द ग्रीन फ़्लाय
तो म्हातारा शेतकरी गावातला सर्वात श्रीमंत माणूस, अगदी आजारी, मृत्युच्या दारी उभा होता.देवाच्या दरबारी त्याचा न्यायनिवाडा केला जात होता, त्याच्याकडे बोट दाखवून देवाने सार्या मानवजातीला उदाहरण दिले : " जॉन गॅलकडे बघा. तुम्ही मर्त्य जीव समजता काय स्वतःला ? तुम्ही खिजगणतीलासुद्धा नाहीत. आता, जॉन गॅल खरंच कोणीतरी आहे. जिल्ह्याचा न्यायाधीशसुद्धा त्याची भेट घेतो वेळप्रसंगी. गावच्या पाटलीणबाई येतात आणि त्याची भेट घेतात. तो सर्वाधिक श्रीमंत माणूस आहे.तरी मी त्याच्यावर आघात करू शकतो.त्यासाठी मला एखादा भुकेला लांडगा पाठवायची गरज नाही की, एखादा मोठा देवदार त्याच्यावर पाडून त्याला चिरडून टाकायची पण गरज नाही. एक छोटी माशी पुरेशी आहे. "
अगदी हेच घडले होते. एक माशी त्याच्या हाताला चावली. हाताला सूज येऊ लागली आणि त्याचे हात अधिकाधिक लाल-काळे होऊ लागले.
पुजार्याने आणि पाटलीणबाईंनी त्याला डॉक्टरला बोलवायला सांगितले.
एखादा साधा शल्यचिकित्सक बोलावणे त्यालासुद्धा चालणारे होते, पण ती मंडळी बुडापेस्टला तार करून विशेषज्ञाला बोलावण्याचा आग्रह करत होती. डॉ. बिर्लींची निवड झाली. एका भेटीचे ३०० फ़्लोरिन्स पडले असते, पण ते वसूल होण्याची खात्री होती.
" मूर्खपणा आहे नुसता ! " म्हातारा म्हणाला, " ती छोटीशी माशी मला ३०० फ़्लोरिन्स किंमतीचे नुकसान करू शकत नाही. "
पण पाटलीणबाई आग्रही होत्या. त्यांनी डॉक्टरचे बिल स्वतःच भरण्याचा प्रस्ताव मांडला. मी मात्रा अचूक लागली. जॉन गॅल स्वाभिमानी शेतकरी होता. तार पाठवण्यात आली आणि एक तरुण, सडपातळ आणि चष्मिष्ट- अगदीच प्रभावहीन व्यक्तिरेखेचा- त्याला घेण्यास स्टेशनवर पाठवलेल्या घोडागाडीतून उतरला.
गॅलबाईने- म्हातार्याच्या तरुण बायकोने त्याने फ़ाटकावर स्वागत केले.
" आपणच बुडापेस्टचे ते प्रसिद्ध डॉक्टर ना ? " तिने विचारले, " तुम्ही लवकर चला आणि माझ्या नवर्याला बघा जरा. त्या माशी चावलेल्या हातावरून ते एवढा गोंधळ घालत आहेत ना की , जणू त्यांना हत्तीच चावलाय. "
हे ढळढळीत खोटे होते. जॉन गॅल एका शब्दानेही बोलला नव्हता, त्याला विचारेपर्यंत त्याने त्याबद्द्दल सांगितलेसुद्धा नव्हते आणि त्यानंतरसुद्धा तो अतिशय अलिप्त होता. तो आपल्या बिछान्यावर शांत, निर्विकार पडून होता. डोके मेंढीच्या कातडीच्या उशीवर टेकवलेले आणि तोंडात पाईप धरलेला.
" काय समस्या आहे म्हातारबुवा ? " डॉक्टरांनी विचारले, " तुम्हाला एक माशी चावली असे कळले. "
"हो, एवढेच " दातखीळ न उघडला म्हातारा उत्तरला.
" माशी कशा प्रकारची होती ? "
" एक हिरवी माशी ", तो शांतपणे म्हणाला.
