’सोपा’ उपाय ??

’फुकट ते पौष्टिक’ च्या ’पिपा’सेला आळा घालणारा ’सोपा’ उपाय.

कथा - कारखान्यातले भूत

भुतांच्या अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या मुलाची कथा

काय लिहू आज...

काय लिहू आज... एक शनिवार कंटाळवाणा ....
कितीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्या..
खरं तर साधा प्रयत्नही  नाही केला...
पराभव हा माझाच, लाजीरवाणा ..

कित्येक  बघितलेली स्वप्नं...
स्वप्नातच विरलेली...
दिवस  उजाडताच  नवा ...
माझी तीच वाट, अंधारलेली ...


एक काळ असा येईल..
माझ्या स्वप्नाप्रमाणे घडेल..
माझी ताकद  मलाच कळेल ..
पण तोही..कदाचित स्वप्नातच..

काय लिहू आज ..मी  दुर्मुखलेला.
खरडल्या चार ओळीच..
मनस्थिती निराशलेलीच...
थांबतो इथेच.. मी कंटाळलेला ..

सार्वजनिक रजनीकांतोत्सव

          आज १२ डिसेंबर, ३०१०. भल्या पहाटे उठून रजनीदेवाजी आराधना करून सहज फेरफटका मारायला बाहेर पडलो. रजनीकांत चौकात आल्यावर एका मोठ्या फलकाने स्वागत केले, " अखिल वैश्विक MIND IT मित्र मंडळ तर्फे आयोजित सार्वजनिक रजनीकांतोत्सव आपल्या हजाराव्या वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे ." तो फलक वाचताक्षणीच " स्वामी  संकेतानंद कृत रजनीकांतायण" या प्राचीन महाकाव्याची "MIND IT मित्र मंडळ"  हा अध्याय डोळ्यासमोर तरळला. भावनावेग अनावर होऊन डोळयातून हर्षधारा वाहू लागल्या. शरीर रोमांचित झाले. रजनीकॄपेने आजही "MIND IT मित्र मंडळ" त्याच पद्धतीने सार्वजनिक रजनीकांतोत्सव साजरा करत आहे.एवढेच नव्हे तर हा उत्सव आता संपूर्ण विश्वात सर्व जाती-धर्म-पंथाचे लोक साजरा करतात. या सणाने जगभरातील भेदभाव कामयचा नष्ट केलाय.
         आता घरी आल्यावर माझ्या संग्रहात असलेले "सार्वजनिक रजनीकांतोत्सव" ची प्रथम घोषणा करणारे ऎतिहासिक पत्रक वाचायला काढले. हजार वर्षं जुने असलेले हे पत्रक आपल्या दर्शनासाठी प्रकाशित करतोय.
                      
                                                      "जाहीर सुचना "
अखिल विश्वात विखुरलेल्या भविकांना एकत्रित आणण्यासाठी व रजनीदेवांच्या भक्तीत न्हाऊन जाण्यासाठी आम्ही १२ डिसेम्बर रोजी १२ दिवसांचा "सार्वजनिक रजनीकांतोत्सव " साजरा करण्याचे ठरवले आहे. या शुभ कार्याकरता स्वामी संकेतानंदांच्या अध्यक्षतेखाली "MIND IT मित्र मंडळ" स्थापण्यात आले आहे. या उत्सवाची अधिक माहिती खालीलप्रमाणे (ही माहिती ’सार्वजनिक रजनीकांतोत्सव’ साजरा करू इच्छिणार्‍या इतर भाविक मंडळांना "मार्गदर्शिका"(guidelines) म्हणूनही वापरता येईल. :-
१ :-  देवाजींचा पोस्टर hot air balloon मधे उडवून वाजतगाजत आणला जाईल.
२ :- मिरवणूकीमधे आणि उत्सवादम्यान फक्त देवाजींचीच गाणी वाजवण्यात येतील.
३ :- देवाजींचे पोस्टर जर ’देशाच्या भावी उज्ज्वल भविष्याने’ स्वहस्ते बनवल्यास उत्तमच. याद्वारे चिमुरड्या रजनीभक्तांना हस्तकलेचे प्रशिक्षण मिळेल, सोबतच देवाजींचे पोस्टर बनवण्याचे पुण्य पदरी पडेल.
४ :- पोस्टर हे कागदीच असावेत, flex चे नाही.  मूर्ती तयार केल्यास ती मातीचीच आणि नैसर्गिक रंगांचीच असावी.(याद्वारे पर्यावरणाचे रक्षण करण्याचा हेतू आहे.)
५ :- उत्सवादरम्यान मंडळाच्या सदस्यांनी घालायचे सोवळे, तसेच नैवेद्य, प्रसाद तत्सम बाबींसाठी देवाजींचे परमभक्त आकाशबुवा यांचा परामर्श घ्यावा.
६ :- जे भाविक कार्यबाहुल्यामुळे व इतर सांसारिक जबाबदार्‍यांमुळे १२ दिवसांचा रजनीकांत बसवू शकत नसतील ते २,४,६,८,१० असा सम संख्येतल्या दिवसांचा रजनीकांत बसवू शकतात.
७ :- विसर्जन करू नये. पोस्टर अथवा मूर्ती इतरांना देऊन रजनीभक्तीचा प्रसार करावा.
८ :- हलते-उडते देखावे फक्त देवाजींची महती सांगणारेच असावेत.
९ :- हा उत्सव online सुद्धा साजरा करता येईल.
१० :- Online साजरा करायचे असल्यास wallpaper, screen saver रजनीदेवांचा असावा, browser चा homepage देवांजींचे संकेतस्थळ असावे. नैवेद्य वगैरेंचे scripts बनवावेत. रजनीदेवांच्याच आरत्या व भक्तीगीते वाजवावी. torrents वर देवाजींचे अवतारकार्य वर्णन करणार्‍या चित्रपटांच्या dvd upload कराव्यात.

   अजूनही काही सूचना असतील तर त्यांचे स्वागत केले जाईल.

                                        सदस्यनोंदणीसाठी आवाहन :
"MIND IT मित्र मंडळाचे" सदस्य होण्याचे स्वामी संकेतानंदांच्या सर्व शिष्य़ांना आवाहन करण्यात येत आहे. इच्छुकांनी प्रतिक्रिया चौकटीत आपल्या नावाची नोंद करावी. त्याखाली रजनीदेवाचा जयघोष करावा.

टीप : - अखिल विश्वात पसरलेला शिष्यगण मंडळाचा सदस्य होऊ शकतो.

                                                                  ---  आदेशान्वये :-
                                                                               सचिव( MIND IT मित्र मंडळ)

                   रजनीकांतजींच्या नावाने.....  MIND IT  अण्णा  !!!

