एक दिवस फुग्गोबाचा......

लेखकु म्हणे :

            साबणाचे फुगे सर्वांनीच आपल्या लहानपणी उडवले असतील. तासनतास साबणाचे फुगे उडवण्यात घालवले असतील, आई-बाबांच्या शिव्या खाल्ल्या असतील. पण आपण फुगे बनवायला जे मिश्रण वापरतो त्याच्यावर कधी प्रयोग केलेत का तुम्ही ? तुम्ही त्या मिश्रणात कधी शाम्पू मिसळून बघितलाय ? दोन-तीन वेगवेगळे साबण वापरले तर कसे फुगे बनतील ? आपला फुगा किती काळ टिकायचा ? काही सेकंद फक्त ! किती मोठा असायचा ? काही सेमी फक्त ! हो ना ? पण एक मुलगा होता, होमर. त्याने ह्या मिश्रणावर प्रयोग केलेत आणि भला-थोरला फुगा फुगवला. त्याची ही कथा ! मूळ इंग्रजी कथा लिहिली आहे जेम्स ए. स्मिथ ह्यांनी. मूळ कथेचे नाव - "The Day of the Bubble ." त्या कथेचे हे मराठी भाषांतर. "ज्याने आशेचे बीज पेरले " या कथेप्रमाणे ही कथादेखील मी ७वी-८वीत असतांना हिंदीत वाचली होती. ( त्या वर्षी भरपूर छान - छान कथा वाचनात आल्या होत्या, सगळ्या हिंदी किंवा हिंदीत अनुवादित. )हिंदी अनुवाद श्री. अरविंद गुप्ता सरांनीच केला होता.अर्थात मला आवडली होतीच. ही बाल-विज्ञानकथा आहे म्हटले तरी चालेल. मुलांना नक्की आवडावी अशी कथा. काही प्रयोग करावेत , ही प्रेरणा मिळावी अशी कथा.साबणाच्या फुग्यांवरून आठवले, लहानपणी १-२त असतांना मी निलगिरीच्या पानाच्या देठापासून छोटीशी रिंग बनवायचो साबणाचे फुगे काढायला; आणि कपडे धुण्याचे साबण वापरायचो. एके दिवशी , मी त्या मिश्रणात अंघोळीच्या साबणाचे पाणी सुद्धा थोडे मिसळले, मिश्रण थोडे घट्ट घेतले. फुगा चांगलाच म्हणजे अर्ध्या फुटापेक्षा तरी लांब निघाला, आणि एक मिनिट तरी टिकला असावा. अर्थात मी पुढे होमरसारखे प्रयोग केले नाहीत, नाहीतर कदाचित माझ्या हातून तेच घडले असते जे होमरच्या हातून घडले ! काय म्हणता ? होमरने काय केले ते तुम्हाला माहित नाही ? अहो, मग कथा वाचा, कळेल तुम्हाला !


                            एक दिवस फुग्गोबाचा......


     कोणे एके काळी होमर नावाचा मुलगा होता. स्लीपि हॉलो नावाच्या शहराबाहेर असलेल्या टेकडीवर तो राहायचा. होमर आपल्या हेन्री काकांसोबत जुन्या, मोडकळीस आलेल्या घरात राहायचा.


     पूर्ण दिवस होमर आपल्या हेन्री काकांना त्यांच्या छोट्याशा शेतात मदत करायचा. पण सायंकाळचे जेवण संपले रे संपले की तो आपल्या काकांसोबत समोर ओसरीत बसायचा आणि आपल्या आवडत्या छंदात गुंग व्हायचा.


     त्याचा छंद होता , साबणाचे फुगे बनवून उडवणे. पण होमरचे फुगे काही साधारण फुगे नसायचे. अहो, मोठ्ठाले फुगे बनवायच्या प्रयोगात होमरने कित्येक वर्षे घालवली होती ; आणि त्याचे फुगे बराच काळ टिकायचे. पटकन फुटतील ते होमरचे फुगे कसले ? आपले फुगे अधिक काळ टिकावे म्हणून होमर एक विशेष मिश्रण वापरायचा. इतर लोकांप्रमाणे तो फक्त साबणाचे पाणी वापरत नव्हता. होमर तर एक शास्त्रज्ञ होता ! फुगे अधिकाधिक काळ टिकावेत म्हणून तो मिश्रणासोबत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करायचा.