" तुम्ही त्यांना प्रश्न विचारा डॉक्टर" , बाईसाहेब मध्येच बोलल्या. " ओवनमध्ये नऊ ब्रेड आहेत. "
" ठीक आहे आई, " अनवधानाने डॉ. म्हणाला.
अचानक काहीतरी डसल्यासारखे ती त्याच्याकडे वळली, आणि कंबरेवर हात ठेवून म्हणाली,
" का ? तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात ! " थोडीशी नाराजीत आणि थोड्या मिश्किल स्वरात म्हणाली, " कदाचित तुमच्या डोळ्यांवर चढवलेल्या त्या दोन खिडक्यांतून तुम्हाला नीट दिसत नसावे. "
ती गर्रकन वळली आणि अल्लड वार्याप्रमाणे स्कर्ट लहरत तारुण्याची जाणीव करून देत ती बाहेर पडली.
डॉक्टर तिच्याकडे रोखून पाहत राहिला. ती अप्रतिम देखणी होती, डॉक्टरपेक्षा बरीच लहान आणि अर्थातच नवर्याहून खूपच लहान होती. तो दिलगिरी दाखवणार होता पण त्याने काही म्हणायच्या आधीच ती निघाली होती.
" चला, जरा हात तपासूया. दुखतंय ? "
" बरंच " उत्तर आले.
डॉक्टरने सुजलेले हात तपासले आणि चेहर्यावर गंभीर भाव तराळले.
" वाईट सुजलेय. नक्कीच विषारी माशी असावी."
" असेल कदाचित, " जॉन निर्विकार चेहर्याने म्हणाला, " मी सांगू शकतो की, ती साधारण माशी नव्हती. "
" ती मृतदेहावरून आलेली माशी होती. "
ह्या माहितीवर जॉनने मनातल्या मनात एक शिवी हासडली.
" मी वेळेवर आलो हे नशीब समजा. आपण अजूनही काहीतरी करु शकतो. उद्या बराच उशीर झाला असता. अहो, तुम्ही या जगात नसता. "
" विचित्र आहे," चिलमीत अंगठ्याने तंबाखू भरत म्हातारा म्हणाला.
" विषबाधा वेगात पसरते, अजून वेळ गमवायला नको. मनाची तयारी करायला हवी. म्हातारेबुवा, आता तुमचा हात कापावा लागेल."
" माझा हात ? " तो आश्चर्याने उद्गारला. त्या स्वरात थोडी थट्टा होती आणि बरीच निराशा होती.
" हो, हे तर करायलाच हवे. "
जॉन गॅल काहीच बोलला नाही, त्याने फक्त डोके हलवले आणि चिलीम ओढू लागला.
" हे बघा, “ डॉक्टर मन वळवण्याच्या प्रयत्नात म्हणाला, " तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. मी तुम्हाला बेशुद्ध करेन आणि जेव्हा तुम्हाला जाग येईल तेव्हा तुम्ही बचावलेले असाल. नाहीतर, उद्या याच वेळेला तुम्ही ठार मेलेले असाल. देवसुद्धा वाचवू शकणार नाही. "
"ओ SS मला एकटे सोडा, " बोलून खूप दमल्यासारखे तो बोलला, भिंतीकडे वळला आणि आपले डोळे बंद केले.
डॉक्टरने अशा जिद्दीपणाची अपेक्षा केली नव्हती. तो खोलीतून बाहेर पडला आणि म्हातार्याच्या बायकोशी बोलायला गेला.
" ते कसे आहेत ? " ती कोणतेही भाव न आणता म्हणाली आणि डॉक्टरांना त्यांच्याविषयीचा तिरस्कार दाखवायला म्हणून आपले काम करतच राहिली.
" वाईट परिस्थिती आहे. मला त्यांनी हात कापायची परवानगी द्यावी म्हणून त्यांचे मन वळवायला तुम्ही मदत करावी, हेच विचारायला आलोय."
