’सोपा’ उपाय ??

’फुकट ते पौष्टिक’ च्या ’पिपा’सेला आळा घालणारा ’सोपा’ उपाय.

कथा - कारखान्यातले भूत

भुतांच्या अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या मुलाची कथा

स्वामी संकेतानंद कहिन
             कधी कधी आपल्या भोवताली एखादी घटना घडते आणि नकळत आपण आपल्या मताची पिंक टाकतो. एखादा कवीमनाचा असेल तर तो कवितेच्या स्वरुपात पिंक टाकेल. आपण अशा कवितांना "वात्रटिका " म्हणतो. वात्रटिकांना  साधारणतः चारोळींचे स्वरूप असते.मी अशाच काही छोट्या छोट्या वात्रटिका लिहिल्या. खरे तर ह्यांना कविता तरी म्हणावे का , हा प्रश्न मला पडलाय. सहज सुचलेल्या काही ओळी, एखाद्या घटनेवर भाष्य करतात. ह्या मुक्तछंदात लिहिलेल्या आहेत,ओळींची संख्या निश्चित  नाही,  अगदीच  स्वैर आहेत. 
  कोणतेही शीर्षक नसलेल्या ह्या छोटेखानी कविता( की वात्रटिका ? ) मी " स्वामी संकेतानंद कहिन " या प्रकारात टाकतो. 
          
          अशा चार " कहिन " मी इथे देतोय.   
  स्वामी संकेतानंद कहिन क्र. १ >>
    कोणता तरी एक सामना, सचिन शतक करतो, धमाल खेळतोय. अचानक तो आउट होतो आणि आपली फलंदाजी ढेपाळते. ३०० च्या   वर पोहचू पाहणारा धावफलक २८० च्या घरात थांबतो ; आणि मग चार ओळी सुचतात,           आज परत एकदा जीव माझा कासाविस झाला..
           सूर्य होता तेजःपुंज, अंधार दूर पळालेला..
           अस्तास जाताच तो, काळोखाने डाव साधला..
           बाकीचे फ़क्त शोभा वाढवाया, देवच फ़क्त खेळला.
 


 
स्वामी संकेतानंद कहिन क्र. २  >>         लोकसभेचे सत्र चालू असते. नेहमीचाच गोंधळ होत असतो. काम बंद , लोकसभा तहकूब आणि माझ्या मनात येतात तीन ओळी...
             आदळआपट,मारामारी, वर्गात नुसता गोंधळ माजला होता..

               सर आले, ओरडले, " सु्टीत खेळायचे सोडून काय करताय रे? "
                " सर, आम्ही ’लोकसभा-लोकसभा’ खेळतोय ", सभापती म्हणाला.


 
 
स्वामी संकेतानंद कहिन क्र. ३ >>       सकाळी वृत्तपत्र हाती घेतो, बातमी वाचतो, " कात्रजचा डोंगर फोडणे सुरूच ! " न्यायालयाने बांधकामावर स्थगिती आणलेली असते, पण अजूनही बांधकाम सुरु असते, डोंगर फोडण्यात येत असतात. पुणे-मुंबई बायपासने प्रवास करतांना पाषाण, बावधन वगैरे भागात निसर्गाची, सह्याद्रीची कत्तल उघड्या डोळ्यांनी दिसत असते. मन उद्विग्न होते, दोन ओळी सहज बाहेर पडतात ,
              वेड्या दादाची वेडी ही भूखंडमाया....
              अधिकारी घेऊन हाताशी चाललेत डोंगर खोदाया..


 स्वामी संकेतानंद कहिन क्र. ४  >>

       हजारो कोटी रुपयांचा स्पेक्ट्रम घोटाळा देशाला धक्का देतो. एवढा मोठा घोटाळा आजवर कुणीच केलेला नसतो. देशाचे अर्थशास्त्र हादरवून सोडणारा हा घोटाळा असतो. ह्या घोटाळ्याची व्याप्ती जगभरातल्या आघाडीच्या दहा घोटाळ्यांमध्ये स्थान मिळवून देते. देशाची मान शरमेने झुकलेली असते. आपण आ वासून बातम्या बघत असतो, वाचत असतो. शून्य मोजायला हाताची बोटे कमी पडतात, पायांचीसुद्धा मोजत असतो.मी बातमी  बघत असतो,  काही ओळी डोळ्यांसमोर विजेसारख्या  चमकतात.....


    
        नोबेल कमिटीचे सभासद चर्चा करत होते,
       " या वर्षी भौतिकशास्त्राचा नोबेल
        राजा आणि कनिमोळीला देऊया का आपण ? 
       स्पेक्ट्रमचा नवा व्यावहारिक उपयोग शोधलाय त्यांनी "
       तेवढ्यात एक कुजबुजला,

      " अर्थशास्त्राचाही द्यायला काय हरकत आहे ? "            

माउस पाहावे चोरून !

अभियांत्रिकीला येणार्‍या सगळ्याच विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान असतेच असे नाही. काही दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी कधी संगणक पाहिलादेखील नसतो. असाच एक दुर्गम भागातून आलेला मुलगा माझ्या शाखेत (c.tech ) होता. बेट्याने पहिल्यांदाच संगणक बघितलेला, वर त्याच्या दादाने त्याला वापरायला म्हणून ल्यापटॉप घेऊन दिला. आता मित्र जे सांगतील ते तो करायचा. एक म्हणाला, "अरे ल्यापटॉप खूप नाजूक असतो, कीबोर्ड आणि माउस लवकर बिघडतात. तू वेगळे कीबोर्ड-माउस घे."त्याचे रुमीज महाचोर वगैरे प्रकारातले होते. त्यांनी सल्ला दिला, " अरे आपण माउस कॉलेजातून आणूया. कीबोर्ड आणता येणार नाही म्हणून नाईलाज आहे. तो तू विकत घे."

झालं, पठ्ठ्याने ह्या कामी माझी मदत घ्यायचे ठरवले, कारण मी त्याचा चांगला मित्र होतो.


मी: अबे १५०-२०० येते  माउस, चल धंतोली,आणू आपण आताच.


तो: अबे आपल्या ल्याबमधून कोणी-न-कोणी माउस चोरतच राहतो. काही मोठी गोष्ट नाही. कायले पैसे खर्च करू मी? उद्या आणू ल्याबमधून ढापून. आपण प्रॅक्टिकल संपले, सगळे गेले की एक माउस चोरू.


मी: अबे, कोणी पाहिले तर वांदा होईल ना बे .


तो: अबे, मी काढतो माउस, तू दारावर लक्ष ठेव. कोणी येऊन त नाही राहिला ते बघ . कोणी येतांना दिसला की लगेच मला इशारा कर.


मी 'हो' म्हणालो आणि दारावर उभा राहिलो. बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नव्हता. माउस चोरायला वेळ तो किती लागणार ? माउस काढा, गुंडाळा आणि ब्यागेत टाका, झाले. पण हा येत नही बघून मी होतंय काय बघायला मागे वळलो.


हा खाली वाकून काहीतरी करत होता. मी गेलो आणि विचारले, "अबे , का करून राहिलास बे ? "


तो: हातातला ब्लेड दाखवत म्हणाला, अबे केबल कापून राहिलो माउसचा, वेळ त लागलच न बे ?


मी: अबे तू पागल झालास का बे , माउस चोरायले केबल काहून कापून राहिलास बे?


मी पाहिले, त्याने अर्धाअधिक केबल कापलेला होता. त्याला वाटले की आपण दोन वायर जोडतो तसे माउसचा वायर ल्यापटॉपला जोडता येत असेल. माउस कसा काढायचा ते त्याला माहीतच नव्हते.


मी म्हणालो, "आता ते ठेव तसेच आणि निघूया येथून, बराच वेळ झालाय, कोणी पाहिले तर गडबड होईल. आता हा माउस काही कामाचा राहिला नाही तसाही."त्याने तो कापलेला माउस तिथे गुंडाळून ठेवला आणि आम्ही पळालो.


पुढच्या प्रॅक्टिकलला सर म्हणाले की, माउसचे केबल कापण्याच्या खोड्या करतांना पुढच्या खेपेला कोणी आढळले तर सस्पेंड करेन त्याला. ती खोडी नव्हती तर माउस चोरण्याचा प्रयत्न होता हे त्यांच्या गावीही नव्हते. कोणी माउस चोरायचा "असा" प्रयत्नही करू शकतो याचा त्यांनी कधी विचारही केला नसणार. त्याची ही माउस चोरी आम्हा मित्रांमध्ये अजरामर झाली आणि त्याचे माउसचोर हे नावदेखील !!


( माझ्या मित्राने मला सांगितलेला माउस चोरीचा किस्सा. या कथेतला "मी" म्हणजे माझा मित्र ! )
 
हास्यगारवा -२०११ च्या अंकात पूर्वप्रकाशित (दुवा: http://holivisheshank2o11.blogspot.com/2011/03/blog-post_7085.html )

एक दिवस फुग्गोबाचा......