     आधी त्याने साबण आणि पाण्याच्या मिश्रणात थोडे डिंक मिसळले , पण ते खूप घट्ट होते. मग एके रात्री त्याच्या डोक्यात एक कल्पना आली की , आपण त्या मिश्रणात थोडे घासलेट टाकून ते पातळ करावे. हे मिश्रण पहिल्याहून बरे होते. एके रात्री त्याने मिश्रणात साबणाची भुकटी मिसळली. त्या रात्री त्याने ३ फुट लांब फुगा फुगवला आणि तो ५ मिनिटे तरंगत राहिला. सरतेशेवटी तो फुगा हेन्री काकांच्या नाकाला आदळला आणि फुटला.


     होमरचा उत्साह वाढला. त्याने विचार केला की थोडे शाम्पू मिसळले की फुगे अजून चांगले बनतील आणि तसेच झाले. मग त्याने थोडे रबर-सिमेंट आणि उसाची मळी मिसळली. ह्याने फुगे जास्त टिकाऊ आणि मोठे बनले.


      ह्या फुग्यांचे आणि हेन्री काकांचे मजेदार नाते होते. फुगे नेहमीच हेन्री काकांना आदळून फुटायचे ; आणि मग ते म्हणायचे, " होमर, एके दिवशी ह्या मोठ्या फुग्यांमुळे तू संकटात सापडशील. फुग्यांचे एवढे मोठे होणे आणि इतका काळ टिकणे नैसर्गिक नाही बाळ. "


     पण होमर तर एक शास्त्रज्ञ होता. तो कुठे लक्ष देतोय ? तो रोज नवनवे प्रयोग करत राहिला.


     एके रात्री जेवणानंतर होमर आणि त्याचे काका त्यांच्या टेकडीवरील घरात ओसरीत बसले होते. नुकतेच होमरने त्याचे साबणाच्या फुग्यांचे नवे मिश्रण तयार केले होते. ह्या खेपेस त्याने थोडे डांबर मिसळले होते जे त्याला नुकतेच डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या कडेला सापडले होते.


      हेन्री काकांनी आपले पाईप पेटवले आणि होमरकडे बघत म्हणाले, " होमर, एके दिवशी ह्या मोठ्या फुग्यांमुळे तू संकटात सापडशील. फुग्यांचे एवढे मोठे होणे आणि इतका काळ टिकणे नैसर्गिक नाही बाळ. "


      पण होमर तर एक शास्त्रज्ञ होता. प्रयोग करण्यातच त्याला खरा आनंद यायचा. त्यामुळे तो लगेच आत गेला आणि फुगे फुगवण्याची त्याची जुनी आवडती नळी आणली आणि फुगा फुगवणे सुरु केले.


      सुरुवातीला त्याला फुगा फुगवणे थोडे कठीण गेले. पण मग फुगा हळूहळू मोठा होत गेला आणि होमरचे कामसुद्धा सोपे होत गेले. आता त्याला फार जोराने फुंकावे लागत नव्हते. होमरने आता लांब , खोल श्वास घेतला आणि फुंकणे सुरु केले आणि फुगा मोठा होत गेला, मोठा, अजून मोठा होत गेला. लवकरच तो त्याने फुगवलेला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा फुगा होता. आणि फुगा अजून मोठा होतच होता. होमरला आता टेकडीखालचे शहर दिसत नव्हते, अंगण दिसत नव्हते. इतकेच नव्हे तर आता हेन्री काकासुद्धा त्याला दिसत नव्हते.