      तमिळप्रान्तस्वामी, सहस्रसूर्यप्रकाशित, कोटिहस्तबलाभुषित,सर्वयुद्धकलाविषारद, धुम्रदन्डिकाधारी, कृष्णनयनावरणउच्छालिता, अभिनयसम्राट, मनोरंजनदाता, भाग्यविधाता,तरुणातितरुण, चिरतरुण, देवाधिदेव, चित्रपटदेव, रजनिकांतदेवजीकी...... जय !!!!


     
      हा ऎतिहासिक दस्तावेज जपण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर आहे याचे मला नेहमीच भान राहील. अरे हो, मी माझी ओळख करून द्यायला विसरलोच. मी "रजनीकांत संग्रहालयाचा " निर्देशक( director) आहे. माझे नाव सौरभकुमार आकाशराव रजनीमार्गी आहे .(सध्याच्या काळात जो तो आपल्या मुलांचे नाव रजनीकांत, सौरभ, आकाश आणि संकेत ठेवत असतो.). असो, आता मला स्वामी संकेतानंद व्याख्यानमालेत "देवाजींचे परमभक्त आकाशबुवा आणि त्यांचे जीवितकार्य "  या विषयावर व्याख्यान द्यायला जायचे आहे. पुन्हा भेटूच.

१२ रजनीचित्रपट व्रतकथा - २

        जुनी गोष्ट आहे. एक आटपाट नगर होते.लुंगीनगर त्याचे नाव.त्या नगरात एक बस वाहक राहायचा. सगळे त्याला चिदूअण्णा म्हणायचे. खाकी सदरा, खाली पांढरी शुभ्र सुती लुंगी, गळ्यात बांधलेला लाल रुमाल, डोळ्यांवर चढवलेला काळा गॉगल ही त्याची वेशभुषा होती.तो रजनीदेवाचा भक्त होता. तो त्याच्या व्यवसायात आनंदी होता. पण त्याला सुटे पैसे परत मागणार्‍या प्रवाशांचा फार त्रास होता.त्यांच्यासोबत वाद घालतांना प्रकरण कसे निस्तरावे कळेनासे झाले होते. त्याचा हिशोब बरोबर लागत नसे. सुट्या पैशांची कमतरता त्याला हैरान करी. प्रवासी पण त्याचे ऎकेनात.
       एके दिवशी त्याला एका सहकार्‍याकडून "१२ रजनीचित्रपट व्रताची" माहिती झाली. सहकार्‍याने सांगितले की, हा व्रत केल्यास तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मग त्याने व्रताची विधी समजावून सांगितली. सोबतच त्याला एक चेतावनी दिली की, हा व्रत मनोभावे पूर्ण कर, देवाजींना विसरू नकोस. " उतू नको, मातू नको, घेतलेली dvd टाकू नको. " इतके बोलून सहकारी आपल्या मार्गाला लागला.
      चिदूअण्णाने ठरवले की, आपण हा व्रत करायचा. १२ जुलै ला त्याने व्रताला प्रारंभ केला. तो अगदी मनोभावे व्रत करी.त्याने रजनीदेवाच्या व्रतात कुठलीही कमी पडू दिली नाही. जसेजसे दिवस पुढे सरकत होते तसतसे चिदूअण्णाला व्रताचा प्रत्यय येऊ लागला.आतातर बसमधे कमालच व्हायची. आता तो बसमधे अगदी खुल्या आवाजात म्हणायचा ," ऎ, किसके पास चिल्लर नही है ?? उनको बस से उतर जाना.. Mind it.. I say.." आणि प्रवासीसुद्धा उतरून जायचे. जे प्रवासी दीडशहाणपणा करून सुटे पैसे लपवायचे, चिदूअण्णाने  " रजनीकांतजी के नामसे एक बार फिर बोलता.. Mind it, I say.." असे म्हणायचा अवकाश की ते सुटे पैसे आपोआप बाहेर उड्या मारत चिदूअण्णाच्या खिशात जायचे. सुट्या पैशांचा घोळ झाला की चिदूअण्णा देवाजींचे नाव घ्यायचा व देवाजींच्या स्टाईलमधे ५ चे नाणे हवेत उडवायच्या. हवेतच ५ च्या नाण्याचे ५ १-१ रुपयांच्या नाण्यांत बदलायचे आणि बरोबर त्याच्या मुठीत यायचे. 
      असे कितीतरी ’न भूतो न भविष्यती’(अर्थात, देवाजींकरता रोजचेच) चमत्कार चिदूअण्णा करू लागला. हे चमत्कार बघायला त्याच्या बसमधे जास्तच गर्दी होऊ लागली. चिदूअण्णामुळे देवाजींच्या भक्तसंख्येत प्रचंड वाढ झाली. त्याच्या बसने प्रवास करणार्‍या प्रवासांच्या संख्येतसुद्धा वाढ होऊ लागली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला " सर्वोत्कृष्ट वाहकाचा" त्या वर्षीचा राज्य पुरस्कार मिळाला.
     "१२ रजनीचित्रपट व्रताचा हा महिमा बघून चिदूअण्णा भारावून केला. त्याचे आयुष्य समाधानी झाले. चिदूअण्णा पुढे ’चिदूबाबा’ नावाचेच जास्त प्रसिद्ध झाला.

     "१२ रजनीचित्रपट व्रत " केल्याने जसे चिदूअण्णाचे कल्याण झाले तसेच श्रोत्यांचे होवो ही रजनीकांतदेवांच्या चरणी याचना.
             अशी ही साठा उत्तराची कहाणी सुफळ सम्पूर्ण. 
                                     श्री  रजनीकांताय नमः 


                              रजनीकांतजींच्या नावाने.....  MIND IT  अण्णा  !!!

      तमिळप्रान्तस्वामी, सहस्रसूर्यप्रकाशित, कोटिहस्तबलाभुषित,सर्वयुद्धकलाविषारद, धुम्रदन्डिकाधारी, कृष्णनयनावरणउच्छालिता, अभिनयसम्राट, मनोरंजनदाता, भाग्यविधाता,तरुणातितरुण, चिरतरुण, देवाधिदेव, चित्रपटदेव, रजनिकांतदेवजीकी...... जय !!!!

तो राजा आमच्याच जातीचा......