लेखकु म्हणे :

            साबणाचे फुगे सर्वांनीच आपल्या लहानपणी उडवले असतील. तासनतास साबणाचे फुगे उडवण्यात घालवले असतील, आई-बाबांच्या शिव्या खाल्ल्या असतील. पण आपण फुगे बनवायला जे मिश्रण वापरतो त्याच्यावर कधी प्रयोग केलेत का तुम्ही ? तुम्ही त्या मिश्रणात कधी शाम्पू मिसळून बघितलाय ? दोन-तीन वेगवेगळे साबण वापरले तर कसे फुगे बनतील ? आपला फुगा किती काळ टिकायचा ? काही सेकंद फक्त ! किती मोठा असायचा ? काही सेमी फक्त ! हो ना ? पण एक मुलगा होता, होमर. त्याने ह्या मिश्रणावर प्रयोग केलेत आणि भला-थोरला फुगा फुगवला. त्याची ही कथा ! मूळ इंग्रजी कथा लिहिली आहे जेम्स ए. स्मिथ ह्यांनी. मूळ कथेचे नाव - "The Day of the Bubble ." त्या कथेचे हे मराठी भाषांतर. "ज्याने आशेचे बीज पेरले " या कथेप्रमाणे ही कथादेखील मी ७वी-८वीत असतांना हिंदीत वाचली होती. ( त्या वर्षी भरपूर छान - छान कथा वाचनात आल्या होत्या, सगळ्या हिंदी किंवा हिंदीत अनुवादित. )हिंदी अनुवाद श्री. अरविंद गुप्ता सरांनीच केला होता.अर्थात मला आवडली होतीच. ही बाल-विज्ञानकथा आहे म्हटले तरी चालेल. मुलांना नक्की आवडावी अशी कथा. काही प्रयोग करावेत , ही प्रेरणा मिळावी अशी कथा.साबणाच्या फुग्यांवरून आठवले, लहानपणी १-२त असतांना मी निलगिरीच्या पानाच्या देठापासून छोटीशी रिंग बनवायचो साबणाचे फुगे काढायला; आणि कपडे धुण्याचे साबण वापरायचो. एके दिवशी , मी त्या मिश्रणात अंघोळीच्या साबणाचे पाणी सुद्धा थोडे मिसळले, मिश्रण थोडे घट्ट घेतले. फुगा चांगलाच म्हणजे अर्ध्या फुटापेक्षा तरी लांब निघाला, आणि एक मिनिट तरी टिकला असावा. अर्थात मी पुढे होमरसारखे प्रयोग केले नाहीत, नाहीतर कदाचित माझ्या हातून तेच घडले असते जे होमरच्या हातून घडले ! काय म्हणता ? होमरने काय केले ते तुम्हाला माहित नाही ? अहो, मग कथा वाचा, कळेल तुम्हाला !


                            एक दिवस फुग्गोबाचा......


     कोणे एके काळी होमर नावाचा मुलगा होता. स्लीपि हॉलो नावाच्या शहराबाहेर असलेल्या टेकडीवर तो राहायचा. होमर आपल्या हेन्री काकांसोबत जुन्या, मोडकळीस आलेल्या घरात राहायचा.


     पूर्ण दिवस होमर आपल्या हेन्री काकांना त्यांच्या छोट्याशा शेतात मदत करायचा. पण सायंकाळचे जेवण संपले रे संपले की तो आपल्या काकांसोबत समोर ओसरीत बसायचा आणि आपल्या आवडत्या छंदात गुंग व्हायचा.


     त्याचा छंद होता , साबणाचे फुगे बनवून उडवणे. पण होमरचे फुगे काही साधारण फुगे नसायचे. अहो, मोठ्ठाले फुगे बनवायच्या प्रयोगात होमरने कित्येक वर्षे घालवली होती ; आणि त्याचे फुगे बराच काळ टिकायचे. पटकन फुटतील ते होमरचे फुगे कसले ? आपले फुगे अधिक काळ टिकावे म्हणून होमर एक विशेष मिश्रण वापरायचा. इतर लोकांप्रमाणे तो फक्त साबणाचे पाणी वापरत नव्हता. होमर तर एक शास्त्रज्ञ होता ! फुगे अधिकाधिक काळ टिकावेत म्हणून तो मिश्रणासोबत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करायचा.


     आधी त्याने साबण आणि पाण्याच्या मिश्रणात थोडे डिंक मिसळले , पण ते खूप घट्ट होते. मग एके रात्री त्याच्या डोक्यात एक कल्पना आली की , आपण त्या मिश्रणात थोडे घासलेट टाकून ते पातळ करावे. हे मिश्रण पहिल्याहून बरे होते. एके रात्री त्याने मिश्रणात साबणाची भुकटी मिसळली. त्या रात्री त्याने ३ फुट लांब फुगा फुगवला आणि तो ५ मिनिटे तरंगत राहिला. सरतेशेवटी तो फुगा हेन्री काकांच्या नाकाला आदळला आणि फुटला.


     होमरचा उत्साह वाढला. त्याने विचार केला की थोडे शाम्पू मिसळले की फुगे अजून चांगले बनतील आणि तसेच झाले. मग त्याने थोडे रबर-सिमेंट आणि उसाची मळी मिसळली. ह्याने फुगे जास्त टिकाऊ आणि मोठे बनले.


      ह्या फुग्यांचे आणि हेन्री काकांचे मजेदार नाते होते. फुगे नेहमीच हेन्री काकांना आदळून फुटायचे ; आणि मग ते म्हणायचे, " होमर, एके दिवशी ह्या मोठ्या फुग्यांमुळे तू संकटात सापडशील. फुग्यांचे एवढे मोठे होणे आणि इतका काळ टिकणे नैसर्गिक नाही बाळ. "


     पण होमर तर एक शास्त्रज्ञ होता. तो कुठे लक्ष देतोय ? तो रोज नवनवे प्रयोग करत राहिला.


     एके रात्री जेवणानंतर होमर आणि त्याचे काका त्यांच्या टेकडीवरील घरात ओसरीत बसले होते. नुकतेच होमरने त्याचे साबणाच्या फुग्यांचे नवे मिश्रण तयार केले होते. ह्या खेपेस त्याने थोडे डांबर मिसळले होते जे त्याला नुकतेच डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या कडेला सापडले होते.


      हेन्री काकांनी आपले पाईप पेटवले आणि होमरकडे बघत म्हणाले, " होमर, एके दिवशी ह्या मोठ्या फुग्यांमुळे तू संकटात सापडशील. फुग्यांचे एवढे मोठे होणे आणि इतका काळ टिकणे नैसर्गिक नाही बाळ. "


      पण होमर तर एक शास्त्रज्ञ होता. प्रयोग करण्यातच त्याला खरा आनंद यायचा. त्यामुळे तो लगेच आत गेला आणि फुगे फुगवण्याची त्याची जुनी आवडती नळी आणली आणि फुगा फुगवणे सुरु केले.


      सुरुवातीला त्याला फुगा फुगवणे थोडे कठीण गेले. पण मग फुगा हळूहळू मोठा होत गेला आणि होमरचे कामसुद्धा सोपे होत गेले. आता त्याला फार जोराने फुंकावे लागत नव्हते. होमरने आता लांब , खोल श्वास घेतला आणि फुंकणे सुरु केले आणि फुगा मोठा होत गेला, मोठा, अजून मोठा होत गेला. लवकरच तो त्याने फुगवलेला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा फुगा होता. आणि फुगा अजून मोठा होतच होता. होमरला आता टेकडीखालचे शहर दिसत नव्हते, अंगण दिसत नव्हते. इतकेच नव्हे तर आता हेन्री काकासुद्धा त्याला दिसत नव्हते.


     होमरला हेन्री काकांचे काही शब्द पुसटसे ऐकू आले , " होमर, तू आता फक्त बघत राहा ! एके दिवशी ह्या मोठ्या फुग्यांमुळे तू संकटात सापडशील. फुग्यांचे एवढे मोठे होणे आणि........ "


     पण आता होमरला ऐकूच येत नव्हते. फुगा आता एवढा मोठा झाला होता की तो जमिनीला घासू नये म्हणून होमर जरा सांभाळूनच फुगवत होता. हळूहळू तो फुगवतच राहिला. फुगवता-फुगवता होमरला दम लागला आणि फुगा मात्र अजून मोठा होतच होता.


     फुग्याला फुगायला थोडी जागा मिळावी म्हणून होमर सांभाळतच ओसरीच्या काठावर आला. दहा फुट, अकरा फुट, बारा फुट - फुगा मोठा होतच होता. तेरा फुट, चौदा फुट - आणि होमरच्या कानी हेन्री काकांचे शब्द पडले , " अरे, बापरे .."