     होमरला हेन्री काकांचे काही शब्द पुसटसे ऐकू आले , " होमर, तू आता फक्त बघत राहा ! एके दिवशी ह्या मोठ्या फुग्यांमुळे तू संकटात सापडशील. फुग्यांचे एवढे मोठे होणे आणि........ "


     पण आता होमरला ऐकूच येत नव्हते. फुगा आता एवढा मोठा झाला होता की तो जमिनीला घासू नये म्हणून होमर जरा सांभाळूनच फुगवत होता. हळूहळू तो फुगवतच राहिला. फुगवता-फुगवता होमरला दम लागला आणि फुगा मात्र अजून मोठा होतच होता.


     फुग्याला फुगायला थोडी जागा मिळावी म्हणून होमर सांभाळतच ओसरीच्या काठावर आला. दहा फुट, अकरा फुट, बारा फुट - फुगा मोठा होतच होता. तेरा फुट, चौदा फुट - आणि होमरच्या कानी हेन्री काकांचे शब्द पडले , " अरे, बापरे .."


     तेवढ्यात एक मोठा आवाज झाला आणि फुगा नळीपासून वेगळा झाला. थोडा वेळ फुगा हलला, कंपने आलीत, पण तो फुटला मात्र नाही. फुटण्याऐवजी फुगा घरंगळू लागला. आधी हळूहळू , मग टेकडीच्या उतारावरून वेगाने घरंगळू लागला. हेन्री काका उभेच झाले. " होमर " , ते म्हणाले , " मी तुला म्हटले होते ना की एके दिवशी ह्या....." . पण आता होमरला ऐकू येईल तेव्हा ना? तो आपल्या विशाल फुग्यामागे टेकडीच्या उतारावर पळत सुटला होता.


     टेकडीवर बेस्सी नावाची गाय चरत होती. फुग्याची चाहूल लागल्यावर तिने आपले चरणे आणि रवंथ करणे बंद केले आणि हम्बरली, " हम्बा..." आणि फुगा तिला आदळला. फुगा इतका चिकट होता की त्याने बेस्सीला उचलले आणि घरंगळत पुढे गेला.


     क्लेम थॉम्पसन हेन्री काकांसाठी अंडी आणत होता. त्याने वर बघितले तर फुगा घरंगळत येतोय ! त्याने "वाचवा " ओरडावे त्याआधीच फुग्याने त्याला उचलले आणि घरंगळत स्लीपि होलो शहराकडे जाऊ लागला.


     क्लेमच्या मागोमाग त्याची मांजर पेस्सी येत होती. क्षणातच ती शहराकडे जाणाऱ्या त्या फुग्याचा एक भाग होती. फुग्यामागोमाग धावत होता होमर, आणि होमरमागोमाग ओरडतच धावत होते होमरचे काका हेन्री," होमर, तुला म्हटले होते ना की एके दिवशी ......"


      आता फुगा महामार्गावर आला होता. किराणा मालाचे विक्रेते मिस्टर अर्नॉल्ड आपल्या घोडागाडीवर आरामात स्लीपि हॉलोकडे जात होते. ते छान पेंगत होते. त्यांच्या घोडीला, डेझीला, त्यांच्या मदतीविना घरी कसे जायचे हे ठाऊक होते. त्यांना काही कळायच्या आतच, फुगा आदळला, आणि घोडी, गाडी, गाडीतला माल, आणि मिस्टर अर्नॉल्ड घरंगळत मुख्य रस्त्याकडे जाऊ लागले.


      थोड्याच वेळात घोडी हिन-हिन करत होती, मांजर "म्याव म्याव " करत होती, गाय हम्बरत होती. छोटा क्लेम थॉम्पसन किंचाळत होता आणि मिस्टर अर्नॉल्ड "वाचवा, वाचवा " ओरडत होते.


      हा सगळा गोंधळ कुठून येतोय हे बघायला सगळे मुख्य रस्त्यावर गोळा झाले. डोळ्यांना दिसणारे दृश्य बघून सगळे जागीच थिजले. एक भला थोरला फुगा घरंगळत येत होता आणि हात पाय, प्राणी त्याला चिकटले होते. ते पळत एखाद्या सुरक्षित जागी जाणार त्याआधीच फुगा त्यांना आदळला.