        जुनी गोष्ट आहे. शेकडो वर्षं जुनी. भारतवर्षात एक राजा होता. राजा पराक्रमी होता, कलेचा भोक्ता होता, रसिक होता, त्याच्या दरबारी कलाकारांना, साहित्यिकांना मानाचे स्थान होते. राजा स्वतः एक साहित्यिक होता, प्रकांडपंडित, विद्वान होता.आपल्या पराक्रमाने त्याने आपल्या राज्याचा विस्तार केला.सुख-समृद्धीचे राज्य आणले. त्याच्या राज्यात भरभराट होती,प्रजा सुखी होती.
        वर्षामागुन वर्षं गेलीत. राजा आता दंतकथेचा, लोकसाहित्याचा विषय झाला होता.त्याच्या पराक्रमाचे पोवाडे गायले जाऊ लागले. त्याची महानता अधोरेखित करणार्‍या म्हणी निघाल्या.त्याच्या काळातल्या वास्तूंना तिर्थक्षेत्राचे स्थान मिळाले
        राजा जाऊन शेकडो वर्ष झाली. आता विसावे शतक लागले होते."जात नाही ती जात" चा प्रत्यय येत होता. जाती तिथेच होत्या.महापुरुषांना जातीच्या दावणीला बांधण्याची नवी टूम निघाली. राजा कसा वाचणार! राजा ज्या जातीचा होता त्या जातीने राजावर आपला दावा केला. त्याच्या नावाने त्या जातीने संघटना उभारल्या. सम्मेलने भरू लागली.त्याचा जयंती सोहळा साजरा होऊ लागला. त्याच्या कार्याची महती जात-बांधवांना व्हावी म्हणून त्याची चरित्रगाथा प्रकाशित झाली. आपल्या जातबांधवांना राजाच्या नावासमोर "जय" लावून अभिवादन करण्याची पद्धत बाळसे धरू लागली. त्या जातीसंघटनेच्या दिनदर्शिकेवर त्याला स्थान मिळाले. थोडक्यात त्या राजाला जातीला बांधण्याचे सर्व कार्यक्रम पार पाडण्यात आले.
           काय म्हणालात ? कथा ओळखीची आहे? राजाचे नाव छत्रपती शिवाजीराजे भोसले आहे आणि जातीचे नाव मराठा आहे असा जर आपला अंदाज असेल तर तुम्ही साफ चुकलात. ही कथा आहे एका वेगळ्याच प्रदेशातली.
          मग या कथेत वेगळे काय? फक्त पात्रं बदललीत काय? नाही, कथेचा उत्तरार्ध वेगळा आहे. कथानक पुर्वार्धापर्यंतच सिमीत राहिले असते तर कही विशेष घडले असे मी माने नसते. महापुरुषांना जातीपुरते मर्यादित करायची फॅशनच आहे सध्या. आपल्या जातीत झालेल्या महापुरुषांची यादी दाखवून "आमची जात तुमच्या जातीपेक्षा श्रेष्ठ कशी" हे सांगण्याची चढाओढ आहे सध्या. असो, आता कथेचा उत्तरार्ध वाचा. ही खरी घटना आहे, गंभीर आणि मजेदारही. जातीवाद कुठल्या वळणावर जाऊ शकतो हे सांगणारी.
         मागे सुट्ट्यांमधे घरी गेलो असता आई आणि माझ्यात झालेला संवाद खालीलप्रमाणे.
(आपल्या सोयीसाठी - पहिली जात -जा१, दुसरी जात -जा२, ’तो’ राजा - राजा )

आई :- काय रे, राजा जा१ च होता का?

मी :- हो, त्याची जात जा१ च होती. प्रश्न विचारण्याचे कारण?

आई :- अरे, जा२ चे काही लोक म्हणताहेत की, तो राजा त्यांच्या जातीचा होता. तो त्यांचा राजा होता. जा१ ने त्याला hijack केले.खरे काय आहे ?

मी :- अगं आई, सगळ्या ऎतिहासिक पुराव्यानुसार राजाची जात जा१ च होती. हे १००% खरे आहे.पण  आता जा२ जर त्या राजावर दावा करतेय तर त्या मागे काही कारण असेलच. त्या नावाचे इतिहासात ३-४ राजे होऊन गेले, वेगवेगळ्या जातींचे-वंशांचे.त्याच नावाचा अजून एक राजा बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे, पण वेगळ्या वंशाचा आणि कालखंडाचा. असे होऊ शकते की जा२ मधे पण या नावाचा एखादा राजा झाला असेल. पण गैरसमजातून त्यांनी जा१च्या राजाला जा२चा राजा समजला असेल.असे असेल तर लवकरच त्यांच्या लक्षात त्यांची चूक येइल.
    दुसरे कारणसुद्धा असू शकते. या राजाचे राज्य खूप मोठे होते. जा१, जा२ दोघेही त्याचीच प्रजा होती. राजा अतिशय लोकप्रिय होता. तो रयतेचा राजा होता. त्यामुळे सगळ्या जातीच्या लोकांना तो आपलाच वाटायचा. असे असू शकते की "आम्ही त्या राजाची कधी काळी प्रजा राहिलेलो आहोत, म्हणून तो आमचा राजा", अशा अर्थाने जा२ ची मंडळी बोलत असतील. पण महापुरुषांना विशिष्ट जातीला बांधण्याची प्रथा लक्षात घेता याची शक्यता दुर्मिळच वाटते.

आई :- जा२ चे म्हणत आहेत की राजा त्यांच्या जातीत जन्माला आला होता; जा१ चे लोक त्याला hijack करून ’राजा आमचा’म्हणत उदो उदो करत आहेत. तो ’ आमचासुद्धा ’ राजा होता असे म्हणत नाहीत ते.

मी :-  इथेच तर  चुकतंय. जर राजाने राज्य चालवतांना "हा माझ्या जातीचा , याला वेगळा न्याय; त्याची जात दुसरी, त्याच्यासाठी वेगळा कायदा" असे म्हणत राज्य केले नाही; सगळ्या प्रजेची त्याने सारखीच काळजी घेतली तर मग आता कशाला "तो रयतेचा राजा होता" हे स्विकारायच्या ऎवजी "तो जा१ चा होता की जा२ चा" यावर  भांडायचे? आमचे पूर्वज त्याची प्रजा राहिली आहेत याचा अभिमान ठेवावा, तो राजा आमच्या जातीचा नाही म्हणून जा२ ने हिरमुसायचे नाही की त्यांनी राजा जा२ चाच कसा यावर भांडत इतिहासातली कुजलेली प्रेते उकरू नयेत. जा१ ने सुद्धा राजा जा१ मधे जन्मला म्हणून त्याच्यावर पहिला हक्क आमचाच असे म्हणू नये, दुसर्‍या जातीने राजाच्या नावाचा, चित्राचा उपयोग त्यांच्या कार्यक्रमात कसा केला म्हणून जाब विचारू नये.
        पण असे होणार नाही. जा१ व जा२ चे कट्टरपंथी लढतच राहतील. राजा जा१ मधे जरी जन्मला तरी तो "जा१चा राजा" म्हणणे चूक ठरेल, राजा सगळ्यांचाच होता.

