सार्वजनिक रजनीकांतोत्सव

          आज १२ डिसेंबर, ३०१०. भल्या पहाटे उठून रजनीदेवाजी आराधना करून सहज फेरफटका मारायला बाहेर पडलो. रजनीकांत चौकात आल्यावर एका मोठ्या फलकाने स्वागत केले, " अखिल वैश्विक MIND IT मित्र मंडळ तर्फे आयोजित सार्वजनिक रजनीकांतोत्सव आपल्या हजाराव्या वर्षात पदार्पण करत असल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे ." तो फलक वाचताक्षणीच " स्वामी  संकेतानंद कृत रजनीकांतायण" या प्राचीन महाकाव्याची "MIND IT मित्र मंडळ"  हा अध्याय डोळ्यासमोर तरळला. भावनावेग अनावर होऊन डोळयातून हर्षधारा वाहू लागल्या. शरीर रोमांचित झाले. रजनीकॄपेने आजही "MIND IT मित्र मंडळ" त्याच पद्धतीने सार्वजनिक रजनीकांतोत्सव साजरा करत आहे.एवढेच नव्हे तर हा उत्सव आता संपूर्ण विश्वात सर्व जाती-धर्म-पंथाचे लोक साजरा करतात. या सणाने जगभरातील भेदभाव कामयचा नष्ट केलाय.
         आता घरी आल्यावर माझ्या संग्रहात असलेले "सार्वजनिक रजनीकांतोत्सव" ची प्रथम घोषणा करणारे ऎतिहासिक पत्रक वाचायला काढले. हजार वर्षं जुने असलेले हे पत्रक आपल्या दर्शनासाठी प्रकाशित करतोय.
                      
                                                      "जाहीर सुचना "
अखिल विश्वात विखुरलेल्या भविकांना एकत्रित आणण्यासाठी व रजनीदेवांच्या भक्तीत न्हाऊन जाण्यासाठी आम्ही १२ डिसेम्बर रोजी १२ दिवसांचा "सार्वजनिक रजनीकांतोत्सव " साजरा करण्याचे ठरवले आहे. या शुभ कार्याकरता स्वामी संकेतानंदांच्या अध्यक्षतेखाली "MIND IT मित्र मंडळ" स्थापण्यात आले आहे. या उत्सवाची अधिक माहिती खालीलप्रमाणे (ही माहिती ’सार्वजनिक रजनीकांतोत्सव’ साजरा करू इच्छिणार्‍या इतर भाविक मंडळांना "मार्गदर्शिका"(guidelines) म्हणूनही वापरता येईल. :-
१ :-  देवाजींचा पोस्टर hot air balloon मधे उडवून वाजतगाजत आणला जाईल.
२ :- मिरवणूकीमधे आणि उत्सवादम्यान फक्त देवाजींचीच गाणी वाजवण्यात येतील.
३ :- देवाजींचे पोस्टर जर ’देशाच्या भावी उज्ज्वल भविष्याने’ स्वहस्ते बनवल्यास उत्तमच. याद्वारे चिमुरड्या रजनीभक्तांना हस्तकलेचे प्रशिक्षण मिळेल, सोबतच देवाजींचे पोस्टर बनवण्याचे पुण्य पदरी पडेल.
४ :- पोस्टर हे कागदीच असावेत, flex चे नाही.  मूर्ती तयार केल्यास ती मातीचीच आणि नैसर्गिक रंगांचीच असावी.(याद्वारे पर्यावरणाचे रक्षण करण्याचा हेतू आहे.)
५ :- उत्सवादरम्यान मंडळाच्या सदस्यांनी घालायचे सोवळे, तसेच नैवेद्य, प्रसाद तत्सम बाबींसाठी देवाजींचे परमभक्त आकाशबुवा यांचा परामर्श घ्यावा.
६ :- जे भाविक कार्यबाहुल्यामुळे व इतर सांसारिक जबाबदार्‍यांमुळे १२ दिवसांचा रजनीकांत बसवू शकत नसतील ते २,४,६,८,१० असा सम संख्येतल्या दिवसांचा रजनीकांत बसवू शकतात.
७ :- विसर्जन करू नये. पोस्टर अथवा मूर्ती इतरांना देऊन रजनीभक्तीचा प्रसार करावा.
८ :- हलते-उडते देखावे फक्त देवाजींची महती सांगणारेच असावेत.
९ :- हा उत्सव online सुद्धा साजरा करता येईल.
१० :- Online साजरा करायचे असल्यास wallpaper, screen saver रजनीदेवांचा असावा, browser चा homepage देवांजींचे संकेतस्थळ असावे. नैवेद्य वगैरेंचे scripts बनवावेत. रजनीदेवांच्याच आरत्या व भक्तीगीते वाजवावी. torrents वर देवाजींचे अवतारकार्य वर्णन करणार्‍या चित्रपटांच्या dvd upload कराव्यात.