      डॉ. पार्सन यांच्या दवाखान्याबाहेर उभी असलेली कर आधी फुग्याला चिकटली. मग, बागेतल्या बेंचवर विणकाम करत बसलेल्या जोन्स आजींना त्याने कवेत घेतले. लंगडी खेळ्णार्‍या काही मुली अचानक गायब झाल्या.


      दोन कुत्रे, जे आपसांत शर्यत लावत होते, डोळ्याची पापणी लवायचा अवकाश, फुग्याच्या कुशीत होते. मुख्य रस्त्यावरची प्रत्येक वस्तू आणि व्यक्ती , जी जमिनीत रोवलेली नव्हती, त्या विशाल चिकट फुग्याला चिकटली होती.


      आता हेन्री काका आणि होमर मुख्य रस्त्यावर पोहचले होते. फुग्याला मार्गातली प्रत्येक वस्तू कवेत घेतांना ते दहशतीने बघत राहिले.


     "हेन्री काका, हेन्री काका," होमर रडू लागला, " या फुग्याला कसे थांबवू ? मी आता काय करू ? "


     आणि हेन्री काकांनी आपलेच पालुपद लावले, " होमर, तुला म्हटले होते ना की.... "


      मुख्य रस्ता जिथे संपायचा तिथे एक चर्च होते. ते एक छोटे चर्च होते. स्लीपि हॉलोच्या सर्व नागरिकांना चर्चचा अभिमान होता, कारण ह्या चर्चच्या छतावर लांब, अणकुचीदार सुळे होते. आता हा मोठा साबणाचा फुगा - त्याला चिकटलेल्या माणसे, प्राणी, वस्तूंसोबत - सरळ त्या छोट्या चर्चकडे जाऊ लागला.


     होमर रडतच म्हणाला, " अरे देवा, आता हे सगळे मरणार आणि सारे पाप माझ्या माथी येईल. सगळी चूक माझीच आहे. "


     फुग्याचा वेग आता इतका वाढला होता की, तो उसळतच पुढे जात होता. फुग्यातुन काय तो आवाज येत होता ! सगळेच रडत, ओरडत होते, प्राणी चित्कार करत होते. चर्चला आदळण्यापूर्वी फुग्याने शेवटची उसळी घेतली आणि तो सुळावर चढला ! एका मिनिटापर्यंत तो तसाच स्थिर राहिला -आणि होमरचा सगळा श्वास फुस्स आवाज करत त्या फुग्यातुन बाहेर पडू लागला. फुगा मेला एकदाचा.


      काय कचरा होता तो ! काय नव्हते त्यात - लोक , कार्स , प्राणी, बेंचेस, चीज-वस्तू, एक ना अनेक ! सगळे चिकट- चिकट झालेले, चिकचिकाट नुसता!


      होमरचा फुगा फुटल्यावर शहर स्वच्छ करायला चार आठवडे लागले. अशी घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती. एका वर्षानंतरसुद्धा स्लीपि हॉलोची जनता होमरच्या वैज्ञानिक प्रयोगाला आपल्या केसांतून , कपड्यांतून धूत होती. फुग्यांचा तो दिवस स्लीपि हॉलोची जनता कधीच विसरू शकली नाही.


       लोकांनी होमरला त्याच्या सार्‍या वैज्ञानिक उपकरणांसह कॉलेजात पाठवले, जेणेकरून शहराला नष्ट न करता त्याला त्याचे प्रयोग करता येतील.


        हेन्री काकांना होमरची उणीव जाणवते. रोज रात्री जेवण झाले की ते ओसरीवर बसतात, पाईप पेटवतात आणि म्हणतात , " होमर, मला माहित होते की ह्या वैज्ञानिक प्रयोगांद्वारे तू एके दिवशी नक्कीच काहीतरी चांगले करशील ! "


                                            
( समाप्त )

____________________________________________________

ही कथा तुम्ही e-book स्वरूपात इथे वाचू शकता आणि डाउनलोड पण करू शकता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More