तो राजा आमच्याच जातीचा......

        जुनी गोष्ट आहे. शेकडो वर्षं जुनी. भारतवर्षात एक राजा होता. राजा पराक्रमी होता, कलेचा भोक्ता होता, रसिक होता, त्याच्या दरबारी कलाकारांना, साहित्यिकांना मानाचे स्थान होते. राजा स्वतः एक साहित्यिक होता, प्रकांडपंडित, विद्वान होता.आपल्या पराक्रमाने त्याने आपल्या राज्याचा विस्तार केला.सुख-समृद्धीचे राज्य आणले. त्याच्या राज्यात भरभराट होती,प्रजा सुखी होती.
        वर्षामागुन वर्षं गेलीत. राजा आता दंतकथेचा, लोकसाहित्याचा विषय झाला होता.त्याच्या पराक्रमाचे पोवाडे गायले जाऊ लागले. त्याची महानता अधोरेखित करणार्‍या म्हणी निघाल्या.त्याच्या काळातल्या वास्तूंना तिर्थक्षेत्राचे स्थान मिळाले
        राजा जाऊन शेकडो वर्ष झाली. आता विसावे शतक लागले होते."जात नाही ती जात" चा प्रत्यय येत होता. जाती तिथेच होत्या.महापुरुषांना जातीच्या दावणीला बांधण्याची नवी टूम निघाली. राजा कसा वाचणार! राजा ज्या जातीचा होता त्या जातीने राजावर आपला दावा केला. त्याच्या नावाने त्या जातीने संघटना उभारल्या. सम्मेलने भरू लागली.त्याचा जयंती सोहळा साजरा होऊ लागला. त्याच्या कार्याची महती जात-बांधवांना व्हावी म्हणून त्याची चरित्रगाथा प्रकाशित झाली. आपल्या जातबांधवांना राजाच्या नावासमोर "जय" लावून अभिवादन करण्याची पद्धत बाळसे धरू लागली. त्या जातीसंघटनेच्या दिनदर्शिकेवर त्याला स्थान मिळाले. थोडक्यात त्या राजाला जातीला बांधण्याचे सर्व कार्यक्रम पार पाडण्यात आले.
           काय म्हणालात ? कथा ओळखीची आहे? राजाचे नाव छत्रपती शिवाजीराजे भोसले आहे आणि जातीचे नाव मराठा आहे असा जर आपला अंदाज असेल तर तुम्ही साफ चुकलात. ही कथा आहे एका वेगळ्याच प्रदेशातली.
          मग या कथेत वेगळे काय? फक्त पात्रं बदललीत काय? नाही, कथेचा उत्तरार्ध वेगळा आहे. कथानक पुर्वार्धापर्यंतच सिमीत राहिले असते तर कही विशेष घडले असे मी माने नसते. महापुरुषांना जातीपुरते मर्यादित करायची फॅशनच आहे सध्या. आपल्या जातीत झालेल्या महापुरुषांची यादी दाखवून "आमची जात तुमच्या जातीपेक्षा श्रेष्ठ कशी" हे सांगण्याची चढाओढ आहे सध्या. असो, आता कथेचा उत्तरार्ध वाचा. ही खरी घटना आहे, गंभीर आणि मजेदारही. जातीवाद कुठल्या वळणावर जाऊ शकतो हे सांगणारी.
         मागे सुट्ट्यांमधे घरी गेलो असता आई आणि माझ्यात झालेला संवाद खालीलप्रमाणे.
(आपल्या सोयीसाठी - पहिली जात -जा१, दुसरी जात -जा२, ’तो’ राजा - राजा )

आई :- काय रे, राजा जा१ च होता का?

मी :- हो, त्याची जात जा१ च होती. प्रश्न विचारण्याचे कारण?

आई :- अरे, जा२ चे काही लोक म्हणताहेत की, तो राजा त्यांच्या जातीचा होता. तो त्यांचा राजा होता. जा१ ने त्याला hijack केले.खरे काय आहे ?

मी :- अगं आई, सगळ्या ऎतिहासिक पुराव्यानुसार राजाची जात जा१ च होती. हे १००% खरे आहे.पण  आता जा२ जर त्या राजावर दावा करतेय तर त्या मागे काही कारण असेलच. त्या नावाचे इतिहासात ३-४ राजे होऊन गेले, वेगवेगळ्या जातींचे-वंशांचे.त्याच नावाचा अजून एक राजा बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे, पण वेगळ्या वंशाचा आणि कालखंडाचा. असे होऊ शकते की जा२ मधे पण या नावाचा एखादा राजा झाला असेल. पण गैरसमजातून त्यांनी जा१च्या राजाला जा२चा राजा समजला असेल.असे असेल तर लवकरच त्यांच्या लक्षात त्यांची चूक येइल.
    दुसरे कारणसुद्धा असू शकते. या राजाचे राज्य खूप मोठे होते. जा१, जा२ दोघेही त्याचीच प्रजा होती. राजा अतिशय लोकप्रिय होता. तो रयतेचा राजा होता. त्यामुळे सगळ्या जातीच्या लोकांना तो आपलाच वाटायचा. असे असू शकते की "आम्ही त्या राजाची कधी काळी प्रजा राहिलेलो आहोत, म्हणून तो आमचा राजा", अशा अर्थाने जा२ ची मंडळी बोलत असतील. पण महापुरुषांना विशिष्ट जातीला बांधण्याची प्रथा लक्षात घेता याची शक्यता दुर्मिळच वाटते.

आई :- जा२ चे म्हणत आहेत की राजा त्यांच्या जातीत जन्माला आला होता; जा१ चे लोक त्याला hijack करून ’राजा आमचा’म्हणत उदो उदो करत आहेत. तो ’ आमचासुद्धा ’ राजा होता असे म्हणत नाहीत ते.