     तेवढ्यात एक मोठा आवाज झाला आणि फुगा नळीपासून वेगळा झाला. थोडा वेळ फुगा हलला, कंपने आलीत, पण तो फुटला मात्र नाही. फुटण्याऐवजी फुगा घरंगळू लागला. आधी हळूहळू , मग टेकडीच्या उतारावरून वेगाने घरंगळू लागला. हेन्री काका उभेच झाले. " होमर " , ते म्हणाले , " मी तुला म्हटले होते ना की एके दिवशी ह्या....." . पण आता होमरला ऐकू येईल तेव्हा ना? तो आपल्या विशाल फुग्यामागे टेकडीच्या उतारावर पळत सुटला होता.


     टेकडीवर बेस्सी नावाची गाय चरत होती. फुग्याची चाहूल लागल्यावर तिने आपले चरणे आणि रवंथ करणे बंद केले आणि हम्बरली, " हम्बा..." आणि फुगा तिला आदळला. फुगा इतका चिकट होता की त्याने बेस्सीला उचलले आणि घरंगळत पुढे गेला.


     क्लेम थॉम्पसन हेन्री काकांसाठी अंडी आणत होता. त्याने वर बघितले तर फुगा घरंगळत येतोय ! त्याने "वाचवा " ओरडावे त्याआधीच फुग्याने त्याला उचलले आणि घरंगळत स्लीपि होलो शहराकडे जाऊ लागला.


     क्लेमच्या मागोमाग त्याची मांजर पेस्सी येत होती. क्षणातच ती शहराकडे जाणाऱ्या त्या फुग्याचा एक भाग होती. फुग्यामागोमाग धावत होता होमर, आणि होमरमागोमाग ओरडतच धावत होते होमरचे काका हेन्री," होमर, तुला म्हटले होते ना की एके दिवशी ......"


      आता फुगा महामार्गावर आला होता. किराणा मालाचे विक्रेते मिस्टर अर्नॉल्ड आपल्या घोडागाडीवर आरामात स्लीपि हॉलोकडे जात होते. ते छान पेंगत होते. त्यांच्या घोडीला, डेझीला, त्यांच्या मदतीविना घरी कसे जायचे हे ठाऊक होते. त्यांना काही कळायच्या आतच, फुगा आदळला, आणि घोडी, गाडी, गाडीतला माल, आणि मिस्टर अर्नॉल्ड घरंगळत मुख्य रस्त्याकडे जाऊ लागले.


      थोड्याच वेळात घोडी हिन-हिन करत होती, मांजर "म्याव म्याव " करत होती, गाय हम्बरत होती. छोटा क्लेम थॉम्पसन किंचाळत होता आणि मिस्टर अर्नॉल्ड "वाचवा, वाचवा " ओरडत होते.


      हा सगळा गोंधळ कुठून येतोय हे बघायला सगळे मुख्य रस्त्यावर गोळा झाले. डोळ्यांना दिसणारे दृश्य बघून सगळे जागीच थिजले. एक भला थोरला फुगा घरंगळत येत होता आणि हात पाय, प्राणी त्याला चिकटले होते. ते पळत एखाद्या सुरक्षित जागी जाणार त्याआधीच फुगा त्यांना आदळला.


      डॉ. पार्सन यांच्या दवाखान्याबाहेर उभी असलेली कर आधी फुग्याला चिकटली. मग, बागेतल्या बेंचवर विणकाम करत बसलेल्या जोन्स आजींना त्याने कवेत घेतले. लंगडी खेळ्णार्‍या काही मुली अचानक गायब झाल्या.


      दोन कुत्रे, जे आपसांत शर्यत लावत होते, डोळ्याची पापणी लवायचा अवकाश, फुग्याच्या कुशीत होते. मुख्य रस्त्यावरची प्रत्येक वस्तू आणि व्यक्ती , जी जमिनीत रोवलेली नव्हती, त्या विशाल चिकट फुग्याला चिकटली होती.


      आता हेन्री काका आणि होमर मुख्य रस्त्यावर पोहचले होते. फुग्याला मार्गातली प्रत्येक वस्तू कवेत घेतांना ते दहशतीने बघत राहिले.


     "हेन्री काका, हेन्री काका," होमर रडू लागला, " या फुग्याला कसे थांबवू ? मी आता काय करू ? "


     आणि हेन्री काकांनी आपलेच पालुपद लावले, " होमर, तुला म्हटले होते ना की.... "


      मुख्य रस्ता जिथे संपायचा तिथे एक चर्च होते. ते एक छोटे चर्च होते. स्लीपि हॉलोच्या सर्व नागरिकांना चर्चचा अभिमान होता, कारण ह्या चर्चच्या छतावर लांब, अणकुचीदार सुळे होते. आता हा मोठा साबणाचा फुगा - त्याला चिकटलेल्या माणसे, प्राणी, वस्तूंसोबत - सरळ त्या छोट्या चर्चकडे जाऊ लागला.


     होमर रडतच म्हणाला, " अरे देवा, आता हे सगळे मरणार आणि सारे पाप माझ्या माथी येईल. सगळी चूक माझीच आहे. "


     फुग्याचा वेग आता इतका वाढला होता की, तो उसळतच पुढे जात होता. फुग्यातुन काय तो आवाज येत होता ! सगळेच रडत, ओरडत होते, प्राणी चित्कार करत होते. चर्चला आदळण्यापूर्वी फुग्याने शेवटची उसळी घेतली आणि तो सुळावर चढला ! एका मिनिटापर्यंत तो तसाच स्थिर राहिला -आणि होमरचा सगळा श्वास फुस्स आवाज करत त्या फुग्यातुन बाहेर पडू लागला. फुगा मेला एकदाचा.


      काय कचरा होता तो ! काय नव्हते त्यात - लोक , कार्स , प्राणी, बेंचेस, चीज-वस्तू, एक ना अनेक ! सगळे चिकट- चिकट झालेले, चिकचिकाट नुसता!


      होमरचा फुगा फुटल्यावर शहर स्वच्छ करायला चार आठवडे लागले. अशी घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती. एका वर्षानंतरसुद्धा स्लीपि हॉलोची जनता होमरच्या वैज्ञानिक प्रयोगाला आपल्या केसांतून , कपड्यांतून धूत होती. फुग्यांचा तो दिवस स्लीपि हॉलोची जनता कधीच विसरू शकली नाही.


       लोकांनी होमरला त्याच्या सार्‍या वैज्ञानिक उपकरणांसह कॉलेजात पाठवले, जेणेकरून शहराला नष्ट न करता त्याला त्याचे प्रयोग करता येतील.


        हेन्री काकांना होमरची उणीव जाणवते. रोज रात्री जेवण झाले की ते ओसरीवर बसतात, पाईप पेटवतात आणि म्हणतात , " होमर, मला माहित होते की ह्या वैज्ञानिक प्रयोगांद्वारे तू एके दिवशी नक्कीच काहीतरी चांगले करशील ! "


                                            
( समाप्त )

____________________________________________________

ही कथा तुम्ही e-book स्वरूपात इथे वाचू शकता आणि डाउनलोड पण करू शकता. 

0 comments Links to this post

अनुदिनी चोरास !!

हवसे - गवसे - नवसे, ज्यांना स्वतःच्या बुद्धीने चार शब्द लिहिता येत नाहीत- लिहिता येत नाही, हरकत नाही - पण आपल्याला आवडलेला लेख अनुदिनीवर  द्यावासा वाटतो, जगाला वाटावासा वाटतो, अहो मग द्या की , त्यालादेखील हरकत नाही , पण लेखकाला श्रेय देणे मात्र आवडत नाही, स्वतःच्या नावे लेख खपवतात ( तेवढीच लेखक/कवी म्हणून प्रसिद्धी, मित्रांत फुशारकी !) - अशांना काय म्हणावे बरे ? तर चोर, हो ना ? चोरी सापडली की, कधी-कधी लंगडा युक्तिवाद  करतात - लेख मेलद्वारे आलाय, लेखक माहित नाही. अहो, मग लेख टाकताना  लिहायचे ना, लेखक माहित नाही ! वा थोडे गुगल्बाबाला विचारले की तो सांगतो मूळ लेख कोणत्या अनुदिनीवर आहे. पण लेखक व कवी बनायची कोण हौस असते हो !! आपण लिहावे, नवखे असाल तर चुका होतील, प्रोत्साहन मिळाले की अधिकाधिक चांगले लिहिले जाते, चुका सुधारल्या जातात, पण लिहित राहावे. मीदेखील अजून नवखाच की, मीदेखील चुका करतो !  असो, कोणाला सांगतोय मी हे ? चोरी ही अनादी-अनंत काळापासून चालत आलीये आणि यापुढेही चालत राहणार.
        तर अशा अनुदिनी-चोरांना उद्देशून मी एक औपरोधिक कविता लिहिली होती. तीच इथे देत आहे. हास्यगारवा -२०११ च्या अंकात ती प्रकाशितही झाली आहे. दुवा  आहे :- http://holivisheshank2o11.blogspot.com/2011/03/blog-post.html


कशास निराशेचे नभ हे दाटले तुजसमोरी ?


