पाडाडी- विडंबनासाठी कच्चा माल- भाग १

माझ्या काव्यरसिक मित्रहो,
विसरलांत तर नाही ना ? प्रदीर्घ कालानंतर परत सार्वजनिक जीवनात येत आहे म्हणून विचारले. जे विसरले त्यांना माझी ओळख करून द्यावयाचा विचार आहे. तर मी कवी स.दा.हितकरे. हो, हो तेच ते कविता पाडण्याची रेसिपी लिहून ज्यांनी होतकरू नवकवींवर अनंत उपकार केले आहेत आणि ज्यांच्या कृपाप्रसादामुळे आज प्रत्येक दुसर्‍या व्यक्तीस कविता प्रसवू लागली आहे तेच ते काव्यभूषण, काव्यकलानिधी, काव्यकुसुमरत्नाकर, काव्यपंडित, काव्यशिरोमणी, काव्यसम्राट कवीश्रेष्ठ स.दा.हितकरे. तसे मला ह्या पदव्या नावापुढे जोडायला आवडत नाही,पण काव्यरसिक चाहत्यांनी इतक्या प्रेमाने हा बहुमान दिला आहे त्याचा अव्हेर करता येत नाही. आता माझ्या काव्यरसिक काव्यप्रेमींपुढे प्रश्न पडला असेल की मी अचानक असा अज्ञातवासात कसा गेलो आणि कसा प्रकटलो. मागील वर्षी एका काव्यसंमेलनात काव्यवाचन करत असतांना माझ्या काव्यतृषार्त श्रोत्यांनी मजवर जो ’प्रेमाचा वर्षाव’ केला त्याचा स्वीकार करून अज्ञातवासात जाण्याचे प्रयोजिले जेणेकरून माझ्या काव्यसाधनेस व्यत्यय येऊ नये. आज अचानक माझ्या सर्व काव्यरसिक काव्यप्रेमींच्या दारावर काकपक्षी कोकलला असेत त्याचे हेच कारण, आमचे आगमन !
   आम्ही अज्ञातवासात जाण्याचे तर कारण कळले, आता अज्ञातवासातून बाहेर येण्याचे कारण सांगणेही क्रमप्राप्तच आहे. आमच्या एका कवीमित्राच्या आग्रहावरून आम्ही येते झालो. त्यांची आम्हांस मागणी की हल्ली विडंबन करण्यास कच्चा माल क्वचितच मिळतो आणि मजला विडंबन करण्याचे भरते येत आहे, तरी आपण कृपा करावी. त्यांच्या विनंतीस मान देऊन आम्ही काही कविता प्रसवित आहोत. ह्या कविता म्हणजे खास विडंबनास्तव असलेला कच्चा माल असून होतकरू नवविडंबनकारांनी ह्याचा सढळ हस्ते वापर करावा. तसेच ह्या कवितांपासून प्रेरणा घेऊन तेही स्वतंत्र अशा कविता प्रसवतील हा दुहेरी फायदा. 
 असो, आता आम्ही ’विडंबनरेडी’ कच्चा माल आपल्या समक्ष सादर करीत आहोत.

१. प्रेमकविता :- आम्ही प्रथम प्राधान्य प्रेमकवितेस दिले यांस कारण की हल्ली भारतात तरुणांची संख्या लक्षणीय झाली आहे, ह्यात चिरतरुणांची संख्या गृहीत धरली की प्रेमकवितेचे ’मार्केट’ किती तेजीत आहे हे लक्षात येईल.

अ) उपप्रकार:  पहिल्या प्रेमाची पहिली कविता :-
अ-१) उपउपप्रकार: कॉलेजकुमार गट :-

वाहू लागली मनात आनंदाची रिव्हर
मला झालाय यारो प्रेमाचा फ़िव्हर
तिला जेव्हा पाहिले मी स्कुटीवर
उन्हाळ्यात पण भरला मला शिव्हर

खुले केस तिचे मानेवर
बॅगेचा बेल्ट खांद्यावर
काळा गॉगल डोळ्यावर
मी खल्लास झालो तिच्यावर

प्रेमात मी झालो पुरता वेडा
कब मिलेगी हाय मेरी केवडा
हार्टचा झालाय आता मेदूवडा
धकधक करतोय बघा केव्हढा

पहिल्या प्रेमाची नशा यारो
लेक्चरको गोली मारो
दोस्तांनो खिसे खाली करो
आता मी करो या मरो