आई :- बरोबर आहे. राजा गेला, त्याचा काळही गेला.आता भांडण लावून दोन जातींमधे विषच तेवढे पेरले जाणार.

मी :- महापुरुषांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आपणसुद्धा आपल्या देशासाठी काहीतरी भरीव काम करावे असा विचार ही मंडळी करणार नाहीत.त्यांना आपापल्या जातीत ओढण्यात सगळी शक्ती घालवतील. जर जा२ ने नेमक्या त्याच राजावर दावा केला असेल तो जा१ चा म्हणून सर्वमान्य आहे, जा२ च्या त्या लोकांचा काही गैरसमज झाला नसेल, तर पुढे काहीतरी गंभीर घडू शकते. जा२ ची ’ही’ मंडळी  इतिहासाचा सोयीस्कर अर्थ लावतील, कदाचित जा२ चा आणि राजाचा कसातरी बादरायण संबंध जोडून आमचेच कसे खरे आहे यावर भांडतील.अशाने त्यांची पोळी भाजली जाईल. पण दोन जातींमधे दरी निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ्य तेवढे बिघडेल.शहाणपणा यातच आहे की जा१ आणि जा२ च्या लोकांनी ह्यांना बळी पडू नये.

        ------ संवाद इथेच संपला -----

   मी मुद्दामच त्या दोन जातींची आणि त्या राजाचे नाव सांगत नाही. ज्यांना राजाची जात माहित नाही त्यांनासुद्धा कळेल ती.राजा नकळत जातीत बांधला जाईल. जातींची नावे कळली तर राजा जा१ चा की जा२ चा अशी निरर्थक वादविवाद स्पर्धा होईल.

     सध्या महापुरुषांना जातीत बांधण्याचा प्रकार एका गंभीर वळणापर्यंत पोहचलाय.माझ्या काळात हळू हळू छत्रपती शिवाजी राजे भोसले  "मराठयांचेच" म्ह्टले जात आहे. माझ्या नातवंडांच्या काळात ( कदाचित माझ्या मुलांच्याच काळात -भारताची ’प्रगती’ वेगात होत आहे ना! ) छत्रपती शिवाजी राजे "फक्त भोसल्यांचेच" असे म्हणण्यापर्य़ंत मजल जाईल.
      राजाचे काय भविष्य आहे हे बघणे मजेदार ठरेल.
     
     

ती....

शृंगारिक कविता किंवा प्रेम कविता हा माझा प्रांत नव्हे. पण एक प्रयत्न केला होता फार दिवसांपूर्वी (फेब्रुवारी ११,२०१०). मग सहजच ती कविता मराठीकविता या संकेतस्थळावर प्रकाशित केली होती.तिथे प्रतिसाद ठीकच होता. पण आता अधिकाधिक लोकांचा प्रतिसाद कळावा म्हणून परत इथे post करतोय. आपली प्रतिक्रिया अगदी परखडपणे द्या. या कवितेनंतर मी पुन्हा कधी या प्रकारात कविता केली नाही.असो, सहन करा आता ही कविता...

                                                       

                                         ती....
                                                   अल्लड अवखळ, पाण्याची खळखळ
                                                    तापणार्‍या बनात, पानांची सळसळ
                                         ती....
                                                   ओठांवर हसू ,लटका राग
                                                   भुंग्याचा पिंगा, फुलांचे पराग

                                          ती....
                                                    पायांत पैंजण,हातांवर गोंदण
                                                    काटेरी झुडपाला, गुलाबांचे आंदण

                                          ती....
                                                     गालावर खळी, नजरेचे बाण
                                                     सैरभैर मन, वारा बेभान

                                         ती....
                                                    भावनांचा पूर, शब्दांचा दुष्काळ
                                                    विस्फारलेल्या नजरा, चर्चांचे गुर्‍हाळ

१२ रजनीचित्रपट व्रतकथा - १

         जुनी गोष्ट आहे. एक आटपाट नगर होते पुण्यनगरी त्याचे नाव.त्या नगरीत एक ऑटोचालक राहत होता.वेंकट त्याचे नाव.तो चित्रपटांचा चाहता होता. ईशकृपेने त्याच्या घरी भरभ्रराट होती.कशाची टंचाई त्याला जाणवली नाही.त्याच्याकडे काळा गॉगल होता, पिवळा रुमाल होता. ते त्याच्या देहाचे घटक बनले होते. तरीपण तो दुःखी असायचा. त्याचे मन त्याला खात असायचे. त्याच्या जीवनात एका गोष्टीची कमतरता त्याला कष्टी करायची. तो रजनीकांतदेवांचा निस्सीम भक्त होता. त्यांचे चित्रपट तो दररोज दिवसभर ऑटो चालवून थकल्यानंतर घरी जाण्यापूर्वी बघायचा.रजनीकांतदेवांच्या काही क्रिया त्याला करणे जमायचे.तो गळ्यातून आपला पिवळा रुमाल काढून एकदाच झटकायचा आणि संपूर्ण ऑटो स्वच्छ व्हायचा.ही रजनीकांतदेवांचीच कृपा असे तो समजायचा. अशा अजूनही काही क्रिया ज्या फक्त स्वय‍ं रजनीकांतदेव किंवा त्यांचे निस्सीम भक्तच करू शकतात,त्या तो करायचा. 
               तरी तो कष्टी होता. त्याला "उजवा पाय जमिनीवर ठेऊन डाव्या पाय गोल फ़िरवून धुळीचे वादळ निर्माण करणे" ही क्रिया जमेना. ह्याखातर त्याने डाव्या पायाच्या गुडघ्याची वाटी ६ दा मोडली होती.असाच एकदा विपन्नावस्थेत ऑटोमधे बसलेला असतांना एक व्यक्ती आला. त्याने वेंकटला रजनीकांतदेवांचा चित्रपट लागलेल्या सिनेमागृहाजवळ सोडण्याचे सांगितले.  रजनीकांतदेवांचा चित्रपट लागलेल्या सिनेमागृहाजवळ जायचे असल्याने तो मीटरने जायला तयार झाला. गप्पांच्या ओघात वेंकटने यात्रेकरूला विचारले, "साहेब, आपण देवाजींचे भक्त दिसता ?" त्याने होकार दिला व विचारले,"तुझा चेहरा असा पडलेला का ? " वेंकटने आपली समस्या सांगितली. तो गृहस्थ हसत म्हणाला, "अरे वेड्या, यात चिंता करण्याची गरज काय? तुला एक व्रत सांगतो, लक्ष देउन ऎक. हे व्रत केल्याने तू आपल्या पायाने छोटेसे वादळ निर्माण करण्यास यशस्वी होशील. मोठे वादळ फ़क्त देवाजीच करू शकतात. तुला एक रहस्य सांगतो ते ऎक. रजनीकांतदेव जेव्हा आपला  पाय गोल गोल हलवतात तेव्हा जगाच्या कोपर्‍यात कुठेतरी चक्रीवादळ येते.  आता तुला "१२ रजनीकांतचित्रपट व्रताची" माहिती देतो, ती ऎक. हे व्रत देवाजींचे परमभक्त स्वामी संकेतानंद ह्यांनी सांगितलेले आहे. आता ह्या व्रताचा विधी सांगतो." अशाप्रकारे त्या इसमाने वेंकटास सम्पूर्ण विधी व महात्म्य सांगितले.वेंकटने लगेच निश्चय केला की याच महिन्यात १२ तारखेपासून हा व्रत करावा. 
       पुढे त्या महिन्याच्या १२ तरखेला त्या महापुरुषाने सांगितलेल्या विधीप्रमाणे वेंकटाने १२ दिवसांचा व्रत केला. ७ च्या दिवसापासून त्याला व्रताची अनुभूती येऊ लागली. १२ व्या दिवसांपर्यंत तो सहजपणे डावा पाय गोल फ़िरवून धुळीचे वादळ बनवू लागला. त्याला अत्यंद आनंद झाला. १२ व्या दिवशी त्याने १२ नास्तिकांना बोलावले. प्रत्येकी १-१ काळा गॉगल, पिवळा रुमाल व रजनीपटांच्या १२ DVD दिल्या. सगळ्यांना तपकिर देऊन व्रताची सांगता केली. वेंकटचे जीवन "१२ रजनीचित्रपट व्रत" केल्याने सुखी समृद्ध झाले. तो रजनीदेवांचा अधिकच निस्सीम भक्त झाला. पुढे तो मीटरने ऑटो चालवू लागला. परतीचे अर्धे भाडे मागणेसुद्धा बंद केले.
         "१२ रजनीचित्रपट व्रत " केल्याने जसे वेंकटचे कल्याण झाले तसेच श्रोत्यांचे होवो ही रजनीकांतदेवांच्या चरणी याचना.
             अशी ही साठा उत्तराची कहाणी सुफळ सम्पूर्ण. 
                                     श्री  रजनीकांताय नमः 