लेख न लिहिता आला ,शोक कशास करी ?


गरजच काय लेख लिहिण्याची शिष्या ,


तुटवडा नाही जालावर सुंदर लेखांचा...


ऐक कान देऊनी सांगतो तुज रहस्य एक,


जरा जालावर अपुली शर्विलक- नजर फेक,


इतरांचे लेख खपवणे अपुल्या नावाने,


हा उपाय आहे सहजसाध्य विनाकष्टाचा ,


अनुदिनींवर भिरभिरती नजर असावी ,


अपुली एका अनुदिनी परि असावी,


आणिक असावा व्यासंग दांडगा जालाचा,


लेख इतरांचे ,गजर करावा स्वनामाचा ...


होताच आरोप चोरीचा ,स्वीकार तया करू नये,


आरडाओरडा होईल खरा, उत्साह परि मरू नये,


अपुलीच री ओढावी, वा अनुदिनी अजून एक बनवावी ,


नित्य-नवा करावा त्यावरी ,संग्रह चौर्य -साहित्याचा...


कुणी म्हणताच चोरी ही,आपण करावी कुरघोडी,


सहज उपलब्ध लेख हा , मी कसा तया सोडी ?


जालावरचे साहित्य हे, कुणी न अपुला हक्क सांगावा,


हवा तसा वापरेन ,लेख ना तुझ्या बापाचा ...


हल्ला करताच टोळ्यांनी ,धीर न जरा सोडावा,


नाव बदलूनी अपुले , परत कार्यकारण साधावा,


अनुदिनी बनवाव्यात बऱ्याच ,मोफत सुविधा ही,


परि न थांबवावा क्षणभर, धंदा लेख चोरण्याचा...


दिवसेंदिवस असाच उद्योग करशील जेव्हा ,


निर्लज्जतेची गोळी तू खाशील जेव्हा..


हे माझ्या शर्विलक शिष्या , आशीर्वाद देतो,


तेव्हा राजा बनशील तू ,अनुदिनी-चोरांचा ...
किमान  या कवितेची चोरी करू नका रे !!

मजला कळले नाही

पाप पुण्यात घोळ केला, मजला कळले नाहीहाय हिशोब का चुकावा, मजला कळले नाही


आज अशी अबोल वीणा, मलहार असा वेडा


सूर कसे संपास गेले, मजला कळले नाही


मी जपले सखे मनाला, धुंद रात जरी होती


हा गजरा इथे कसा गे, मजला कळले नाही


सात जन्मांचि गाठ होती , पहिला सरला नाही


हात असा कसा कसा सुटावा, मजला कळले नाही


दोनच थेंब हो रक्ताचे , तलवार असे हाती


हा कसला असे पुरावा, मजला कळले नाही 
 मी मराठी या संकेतस्थळावर   पूर्वप्रकाशित


आता फक्त आठवणी......

मिन्नले या तमिळ चित्रपटात( हिंदी :- "रहना हैं तेरे दिल में " ) एक पिटुकले पण सुंदर गाणे आहे, " इरु विळी उनद. " हे गाणे हिंदीमध्ये नाही. फक्त ह्या गाण्याची धून तेवढी वाजते.( प्रसंग आठवा :- अनुपम खेर सैफुला भेटून सांगतो की बेटा, हे लग्न करू नकोस कारण दिया आणि माधवन दोघे एकमेकांवर प्रेम करतात.) दोन मिनिटांहून कमी लांबीचे हे गाणे, पण हॅरिस जयराजने अतिशय सुंदर संगीत दिलेय. तामरई ने गीत लिहिलेय. व्यक्तीशः मला संगीतच जास्त आवडले. पण पहिल्या ४ ओळी अगदीच सुरेख आहेत. मागे कधीतरी मी अनुवाद करावा म्हणून बसलो होतो. पहिल्या चार ओळींचा केला आणि त्यानंतर मला जे सुचत गेले ते लिहित सुटलो, अनुवाद राहिला बाजूला ! ;) एक कविता तयार झाली होती. ती बझ्झवर टाकली, आणि बर्‍याच वाचकांना पसंतही पडली होती. प्रेरणा मात्र मूळ गाणे असल्याने काही साम्यस्थळे नक्कीच असतील. सरतेशेवटी मी मूळ गाण्याचेदेखील अनुवाद पूर्ण केले आहे.वैरामुत्तू सरांव्यातिरिक्त एखाद्या दुसर्‍या गीतकाराचे गीत प्रथमच अनुवादित करतोय.माझी कविता आणि मूळ कविता दोन्ही देतोय.


आधी मूळ गाण्याचा अनुवाद(गाणे जसे आहे,तसाच अनुवाद देण्याचा प्रयत्न केलाय.) :
दोन्ही नजरा तुझ्याच ..


पापण्य़ा तुझ्याच ..


स्वप्नं मात्र


माझी, फक्त माझीच
दिवस लांबलेत , तू कुठे गेलीस ,


कसली शिक्षा मी इथे जगतोय ..


फक्त आठवण , फक्त आठवण...
दोन्ही नजरा तुझ्याच ..


पापण्य़ा तुझ्याच ..


स्वप्नं मात्र


माझी, फक्त माझीच
दिवस लांबलेत , तू कुठे गेलीस ,


कसली शिक्षा मी इथे जगतोय ..


फक्त आठवण , फक्त आठवण...


फक्त आठवण ,तुझीच आठवण
प्रेमात जखमी झालो असता झोप इथे कुठे ?


फक्त आठवण , फक्त आठवण...


(


Iru Vizhi Unathu.. Imaigalum Unathu..


Kanavugal Mattum.. Enathey Enathu..


Iru Vizhi Unathu.. Imaigalum Unathu..


Kanavugal Mattum.. Enathey Enathu..
Naatkal Neeluthey Nee Engo Poanathum


Aaen Thandanai Naan Ingae Vaazhvathum


Orae Nyaabagam.. Orae Nyaabagam..


Iru Vizhi Unathu.. Imaigalum Unathu..


Kanavugal Mattum.. Enathey Enathu..
Naatkal Neeluthey Nee Engo Poanathum


Aaen Thandanai Naan Ingae Vaazhvathum


Ohoa Hoa.. Orae Nyaabagam..


Ohoa Hoa.. Unthan Nyaabagam..
Kaathal Kaayam Naerumbothu Thookkam Ingu Aethu


Orae Nyaabagam.. Orae Nyaabagam..


)

या गाण्यातून प्रेरणा घेऊन मी केलेली कविता :-
डोळे तुझेच ,


पापण्य़ा तुझ्याच ..


पण पापण्य़ांआडची स्वप्नं


फ़क्त माझीच ..


हृदय तुझेच ,


स्पंदने तुझीच ..


पण प्रत्येक श्वास


फ़क्त माझाच .


ती रात अन्‌ ते स्वप्न कुठे आहे?


हृदयात सामावलेले माझे प्राण कुठे आहे?


माझ्या जखमांवर प्रेमाने घातलेली फ़ुंकर,


अन्‌ नजरेतली ती तळमळ..


आता फ़क्त आठवणी....


फ़क्त आठवणी...


मधुमयी त्या राती भेटीच्या,


अन्‌ प्रेमाचा वाहता निर्झर..


आता फ़क्त आठवणी....


फ़क्त आठवणी...


भळभळणारी जखम माझी,


आता भरेल काय ?


तुझ्या ओठी माझे


नाव असेल काय ?


मिन्नलेची सारीच गाणी सुंदर आहेत ! वसीगरा (जरा जरा..), वेनमदी वेनमदी (सच कह रहा हैं दिवाना ) वगैरे गाण्यांचा सुद्धा मराठी अनुवाद करायला काय हरकत आहे ?

त्रिवेणी -- क्र. ११ ते १४

त्रिवेणी  क्र. ११ >>

 
पौर्णिमेच्या रात्री आपण भेटलो चंद्राच्या साथीने, नक्षत्रांच्या सोबतीने,नको जाऊ म्हणताच तू हसत म्हणालीस, "भेटूच रे १५ दिवसानंतर"


.


.


.


.


.


१५ दिवसानंतर अमावास्या आली गं माझ्या जीवनात... :(
 
 
--------------------------------------------------------------------------------
 
त्रिवेणी  क्र. १२ >>
 
शांत चेहरा, मंद मिटलेल्या पापण्या..रुंद कपाळावर लालेलाल टिकली..


.


.


.


.


बंदुकीची एक गोळी, काम फत्ते..
 
 
-----------------------------------------------------------------------------
 
त्रिवेणी क्र. १३ >> 
आईवर चिक्कार कविता लिहिल्या गेल्यात..विचार केला आपणही एक कविता लिहावी ...


.


.


.