" अरे बापरे ! " पांढरीफ़टक होत ती उद्गारली, " हे करायलाच हवे का ? "
" हो, नाहीतर येत्या २४ तासांत ते मरतील. "
तिचा चेहरा लालबुंद झाला आणि तिने डॉक्टरांचा हात धरून त्यांना ओढतच ती रुग्णाच्या खोलीत घेऊन आली आणि कंबरेवर हात ठेवत म्हणाली, " अपंगाची बायको म्हणून समाधानाने जगणारी बाई वाटते का मी तुम्हाला ? मी शरमेने मरेन. तिकडे ! फ़क्त बघा त्यांच्याकडे ! " ती आपल्या नवर्याकडे वळली आणि जवळजवळ ओरडलीच, " त्यांना तुमचा हात कापायची परवानगी अजिबात देऊ नका , जॉन. त्यांचे अजिबात ऐकू नका. "
म्हातार्या शेतकर्याने तिच्याकडे मैत्रीपूर्ण नजरेने पाहिले.
" काळजी करू नकोस , क्रिस्का, " त्याने तिची खात्री पटवली, " इथे कसलीही काटछाट होणार नाही. मला तुकड्यांत मरायचे नाहीये. "
डॉक्टर म्हातार्याशी मृत्यूच्या भयानकतेबद्दल आणि जीवनाच्या सौंदर्याबद्दल बोलला, पण ते सारे वाया गेले. वाड्यातून पाटलीणबाईंना बोलावले, आणि पुजार्याला आणि गावातल्या सार्याच संभाषणचतुर वाक्यपटुंना बोलावले पण काहीच फायदा झाला नाही. जॉन गॅल ठाम राहिला. हात कापायला त्याने नकारच दिला.
म्हातारा ज्याप्रकारे मृत्य़ूला शरण जात होता, कटुतेविना, प्रतिकाराविना आणि व्यर्थ अश्रू न ढाळता, ते त्याच्या शांत चेहर्यात आणि बोलण्यात दिसत होते. त्याला मृत्यूचे भय नव्हते. जर आता त्याची वेळ आली असेल, तर तो त्याच्या वडलांप्रमाणे, आजोबांप्रमाणे जायला तयार होता.
म्हातार्याला स्वतःला वाचवण्याचे कितीही आवाहन केले तरी काही फायदा झाला नसता हे आता निश्चितच होते. पण वैतागलेल्या डॉक्टरला आपल्याबद्दल खरंच काहीतरी वाटतंय हे त्या म्हातार्या शेतकर्याला जाणवले. त्याला डॉक्टरची तळमळ बघून दया आली. हा एवढा दुःखी आहे याचे त्याला वाईट वाटले आणि थोड्या उपहासाने , थॊड्या तिरस्काराने जॉन डॉक्टरचे सांत्वन करू लागला.
अचानक डॉक्टरला आठवले की खेडूतांच्या बाबतीत पैशाचा मुद्दा चमत्कार करू शकेल, म्हणून तो म्हणाला " मी तुमचा हात कापो अथवा न कापो, तुम्हाला माहीतच आहे की, तुम्हाला मला ३०० फ़्लोरिन्स द्यायचे आहेत. जर शल्यक्रिया झाली नाही तर ते पैसे वाया घालवणे होईल. फक्त पाचच मिनटे लागतील.
" ठीक आहे, जर तुम्हाला तुमची फ़ीस कमवायचीच आहे तर एखादे मलम लिहून देऊ शकता. " जोड्यांच्या दुकानात भाव केल्यासारखा शांत चेहर्याने म्हातारा म्हणाला.
ह्याचासुद्धा मुळीच फायदा झाला नाही. वैतागलेला आणि निराश, डॉक्टर तिथून बाहेर पडला आणि पुन्हा विचार करायला आणि गावातल्या काही समजूतदार माणसांसोबत ह्या समस्येबद्दल चर्चा करायला निघाला. त्याला थोडेफार चांगले सल्ले मिळाले, पण न्यायाधीशाला रुग्णाच्या बाजूला उभे करणे तितकेच व्यर्थ होते. ती तरुण स्त्री डॉक्टरची कोणतीही ’दुष्ट’ योजना उढळून लावायला तिथे होतीच आणि आपल्या नवर्याचा दावा मजबूत करायला मध्येच एक-दोन शब्द बोलायची संधी ती अजिबात सोडत नव्हती. डॉक्तर पिन्हापुन्हा तिच्याकडे डोळे वटारायचा आणि एकदा तो तिच्यावर ओरडला देखील.