                              रजनीकांतजींच्या नावाने.....  MIND IT  अण्णा  !!!

      तमिळप्रान्तस्वामी, सहस्रसूर्यप्रकाशित, कोटिहस्तबलाभुषित,सर्वयुद्धकलाविषारद, धुम्रदन्डिकाधारी, कृष्णनयनावरणउच्छालिता, अभिनयसम्राट, मनोरंजनदाता, भाग्यविधाता,तरुणातितरुण, चिरतरुण, देवाधिदेव, चित्रपटदेव, रजनिकांतदेवजीकी...... जय !!!!

१२ रजनीचित्रपट व्रतकथा - प्रस्तावना

                                    ॥ श्री रजनीकांताय नमः ॥

आमच्या असे निदर्शनास आले आहे की, स्वामी संकेतानंद महाराजरचित या अद्भुत व्रताची महती बहुश्रुत असूनदेखील आणि लाखो भक्तांना याची प्रत्यक्ष अनुभूती आली असतांनादेखील कित्येक नास्तिक ह्या व्रताच्या सत्यतेवर शंका करतात. अशा नास्तिक व या भूलोकी राहण्यास अपात्र अशा मंडळींसाठी आम्ही या व्रताच्या १२ दिवसांच्या १२ कथा प्रकाशित करण्याचे योजिले आहे. ह्या कथा म्हणजे भाकडकथा नसून ज्या भक्तांनी हे व्रत यशस्वीपणे व पूर्ण श्रद्धेने केले त्यांनी स्वामी संकेतांनंदाना प्रत्यक्ष येऊन सांगितलेले अनुभव होत.

    एका दिवसाला एक याप्रमाणे १२ दिवसांच्या व्रतकालावधीमधे ह्या कथांचे चित्रपट संपल्यावर देवाजींच्या पूर्णाकृती पोस्टरसमोर बसून आरतीअगोदर पठण करायचे आहे.उपस्थित इतर भाविकांनी श्रद्धापूर्वक श्रवण करावे.

     पुढील पानापासून आम्ही कथा प्रकाशित करु.

                          रजनीकांतजींच्या नावाने.....  MIND IT  अण्णा  !!!

    तमिळप्रान्तस्वामी, सहस्रसूर्यप्रकाशित, कोटिहस्तबलाभुषित,सर्वयुद्धकलाविषारद, धुम्रदन्डिकाधारी, कृष्णनयनावरणउच्छालिता, अभिनयसम्राट, मनोरंजनदाता, भाग्यविधाता,तरुणातितरुण, चिरतरुण, देवाधिदेव, चित्रपटदेव, रजनिकांतदेवजीकी...... जय !!!!

१२ रजनीचित्रपट व्रत-महात्म्य

                                               ॥ श्री रजनीकांताय नमः ॥
  
     अभिनेताशिरोमणी, प्रातःस्मरणीय श्री रजनीकांतदेवजींच्या स्वामी संकेतानंदरचित अद्भुत व शिघ्रफलदायी अशा "१२ रजनीचित्रपट व्रताचे" महात्म्य वर्णनातित आहे. तरीही भक्तांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही आमच्या अल्पमतीप्रमाणे या व्रताचे महात्म्य वर्णन करण्याचे धारिष्ट्य करित आहोत.
       भाविकांनी लक्षात घ्यावे की, येथे वर्णिलेले महात्म्य म्हणजे हिमनगाचे टोक होय. ह्या व्रताची यशस्वी सांगता केल्यावर तसेच ह्या व्रतकालावधीमध्येसुद्धा आपल्याला या दिव्य व्रताची अनुभूती येईलच. ती अनुभूती इथल्या वर्णनापेक्षा वेगळीसुद्धा असू शकते. तो देवाजींचा प्रसाद समजून ग्रहण करावा.
         आता आम्ही स्वामी संकेतानंद महाराज आणि इतर भक्तांच्या निदर्शनास आलेले " १२ रजनीचित्रपट व्रत " महात्म्य वर्णित आहोत. भाविकांनी श्रध्दापूर्वक तो श्रवण करावा.

 १.  ज्या कोणाचे कृष्णनयनावरण(पक्षी : काळा गॉगल) तर्जनीमध्ये फ़िरकी घेत नसेल किंवा मानेला झटला दिल्यास कपाळावर अथवा डोक्याच्या मागे जात नसेल त्यांनी हा व्रत केल्यास त्यांचे प्रयत्न सिद्धीस जातात.