"आई " शब्द लिहिला, कविता पूर्ण झाली....
 
----------------------------------------------------------------------------
 
त्रिवेणी क्र. १४  >>तुझ्यावर मी कविता केली की तू जाम रागावतेस..चिडतेस, म्हणतेस, "त्या कविता करणे आधी बंद कर "


.


.


.


.


पण तू नजरेने रोज कविता करतेस त्याचे काय ?


-----------------------------------------------------------------------------

ज्याने आशेचे बीज पेरले

एक फ्रेंच कथा आहे -  " L'homme qui plantait des arbres  " ( The  Man Who  Planted  Trees   ). लेखक  आहेत - ज्योँ गिओनो . ही  कथा मी लहानपणी साधारणतः ७ वी -८ वीत   असतांना हिंदीत वाचली होती. कथेचे नाव होते,  " जिसने उम्मीद के बीज बोये " , अनुवाद श्री. अरविंद गुप्ता ह्यांनी केला होता. ह्या कथेने मी तेव्हा प्रचंड प्रभावित झालो होतो. पुढे माहित झाले  की मीच नव्हे तर जगात शेकडो लोक ह्या कथेने प्रभावित झाले आहे, झाडे लावत सुटलेत. मी ह्या कथेचा मराठी अनुवाद करायचे तेव्हाच ठरवले होते, पण लहानपणी ठरवलेल्या सारयाच गोष्टी आपण अमलात आणत नाही ना ? पण ह्या कथेची जादूगारीच अशी की मी कधीच ही  कथा  विसरु शकलो नाही. डिसेम्बर, २०१० ला मी ही कथा  जालावर शोधली  आणि  अनुवाद करायला घेतले. प्रत्यक्ष अनुवादाला सुरुवात फेब्रुवारीत  केली.  माझ्या आळशी स्वभावामुळे कथेचा अनुवाद बराच लांबला. सरतेशेवटी एप्रिलमध्ये  अनुवाद पूर्ण झाला आणि मी तो तपासायला हेरंब , राजे , आणि विद्याधर   ह्या माझ्या तिघा मित्रांना ( आणि ज्यांची मराठी भाषेवर पकड ही  माझ्यापेक्षा जास्त चांगली आहे असे मी मानतो ) दिला. त्यांनी होकार कळवल्यावर मी आता हा अनुवाद प्रकाशित करायला तयार आहे. धन्यवाद भिंतीवरल्या  बाबा, राजे !! "हाबार्स " सत्यवाना !!! ( बाबा, राजे, तुमचा असा एखादा सिग्नेचर "हाबार" नाही का ? ). कथा अतिशय सुंदर, प्रभावित करणारी  आहे, तुम्हाला न आवडल्यास दोष माझ्या अनुवादाचा असेल, कथेचा असणार नाही.
       अनुवाद करतांना मी इंग्रजी आणि हिंदी दोन्ही अनुवादांचा  आधार घेतलाय. किंचित स्वातंत्र्य  घेतलेय.
       पर्यावरणाच्या रक्षणासाठी लिहिल्या गेलेल्या काही प्रचंड लोकप्रिय  कथांमध्ये ह्या कथेचा  समावेश होतो. त्यामुळे ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी असे मला वाटते. 
    कथा सलग देतोय . ही कथा  तुकड्यांत देण्यात मजा नाही. असो, आता कथेला सुरुवात करतो.

               
                  ज्याने आशेचे बीज पेरले


कुणा माणसाच्या माणुसकीचा योग्य अंदाज लावायचा असेल तर त्याची बराच काळ पारख करणे आवश्यक असते.जर कोणी फळाच्या आशेविना दुसर्‍यांचे भले करत असेल तर त्याहून अधिक चांगले काय असेल बरे ? मी ज्या माणसाची गोष्ट आपल्याला सांगतोय त्याने तर आपल्या श्रम आणि चिकाटीने या जगाचे चित्रच पालटले.खरे तर बरीच जुनी गोष्ट आहे.सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मी सेनेत भर्ती झालो होतो.वर्षभराच्या ट्रेनिंगनंतर मला १५ दिवसांची सुटी मिळाली होती.सुटीमधे घरी जाण्याऐवजी भटकंतीचा विचार मनात आला.आपल्या सैनिकी पिशवीत थोडे खाण्याचे सामान आणि एक पाण्याची बाटली ठेवून भटकंतीला निघालो. ज्या भागातून मी जात होतो ते मला एकदम नविन होते.अगदी ओसाड माळरान होते.कुठे कुठे पिवळ्या धोत्र्याची काटेरी झुडुपे होती.बाकी जागी सुकलेल्या गवताखेरीज अजून काहीच नव्हते.


मला या भागात भटकंती करून दोन दिवस झाले होते.हा भाग अजिबात वसलेला नव्हता आणि वातावरणातसुद्धा एक भयाण शांतता भिनलेली होती.मी आता जिथे उभा होतो तिथे कदाचित कधीकाळी गाव वसलेले असावे. एका कोपर्‍यात सहा-सात घरे होती जी आता उद्ध्वस्त झाली होती.ह्यांना बघून मला असे वाटले की जवळपास नक्कीच कुठेतरी एखादी विहीर किंवा पाण्याचे स्रोत असावे.थोडे शोधल्यावर मला एक ओहोळसुद्धा दिसले, पण आता ते कोरडे होते. तिथेच थोडा वेळ आराम करायचा विचार केला.माझ्याकडील पाणी संपले होते आणि गळा अगदी कोरडा पडला होता. गावाच्या एका कोपर्‍यात एक भग्न मंदिरपण दिसले. पण आता तिथे कोणी राहत नव्हता.


जूनचा महिना होता. सूर्याच्या उष्णतेने जमीन तापली होती.जोरात सुटलेल्या वार्‍याने धुळीचे वादळ घोंघावत होते. अशा निराशादायी वातावरणाला मी जास्त वेळ सहन करू शकलो नाही.मी एक अरुंद पायवाट पकडली आणि चालता झालो.


पाच तास सतत चालल्यावरसुद्धा मला कुठेच पाणी मिळाले नाही.आता तर माझी पाण्याची आशाच लोपली होती.चारी बाजूंना कोरड्या धरतीवर उगवलेल्या काटेरी झुडुपांखेरीज काहीच नव्ह्ते.या भयाण शांततेत मला दूर एका काळ्या सावलीसारखे काहीतरी दिसले.मला दूरुन ते एका झाडासारखे भासले आणि मी त्याच्याकडे जाऊ लागलो.जवळ गेल्यावर तो एक मेंढपाळ निघाला.त्याच्या आजूबाजूला ३० मेंढ्या जमिनीवर बसल्या होत्या.


त्याने भोपळ्याच्या पात्रातून मला पाणी पाजले आणि थोड्या वेळात तो मला आपल्या घरी घेऊन गेला.तो एका खोल नैसर्गिक विहीरीतून पाणी शेंदायचा.


तो माणूस मितभाषी होता.तो अगदी एकटाच राहायचा आणि त्याच्याशी बोलणारा कोणीच नसल्यामुळे असे असावे कदाचित. पण त्याचा आत्मविश्वास बघून असे वाटायचे की तो आपल्या कामात अगदी निपुण आहे.या ओसाड निर्जन भागात त्याची भेट होण्याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. तो एका पक्क्या घरात राहायचे जे त्याने त्या भागातल्या दगडांपासून स्वतः बांधले होते. घराची छत मजबूत होती.छताला वारा आदळून घोंघावणारा आवाज करायचा.


घरात सगळ्या वस्तू व्यवस्थित मांडल्या होता. भांडी घासून-पुसून लख्ख ठेवली होती आणि आणि फ़रशी स्वच्छ होती. एका कोपर्‍यात धारदार कुर्‍हाड ठेवली होती. चुलीच्या मंद आचेवर एक पातेले ठेवले होते आणि ज्यात खिचडी शिजत होती.आपल्या कोटावर त्याने इतक्या निपुणतेने ठिगळ लावले होते की ते लक्षातही येत नव्हते.त्याने मलापण खिचडी खायला दिली. जेवण झाल्यावर मी सिगारेट पेटवली आणि एक त्यालापण दिली. तो म्हणाला की तो सिगारेट पीत नाही. त्याचापाशी एक केसाळ कुत्रापण होता. पण तोसुद्धा आपल्या मालकाप्रमाणेच गप्प राहायचा.


