१२ रजनीचित्रपट व्रतकथा - १

         जुनी गोष्ट आहे. एक आटपाट नगर होते पुण्यनगरी त्याचे नाव.त्या नगरीत एक ऑटोचालक राहत होता.वेंकट त्याचे नाव.तो चित्रपटांचा चाहता होता. ईशकृपेने त्याच्या घरी भरभ्रराट होती.कशाची टंचाई त्याला जाणवली नाही.त्याच्याकडे काळा गॉगल होता, पिवळा रुमाल होता. ते त्याच्या देहाचे घटक बनले होते. तरीपण तो दुःखी असायचा. त्याचे मन त्याला खात असायचे. त्याच्या जीवनात एका गोष्टीची कमतरता त्याला कष्टी करायची. तो रजनीकांतदेवांचा निस्सीम भक्त होता. त्यांचे चित्रपट तो दररोज दिवसभर ऑटो चालवून थकल्यानंतर घरी जाण्यापूर्वी बघायचा.रजनीकांतदेवांच्या काही क्रिया त्याला करणे जमायचे.तो गळ्यातून आपला पिवळा रुमाल काढून एकदाच झटकायचा आणि संपूर्ण ऑटो स्वच्छ व्हायचा.ही रजनीकांतदेवांचीच कृपा असे तो समजायचा. अशा अजूनही काही क्रिया ज्या फक्त स्वय‍ं रजनीकांतदेव किंवा त्यांचे निस्सीम भक्तच करू शकतात,त्या तो करायचा. 
               तरी तो कष्टी होता. त्याला "उजवा पाय जमिनीवर ठेऊन डाव्या पाय गोल फ़िरवून धुळीचे वादळ निर्माण करणे" ही क्रिया जमेना. ह्याखातर त्याने डाव्या पायाच्या गुडघ्याची वाटी ६ दा मोडली होती.असाच एकदा विपन्नावस्थेत ऑटोमधे बसलेला असतांना एक व्यक्ती आला. त्याने वेंकटला रजनीकांतदेवांचा चित्रपट लागलेल्या सिनेमागृहाजवळ सोडण्याचे सांगितले.  रजनीकांतदेवांचा चित्रपट लागलेल्या सिनेमागृहाजवळ जायचे असल्याने तो मीटरने जायला तयार झाला. गप्पांच्या ओघात वेंकटने यात्रेकरूला विचारले, "साहेब, आपण देवाजींचे भक्त दिसता ?" त्याने होकार दिला व विचारले,"तुझा चेहरा असा पडलेला का ? " वेंकटने आपली समस्या सांगितली. तो गृहस्थ हसत म्हणाला, "अरे वेड्या, यात चिंता करण्याची गरज काय? तुला एक व्रत सांगतो, लक्ष देउन ऎक. हे व्रत केल्याने तू आपल्या पायाने छोटेसे वादळ निर्माण करण्यास यशस्वी होशील. मोठे वादळ फ़क्त देवाजीच करू शकतात. तुला एक रहस्य सांगतो ते ऎक. रजनीकांतदेव जेव्हा आपला  पाय गोल गोल हलवतात तेव्हा जगाच्या कोपर्‍यात कुठेतरी चक्रीवादळ येते.  आता तुला "१२ रजनीकांतचित्रपट व्रताची" माहिती देतो, ती ऎक. हे व्रत देवाजींचे परमभक्त स्वामी संकेतानंद ह्यांनी सांगितलेले आहे. आता ह्या व्रताचा विधी सांगतो." अशाप्रकारे त्या इसमाने वेंकटास सम्पूर्ण विधी व महात्म्य सांगितले.वेंकटने लगेच निश्चय केला की याच महिन्यात १२ तारखेपासून हा व्रत करावा. 
       पुढे त्या महिन्याच्या १२ तरखेला त्या महापुरुषाने सांगितलेल्या विधीप्रमाणे वेंकटाने १२ दिवसांचा व्रत केला. ७ च्या दिवसापासून त्याला व्रताची अनुभूती येऊ लागली. १२ व्या दिवसांपर्यंत तो सहजपणे डावा पाय गोल फ़िरवून धुळीचे वादळ बनवू लागला. त्याला अत्यंद आनंद झाला. १२ व्या दिवशी त्याने १२ नास्तिकांना बोलावले. प्रत्येकी १-१ काळा गॉगल, पिवळा रुमाल व रजनीपटांच्या १२ DVD दिल्या. सगळ्यांना तपकिर देऊन व्रताची सांगता केली. वेंकटचे जीवन "१२ रजनीचित्रपट व्रत" केल्याने सुखी समृद्ध झाले. तो रजनीदेवांचा अधिकच निस्सीम भक्त झाला. पुढे तो मीटरने ऑटो चालवू लागला. परतीचे अर्धे भाडे मागणेसुद्धा बंद केले.
         "१२ रजनीचित्रपट व्रत " केल्याने जसे वेंकटचे कल्याण झाले तसेच श्रोत्यांचे होवो ही रजनीकांतदेवांच्या चरणी याचना.
             अशी ही साठा उत्तराची कहाणी सुफळ सम्पूर्ण. 
                                     श्री  रजनीकांताय नमः 


                              रजनीकांतजींच्या नावाने.....  MIND IT  अण्णा  !!!

      तमिळप्रान्तस्वामी, सहस्रसूर्यप्रकाशित, कोटिहस्तबलाभुषित,सर्वयुद्धकलाविषारद, धुम्रदन्डिकाधारी, कृष्णनयनावरणउच्छालिता, अभिनयसम्राट, मनोरंजनदाता, भाग्यविधाता,तरुणातितरुण, चिरतरुण, देवाधिदेव, चित्रपटदेव, रजनिकांतदेवजीकी...... जय !!!!

५ टिप्पण्या:

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More