  २.  ज्या कोणाला हाता-पायांची वारंवार अजागळ हालचाल करतांना "वख वख वख" असा सूर लावता येत नसेल त्यांनी हा व्रत केल्यास तत्काळ त्यांचे ईप्सित साध्य होते.( हेच परिमाण "गॉगलची फिरकी अथवा भिंगरी" ह्या देवाजींच्या दिव्य लीलेसदेखील लागू आहे.)

३.  ज्या कोणास विडी उंच उडवल्यास अलगद ओठात झेलता येत नसेल त्या भाविकांनी हे व्रत करावे.( विडी किंवा सिगारेट ओढणे स्वास्थ्यास अतिहानिकारक आहे, यास्तव ही क्रिया विडी/सिगारेट न पेटवता करावी तसेच विडी/सिगारेट ओठांत आल्यावरसुद्धा पेटवू नये अशी स्वामी संकेतानंदांची सक्त ताकीद आहे. ही क्रिया खास देवाजींसाठी राखीव असल्याची भक्तांनी नोंद घ्यावी.)

४.  जे कोणी " नाणे हवेत उडवल्यानंतर बरोबर पाकिटात( सदर्‍याच्या किंवा विजारीच्या ) न जाणे" ह्या आजाराने त्रस्त असतील अशांनी हा व्रत दरमास १२ दिनांकी सतत ३ महिने किंवा १२ मे (फ़क्त मे महिना)दिनांकी सुरू करावा. ह्या रोगापासून कायमस्वरूपी सुटका होते.

 ५.  ज्या कोणाला बंदुकीच्या धावत्या गोळीचे ब्लेड किंवा तत्सम धारदार वस्तूंद्वारे २ तुकडे करता येत नसतील त्यांनी हे व्रत १२ डिसेम्बर रोजी सुरू करणे. हे व्रत फक्त आणि फ़क्त संरक्षण क्षेत्राशी संबंधीत (पोलीस, सैन्य, इ.) प्रामाणिक व समाजकार्य करण्यास इच्छूक तरुणांनी करावयाचे आहे.अशा क्रियांसाठी हे व्रत विशेष परिणामकारक असल्याचा अनेक भाविकांचा अनुभव आहे.

६. ज्या  कोणाला वायुवेगाने धावायचे आहे, पायाने वादळ निर्माण करायचे आहे, १ किमी. रुंद दरीवरुन ऑटो उडवायचा आहे, एका बोटाने १० गुंडांना( "गुंड" शब्द विशेष, "निर्दोष" नाही.) हवेत उडवून धराशायी करायचे आहे, पंचलाईन मारायची आहे, अशा अनेक देवाजींच्या नित्य लीला असलेल्या क्रिया जमत नसल्यास हे व्रत करावे. भाविकांच्या सर्व इच्छा सफल होतात.

      असा हा भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा अत्यंत चमत्कारी व लाभदायक व्रत आहे.
      वर आम्ही ह्या व्रताचे अतिशय थोडक्यात महात्म्य वर्णिले आहे. भविकांनी इतरही लाभ प्राप्त केलेले असल्यास त्यांचा उल्लेख प्रस्तुत प्रकाशकाजवळ करावा. त्यांना या अनुदिनीवर प्रकाशित केले जाईल.

                   रजनीकांतजींच्या नावाने.....  MIND IT  अण्णा  !!!

      तमिळप्रान्तस्वामी, सहस्रसूर्यप्रकाशित, कोटिहस्तबलाभुषित,सर्वयुद्धकलाविषारद, धुम्रदन्डिकाधारी, कृष्णनयनावरणउच्छालिता, अभिनयसम्राट, मनोरंजनदाता, भाग्यविधाता,तरुणातितरुण, चिरतरुण, देवाधिदेव, चित्रपटदेव, रजनिकांतदेवजीकी...... जय !!!!

"१२ रजनीचित्रपट व्रत" - विधी

प्रस्तावना : - 
     "१२ रजनीचित्रपट व्रत" हे रजनीकांतदेवांचे परमभक्त स्वामी संकेतानंद महाराज ह्यांच्या अनेक वर्षांच्या दिव्य साधनेचे फळ होय. हे व्रत अतिशय सिद्ध व तत्काळ परिणाम दाखवणारे आहे.हे व्रत श्रद्धेने पूर्ण केल्यास रजनीकांतदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या काही लीला करण्याची क्षमता सामान्य माणसात अंगी येते.
       समस्त भूलोकीच्या मर्त्य मानवांना या व्रताचा लाभ व्हावा या उदात्त हेतूने ह्या व्रताची सम्पूर्ण विधी स्वामी संकेतानंद महाराज ह्यांनी प्रस्तुत अनुदिनीलेखकास सांगितलेली आहे. ह्या व्रताची अचूक व परिणामकारक विधी फ़क्त याच अनुदिनीवर असून भाविकांनी इतर खोट्या व्रत-अनुदिनींपासून सावध रहावे तसेच अनुदिनीस भेट देण्याआधी http://manmanjusha.blogspot.com या संकेतस्थळाची खात्री करुन घ्यावी. इतर अनुदिनींमधे सांगितलेली व्रत-विधी परिणामकारक नाही याची श्रद्धाळूंनी नोंद घ्यावी. तसेच हे व्रत कॉपीराइट केलेले असल्याने ह्या व्रताची नक्कल व चोरी करण्याचे पातक करु नये. रजनीकांतजी आपल्या गॉगलआडून सगळे बघत असल्याची चोरट्यांनी नोंद घ्यावी