पहिल्याच भेटीनंतर मला असे वाटले की त्याने रात्री थांबायची मला परवानगी दिली आहे.कारण पुढचे गाव सुमारे दीड दिवस दूर होते, त्यामुळे माझ्या दमलेल्या पायांना आराम देणेच जास्त चांगले होते.या डोंगराळ भागात दूर-दूर वसलेल्या काही छोट्या-छोट्या वस्त्या होत्या.ह्या वस्त्या आपापसांत कच्च्या रस्त्याने जुळल्या होत्या.या वस्त्यांमधे राहणारे लोक लाकडापासून कोळसा बनवण्याचा उद्योग करायचे.कोळश्याच्या धंद्यामुळे आसपासची सगळी वनराई नष्ट झाली होती. निर्दयी वार्‍याला थांबवणारे एकही झाड आता उरले नव्हते.टेकड्यांवर सदैव धुळीचे वादळ नाचायचे. कोळश्याच्या धंद्यात आता जास्त फायदा नव्हता. कोळश्याला गाडीने शहरात पोचवायला दोन दिवस लागायचे. बदल्यात दलाल जो पैसा द्यायचे त्याने क्वचितच घर चालायचे.कर्ज, रोगराई, नापिक,ओसाड जमीनीमुळे कोळश्याचा धंदा करणारी कुटुंबंसुद्धा आता मरणपंथाला लागली होती.


जेवणानंतर मेंढपाळाने एक छोटी पिशवी उचलली आणि त्यातील सार्‍या बिया मेजावर विखुरल्या.मग तो खूप काळजीपपूर्वक त्यांचे निरीक्षण करू लागला.तो एका-एका बिजाला उचलायचा,पारखायचा आणि मग त्यांतल्या चांगल्या बियांना तो वेगळे ठेवायचा.मी सिगारेटचा एक झुरका घेतला आणि विचार केला की त्याला बिया निवडण्य़ाच्या कामी थोडी मदत करावी. पण तो म्हणाला की, हे काम तो स्वतःच करेल.तो ज्या उत्कटतेने आणि एकाग्रतेने आपले हे काम करत होता ते बघून मलासुद्धा माझे हे नाक खुपसणे आवडले नाही. आम्हा दोघांत एकूण एवढेच बोलणे झाले. बियांना वेगळे केल्यावर तो चांगल्या बियांचा १०-१० चा समूह बनवू लागला. समूह बनवतांना तो बियांना खूपच काळजीपूर्वक निरखायचा. त्यातल्या जराही डागाळलेल्या किंवा भेगा पडलेल्या बियांना तो वेगळे करायचा.अशाप्रकारे त्याने शंभर बिया निवडल्या, त्या एका पिशवीत टाकल्या आणि तो झोपी गेला.


मला कळेना पण मला ह्या इसमासोबत खूप शांती लाभत होती.दुसर्‍या दिवशी सकाळी मी त्याला विचारले की मी त्याच्या घरी अजून एक दिवस आराम करू शकतो काय. त्याने चटकन होकार दिला.त्यानंतर तो पुन्हा आपल्या कामात व्यग्र झाला. आता पुढे अजून कुठल्या संवादाची आवश्यकता नव्हती. पण माझ्या मनात कुतुहल जागे होत होते आणि मी त्या मेंढपाळाची जीवनगाथा ऐकायला उत्सुक होतो.


सर्वप्रथम त्याने त्या निवडलेल्या बियांना एका पाण्याच्या भांड्यात भिजू टाकले.मग त्याने मेंढ्यांचे कुंपण उघडले आणि त्यांना तो कुरणाकडे नेऊ लागला.मी बघितले की त्याच्याजवळ लाकडी काठीऐवजी पाच फ़ूट लांब लोखंडी काठी होती. काठी माझ्या अंगठ्याइतकी जाड असेल. मीदेखिल गुपचुप मेंढपाळाच्या मागे जाऊ लागलो. मेंढ्यांचे कुरण खाली खोर्‍यात होते. थोड्या वेळात मेंढ्यांना आपल्या केसाळ कुत्र्याच्या देखरेखीखाली सोडून तो स्वतः डोंगरावर माझ्याकडे आला. मला वाटले माझ्या या लुडबुडीने तो चिडेल. पण त्याने असे काही केले नाही. त्याने आपला रस्ता धरला आणि माझ्यापाशी करायला काहीच नसल्याने मीसुद्धा त्याच्या मागे-मागे जाऊ लागलो. तो अंदाजे १०० फुट दूर एका टेकडीवर चढला. तिथे त्याने लोखंडी काठीने जमीन खोदून खड्डा खणला. त्यात त्याने एक बी पेरले आणि खड्डा मातीने भरला. तो देशी झाडांच्या बिया पेरत होता. मी त्याला विचारले की, काय ही जमीन त्याच्या मालकीची आहे. त्याला ती जमीन कोणाच्या मालकीची आहे हेसुद्धा ठाऊक नव्हते. कदाचित ती गावाची सार्वजनिक जागा असेल वा अशा श्रीमंतांची ज्यांना या जमिनीची काहीच चिंता नसेल. जमिनीचा मालक कोण आहे हे जाणण्यात त्याला रस नव्हता. त्याने त्या शंभर बियांना अगदी प्रेमाने पेरले.


दुपारच्या न्याहारीनंतर तो बिया पेरण्याच्या आपल्या कामात परत व्यग्र झाला. कदाचित मी आपला प्रश्न परत परत विचारला असेल, कारण मला शेवटी त्याच्याविषयी थोडी माहिती नक्कीच मिळाली. मागील तीन वर्षांपासून तो त्या निर्जन भागात झाडांच्या बिया पेरत होता. आतापर्यंत त्याने एक लक्ष बिया पेरल्या होत्या. या एक लक्ष बियांमधून फ़क्त वीस हजारच अंकुरली होती.त्याला वाटायचे की या वीस हजार रोपट्यांपैकी अर्धेच वाचतील. अर्धे एखाद्या नैसर्गिक संकटाचे बळी जातील वा उंदीर त्यांना कुरतडतील. पण जिथे आधी काहीच उगवत नव्हते तिथे आता किमान दहा हजार वृक्षतरी उभे राहतील.


हे सगळे ऐकून मी त्या माणसाच्या वयाचा अंदाज लावू लागलो. तो नक्कीच पन्नाशीच्या वरच्या असावा.त्याने मला स्वतःच सांगितले की तो ५५ वर्षांचा आहे.एके काळी खोर्‍यात खालच्या क्षेत्रात त्याची शेती होती.मग अचानक त्याच्या एकुलत्या एका मुलाचे आणि मग त्याच्या पत्नीचे निधन झाले.या घटनांनी त्याला जबर मानसिक धक्का बसला होता. तेव्हापासून तो एकांतासाठी आपला कुत्रा आणि मेंढ्यांसोबत इकडे आला.त्याचे म्हणणे होते की झाडांविना जमीन हळूहळू मरत आहे.त्याच्यापाशी इतर कोणतेही महत्त्वाचे काम नसल्याने त्याने धरणीची ही दुरावस्था दूर करण्याचा निश्चय केला.


मी त्या काळी तरुण होतो आणि एकटाच भटकंतीसाठी निघालो होतो, त्यामुळे मी त्याच्या निर्णयाचे मर्म थोडे समजू शकलो. पण माझे तारुण्य एका सुखी भविष्याच्या शोधात होते.मी त्याला म्हटले की तीस वर्षानंतर त्याचे हे दहा हजार झाडांचे दृश्य भव्य दिसेल. माझ्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याने अगदी सहज उत्तर दिले की जर देवाने त्याला तेवढे आयुष्य दिले तर तो पुढच्या तीस वर्षांत इतके वृक्ष लावेल की ही दहा हजार झाडे समुद्रात पाण्याच्या एखाद्या थेंबासारखे दिसतील.


याव्यतिरिक्त तो काही फळझाडांच्या लागवडीचे प्रयोग करत होता व त्यासाठी त्याने आपल्या घराबाहेरच एक रोपवन बनवले होते.काही झाडांना त्याने काटेरी कुंपण लावून मेंढ्यांपासून सुरक्षित ठेवले होते.ती रोपे खूप छान वाढत होती.दरीत लावायला म्हणून त्याने बर्चची निवड केली होती कारण तिथे जमिनीच्या थोड्याच खाली ओलावा होता.


दुसर्‍या दिवशी मी त्याचा निरोप घेतला.


पुढच्या वर्षी १९१४ चे प्रथम महायुद्ध सुरु झाले; जिथे मी पुढची पाच वर्षे लढत राहिलो.सैन्याच्या एका जवानाला झाडांबद्दल विचार करायला वेळ तो काय मिळणार.खरे सांगायचे तर त्या घटनेने माझ्या मनावर फारसा प्रभाव टाकला नव्हता.माझ्या लेखी त्याच्या या मोहिमेला एका छंदाएवढेच महत्व होते. उदा. टपाल-तिकिटे गोळा करणे; आणि त्यामुळे मी ते विसरलोही होतो. युद्ध संपले होते आणि मला बऱ्यापैकी पैसा आणि सुट्टी मिळाली. मी विचार केला की चला जरा मोकळ्या शुद्ध हवेत श्वास घ्यावे.फक्त याच उद्देशाने मी परत एकदा त्या ओसाड रानात भटकायला निघालो.त्या भागात काही बदल झाला नव्हता.पण, त्या ओसाड गावाच्या पलीकडे मला दूरवर डोंगरमाथ्यावर गालीच्याप्रमाणे पसरलेले धुके दिसले.आता माझ्या मनात त्या झाडे लावणाऱ्या मेंढपाळाच्या आठवणी ताज्या होऊ लागल्या होत्या. "दहा हजार झाडे" मी विचार केला, " खरंच खूप जागा घेतात. "


मी युद्धात अगणित लोकांना मरतांना बघितले होते.त्यामुळे तो मेला असेल ही कल्पना करणे फारसे कठीण नव्हते.विशेषतः विशीतले तरुण तर हाच विचार करतात की हाताशी इतर काम नसलेला पंचावन्न-साठ वर्षांचा म्हातारा मरणारच.


