स्वामी संकेतानंद कहिन
             कधी कधी आपल्या भोवताली एखादी घटना घडते आणि नकळत आपण आपल्या मताची पिंक टाकतो. एखादा कवीमनाचा असेल तर तो कवितेच्या स्वरुपात पिंक टाकेल. आपण अशा कवितांना "वात्रटिका " म्हणतो. वात्रटिकांना  साधारणतः चारोळींचे स्वरूप असते.मी अशाच काही छोट्या छोट्या वात्रटिका लिहिल्या. खरे तर ह्यांना कविता तरी म्हणावे का , हा प्रश्न मला पडलाय. सहज सुचलेल्या काही ओळी, एखाद्या घटनेवर भाष्य करतात. ह्या मुक्तछंदात लिहिलेल्या आहेत,ओळींची संख्या निश्चित  नाही,  अगदीच  स्वैर आहेत. 
  कोणतेही शीर्षक नसलेल्या ह्या छोटेखानी कविता( की वात्रटिका ? ) मी " स्वामी संकेतानंद कहिन " या प्रकारात टाकतो. 
          
          अशा चार " कहिन " मी इथे देतोय.   
  स्वामी संकेतानंद कहिन क्र. १ >>
    कोणता तरी एक सामना, सचिन शतक करतो, धमाल खेळतोय. अचानक तो आउट होतो आणि आपली फलंदाजी ढेपाळते. ३०० च्या   वर पोहचू पाहणारा धावफलक २८० च्या घरात थांबतो ; आणि मग चार ओळी सुचतात,           आज परत एकदा जीव माझा कासाविस झाला..
           सूर्य होता तेजःपुंज, अंधार दूर पळालेला..
           अस्तास जाताच तो, काळोखाने डाव साधला..
           बाकीचे फ़क्त शोभा वाढवाया, देवच फ़क्त खेळला.
 


 
स्वामी संकेतानंद कहिन क्र. २  >>         लोकसभेचे सत्र चालू असते. नेहमीचाच गोंधळ होत असतो. काम बंद , लोकसभा तहकूब आणि माझ्या मनात येतात तीन ओळी...
             आदळआपट,मारामारी, वर्गात नुसता गोंधळ माजला होता..

               सर आले, ओरडले, " सु्टीत खेळायचे सोडून काय करताय रे? "
                " सर, आम्ही ’लोकसभा-लोकसभा’ खेळतोय ", सभापती म्हणाला.


 
 
स्वामी संकेतानंद कहिन क्र. ३ >>       सकाळी वृत्तपत्र हाती घेतो, बातमी वाचतो, " कात्रजचा डोंगर फोडणे सुरूच ! " न्यायालयाने बांधकामावर स्थगिती आणलेली असते, पण अजूनही बांधकाम सुरु असते, डोंगर फोडण्यात येत असतात. पुणे-मुंबई बायपासने प्रवास करतांना पाषाण, बावधन वगैरे भागात निसर्गाची, सह्याद्रीची कत्तल उघड्या डोळ्यांनी दिसत असते. मन उद्विग्न होते, दोन ओळी सहज बाहेर पडतात ,
              वेड्या दादाची वेडी ही भूखंडमाया....
              अधिकारी घेऊन हाताशी चाललेत डोंगर खोदाया..


 स्वामी संकेतानंद कहिन क्र. ४  >>

       हजारो कोटी रुपयांचा स्पेक्ट्रम घोटाळा देशाला धक्का देतो. एवढा मोठा घोटाळा आजवर कुणीच केलेला नसतो. देशाचे अर्थशास्त्र हादरवून सोडणारा हा घोटाळा असतो. ह्या घोटाळ्याची व्याप्ती जगभरातल्या आघाडीच्या दहा घोटाळ्यांमध्ये स्थान मिळवून देते. देशाची मान शरमेने झुकलेली असते. आपण आ वासून बातम्या बघत असतो, वाचत असतो. शून्य मोजायला हाताची बोटे कमी पडतात, पायांचीसुद्धा मोजत असतो.मी बातमी  बघत असतो,  काही ओळी डोळ्यांसमोर विजेसारख्या  चमकतात.....


    
        नोबेल कमिटीचे सभासद चर्चा करत होते,
       " या वर्षी भौतिकशास्त्राचा नोबेल
        राजा आणि कनिमोळीला देऊया का आपण ? 
       स्पेक्ट्रमचा नवा व्यावहारिक उपयोग शोधलाय त्यांनी "
       तेवढ्यात एक कुजबुजला,

      " अर्थशास्त्राचाही द्यायला काय हरकत आहे ? "            

७ टिप्पण्या:

 1. स्वामी एकदम...जबरी...मस्त लिहल आहेस.

  उत्तर द्याहटवा
 2. देविदास सर,सपा, योमू , इंद्रधनू>> धन्यवाद !!

  उत्तर द्याहटवा
 3. भारी लिहिलंय....
  स्वामींचा विजय असो..

  उत्तर द्याहटवा
 4. धन्यवाद गायत्री ! ब्लॉगवर स्वागत !! भेट देत राहा आणि प्रतिक्रियापण !! ;)

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More