              ---  प्रकाशक  
  
व्रतासाठी लागणारे साहित्य :- 
१ :- रजनीकांतजींच्या १२ चित्रपटांच्या DVDs किंवा VCDs (ह्यामधे शिवाजी-द बॉस ,बादशा, थलपती, भैरवी असल्यास व्रत अधिक परिणामकारक होतो असे आमच्या निदर्शनास आले आहे. तसेच त्यांनी आपल्या अवतारकार्याचा प्रारम्भ ज्या चित्रपटापासून केला तो म्हणजे "अबूर्व रागंगल " असणे बन्धनकारक आहे.) -- १२ DVDs किंवा VCDs प्रत्येकी
२ :- देवाजींचा पूर्णाकृती पोस्टर - १ किंवा अधिक
३ :- देवाजींचे विविध आकारांतील पोस्टर - यथाशक्ती
४ :- लाल, पिवळे रुमाल
५ :- काळा गॉगल
 ६ :- तंबाखू नसलेली सिगारेट किंवा विडी (भाविकांच्या स्वास्थ्यलाभाचा विचार केलेला आहे.. रजनीकांतजी तंबाखू असलेली विडी ओढू शकतात कारण ते देव आहेत, आपण नाही. अल्पवयीन व वृद्धांना या साहित्याविना व्रत करण्याची मुभा आहे.)
७ :- पंचामृत, पणती, उदबत्ती, धूप
८ :- दूरध्वनी संच, DVD चालक
व्रत करण्याची विधी :-       
         हे व्रत कोणालाही, कोणत्याही महिन्याच्या १२ तारखेस करता येते. मात्र हे व्रत १२व्या म्हणजेच डिसेम्बर महिन्याच्या १२व्या महिन्यास केल्यास विशेष लाभदायी ठरते असे स्वामी संकेतानंदांस व अनेक भाविकांच्या लक्षात आले आहे.( १२ डिसेम्बरला देवाजींचा वाढदिवस असतो हे भविकांना कळले असेलच.) काही कारणास्तव १२ डिसेम्बरला न जमल्यास १२ मेचे व्रतसुद्धा इतर महिन्यांच्या व्रतांपेक्षा अधिक परिणामकारक आहे.(१२ मे या दिवशी देवाजींचे परमभक्त स्वामी संकेतानंद हे देवाजींचा कृपाप्रसाद अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा यास्तव भूलोकी अवतरले होते.) तसेच हा व्रत १२ दिवसांत पूर्ण करावा. या व्रतादरम्यान इतर कोणत्याही सिनेता‍र्‍याचे चित्रपट बघू नयेत. अन्यथा व्रताचा परिणाम शून्य होईल.
         १२ तारखेला मनी येईल तेव्हा झोपून उठावे. केसांची स्टाईल मारावी. हातापायांची अजागळ हालचाल करावी. ही हालचाल करत असतांनाच मुखातून वख वख वख असा आवाज काढावा. दात घासण्याचा ब्रश उंच भिरकावून तोंडात अलगद झेलावा. मगच दात घासावेत. अंघोळ केली नाही तरी चालेल.
          गळ्याला लाल किंवा पिवळा रुमाल गुंडाळावा. डोळ्यांवर काळा गॉगल चढवावा.
      रजनीकांतजींच्या पूर्णाकृती पोस्टरची तसेच इतर सर्व पोस्टरांचे देवघरात प्रतिष्ठापना करावी. या सर्व पोस्टर्सना पंचामृताचा अभिषेक करावा.धूप, दीप, अगरबत्ती पेटवावी. "रजनीकांतजींच्या नावानं -- MIND IT अण्णा " ह्या घोषणेचा त्रिवार उद्घोष करावा.
            देवाजींच्या प्रथम अवतारकार्याची महती सांगणारा चित्रपट "अपूर्व रागंगल" हा सर्वप्रथम बघावा. चित्रपट सुरू होण्याआधी DVD ची पूजा करावी. दुरध्वनी संचासमोर अगरबती लावावी. "रजनीकांतजींच्या नावानं -- MIND IT अण्णा " ह्या घोषणेचा त्रिवार उद्घोष करावा. मग हा चित्रपट पूर्ण बघावा. अशाप्रकारे १२ दिवसांत १२ चित्रपट बघावेत. चित्रपट बघून झाल्यावर देवाजींनी केलेल्या लीलांची आपण उजळणी करावी. त्या लीला आपल्याला करता याव्यात याचा सराव करावा.मानेला झटके देउन डोळ्यांवरचा गॉगल डोक्यामागे नेणे,कपाळावर चढवणे, विडी जास्तीत जास्त उंच उडवून अलग ओठी झेलणे, अशा देवाजींच्या अगणित लीलांपैकी काहींचा रोज सराव करावा. 
             चित्रपट बघतांना देवाजींच्या प्रत्येक प्रवेशाला शिट्ट्या माराव्या, प्रत्येक गाण्यावर पाय थिरकवावेत, प्रत्येक पंचलाईनला टाळ्या वाजवून व शिट्ट्या मारून दाद द्यावी. अन्यथा रजनीकांतदेव प्रसन्न होणार नाहीत.
           भाविकांना सांगण्यात येते की "उजवा पाय जमिनीवर ठेवून डावा पाय झटक्यात वर उडवून किक मारणे " ही क्रिया साधा व पृष्ठभागी सैल असलेला पॅन्ट घालूनच करावी. जीन्स पॅन्ट घातल्यास पृष्ठभाग उघडा पडण्याचा धोका सम्भवतो.आपण मर्त्य मानव आहोत. आपली जीन्स पॅन्ट टरकते, फक्त देवाजींचीच टरकत नाही, म्हणून त्यांनी घातलेली चालते.. ते देव आहेत लक्षात ठेवा.
             चित्रपट संपल्यावर देवघरात जाऊन स्वामी संकेतानंदरचित रजनीकांतजींची आरती( मराठी अथवा हिंदी) भक्तिभावाने गावी."रजनीकांतजींच्या नावानं -- MIND IT अण्णा " ह्या घोषणेचा परत त्रिवार उद्घोष करावा.
            आवश्यक सूचना :- ह्या व्रतकालावधीदरम्यान भाविकांनी फ़क्त रजनीकांत पद्धतीनेच पंचलाईन मारत बोलावे. काही तमिळ संवादफेक जमल्यास अतिउत्तम.

व्रताची सांगता :-   
  १२ व्या दिवशी १२ नास्तिकांना बोलवावे. त्यांना देवाजींचा चित्रपट दाखवावा.
  १२ ही नास्तिकांना प्रत्येकी एक काळा गॉगल व लाल किंवा पिवळा रुमाल द्यावा.
  मग त्यांना देवाजींच्या १२ चित्रपटांच्या DVDS किंवा VCDs द्याव्यात.ह्या DVD किंवा VCD देतांना म्हणावे, 
     " ऊतु नको, मातू नको, दिलेली DVD/VCD टाकू नको. "
   प्रत्येकास मग या अनुदिनीचा संकेतस्थळ कानात गुरुमंत्र म्हणून फुंकावा.
    नैवेद्याला जे बनलेले असेल ते खाउन व्रताची सांगता करावी.(पुर्वी नैवेद्याला एक-एक विडी किंवा सिगारेट देऊन सांगता करण्यात यायची.मात्र हे स्वास्थ्यास हानिकारक असल्याने खुद्द देवाजींनी अशा प्रकारे व्रताचे पारणे फेडण्यास मनाई केली आहे. त्यांचा बहुसंख्येने असलेला गोरगरीब भक्तवर्ग (ज्याला काही नतद्रष्ट व्यक्ती "मासेस" म्हणून हिणवतात) लक्षात घेऊन देवाजीनी कोणत्याही खाद्याद्वारे पारणे फेडण्याची परवानगी दिली आहे.) 

     "१२ रजनीचित्रपट" व्रताचे महात्म्य व कथा पुढील भागात प्रकाशित करण्यात येतील. तोपर्यंत भाविकांनी देवाजींचे चित्रपट गोळा करावेत.
 
