अनुदिनी चोरास !!

हवसे - गवसे - नवसे, ज्यांना स्वतःच्या बुद्धीने चार शब्द लिहिता येत नाहीत- लिहिता येत नाही, हरकत नाही - पण आपल्याला आवडलेला लेख अनुदिनीवर  द्यावासा वाटतो, जगाला वाटावासा वाटतो, अहो मग द्या की , त्यालादेखील हरकत नाही , पण लेखकाला श्रेय देणे मात्र आवडत नाही, स्वतःच्या नावे लेख खपवतात ( तेवढीच लेखक/कवी म्हणून प्रसिद्धी, मित्रांत फुशारकी !) - अशांना काय म्हणावे बरे ? तर चोर, हो ना ? चोरी सापडली की, कधी-कधी लंगडा युक्तिवाद  करतात - लेख मेलद्वारे आलाय, लेखक माहित नाही. अहो, मग लेख टाकताना  लिहायचे ना, लेखक माहित नाही ! वा थोडे गुगल्बाबाला विचारले की तो सांगतो मूळ लेख कोणत्या अनुदिनीवर आहे. पण लेखक व कवी बनायची कोण हौस असते हो !! आपण लिहावे, नवखे असाल तर चुका होतील, प्रोत्साहन मिळाले की अधिकाधिक चांगले लिहिले जाते, चुका सुधारल्या जातात, पण लिहित राहावे. मीदेखील अजून नवखाच की, मीदेखील चुका करतो !  असो, कोणाला सांगतोय मी हे ? चोरी ही अनादी-अनंत काळापासून चालत आलीये आणि यापुढेही चालत राहणार.
        तर अशा अनुदिनी-चोरांना उद्देशून मी एक औपरोधिक कविता लिहिली होती. तीच इथे देत आहे. हास्यगारवा -२०११ च्या अंकात ती प्रकाशितही झाली आहे. दुवा  आहे :- http://holivisheshank2o11.blogspot.com/2011/03/blog-post.html


कशास निराशेचे नभ हे दाटले तुजसमोरी ?


लेख न लिहिता आला ,शोक कशास करी ?


गरजच काय लेख लिहिण्याची शिष्या ,


तुटवडा नाही जालावर सुंदर लेखांचा...


ऐक कान देऊनी सांगतो तुज रहस्य एक,


जरा जालावर अपुली शर्विलक- नजर फेक,


इतरांचे लेख खपवणे अपुल्या नावाने,


हा उपाय आहे सहजसाध्य विनाकष्टाचा ,


अनुदिनींवर भिरभिरती नजर असावी ,


अपुली एका अनुदिनी परि असावी,


आणिक असावा व्यासंग दांडगा जालाचा,


लेख इतरांचे ,गजर करावा स्वनामाचा ...


होताच आरोप चोरीचा ,स्वीकार तया करू नये,


आरडाओरडा होईल खरा, उत्साह परि मरू नये,


अपुलीच री ओढावी, वा अनुदिनी अजून एक बनवावी ,


नित्य-नवा करावा त्यावरी ,संग्रह चौर्य -साहित्याचा...


कुणी म्हणताच चोरी ही,आपण करावी कुरघोडी,


सहज उपलब्ध लेख हा , मी कसा तया सोडी ?


जालावरचे साहित्य हे, कुणी न अपुला हक्क सांगावा,


हवा तसा वापरेन ,लेख ना तुझ्या बापाचा ...


हल्ला करताच टोळ्यांनी ,धीर न जरा सोडावा,


नाव बदलूनी अपुले , परत कार्यकारण साधावा,


अनुदिनी बनवाव्यात बऱ्याच ,मोफत सुविधा ही,


परि न थांबवावा क्षणभर, धंदा लेख चोरण्याचा...


दिवसेंदिवस असाच उद्योग करशील जेव्हा ,


निर्लज्जतेची गोळी तू खाशील जेव्हा..


हे माझ्या शर्विलक शिष्या , आशीर्वाद देतो,


तेव्हा राजा बनशील तू ,अनुदिनी-चोरांचा ...
किमान  या कवितेची चोरी करू नका रे !!

६ टिप्पण्या:

 1. निर्लज्ज आहेत रे सगळे...आपण आपले काम करावे.
  कविता चोरांना प्रेरणादायी आहे!

  उत्तर द्याहटवा
 2. रुचिपूर्ण कविता.. अपेक्षा आहे कि अशी चोरी करणाऱ्याला हे वाचून तरी, कमीत-कमी स्वताच्या मनात तरी लाज वाटेल..
  दुसर्याची मेहनत किवा श्रेय स्वताच्या नावे करू पाहणारे, फार दिवस लपून राहूच शकत नाहीत...

  उत्तर द्याहटवा
 3. सागर , धन्यवाद !! निर्लज्ज चोरांना कविता नक्कीच प्रेरणादायी आहे ! ;)

  उत्तर द्याहटवा
 4. मिहीर, खूप उशिरा आभार मानतोय. भेट देत राहा !

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More