   अजूनही काही सूचना असतील तर त्यांचे स्वागत केले जाईल.

                                        सदस्यनोंदणीसाठी आवाहन :
"MIND IT मित्र मंडळाचे" सदस्य होण्याचे स्वामी संकेतानंदांच्या सर्व शिष्य़ांना आवाहन करण्यात येत आहे. इच्छुकांनी प्रतिक्रिया चौकटीत आपल्या नावाची नोंद करावी. त्याखाली रजनीदेवाचा जयघोष करावा.

टीप : - अखिल विश्वात पसरलेला शिष्यगण मंडळाचा सदस्य होऊ शकतो.

                                                                  ---  आदेशान्वये :-
                                                                               सचिव( MIND IT मित्र मंडळ)

                   रजनीकांतजींच्या नावाने.....  MIND IT  अण्णा  !!!

      तमिळप्रान्तस्वामी, सहस्रसूर्यप्रकाशित, कोटिहस्तबलाभुषित,सर्वयुद्धकलाविषारद, धुम्रदन्डिकाधारी, कृष्णनयनावरणउच्छालिता, अभिनयसम्राट, मनोरंजनदाता, भाग्यविधाता,तरुणातितरुण, चिरतरुण, देवाधिदेव, चित्रपटदेव, रजनिकांतदेवजीकी...... जय !!!!


     
      हा ऎतिहासिक दस्तावेज जपण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर आहे याचे मला नेहमीच भान राहील. अरे हो, मी माझी ओळख करून द्यायला विसरलोच. मी "रजनीकांत संग्रहालयाचा " निर्देशक( director) आहे. माझे नाव सौरभकुमार आकाशराव रजनीमार्गी आहे .(सध्याच्या काळात जो तो आपल्या मुलांचे नाव रजनीकांत, सौरभ, आकाश आणि संकेत ठेवत असतो.). असो, आता मला स्वामी संकेतानंद व्याख्यानमालेत "देवाजींचे परमभक्त आकाशबुवा आणि त्यांचे जीवितकार्य "  या विषयावर व्याख्यान द्यायला जायचे आहे. पुन्हा भेटूच.

४ टिप्पण्या:

 1. Comrade, waah waah!! tum jiyo hazaro saal!!
  (ho rajani bhakta ek-mekanna COMRADE mhantat)

  उत्तर द्याहटवा
 2. रजनि रजनि (प्रोफेसरांच्या सुचनेनुसार जसं राम राम म्हणुन अभिवादन केलं जातं तसं)
  हजारो वर्षांनंतरदेखिल रजनिमहोत्सव भाविकपणे साजरा होतो कारण रजनिधर्म सर्वसमावेशक आहे. जगतातील अखिल मनुष्य जमातीस एकीने बांधण्यात केवळ रजनिधर्म पुर्ण यशस्वी झाला आहे. ह्याच्या कोणत्याही प्रजाती नाहित. धन्य तो रजनि धन्य त्याचे भक्तगण....

  बोला सकलजन एकमुखे नीट
  रजनिदेवांच्या नावानं MINDD ITT...

  उत्तर द्याहटवा
 3. मलाही व्हायचं आहे Mind It मित्र मंडळाचा सदस्य. कृपया माझंही नाव दाखल करा यादीत.

  रजनीकांतजींच्या नावाने MIND IT अण्णा!!

  उत्तर द्याहटवा
 4. व्वा व्वा संकेत come come, welcome !!!!! "अखिल वैश्विक MIND IT मित्र मंडळात" तुझे हार्दिक स्वागत आहे !!!

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More