अ-२) उपउपप्रकार :- निरागस गट
 
ती हसते किती गोड
जणू कैरीची फोड
तिचे लाजणे गोजरे
जणू फणसाचे गरे

ती मज मिळावी अशी
जणू सागरा
मिळे धरणी
माझे प्रेम व्हावे अमर
कोणाची न व्हावी करणी 

अ-३) उपउपप्रकार :- चिरतरुण गट
आयुष्याच्या संधीकाली
कृपा तव झाली
रुपेरी झळाळी
रवीस अस्ताचली

गे षोडषे, कोमलिके
का आलीस आता जीवना
कृतांतकटकामलध्वज जणू
शिरी मम आहेत खुणा

गे तव सुहास्यवदन
अन्‌ मम गात्रांचे रुदन
ही तव नयनी चंचलता
अन्‌ मम दृष्टीस अधूता

परि तव लाघवी स्मित ते
मज करिती विस्मित ते
नवउन्मेषांचे अंकुर फुटले
मम हृदय व्याकुल जाहले

की आषाढधारा तृषार्त धरित्रीस
की पल्लवी वठलेल्या वृक्षास
की तोय मधाळ वाळवंटी
की निशीथिनीस ज्योत एकटी

अ-४) उपउपप्रकार :- ’मिडलाईफ़ क्रायसिस’ गट
आज पुन्हा मी
असा कातर का झालो...
मेघगंभीर मी, पुन्हा...
असा आतुर का झालो...

ही पहिली प्रेमाची चाहूल...
आता का लागावी..
हाय ही परवशता..
आता का भोगावी...
आयुष्य जळले अर्धे..
आधी बाप, आता मुले..
अन्‌ सुकली फुले..
तारुण्याची केव्हाच...

तारुण्य सडले ते..
चिमूटभर इंक्रीमेंटची
अन्‌ वेतन आयोगाची
वाट पाहण्यात ते..

आता मोहरला वसंत आहे..
दोन क्षण जगावे म्हणतोय मी...
झुगारून द्यावे जोखड मानेवरून..
एकदा प्रेम करावे म्हणतोय मी...

ब)
उपप्रकार: प्रेमात पडल्यानंतरची प्रेमकविता
ब-१) उपउपप्रकार :- ’दुनियाको गोली मारो’ गट

ती माझ्या हृदयाची राणी
आणि मी तिच्या मनाचा राजा
ती शहनाई बिस्मिल्लांची
मी लग्नातला बॅंड्बाजा

मी तिच्या प्रेमात धुंद
हवा झाली आहे कुंद
तिने माळलेला गजरा
मला करतो बावरा

तू अशीच मला रहा भेटत
आपले प्रेम नेऊ रेटत
जर आपल्याआड आली दुनिया
आपण झुगारून देऊ दुनिया

ब-२) उपउपप्रकार : ’हळवा’ गट

आज ती आली भेटायला मला...
जशी झुळूक अंगावरूनी...
अमाप सुख देऊन गेली..

ती हसते तेव्हा..
मला हसवते
ती रडते तेव्हा
मला रडवते..

तिच्या गालावरची खळी
मला करते बेभान
तिच्या डोळ्यांतला काजळ
मनात घालतो थैमान

माझ्या मनाचे पाखरू
तिच्या जीवाचे कोकरू
माझ्या मनाचा पारवा
तिच्या डोळ्यांतला शिरवा

नको कधी सोडुनि जाऊस गं
मी तुझ्याविणा कसा जगेल गं
माझ्या आसवांचा पाउस गं
तुझी क्रोधाग्नि विझवेल गं

क) उपप्रकार : प्रेमभंगाच्या कविता
क-१ ) उपउपप्रकार :- ’देवदास’ गट


ती गेली ....
गेली ती...
मज सोडून
वार्‍यावर ती
दु:खाच्या गर्तेत लोटून ती..
ती गेली..
गेली ती..

दोन दिवसांसाठी आली ती..
पाहुणी हृदयात राहून गेली ती..
ती गेली..
गेली ती...

कोसळलो मी आज पुरा..
मृत्यो, दे मज तू थारा...
माझ्या जीवनात करून अंधार ती..
माझ्या भावनेवर करून वार ती..
ती गेली..
गेली ती..

ही वारुणीच आता मज साथी..
हा जामच हवा आता मज हाती
मैफ़िल अर्ध्यात सोडून ती..
संसार स्वप्नांचा मोडून ती..
ती गेली..
गेली ती..

क-२) उपउपप्रकार :- ’भ्रमिष्ट’ गट
ती गेली ???
नाही..
ती आहेच इथे..
माझ्यादेखत..
इथे.. या बाकावर..
बकुळीखाली बघा...
रोज ती येते मला भेटावया..
ती गेली म्हणता तुम्ही ???