  

रजनीकांतची आरती - मराठी

प्रात:स्मरणीय आदरणीय रजनीकांतदेव तमिळप्रांतीय चित्रपट-उद्योगाद्वारे आपल्या लीला दाखवून मर्त्य मानवास धन्य जरी करत असले तरी ते मूळचे आपले मराठे माणूसच (हो हो.. शिवाजीराव गायकवाडच..), त्यांचा भक्तवर्ग हा मराठी मुलुखातदेखील असल्याची जाणीव या पामरास आहे, म्हणूनच आम्ही रजनीकांतदेवजींची आरती मराठीमध्ये लिहावयास घेतली.. रजनीकांतदेवजींच्या प्रेरणेनेच ही आरती लिहीली जात आहे..हा त्यांचाच कृपाप्रसाद.... गोड मानून घ्या..

 

आरती रजनीकांता,
महातेजस्वी संता,
रक्षिले भक्तगण,
असा तू अरिहंता
आरती रजनीकांता ॥१॥

सिगरेट भिरकावली,
ओठी अलगद झेलली,
गॉगल्सची केली भिंगरी,
दुष्टांची त्रेधा उडाली ॥२॥
आरती रजनीकांता...

सहस्त्र गुंड भारी,
एका बोटाने मारी,
यमाला मात दिली,
तू आमचा कैवारी ।३॥
आरती रजनीकांता...

सोकावले सिनेतारे,
चैतन्यमय तू उभा रे,
तरुणांचा आदर्श आणि,
पिडीतांचा अण्णा रे ॥४॥

आरती रजनीकांता...

चित्रपट तुझे बघावे,
दु:ख घरी ठेवावे,
तुझेच नाम ओठी,
ध्यानीमनी जपावे ॥५॥

आरती रजनीकांता...

सांगावी किती आता,
तुझी पराक्रम गाथा,
संकेत भक्त तुझा,
चरणी ठेवितो माथा ॥६॥
आरती रजनीकांता,
महातेजस्वी संता,
रक्षिले भक्तगण,
असा तू अरिहंता
आरती रजनीकांता...


रजनीकांतच्या नावाने.....  MIND IT  अण्णा  !!!

तमिळप्रान्तस्वामी, सहस्रसूर्यप्रकाशित, कोटिहस्तबलाभुषित,सर्वयुद्धकलाविषारद, धुम्रदन्डिकाधारी, कृष्णनयनावरणउच्छालिता, अभिनयसम्राट, मनोरंजनदाता, भाग्यविधाता,तरुणातितरुण, चिरतरुण, देवाधिदेव, चित्रपटदेव, रजनिकांतदेवजीकी...... जय !!!!

रजनीकांतची आरती - हिंदी

आकाशने रजनीकांतच्या आरतीची मागणी केली..निमित्त होते रजनीकांत बसवण्याचे.. जसे आपण गणपती बसवतो ना तसेच रजनीकांत बसवायचा.  आरती मराठीत लिहिणार होतो मात्र एका मैत्रिणीसोबत चाललेल्या chat दरम्यान तिला हि कल्पना सांगितली आणि तत्क्षणी  अगदी सहजपणे आरतीचे धृपद सुचले, ती हिंदी असल्याने आरतीपण हिंदीमध्येच लिहायला घेतली. तिला धृपद आवडले  आणि मग  मी आरती पूर्ण करायला बसलो.
 आकाशराव सुद्धा प्रकट झालेत आणि त्यांच्या प्रोत्साहनाने १-१ कडवे लिहित गेलो. अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण आरती तयार झाली.. आपण वाचून बघा आणि आपले मत कळवा.
आरती गाऊन झाल्यावर आपण जशी हाळी देतो ना उदा. "गणपती बाप्पा मोरया " तशी हाळी रजनीकांतच्या नावाने द्यायचे सुद्धा ठरले आणि लगेच एक हाळी सुचली.. ती हाळी अर्थातच आरतीनंतर .
मराठी आरतीसुद्धा लिहीली आहे.


जयदेव  जयदेव  जय  रजनीकांता |
गुंडों  का  तू  फोड़े  हैं  माथा .. जयदेव  जयदेव ||१ ||


दस  गुंडों  को  तुने  एक  ऊँगली  से  धो  डाला
गरीबो  की  ज्योति  और  जुल्मियो  की   ज्वाला
तेरे  जलवे  से  कोई  नहीं  बच  पाता ||२||
जयदेव  जयदेव.....
जयदेव  जयदेव जय  रजनीकांता..
जयदेव  जयदेव

तेरे  पैरोंमे   तूफानों  की  आहट..
तेरे  गोग्गल्स  में  स्टाइल  की  चाहत
लाचारों  का  तू  ही  जीवनदाता ||३||
जयदेव  जयदेव.....
जयदेव  जयदेव जय  रजनीकांता..
जयदेव  जयदेव

एक  गोलिमे  तुने  दो  गुन्ड़ोंको  मारा
तेरे  सामने  तो  यमराज  भी  हारा
तेरे  करिश्मे  और  कोई  न  कर  पाता ||४||
जयदेव  जयदेव.....
जयदेव  जयदेव जय  रजनीकांता..
जयदेव  जयदेव

सिगरेट  की  कांडी से  तुने  की  माया
५  फीट  उछालके  होंठोमे दबाया
सिगरेट  के  धुएं  से  हर  विलेन   मर  जाता ||५||
जयदेव  जयदेव....
जयदेव  जयदेव जय  रजनीकांता..
जयदेव  जयदेव

निशदिन   रजनीजी  मन  में  हैं  प्यारे ..
फ़िल्में  उनकी  हर  दुःख -दर्द  दूर  करें 
तन  रोमांचित  हो  जाता, मन  धुल  जाता ||६||
जयदेव  जयदेव.....
जयदेव  जयदेव जय  रजनीकांता..
जयदेव  जयदेव


जो  यह  करे  रजनीजी  की  पूजा
कहत  सकेतानंद  स्वामी ,
भजत  संकेतानंद  स्वामी
जीवन  धन्य  हो  जाता ...
जय जय जय रजनीकांता ||७||

जयदेव  जयदेव  जय  रजनीकांता
गुंडों  का  तू  फोड़े  हैं  माथा 
जयदेव  जयदेव ..

रजनीकांतच्या नावाने.....  MIND IT  अण्णा  !!!

तमिळप्रान्तस्वामी, सहस्रसूर्यप्रकाशित, कोटिहस्तबलाभुषित,सर्वयुद्धकलाविषारद, धुम्रदन्डिकाधारी, कृष्णनयनावरणउच्छालिता, अभिनयसम्राट, मनोरंजनदाता, भाग्यविधाता,तरुणातितरुण, चिरतरुण, देवाधिदेव, चित्रपटदेव, रजनिकांतदेवजीकी...... जय !!!!

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More