पण तो मेला नव्हता. खरे तर तो एकदम ठणठणीत होता.त्याने काम बदलले होते.आता त्याच्याकडे फक्त चारच मेंढ्या होत्या पण मधमाशांचे शंभर पोळे होते.त्याने मेंढ्या पाळणे सोडले कारण त्या रोपट्यांना खातील ही एक भीती होती. त्याने सांगितले (आणि मी स्पष्टपणे बघितलेही ) की युद्धाचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता आणि सातत्याने झाडे लावत होता.


१९१० ला लावलेली झाडे आता दहा वर्षांची झाली होती आणि आम्हा दोघांपेक्षा उंच झाली होती . ते दृश्य अगदी भान हरपणारे होते.मी निशब्द झालो होतो आणि तो तसाही अबोलच होता, आम्ही दोघे त्या जंगलात दिवसभर शांतपणे भटकत राहिलो. तीन भागांत विभागलेले ते जंगल अकरा किलोमीटर लांब आणि चार किलोमीटर रुंद होते. हे सगळे त्या अशिक्षित मेंढपाळाच्या दोन हातांच्या कठोर परिश्रमाचे आणि दृढनिश्चयाचे फळ होते; आणि त्याने हे कोणत्याही तांत्रिक साधनांच्या मदतीविना केले होते. ह्यावरून लक्षात येईल की, जर माणसाने मनात आणले तर युद्ध आणि विध्वंसाचा मार्ग सोडून, तोसुद्धा देवासारखेच सुंदर जग निर्माण करू शकतो.


तो जगात घडणाऱ्या घडामोडींकडे पूर्ण दुर्लक्ष करत आपले स्वप्न साकार करत होता. हवेत सळसळणारे , माझ्या खांद्याएवढे उंच, नजर पोहचेल तिथवर दिसणारे बीचचे वृक्ष ह्याची साक्ष देत होते. पाच वर्षांपूर्वी लावलेले काही देवदार त्याने मला दाखवले. त्यावेळी, १९१५ ला मी युद्धात लढत होतो. त्याने ही झाडे दरीत लावली होती, जिथे जमिनीत बराच ओलावा होता. एखाद्या तरुणीप्रमाणे कोमल अशा त्या झाडांनी जमिनीवर छान आच्छादन केले होते.


वृक्षारोपणामुळे ह्या ओसाड माळरानात एक नवे चैतन्य आले होते. अनेक चांगल्या बदलांच्या मालिकेची ही नांदी होती. पण हे सर्व बघायला त्याच्यापाशी वेळ नव्हता. तो आपले काम निर्धाराने करण्यात व्यग्र होता. पण परत येतांना मला गावाजवळ काही झर्‍यान्तुन वाहणाऱ्या पाण्याची खळखळ ऐकू आली. किती काळापासून हे झरे कोरडे पडले होते हे त्या देवालाच ठाऊक ! वृक्षारोपणाने सुरु केलेल्या बदलांच्या मालिकेतला हा सर्वाधिक प्रभाव पाडणारा बदल होता. कोणी एके काळी ह्यांतून नक्कीच पाणी वाहत असावे. भग्नावस्थेत असणार्‍या ज्या गावांचा उल्लेख मी पूर्वी केला होता, ती गावे कधीकाळी ह्यांच्याच किनार्‍यावर वसली असावीत.


वारा आपले बीज- प्रसारणाचे काम चोख बजावत होता. वार्‍याने बिया दूर-दूर पसरल्या जात होत्या. पाणी पुन्हा वाहू लागण्याने किनार्‍यावर विविध प्रकारची रोपटी आणि गवत उगवले होते. जमिनीखाली झोपलेल्या बिया आता जाग्या झाल्या होत्या. रानफुले त्यांच्या रंगीबेरंगी डोळ्यांनी आकाशाकडे बघत होती.आता जीवन जगायला एक अर्थ गवसला होता. पण हा बदल अगदी हळुवार आणि नैसर्गिक गतीने झाला होता त्यामुळे आश्चर्यचकित करणारा वाटत नव्हता. ससे आणि रानडुकरांच्या शिकाऱ्यांनी हा हिरव्या कौतुकाचा पूर बघितला होता खरा, पण त्यांनी ह्याला पृथ्वीचा नैसर्गिक वेडेपणा समजून दुर्लक्ष केले होते. त्यामुळेच मेंढपाळाच्या कामात कोणी ढवळाढवळ केली नव्हती. जर त्याला कोणी पहिले असते तर नक्कीच त्याला विरोध केला असता. पण त्याला शोधणे खूप कठीण होते. शासनात किंवा शेजारच्या गावांमध्ये कुणीच हा विचार करू शकत नव्हता की, हे विशाल जंगल कुणीतरी स्वतःच्या हाताने लावले होते.


ह्या जगावेगळ्या व्यक्तीच्या स्वभावाचा जर तुम्हाला अगदी योग्य अंदाज घ्यायचा असेल तर हे लक्षात घ्या की, हा अगदीच एकता, एका वैराण भागात आपले काम करत होता. इतका एकाकी की शेवटी - शेवटी तो बोलणेसुद्धा विसरला. कदाचित त्याच्या लक्षात आले असावे की, त्याला शब्दांची गरजच उरली नव्हती.


१९३३ ला पहिल्यांदा त्याला एक वनाधिकारी भेटला. त्याने त्या मेंढपाळाला त्या आदेशाची जाणीव करून दिली ज्याअन्वये जंगलाच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची वस्तू पेटवण्यास बंदी आणली होती कारण ज्वलनशील पदार्थांनी ह्या नैसर्गिक जंगलाला धोका होता. ह्या वनाधिकार्‍याने मेंढपाळाजवळ आश्चर्य प्रकट केले की तो पहिल्यांदाच एखादे जंगल स्वतःहून वाढतांना बघत होता. त्यावेळी तो मेंढपाळ आपल्या घरापासून सुमारे १२ किमी. दूर काही बीच वृक्ष लावायचा विचार करत होता. एवढे अंतर रोज येणे-जाणे करण्याऐवजी तिकडेच घर बांधायचा त्याने विचार केला. पुढच्या वर्षी त्याने तेथे आपले छोटेखानी दगडी खोपटे बांधले आणि तो नव्या घरी राहायला गेला.


१९३५ ला त्या "नैसर्गिक वनाचे" निरीक्षण करायला एक मोठी शासकीय समिती आली. वन खात्याचे मोठे अधिकारी, उपाधिकारी आणि काही तंत्रज्ञ आले होते. त्यांनी नेहमीचीच निरर्थक बडबड केली.त्या निरर्थक चर्चेने इतर कोणता लाभ तर झाला नाही, पण एक मात्र झाले, ते सगळे क्षेत्र "सुरक्षित वन क्षेत्र " म्हणून घोषित करण्यात आले. त्याचा एक फायदा हा झाला की, लाकडापासून कोळसा बनवण्याच्या उद्योगावर बंदी आली. ह्या जंगलाच्या सुंदरतेने प्रभावित झाल्याविना राहता येत नव्हते. ह्या सुंदरतेने शासकीय अधिकाऱ्यांचेही हृदयपरिवर्तन केले होते. निरीक्षण समितीचा एक सदस्य माझा मित्र होता. जेव्हा मी त्याला जंगलाचे खरे रहस्य सांगितले तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. पुढच्याच आठवड्यात आम्ही दोघे त्या मेंढपाळाला भेटायला गेलो. तो आपल्या कामात व्यग्र होता. ही जगा निरीक्षणाच्या जागेपासून सुमारे १० किमी दूर होती.


तो वनाधिकारी असाच माझा मित्र बनला नव्हता. तो एक भला माणूस होता आणि चांगल्या कामाचा आदर करायचा. आपल्या तोंडाला कुलूप केव्हा लावायचे हे त्याला कळायचे. मी मेंढपाळाला भेट म्हणून सोबत आणलेली अंडी दिली. तिघांनी सोबत बसून जेवण केले. मग आम्ही तासनतास ती सुंदरता न्याहाळत भटकलो.


