१२ रजनीचित्रपट व्रत-महात्म्य

                                               ॥ श्री रजनीकांताय नमः ॥
  
     अभिनेताशिरोमणी, प्रातःस्मरणीय श्री रजनीकांतदेवजींच्या स्वामी संकेतानंदरचित अद्भुत व शिघ्रफलदायी अशा "१२ रजनीचित्रपट व्रताचे" महात्म्य वर्णनातित आहे. तरीही भक्तांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही आमच्या अल्पमतीप्रमाणे या व्रताचे महात्म्य वर्णन करण्याचे धारिष्ट्य करित आहोत.
       भाविकांनी लक्षात घ्यावे की, येथे वर्णिलेले महात्म्य म्हणजे हिमनगाचे टोक होय. ह्या व्रताची यशस्वी सांगता केल्यावर तसेच ह्या व्रतकालावधीमध्येसुद्धा आपल्याला या दिव्य व्रताची अनुभूती येईलच. ती अनुभूती इथल्या वर्णनापेक्षा वेगळीसुद्धा असू शकते. तो देवाजींचा प्रसाद समजून ग्रहण करावा.
         आता आम्ही स्वामी संकेतानंद महाराज आणि इतर भक्तांच्या निदर्शनास आलेले " १२ रजनीचित्रपट व्रत " महात्म्य वर्णित आहोत. भाविकांनी श्रध्दापूर्वक तो श्रवण करावा.

 १.  ज्या कोणाचे कृष्णनयनावरण(पक्षी : काळा गॉगल) तर्जनीमध्ये फ़िरकी घेत नसेल किंवा मानेला झटला दिल्यास कपाळावर अथवा डोक्याच्या मागे जात नसेल त्यांनी हा व्रत केल्यास त्यांचे प्रयत्न सिद्धीस जातात.

  २.  ज्या कोणाला हाता-पायांची वारंवार अजागळ हालचाल करतांना "वख वख वख" असा सूर लावता येत नसेल त्यांनी हा व्रत केल्यास तत्काळ त्यांचे ईप्सित साध्य होते.( हेच परिमाण "गॉगलची फिरकी अथवा भिंगरी" ह्या देवाजींच्या दिव्य लीलेसदेखील लागू आहे.)

३.  ज्या कोणास विडी उंच उडवल्यास अलगद ओठात झेलता येत नसेल त्या भाविकांनी हे व्रत करावे.( विडी किंवा सिगारेट ओढणे स्वास्थ्यास अतिहानिकारक आहे, यास्तव ही क्रिया विडी/सिगारेट न पेटवता करावी तसेच विडी/सिगारेट ओठांत आल्यावरसुद्धा पेटवू नये अशी स्वामी संकेतानंदांची सक्त ताकीद आहे. ही क्रिया खास देवाजींसाठी राखीव असल्याची भक्तांनी नोंद घ्यावी.)

४.  जे कोणी " नाणे हवेत उडवल्यानंतर बरोबर पाकिटात( सदर्‍याच्या किंवा विजारीच्या ) न जाणे" ह्या आजाराने त्रस्त असतील अशांनी हा व्रत दरमास १२ दिनांकी सतत ३ महिने किंवा १२ मे (फ़क्त मे महिना)दिनांकी सुरू करावा. ह्या रोगापासून कायमस्वरूपी सुटका होते.

 ५.  ज्या कोणाला बंदुकीच्या धावत्या गोळीचे ब्लेड किंवा तत्सम धारदार वस्तूंद्वारे २ तुकडे करता येत नसतील त्यांनी हे व्रत १२ डिसेम्बर रोजी सुरू करणे. हे व्रत फक्त आणि फ़क्त संरक्षण क्षेत्राशी संबंधीत (पोलीस, सैन्य, इ.) प्रामाणिक व समाजकार्य करण्यास इच्छूक तरुणांनी करावयाचे आहे.अशा क्रियांसाठी हे व्रत विशेष परिणामकारक असल्याचा अनेक भाविकांचा अनुभव आहे.

६. ज्या  कोणाला वायुवेगाने धावायचे आहे, पायाने वादळ निर्माण करायचे आहे, १ किमी. रुंद दरीवरुन ऑटो उडवायचा आहे, एका बोटाने १० गुंडांना( "गुंड" शब्द विशेष, "निर्दोष" नाही.) हवेत उडवून धराशायी करायचे आहे, पंचलाईन मारायची आहे, अशा अनेक देवाजींच्या नित्य लीला असलेल्या क्रिया जमत नसल्यास हे व्रत करावे. भाविकांच्या सर्व इच्छा सफल होतात.

      असा हा भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा अत्यंत चमत्कारी व लाभदायक व्रत आहे.
      वर आम्ही ह्या व्रताचे अतिशय थोडक्यात महात्म्य वर्णिले आहे. भविकांनी इतरही लाभ प्राप्त केलेले असल्यास त्यांचा उल्लेख प्रस्तुत प्रकाशकाजवळ करावा. त्यांना या अनुदिनीवर प्रकाशित केले जाईल.

                   रजनीकांतजींच्या नावाने.....  MIND IT  अण्णा  !!!

      तमिळप्रान्तस्वामी, सहस्रसूर्यप्रकाशित, कोटिहस्तबलाभुषित,सर्वयुद्धकलाविषारद, धुम्रदन्डिकाधारी, कृष्णनयनावरणउच्छालिता, अभिनयसम्राट, मनोरंजनदाता, भाग्यविधाता,तरुणातितरुण, चिरतरुण, देवाधिदेव, चित्रपटदेव, रजनिकांतदेवजीकी...... जय !!!!

२ टिप्पण्या:

  1. एक भक्त वाढला बुवा रजनीदेवाचा. म्हणजे तसा मी मिथुनचा भक्त आहे, पण हिंदुधर्मात सांगितल्याप्रमाणे ‘सर्वदेवनमस्काराः केशवं प्रतिगच्छति।’ तेव्हा मिथुनजींना नमस्कार केला काय किंवा रजनीदेवाला केला काय, फळ हे चांगलंच मिळणार. :-)

    उत्तर द्याहटवा
  2. बरोब्बर संकेत ! मी रजनीभक्त आहे पण प्रभुजींनापण follow करतो !!!

    उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More