कशी जाईल ती ..
मला सोडुनि असा एकटा ??
अजून अबोलीची फुले माळलीच नाही तिने..
बागेतून माळ्याचा ओरडण्याचा आवाज आलाच नाही आज..
ती गेली ??
शक्यच नाही...
गजरा माळल्याविण ती जाणारच नाही..

ती गेली ???
मग मी इथे काय करतो ?
नाही ती आहेच इथे...
ती जाणे शक्यच नाही...

अरे..
मला इथे ठाण्याला का आणलंत ???

क-३) उपउपप्रकार : ’गेली तर जाऊ दे ’ गट
ती गेली...
जाऊ दे..
एक ना एक दिन..
सबको जाना हैं..

ती गेली..
जाऊ दे..
उद्या दुसरी येईल..
ती हिच्यासारखी नसेल कदाचित..
कदाचित ती असे दिलखुलास हसणारी नसेल..
कदाचित ती अशी निरागस बोलणारी नसेल..
पण ती माझ्यावर प्रेम करणारी असेल..

ती गेली..
जाऊ दे...
छप्पन पोरी आल्या अन्‌ गेल्या..
हीसुद्धा एक त्यांतलीच..
गेली तर..
जाऊ दे..
जिंदगी चलने का नाम हैं..

क-४)उपउपप्रकार :  ’नकार’ गट
का तिने मज नकार द्यावा ?
मी का इतुका नालायक आहे ?
का तिने मज निराश करावे ?
मी का इतुका नालायक आहे ?

मी प्रेम केले तिजवर
तिने केला माझा अव्हेर..
काय करू आता मी ?
की तिने करावा माझा स्वीकार

खरे प्रेम नाही जगात
कळून चुकले मला..
अता पुन्हा प्रेम नाही..
करायचे आहे मला..

क-५) उपउपप्रकार : ’आठवणींचा झुला ’ गट

किती वर्षे झालीत..
ती गेली मज सोडून..
किती श्रावण जळले
तिच्या आठवणींत..

तिची माझी पहिली भेट
अजून आठवते..
अगदी कालच घडल्यासारखी..
डीपीच्या कट्ट्यावर झालेली नजरानजर
अन्‌ मग महाराजबागेत चोरून भेटणे..

आठवतात प्रेमाच्या आणाभाका..
कॉलेजच्या पहिल्या ट्रीपमध्ये घेतलेल्या..
’डोनापावला’वर घेतलेल्या शपथा..
’साथ जिएंगे, साथ मरेंगे’च्या..
ती मात्र आहे सुखाचा संसार करत आता..
मी मरतोय तिच्या वाट्याचे मरण..

ते दिवस सोनेरी,
अन्‌ मोरपिसासारखे ..
तू कशी विसरू शकतेस ?
मला अशी दुःखाच्या सागरात लोटून
तू कशी जाऊ शकतेस ?

तर माझ्या काव्यरसिक मित्रांनो, मी आपणांस काही मोजक्या ’प्रेमकविता’प्रकारांचा कच्चा माल पुरवला आहे. या विषयाचा आवाकाच एवढा मोठा आहे की एक स्वतंत्र ग्रंथच लिहीणे इष्ट राहील. तरी विस्तारभयास्तव काही प्रमुख ’प्रेमकविता’प्रकार देऊन मी इथेच थांबतो. पुढच्या भागात अजून काही विषयांतला कच्चा माल पुरवला जाईल.

टीप :- या मालिकेत वापरलेल्या सर्व कविता या ’पाडलेल्या’ कविता असून त्यांचा ’स्फुरलेल्या’ कवितांशी दुरान्वयेही संबंध नाही. तसे काही आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.


आपला स्नेहांकित,
काव्यभूषण, काव्यकलानिधी, काव्यकुसुमरत्नाकर, काव्यपंडित, काव्यशिरोमणी, काव्यसम्राट कवीश्रेष्ठ स.दा.हितकरे (कैपाडे स्वामी)

१० टिप्पण्या:

 1. एक नंबर... प प ह... शब्द नाही माझ्याकडे. हा जमलं तर एखादी कविता लिहीतो. :P स्वामी _/\_

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद... नक्कीच लिही रे.. त्याजसाठी केला हा अट्टाहास !! ;)

   हटवा
 2. प्रत्युत्तरे
  1. धन्यू धन्यू..
   अभ्यास कराल तरच पुढे जाल असे आमचे गुर्जी सांगून गेलेत म्हणून केला होता हो.. :)

   हटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More