसरले तर ते डोशासारखे पसरते. सराटा वापरता येईल. पूर्वी आंब्याची किंवा पेरुची पाने मोडून त्याला काडीने बांधून वापरत. आता प्रगत झालो. अच्छे दिन आले.
3. फ़क्त लसणाची पात वापरावी. सोललेल्या पाकळ्या नाही. चवीला उग्रता नको.
4. तांदूळ जर कमी झाले तर आक्षे तव्याला चिकटतात. तव्यावर नीट पसरले जात नाहीत. तेव्हा आक्षे जमले नाहीत तर बैटरमध्ये थोड़े तांदळाचे पीठ टाकता येईल. ते मिसळा आणि पुन्हा एक प्रयत्न करून पहा. जमेगा बाबा जमेगा!
5. आक्षे बनले की खायला प्रस्तुत लेखकाला अवश्य बोलवावे. नाहीतर पुढच्या वेळी आक्षे बिघडतात.

-- स्वामी संकेतानंद 

चेहरे

आश्वासनास भुलले चेहरे
काळोख पीत निजले चेहरे
हातात आंधळ्यांच्या, बंदुका..
रक्तात हाय, भिजले चेहरे!
त्यांची नज़र ढगांना बोचली
अन् वावरात रडले चेहरे
मी कळवळून गातो मर्सिया
अन् दाद देत बसले चेहरे
लिहतोस तू कुणासाठी गझल
त्यांचे कधीच थिजले चेहरे

-- संकेत,
नवी दिल्ली, 
३० ऑगस्ट , २०१५ 
--------------------------------------------------
आणि जाताजाता ग़ालिबच्या एका शेराचा अनुवाद:-
सगळेच काय दडले चेहरे?
काही फुलांत दिसले चेहरे
मातीत काय शोधीशी अता?
झाले विलीन, लपले चेहरे
मूळ शेर :-
सब कहाँ, कुछ लाल:-ओ-गुल में नुमायाँ हो गईं
ख़ाक में क्या सूरतें होंगी, कि पिन्हाँ हो गई

-- नवी दिल्ली,
१९ ऑगस्ट,२०१५ 

अनाहत

साकळली पावसाळी रात्र
गाते गहिऱ्या व्रणाचे गूढ
ऐकूनी तो अनाहत नाद
गायी गोठ्यातल्या दिग्मूढ़
पाचोळा नीजलेला शांत
येई दचकून त्याला जाग
शीरांच्या त्या शिळ्या स्वप्नांस
मंत्रोच्चारात लावी आग
घुबडांचे थांबले घुत्कार
छपराला टांगले वाघूळ
माळावरच्या कुबट कोषात
निर्वाताची व्यथा गाभूळ
घाबरला वळचणीचा जीव
सैरावैरा पळे फडताळ
केविलवाणे दडे ते बीळ
काळोखाला चरे विक्राळ
पागोळ्यांच्या भिडे हृदयास
भिजलेला आर्त अंतर्नाद
कातर सूरात देती हाक
देणारा ना कुणी प्रतिसाद
गहिवरलेल्या घराची भिंत
घेते पिऊन ते नि:श्वास
डोळे थिजले कुणाची आस
पावा वाजेल हा विश्वास

-- नवी दिल्ली२ ऑगस्ट, २०१५,

निरर्थक कविता

कधी कधी निरर्थका लिहा बघू ज़रा उगा
असाच मी लिहूनिया प्रसिद्ध जाहलो जगा
असाच खेळ खेळलो पिळून शब्द काढले
अजून केस ओढतो कशास काव्य वाचले
इथून चार चोरले तिथून चार ढापले
करून भेळ चट्पटी विका म्हणून आपले
म्हणेल तो बळेबळे, "कळेल त्यांस चांगले"
छळेल प्रश्न हो मला, "कशास लोक पांगले?"
तुम्ही मला बघूनिया कशास दूर भागता
तुम्हास सोडणार का न काव्य हे सुनाविता?
पळा पळा छळेन मी विडंबने करेन मी
उदार काव्यप्रेमिका कशास लाइका कमी?
-- स्वामी संकेतानंद
नवी दिल्ली, 
२४ जुलै, २०१५ 

समाधी

ओली शेवाळलेली
दगडी जन्मठेप
कदंबकाठावर कोण
उसळून घेई झेप
चोरटा एक कटाक्ष
मध्यान्ही काळोखात
पेंगले निवांत नेत्र
मायाळू मंद सूरात
गारढोण श्वासस्पर्श
युगे धरला अबोला
अजागळ अजस्र देह
आतून अथांग ओला
स्पर्शून गंगामाई
घाबरे परत फिरे
दुधाळ स्तनामधुनि
पाझरती नीलहिरे
चुनखड़ी गा त्याचा
अनंत उच्छवास
सालीना मिळतो आहे
लोबानी मुखवास

-- संकेत 
नवी  दिल्ली,
 २२ जुलै, २०१५   

विडंबन- चालवून टाक चीप

चालवून टाक चीप, जागतीक अर्थ मंद  
राजना रिसेशनात कोण बैंक होय बंद

त्या युरोकुली भरीस, भांडते अजून ग्रीस
बाय तू करू नकोस, एक वर्ष स्टॉक बंद

 गीत गात 'टू बिगा'चं, बेलआउटी उगाच
 सावकार आधुनीक, की मती असेल मंद

 गार गार एक्सपोर्ट चीन मोरली सपोर्ट
 गाउनी गुलाबगीत खात जा गुलाबकंद

 ते तुलाच रे कळेल, कोण कोण रे जळेल
 सांग ना अता खरेच, टोकियो कि ताशकंद?

हाय ते इझी मनीत, क्यूइने कबर खणीत
सांग घेउनी बुडेेल, सैमला अनर्थछंद

-- स्कैमी संकेतानंद  ;)
नवी दिल्ली, 
०८ जुलै , २०१५ 

विडंबन-- पडून आहे सार्त्र अजुनी


पडून आहे सार्त्र अजुनी भावड्या निजलास का रे?
एवढ्यातच त्या कम्यूवर तू असा थकलास का रे?

अजुनही रचल्या न थप्पी रँडतैच्या पुस्तकांच्या
अजुन ’भू’ खचली कुठे रे? हाय! तू खचलास का रे?

सांग, ह्या बाख्तीनदाच्या भाविकाला काय सांगू?
नच कळे आम्हास ते जे आणि तू रुसलास का रे?

बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा फ़्रांत्स काफ़्का,
’रातपारीला बनूनी कीट वळवळलास का रे?’

उगवती डोक्यात माझ्या ’जागतिक’च्या पायवाटा
तू बिचार्‍या वाचकांना एवढा  छळलास का रे?

-- स्वामी संकेतानंद,
१४ नोव्हेंबर,२०१४,
नवी दिल्लीShare

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More