"१२ रजनीचित्रपट व्रत" - विधी

प्रस्तावना : - 
     "१२ रजनीचित्रपट व्रत" हे रजनीकांतदेवांचे परमभक्त स्वामी संकेतानंद महाराज ह्यांच्या अनेक वर्षांच्या दिव्य साधनेचे फळ होय. हे व्रत अतिशय सिद्ध व तत्काळ परिणाम दाखवणारे आहे.हे व्रत श्रद्धेने पूर्ण केल्यास रजनीकांतदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या काही लीला करण्याची क्षमता सामान्य माणसात अंगी येते.
       समस्त भूलोकीच्या मर्त्य मानवांना या व्रताचा लाभ व्हावा या उदात्त हेतूने ह्या व्रताची सम्पूर्ण विधी स्वामी संकेतानंद महाराज ह्यांनी प्रस्तुत अनुदिनीलेखकास सांगितलेली आहे. ह्या व्रताची अचूक व परिणामकारक विधी फ़क्त याच अनुदिनीवर असून भाविकांनी इतर खोट्या व्रत-अनुदिनींपासून सावध रहावे तसेच अनुदिनीस भेट देण्याआधी http://manmanjusha.blogspot.com या संकेतस्थळाची खात्री करुन घ्यावी. इतर अनुदिनींमधे सांगितलेली व्रत-विधी परिणामकारक नाही याची श्रद्धाळूंनी नोंद घ्यावी. तसेच हे व्रत कॉपीराइट केलेले असल्याने ह्या व्रताची नक्कल व चोरी करण्याचे पातक करु नये. रजनीकांतजी आपल्या गॉगलआडून सगळे बघत असल्याची चोरट्यांनी नोंद घ्यावी