" जेव्हा चार माणसं बोलत असतील तेव्हा तुम्ही जिभेवर ताबा ठेवा. "
" तुमच्या लेखी बायका म्हणजे नवर्याची उष्टी खाणारीच ना , " तिने लगेच प्रत्युत्तर दिले.
जॉन गॅलने भांडण टाळायला लगेच हस्तक्षेप केला.
" जास्त गोंधळ घालू नकोस, क्रिस्का. पाहुण्यांकरिता वाईन आण बघू. "
" कोणत्या पिंपातली ? " तिने विचारले.
" दोन-हेक्टर पिंपातली. पण माझ्या मरणाच्या जेवणाला मात्र तीन-हेक्टर पिंपातले वापर. ती आंबू लागलीये. "
तो मृत्यूच्या कल्पनेला पार शरण गेला होता. पाहुणे वाईन प्याले आणि त्याला त्याच्या मर्जीवर सोडून निघाले.
अंगणात डॉक्टर बिर्ली घरगड्याला भेटला - तरुण , बलदंड, हरकाम्या.
" घोडागाडी तयार ठेव. मी अर्ध्या तसात निघेन, " तो गड्याला म्हणाला, " आणि गॅलबाईंना सांग की, मी रात्री जेवणाला थांबणार नाही. "
काय करावे याचा विचार करतच तो फाटकाबाहेर थांबला. फाटकाच्या फटीतून त्याने गड्याला गॅलबाईंकडे जाताना पाहिले आणि तिने गड्याला दिलेला नखरेल कटाक्ष लक्षात येणे तो टाळू शकला नाही आणि गड्याच्या देहबोलीतून जाणवणारा बदलदेखील ! ते दोघे आगीशी खेळत होते हे निश्चितच होते आणि दोघांमध्ये काहीतरी नक्कीच शिजत होतं. आता त्याला ह्या विषयाची थोडी अधिक माहिती तेवढी मिळवायची होती. गावातल्या सार्या प्रेम-प्रकरणांची माहिती ठेवणारी प्रेमात पाडणारे प्रेम-काढे बनवणारी एखादी म्हातारी चेटकीण गावात नक्कीच असावी. मुन्सफ़ला नक्कीच माहीत असावे. त्याला माहीत होते.
" म्हातारी चेटकीण रिबेक, " तो म्हणाला, " गॅल्सच्या दोन घरांपलिकडेच ती राहते."
डॉक्टरने त्याच्या हातावर दोन फ़्लोरिन्स ठेवले.
" मी एका स्त्रीच्या प्रेमात पडलोय, आणि मला असे काहीतरी हवेय की तीसुद्धा माझ्यावर प्रेम करेल," तो म्हणाला.
" अरे, हे शक्य नाही बाळा. तू शेतातल्या बुजगावण्यासारखा दिसतोस, आणि त्या तुझ्यासारख्यांच्या प्रेमात पडत नाहीत. "
" मान्य आहे, माई; पण मी तिला हवी तेवढी वस्त्राभुषणे देऊ शकतो आणि उधळायला वाट्टेल तितका पैसा.... "
" आणि कोण आहे ती ? "
" सौ. जॉन गॅल. "
" तू सर्व गुलाब खुडू शकतोस, पण जे आधीच खुडले गेलेत ते नाही. "
डॉक्टरला हेच तर माहीत करायचे होते.
" आणि तो दुसरा माणूस कोण आहे ? " त्याने विचरले.