ज्या दिशेने आम्ही आलो होतो त्या डोंगरउतारावर लावलेली झाडे आता २०-२५ फुट उंच झाली होती. मला स्पष्ट आठवते की, १९१३ ला हीच जमीन अगदी नापीक आणि निष्प्राण होती. मानसिक शांती, कठोर परिश्रम, डोंगरावरची फुप्फुसांना तरुण करणारी स्वच्छ हवा आणि साधे-सात्विक जेवण ह्यामुळे त्या मेंढपाळाला उत्कृष्ट आरोग्य लाभले होते. या धरतीवर तो कदाचित देवदूत होता. मी फक्त विचार करत राहिलो की, हा अजून किती एकर जमिनीवर झाडे लावेल.


निरोप घेण्यापूर्वी माझ्या मित्राने मातीचे परीक्षण करून काही विशिष्ट जातींची झाडे लावायचा सल्ला दिला, पण त्याने आपल्या सल्ल्यावर फारसा जोर दिला नाही. नंतर तो मला म्हणाला, " माझ्या आग्रह न करण्यामागे एक चांगले कारण आहे, तो मेंढपाळ झाडांविषयी माझ्याहून अधिक जाणतो. " तासभर चालल्यावर माझा मित्र परत मला म्हणाला, " तो माणूस कदाचित झाडांविषयी या जगात सगळ्यांपेक्षा जास्त जाणतो. महत्त्वाचे म्हणजे त्याने आनंदी राहण्याचा एक अद्भुत मार्ग शोधला आहे. "


त्या अधिकार्‍यामुळेच जंगल सुरक्षित राहू शकले आणि मेंढपाळाचा आनंदही! त्या अधिकार्‍याने जंगलाच्या सुरक्षेसाठी तीन वनरक्षक नेमले. त्यांच्यावर अशी जरब बसवली की, कोळश्याचा धंदा करणाऱ्यांकडून मिळणाऱ्या दारूच्या लाचेपासून ते दूर राहावेत.


फक्त १९३९ च्या युद्धादरम्यान या कामाला गंभीर धोका पोहचला होता. वाहने त्या काळी gazogenes वर ( लाकडे किंवा कोळसा जाळून चालणारे जनित्र, जनरेटर) चालू लागली होती. त्यामुळे लाकडे कधीच पुरेशी नसत. १९१० ला लावलेल्या ओकच्या जंगलात लाकूडतोड सुरु झाली होती, पण तो भाग कोणत्याही रेल्वेमार्गापासून एवढा दूर होता की, हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरला. त्यामुळे त्यांना लाकूडतोड सोडावी लागली. मेंढपाळाला ह्या घटनेची गंधवार्ताही मिळाली नाही. तो ३० किमी दूर, शांतपणे काम करत राहिला. ज्याप्रमाणे त्याने १९१४ चे युद्ध दुर्लक्षिले होते, त्याचप्रमाणे ३९ च्या युद्धाकडेही त्याने दुर्लक्ष केले होते.


जून, १९४५ ला मी त्या म्हातार्‍या मेंढपाळाला शेवटचे भेटलो. तेव्हा त्याचे वय ८७ होते. मी त्या ओसाड भागाच्या मार्गावरूनच आपला प्रवास सुरु केला. युद्धाने बरेच नुकसान केले असले तरी ह्या मार्गावर बस धावतांना बघून मला आश्चर्य वाटले. किंबहुना बसने प्रवास करतांना मला माझ्या पूर्वीच्या प्रवासातली कित्येक स्थळे ओळखतही आली नाहीत. मला असे वाटले की, जणू एका नव्याच भागात हा मार्ग घेऊन जातोय. जेव्हा मी त्या गावाचे नाव वाचले जे कधीकाळी भग्न आणि निर्जन होते, तेव्हाच मी योग्य ठिकाणी पोहचलो असल्याची खात्री पटली.


मी त्या गावी उतरलो. १९१३ ला १०-१२ घरांच्या ह्या वस्तीत फक्त तिघे राहायचे. ते गरिबीने ग्रासलेले निराश जीव होते, एकमेकांचा द्वेष करायचे, शरीराने आणि मनाने थकलेले, आदिम युगातले जीवन जगायचे. भग्न घरांवर काटेरी झुडपांचे राज्य होते. त्यांची परिस्थिती आशेपलीकडे बिघडलेली होती. या निराश जीवनातून मुक्तीसाठी मृत्यूची वाट बघणे हेच त्यांच्या हाती होते.


सगळे बदलले होते. अगदी हवेतला बदलही प्रफुल्लीत करणारा होता. गरम, कठोर वार्‍याच्या माराऐवजी आता मंद, थंड आणि सुगंधी वाऱ्याची झुळूक वाहत होती. पाण्याच्या प्रवाहाचा वाटावा असा आवाज डोंगरावरून येत होता, तो खरेतर रानवारा होता. माझ्या आश्चर्याला पारावर उरला नाही जेव्हा मी छोट्याश्या तळ्यात पडणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकला. मी बघितले की एक कारंजा बांधण्यात आला होता, थुइथुइ कारंजी उडत होती. एक हृदयस्पर्शी दृश्य बघितले - कुणीतरी कारंज्याच्या बाजूला सोनचाफा लावला होता. या रखरखत्या वाळवंटात जीवन पुन्हा परतल्याचे प्रतिक हे ४ वर्षांचे सोनचाफ्याचे झाड होते.


गावाकडे बघून वाटायचे की, तिथल्या रहिवाश्यांच्या मनात एका उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आहे. त्यांच्या मनात एक नवी आशा जागी झाली होती. पडक्या घरांना मोडून पाच घरांची दुरुस्ती करून पक्के करण्यात आले होते. गावात आता २८ लोक राहायचे ज्यांत चौघे नवविवाहित जोडपेसुद्धा होते. नव्या घरांची नुकतीच रंगरंगोटी झाली होती आणि त्यांच्याभोवती छोट्या छोट्या बागांत पालेभाज्या, फुले जोमात वाढत होती. कुठे गुलाब, कुठे कोबी, कुठे शेंगा, नाना प्रकारच्या भाज्या, फुले-फळे होती. कोणालाही राहायची इच्छा व्हावी, असे ते गाव आता झाले होते.


महायुद्ध नुकतेच संपले होते त्यामुळे जीवनाचे गाड़े अजून सुरळीत चालायचे होते, पण इकडे जीवनात चैतन्य होते. डोंगरउतारावर मी जवाचे आणि बाजरीचे शेत पहिले. खाली चिंचोळ्या दरीत कुरण हिरवे होत होते.


फक्त आठ वर्षांतच या भागात आरोग्य आणि भरभराटीचे वातावरण आले होते. १९१३ ला जेथे भग्नावशेष होते, तेथे आता हिरवे शेत हसत होते. लोक आता सुखी आणि आनंदी होते. कधीकाळी कोरडे असलेले ओहोळ आता डोंगरावरून येणार्‍या वितळलेल्या बर्फाच्या पाण्याने खळाळत होते. छोट्या छोट्या कालव्यांनी हे पाणी शेतांना पुरवले जात होते. शेतांवर वेगवेगळ्या झाडांची प्रेमळ सावली होती. हळूहळू पूर्ण गावाचा कायापालट झाला होता. मैदानी भागात जमिनी महागल्या होत्या.त्यामुळे लोक इकडे वसू लागले. ते आपल्यासोबत नवा उत्साह आणि झळाळी, धाडसी वृत्ती घेऊन आले होते. रस्त्यावर तुम्हाला असे स्त्री-पुरुष, मुले-मुली भेटायचे ज्यांच्या चेहर्‍यावर हास्य होते, डोळ्यांत नवे तेज होते. जर इथली लोकसंख्या मोजायची तर या १० हजार लोकांच्या आनंदाचे श्रेय फक्त त्या एकट्या निरक्षर मेंढपाळाला जाते.


जेव्हा मी विचार करतो की, ही सगळी कायापालट फक्त एका माणसाच्या मानसिक आणि शारीरिक श्रमाने घडली आहे, तेव्हा मी नतमस्तक होतो. एका साधारण माणसाने एकट्यानेच ह्या ओसाड माळरानावर चैतन्य फुलवले होते. जेव्हा हा सगळा विचार मनात येतो, तेव्हा सगळ्या त्रासदायक गोष्टींना बाजूला सारून, मानवतेवरचा माझा विश्वास अजूनच दृढ होतो. त्या निरक्षर पण महान माणसाच्या जीवनातून मी एक धडा मात्र शिकलो, - जर माणसाने मनात आणले तर पृथ्वीवर राहूनच तोसुद्धा देवाच्या तोडीचे महान कार्य करू शकतो.


१९४७ ला एका झाडाखाली त्या मेंढपाळाने शांतपणे डोळे मिटले. 
 ( समाप्त )

______________________________________________________

ही कथा खाली दिलेल्या दुव्यावर वि-पुस्तक( e-book) स्वरूपात वाचू शकता आणि मोफ़त डाउनलोड करू शकता.Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More