              ---  प्रकाशक  
  
व्रतासाठी लागणारे साहित्य :- 
१ :- रजनीकांतजींच्या १२ चित्रपटांच्या DVDs किंवा VCDs (ह्यामधे शिवाजी-द बॉस ,बादशा, थलपती, भैरवी असल्यास व्रत अधिक परिणामकारक होतो असे आमच्या निदर्शनास आले आहे. तसेच त्यांनी आपल्या अवतारकार्याचा प्रारम्भ ज्या चित्रपटापासून केला तो म्हणजे "अबूर्व रागंगल " असणे बन्धनकारक आहे.) -- १२ DVDs किंवा VCDs प्रत्येकी
२ :- देवाजींचा पूर्णाकृती पोस्टर - १ किंवा अधिक
३ :- देवाजींचे विविध आकारांतील पोस्टर - यथाशक्ती
४ :- लाल, पिवळे रुमाल
५ :- काळा गॉगल
 ६ :- तंबाखू नसलेली सिगारेट किंवा विडी (भाविकांच्या स्वास्थ्यलाभाचा विचार केलेला आहे.. रजनीकांतजी तंबाखू असलेली विडी ओढू शकतात कारण ते देव आहेत, आपण नाही. अल्पवयीन व वृद्धांना या साहित्याविना व्रत करण्याची मुभा आहे.)
७ :- पंचामृत, पणती, उदबत्ती, धूप
८ :- दूरध्वनी संच, DVD चालक
व्रत करण्याची विधी :-       
         हे व्रत कोणालाही, कोणत्याही महिन्याच्या १२ तारखेस करता येते. मात्र हे व्रत १२व्या म्हणजेच डिसेम्बर महिन्याच्या १२व्या महिन्यास केल्यास विशेष लाभदायी ठरते असे स्वामी संकेतानंदांस व अनेक भाविकांच्या लक्षात आले आहे.( १२ डिसेम्बरला देवाजींचा वाढदिवस असतो हे भविकांना कळले असेलच.) काही कारणास्तव १२ डिसेम्बरला न जमल्यास १२ मेचे व्रतसुद्धा इतर महिन्यांच्या व्रतांपेक्षा अधिक परिणामकारक आहे.(१२ मे या दिवशी देवाजींचे परमभक्त स्वामी संकेतानंद हे देवाजींचा कृपाप्रसाद अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा यास्तव भूलोकी अवतरले होते.) तसेच हा व्रत १२ दिवसांत पूर्ण करावा. या व्रतादरम्यान इतर कोणत्याही सिनेता‍र्‍याचे चित्रपट बघू नयेत. अन्यथा व्रताचा परिणाम शून्य होईल.
         १२ तारखेला मनी येईल तेव्हा झोपून उठावे. केसांची स्टाईल मारावी. हातापायांची अजागळ हालचाल करावी. ही हालचाल करत असतांनाच मुखातून वख वख वख असा आवाज काढावा. दात घासण्याचा ब्रश उंच भिरकावून तोंडात अलगद झेलावा. मगच दात घासावेत. अंघोळ केली नाही तरी चालेल.
          गळ्याला लाल किंवा पिवळा रुमाल गुंडाळावा. डोळ्यांवर काळा गॉगल चढवावा.
      रजनीकांतजींच्या पूर्णाकृती पोस्टरची तसेच इतर सर्व पोस्टरांचे देवघरात प्रतिष्ठापना करावी. या सर्व पोस्टर्सना पंचामृताचा अभिषेक करावा.धूप, दीप, अगरबत्ती पेटवावी. "रजनीकांतजींच्या नावानं -- MIND IT अण्णा " ह्या घोषणेचा त्रिवार उद्घोष करावा.
            देवाजींच्या प्रथम अवतारकार्याची महती सांगणारा चित्रपट "अपूर्व रागंगल" हा सर्वप्रथम बघावा. चित्रपट सुरू होण्याआधी DVD ची पूजा करावी. दुरध्वनी संचासमोर अगरबती लावावी. "रजनीकांतजींच्या नावानं -- MIND IT अण्णा " ह्या घोषणेचा त्रिवार उद्घोष करावा. मग हा चित्रपट पूर्ण बघावा. अशाप्रकारे १२ दिवसांत १२ चित्रपट बघावेत. चित्रपट बघून झाल्यावर देवाजींनी केलेल्या लीलांची आपण उजळणी करावी. त्या लीला आपल्याला करता याव्यात याचा सराव करावा.मानेला झटके देउन डोळ्यांवरचा गॉगल डोक्यामागे नेणे,कपाळावर चढवणे, विडी जास्तीत जास्त उंच उडवून अलग ओठी झेलणे, अशा देवाजींच्या अगणित लीलांपैकी काहींचा रोज सराव करावा. 
             चित्रपट बघतांना देवाजींच्या प्रत्येक प्रवेशाला शिट्ट्या माराव्या, प्रत्येक गाण्यावर पाय थिरकवावेत, प्रत्येक पंचलाईनला टाळ्या वाजवून व शिट्ट्या मारून दाद द्यावी. अन्यथा रजनीकांतदेव प्रसन्न होणार नाहीत.
           भाविकांना सांगण्यात येते की "उजवा पाय जमिनीवर ठेवून डावा पाय झटक्यात वर उडवून किक मारणे " ही क्रिया साधा व पृष्ठभागी सैल असलेला पॅन्ट घालूनच करावी. जीन्स पॅन्ट घातल्यास पृष्ठभाग उघडा पडण्याचा धोका सम्भवतो.आपण मर्त्य मानव आहोत. आपली जीन्स पॅन्ट टरकते, फक्त देवाजींचीच टरकत नाही, म्हणून त्यांनी घातलेली चालते.. ते देव आहेत लक्षात ठेवा.
             चित्रपट संपल्यावर देवघरात जाऊन स्वामी संकेतानंदरचित रजनीकांतजींची आरती( मराठी अथवा हिंदी) भक्तिभावाने गावी."रजनीकांतजींच्या नावानं -- MIND IT अण्णा " ह्या घोषणेचा परत त्रिवार उद्घोष करावा.
            आवश्यक सूचना :- ह्या व्रतकालावधीदरम्यान भाविकांनी फ़क्त रजनीकांत पद्धतीनेच पंचलाईन मारत बोलावे. काही तमिळ संवादफेक जमल्यास अतिउत्तम.