" पॉल नेगी, घरगडी. ते नक्कीच त्याच्या प्रेमात पडली असावी. कारण ती बरेचदा प्रेमाच्या काढयाकरता इथे येते. त्याच्या वाईनमध्ये मिसळायला नुकतेच काही चेटूक दिलेय मी. "
" आणि जॉन गॅलला संशय आला नाही ? "
" तो हुशार असला , तरी तिची चलाखी त्याला नेहमीच मात देते. "
डॉक्टर गॅलच्या वाड्यात परतला आणि पाहिले की दोघेही अजून गप्पा करतच आहेत. गड्याने डॉक्टरांना स्टेशनवर न्यायला घोडे तयार केले होते. तिने डॉक्टरला बोलावले. डॉक्टर आल्यावर तिने ३०० फ़्लोरिन्स काढून त्याच्या हातात ठेवले.
" तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल, डॉक्टरसाहेब, " त्याला पैसे देत ती म्हणाली.
" ठीक आहे," डॉक्टर म्हणाला, " पण हे तुमच्या विवेकावर अवलंबून आहे, कारण मला ह्यांची गरज नाही. "
" तुम्ही काळजी करू नका. माझे मन हे ओझे वाहील. "
" उत्तमच ! गाडीत माझे सामान ठेवा, तोपर्य़ंत मी तुमच्या नवर्याचा निरोप घेतो. "
जॉन गॅल ज्या स्थितीत त्याला सोडले होते अगदी तसाच पहुडला होता. चिलीम विझलेली होती, त्याचे डोळे बंद होते जसे काही तो डुलकी घेतोय. दार उघडल्यावर त्याने वर पाहिले आणि एक डोळा किलकिला केला.
" मी फक्त तुमचा निरोप घ्यायला आलोय, मि. गॅल." डॉक्टर म्हणाला.
" तुम्ही जाताय ? " त्याने शांतपणे विचारले.
" इथे थांबायला काही कारण उरलेले नाही. "
" तिने तुम्हाला पैसे दिले ? "
" हो. तुम्हाला चांगली बायको मिळाली आहे, मि. गॅल. अहो, ती किती सुंदर आहे ! "
आपला चांगला हात डॉक्टरंना देत त्याने दुसरा डोळाही उघडला आणि बोलला, "हो ना ? "
" तिचे सुंदर ओठ चेरीसारखे आहेत. "
" हो तर, आहेतच. " त्याच्या चेहर्यावर एक आनंदी स्मित पसरले होते.
" लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण ह्या लफंग्या पॉलचा तिच्यासोबत मस्त वेळ जाईल. "
म्हातारा कावराबावरा झाला आणि त्याने वर पाहिले.
" तुम्ही हे कशावरून बोलताय डॉक्टर ? "
डॊक्टरने अचानक आपले ओठ बंद केले जणू काही तो अनवधानाने न बोलण्यासारखे काही बोलून गेला होता.
" नॉनसेन्स. ह्याच्याशी माझे काही घेणेदेणे नाही. तुमच्यापाशी डोळे असतात, डोके असते आणि तुम्ही गोष्टी बघता आणि त्या गोष्टींची सांगड घालता. ज्या क्षणी तिने तुमचा हात कापण्यास नकार दिला तेव्हाच मला शंका आली होती. तुम्हाला शंका आली नाही का ? पण आता मी समजलोय. अर्थातच...अर्थातच... "
ह्या क्षणी आपल्या दोन हातांपैकी एक सुजला आहे हे विसरून जॉन गॅलने आपल्या दोन्ही मुठी आवळल्या तो वेदनेने कळवळला.
" आSSS ! माझा हात, माझा हात ! आता एका शब्दानेही बोलू नका डॉक्टर. "
" नाही बोलणार. " डॉक्टर म्हणाला.
आपल्या उजव्या हाताने डॉक्टरचा हात पकडल्यावर त्याच्या छातीतून खोलवर कळा उठल्या.