मी :-  इथेच तर  चुकतंय. जर राजाने राज्य चालवतांना "हा माझ्या जातीचा , याला वेगळा न्याय; त्याची जात दुसरी, त्याच्यासाठी वेगळा कायदा" असे म्हणत राज्य केले नाही; सगळ्या प्रजेची त्याने सारखीच काळजी घेतली तर मग आता कशाला "तो रयतेचा राजा होता" हे स्विकारायच्या ऎवजी "तो जा१ चा होता की जा२ चा" यावर  भांडायचे? आमचे पूर्वज त्याची प्रजा राहिली आहेत याचा अभिमान ठेवावा, तो राजा आमच्या जातीचा नाही म्हणून जा२ ने हिरमुसायचे नाही की त्यांनी राजा जा२ चाच कसा यावर भांडत इतिहासातली कुजलेली प्रेते उकरू नयेत. जा१ ने सुद्धा राजा जा१ मधे जन्मला म्हणून त्याच्यावर पहिला हक्क आमचाच असे म्हणू नये, दुसर्‍या जातीने राजाच्या नावाचा, चित्राचा उपयोग त्यांच्या कार्यक्रमात कसा केला म्हणून जाब विचारू नये.
        पण असे होणार नाही. जा१ व जा२ चे कट्टरपंथी लढतच राहतील. राजा जा१ मधे जरी जन्मला तरी तो "जा१चा राजा" म्हणणे चूक ठरेल, राजा सगळ्यांचाच होता.

आई :- बरोबर आहे. राजा गेला, त्याचा काळही गेला.आता भांडण लावून दोन जातींमधे विषच तेवढे पेरले जाणार.

मी :- महापुरुषांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आपणसुद्धा आपल्या देशासाठी काहीतरी भरीव काम करावे असा विचार ही मंडळी करणार नाहीत.त्यांना आपापल्या जातीत ओढण्यात सगळी शक्ती घालवतील. जर जा२ ने नेमक्या त्याच राजावर दावा केला असेल तो जा१ चा म्हणून सर्वमान्य आहे, जा२ च्या त्या लोकांचा काही गैरसमज झाला नसेल, तर पुढे काहीतरी गंभीर घडू शकते. जा२ ची ’ही’ मंडळी  इतिहासाचा सोयीस्कर अर्थ लावतील, कदाचित जा२ चा आणि राजाचा कसातरी बादरायण संबंध जोडून आमचेच कसे खरे आहे यावर भांडतील.अशाने त्यांची पोळी भाजली जाईल. पण दोन जातींमधे दरी निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ्य तेवढे बिघडेल.शहाणपणा यातच आहे की जा१ आणि जा२ च्या लोकांनी ह्यांना बळी पडू नये.

        ------ संवाद इथेच संपला -----

   मी मुद्दामच त्या दोन जातींची आणि त्या राजाचे नाव सांगत नाही. ज्यांना राजाची जात माहित नाही त्यांनासुद्धा कळेल ती.राजा नकळत जातीत बांधला जाईल. जातींची नावे कळली तर राजा जा१ चा की जा२ चा अशी निरर्थक वादविवाद स्पर्धा होईल.

     सध्या महापुरुषांना जातीत बांधण्याचा प्रकार एका गंभीर वळणापर्यंत पोहचलाय.माझ्या काळात हळू हळू छत्रपती शिवाजी राजे भोसले  "मराठयांचेच" म्ह्टले जात आहे. माझ्या नातवंडांच्या काळात ( कदाचित माझ्या मुलांच्याच काळात -भारताची ’प्रगती’ वेगात होत आहे ना! ) छत्रपती शिवाजी राजे "फक्त भोसल्यांचेच" असे म्हणण्यापर्य़ंत मजल जाईल.
      राजाचे काय भविष्य आहे हे बघणे मजेदार ठरेल.
     
     

६ टिप्पण्या:

 1. संकेत, सध्या जे काही चालू आहे, तो अत्यंत मनस्ताप देणारा प्रकार आहे. ज्या शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना अभिजात औदार्याने वागवलं , त्यांना एकाच जातीच्या चौकटीत बसवणे हे कसं समजून घ्यायचं? आणि दुस-या जातीचे कसे त्यांच्या विरोधात होते, आणि त्यांचा महाराजांशी कसा सम्बन्ध नव्हता हे सिद्ध करण्यासाठी पाहिजे त्या थराला जाऊन लेखन करणे हादेखील घृणास्पद प्रकार आहे. आणि या सगळ्यात महाराजांची थोरवी उणावत नाही, पण हे असे प्रकार करणा-यांची पातळी मात्र दिसून येते. असो. ज्याची कर्मे त्याच्यासोबत. मला ही पोस्ट आवडली म्हणून कमेन्ट लिहायचा खटाटोप केला. मस्त!

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यवाद सौरभदा ...
  धन्यवाद सागरदा....

  उत्तर द्याहटवा
 3. @ अश्विन : खरंय, तळपायाची आग मस्तकी जाते हे सगळे पाहून.समस्या ही आहे की, हा प्रकार फ़क्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर चालत आहे. मी उल्लेख केलेला राजा महाराष्ट्रातला नाही.अशा लोकांचा brainwash करणे सोपे असते.. या लोकांचाच उपयोग मग ही नेतेमंडळी आपल्या स्वार्थाकरता करते.

  उत्तर द्याहटवा
 4. Made a nice point thru a simple post. Your post made me wonder, of the Maratha's claim their propriety over Shivaji, then perhaps the Rajput clan to which he belonged actually OWN him !
  Ooops !! it means rewriting history ! i.e additional 3 chapters to history book ! ... nahiiiiiiiiiiiii !!

  keep the good work flowing !!

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More