व्रताची सांगता :-   
  १२ व्या दिवशी १२ नास्तिकांना बोलवावे. त्यांना देवाजींचा चित्रपट दाखवावा.
  १२ ही नास्तिकांना प्रत्येकी एक काळा गॉगल व लाल किंवा पिवळा रुमाल द्यावा.
  मग त्यांना देवाजींच्या १२ चित्रपटांच्या DVDS किंवा VCDs द्याव्यात.ह्या DVD किंवा VCD देतांना म्हणावे, 
     " ऊतु नको, मातू नको, दिलेली DVD/VCD टाकू नको. "
   प्रत्येकास मग या अनुदिनीचा संकेतस्थळ कानात गुरुमंत्र म्हणून फुंकावा.
    नैवेद्याला जे बनलेले असेल ते खाउन व्रताची सांगता करावी.(पुर्वी नैवेद्याला एक-एक विडी किंवा सिगारेट देऊन सांगता करण्यात यायची.मात्र हे स्वास्थ्यास हानिकारक असल्याने खुद्द देवाजींनी अशा प्रकारे व्रताचे पारणे फेडण्यास मनाई केली आहे. त्यांचा बहुसंख्येने असलेला गोरगरीब भक्तवर्ग (ज्याला काही नतद्रष्ट व्यक्ती "मासेस" म्हणून हिणवतात) लक्षात घेऊन देवाजीनी कोणत्याही खाद्याद्वारे पारणे फेडण्याची परवानगी दिली आहे.) 

     "१२ रजनीचित्रपट" व्रताचे महात्म्य व कथा पुढील भागात प्रकाशित करण्यात येतील. तोपर्यंत भाविकांनी देवाजींचे चित्रपट गोळा करावेत.
 
  

२२ टिप्पण्या:

 1. मस्तच. खूप दिवसांनी चांगला लेख वाचला.
  "१२ व्या दिवशी १२ नास्तिकांना बोलवावे. प्रत्येकी एक काळा गॉगल व लाल किंवा पिवळा रुमाल द्यावा."

  जबरी एकदम.

  उत्तर द्याहटवा
 2. जब्बरदस्त !!!

  "रजनीकांतजींच्या नावानं -- MIND IT अण्णा " :D

  उत्तर द्याहटवा
 3. जबरा आहे!
  आम्ही मिथुनी आहोत...
  प्रभुजींच्या कृपेने गुंडादिवस साजरा करतो!
  पण आपल्या दोन्ही धर्मांचा एक सबसेट कॉमन आहे! :P
  जय प्रभुजी!

  उत्तर द्याहटवा
 4. खुपच भन्नाट...
  "रजनीकांतजींच्या नावानं -- MIND IT अण्णा "
  "रजनीकांतजींच्या नावानं -- MIND IT अण्णा "
  "रजनीकांतजींच्या नावानं -- MIND IT अण्णा "

  उत्तर द्याहटवा
 5. वाह देवेंद्रमुळे हा ब्लॉग वाचनात आला..अप्रतिम लिहलय
  शुभेच्छा

  उत्तर द्याहटवा
 6. अरे ग्यांग मधी आजुन एक अधिक झाला....तो मिथुनी बाबा व्हता आता रजनी संकु आला... :) :)

  पोस्ट मस्त झाली आहे.

  उत्तर द्याहटवा
 7. रजनीकांतजींच्या नावानं -- MIND IT अण्णा

  उत्तर द्याहटवा
 8. एकदम भारी लेख !
  विद्याधर प्रमाणेच मीसुद्धा प्रभूजींचा निस्सीम भक्त आहे. पण तुमच्या या देवाला माझा पूर्ण पाठींबा आहे.

  उत्तर द्याहटवा
 9. @ the prophet: आपल्याच कृपेने "गुंडा" या प्रभूजींच्या अवतारकार्याची ओळख झाली. मी वाचतो आपले लेख. मस्त लिहीता.
  ब्ल~ऒगवर स्वागत आहे आपले.

  उत्तर द्याहटवा
 10. @अभिजीतदा: आमच्या देवाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्स...

  उत्तर द्याहटवा
 11. @ दवबिंदू : वाः अगदी त्रिवार घोष केलात.

  उत्तर द्याहटवा
 12. @ सुहासदा : धन्स रे दा.. तुझ्या ब्लॉगचा मी नियमीत वाचक आहे.

  उत्तर द्याहटवा
 13. @ मनमौजी : गॅंग कदाचित मोठी होत जाणार आहे. इतरही भक्तगण कदाचित आपल्या देवांबद्दल लिहितील.

  उत्तर द्याहटवा
 14. मस्तच रे एकदम. आपण कसे, मिठाई विकत घेण्याआधी ती खाऊन बघतो. तसं फॉलोवर क्लिक करण्याआधी मी तुझ्या एक-दोन पोस्ट्स वाचून बघितल्या. आता फॉलोवर क्लिक करायला हरकत नाही. झ्याकच आहेत तुझे लेख. :-)

  उत्तर द्याहटवा
 15. धन्स रे संकेत !!! माझी मिठाई आवडली त्याबद्दल !!!

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More