" कोणता पॉल डॉक्टर ? कोणता पॉल म्हणायचा आहे तुम्हाला ? कोण आहे तो ? "
" तुम्हाला खरंच म्हणायचं आहे की तुम्हाला माहीत नाहे ? पॉल नेगी, तुमचा घरगडी. " म्हातार्या शेतकर्याचा चेहरा पांढरा पडला. त्याचे ओठ थरथरत होते आणि हृदयात रक्त उसळ्या घेऊ लागले होते. आता त्याचे हात त्याला त्रास देत नव्हते. त्याने अचानक कपाळावर हात मारला आणि वर पाहिले, " काय मूर्ख होतो मी. मला आधीच शंका यायला हवी होती. ती बाई तर विषारी नागिण निघाली ! "
" त्या बाईला दोष देऊन काही उपयोग नाही, मि. गॅल, तिच्यापाशी तिचे तारुण्य आहे, ती स्वस्थ आहे आणि तिच्यापुढे तिचे संपूर्ण आयुष्य पडले आहे. ती अजूनही कदाचित निर्दोष असेल, पण तुम्ही गेल्यावर तिला लग्न करावेच लागेल..... आणि तुम्ही तर जाणारच.... "
म्हातारा शेतकरी प्रयत्नपूर्वक हलला आणि डॉक्टरकडे वळला ज्याने आपले बोलणे सुरूच ठेवले होते.
" तुम्ही गेल्यावर जर तिने एखाद्या तरूणाशी लग्न केले तरी तुमच्यापाशी गमवण्यासारखे काहीच असणार नाही. मातीत मिसळल्यावर तुम्हाला ह्यातले काही माहीतदेखील होणार नाही. तसेही, तुम्हाला तर आनंद व्हायला हवा की तिला नवरा म्हणून एक देखणा माणूस भेटेल, सुंदर तरूण पॉल ! "
म्हातारा दातओठ खाऊ लागला. दोन सुळे एकमेकांशी टकरावल्यासरखा आवाज येत होता.
" तुम्ही लोभीपणा दाखवू नका, गॅलसाहेब. तिचा आकर्षक देह उपभोगाविना वाया जाऊ देणे हे वाईटच होईल. पॉल मूर्ख नाही. तो तिच्यासारख्या स्त्रिला थोडी चवही न घेता जाऊ देणार नाहीच. तसेही तिच्यापाशी तुमचा सर्व पैसा, सगळी शेती असेल. आणि तिलासुद्धा जगायला आवडेल. ह्या सगळ्यामध्ये जर कोणी मूर्ख असेल तर तुम्हीच, गॅलसाहेब. "
तो शेतकरी पुन्हा कळवळला आणि घामाने त्याचे कपाळ ओथबले. त्याच्या हृदयातला कटूपणा, तिरस्कार आता भरून वाहणारच होता.
" हे बघा, मि. गॅल, काहीच न मिळवण्यापेक्षा तिला एका हाताने कवटाळणे जास्त चांगले राहील. "
आता हे त्या म्हातार्यासाठी अतीच झाले होते.
त्याने उडी मारली आणि अपला सुजलेला हात डॉक्टरकडे करत म्हणाला,
" तुमचा चाकू घ्या हातात डॉक्टर, आणि कापून फेका ह्याला ! "
( समाप्त )
( मूळ हंगेरिअन लघुकथेचा मराठी अनुवाद
लेखक : Kalman Mikszath )
पूर्वप्रकाशित : - मी मराठी दिवाळी अंक २०११
खूप छान!
उत्तर द्याहटवाकथा छान आहे ...अनुवादही चांगलाच जमलाय ... मस्तच रे संकेत...
उत्तर द्याहटवाधन्यवाद गीतांजलीताई, आणि ब्लॉगवर स्वागत !
उत्तर द्याहटवा:) धन्यवाद भावा ! अजून १-२ अनुवाद पाडायला हरकत नाही आता ! ;)
उत्तर द्याहटवाफारच छान...
उत्तर द्याहटवाजगण्याची आसक्ती नेमकी कोणत्या निमित्ताने उभारी घेईल हे डॉक्टरच ओळखू शकतो !!
:)
हटवाThank you.