एक ऐतिहासिक विजय


एप्रिलमध्ये लिहीलेला हा लेख आता इथे प्रकाशित करतोय. बातमी एव्हाना अगदीच शिळी झाली आहे,  पण त्याला इलाज नाही.  :D 
---संकेत 
--------------------------------------------------------------------        

२७ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारतासह आग्नेय आशियाला पोलियो मुक्त जाहीर केले व यासोबतच भारताने दरवर्षी हजारो मुलांना पंगू करणार्‍या एका भयावह रोगावर सुमारे २० वर्षे चाललेल्या लढ्यात एक ऐतिहासिक विजय मिळवला. जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया गटातली इतर राष्ट्रे पोलियो मुक्त झालेली असताना भारतामुळे आग्नेय आशिया गटाला अद्याप प्रमाणपत्र जाहीर झाले नव्हते. भारत पोलियो मुक्त करणे हे सर्वात मोठे आव्हान मानले जात होते.

            भारताने पोलियो लसीकरण मोहीम हाती घेण्यापूर्वी दरवर्षी हजारो मुले पोलियो ग्रस्त होत, कायमची लुळीपांगळी होत किंवा मृत्यूमुखी पडत. आरोग्याच्या पुरेशा सोयींचा अभाव, दुर्गम वस्त्या, रोजगारासाठी स्थलांतर करणारी कुटुंबे, लसीकरणा विषयीचे गैरसमज अशी अनेक गंभीर आव्हाने भारतापुढे होती. शासनाचे आणि जागतिक संघटनांचे पाठबळ, निधीची कमतरता भासू न देण्याची दक्षता, एकही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून सर्वत्र उभारलेले लसीकरण बूथ, स्वयंसेवकांची फौज, जनजागृती करायला राबवण्यात आलेले, 'दो बूँद ज़िन्दगी की' हा संदेश देणारे पल्स पोलियो हे यशस्वी अभियान आणि महत्वाचे म्हणजे दरवर्षी नवनवे रुग्ण सापडत असतानाही न खचता, चिकाटीने चालू ठेवलेली लसीकरण मोहीम या सर्वांचा परिपाक म्हणजे भारताने मिळवलेले आजचे यश. २००८ ला जगातील सुमारे पन्नास टक्के रुग्ण भारतात आढळले होते. मात्र २०११ ला केवळ एक रुग्ण आढळून आला. त्यानंतर सलग तीन वर्षे एकही नवा रुग्ण सापडला नाही आणी भारत आपला विजय साजरा करायला मोकळा झाला.

       आग्नेय आशिया पोलियोमुक्त जाहीर झाल्याने आता जगात अवघे तीन देश पोलियोच्या मगरमिठीत उरलेले आहेत- शेजारी राष्ट्रे पाकिस्तान, अफगानिस्तान आणि आफ्रिकन राष्ट्र नायजेरिया. राजकीय अस्थिरता, अपुर्‍या आरोग्यविषयक सोयी, दहशतवाद्यांचा आणि कडव्या धार्मिकांचा लसीकरणाला असलेला विरोध यामुळे या देशांमध्ये लसीकरण मोहिमेला हवे तसे यश लाभत नाही आहे. किंबहुना पाकिस्तानात लसीकरण मोहिमेच्या स्वयांसेवकांवर होणारे हल्ले वाढल्यामुळे पोलियो रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ दिसून येते. जोवर या तीन राष्ट्रांमध्ये पोलियोचे नवे रुग्ण सापडात आहेत तोवर जग पोलियोमुक्त करणे हे एक आव्हानच राहणार आहे. 

        पोलियोमायलिटिस हा रोग एंटेरोवायरस गटात मोडणार्‍या पोलियोवायरस(PV) या विषाणूमुळे होतो. या विषाणूचे एकूण तीन प्रकार आढळत असले तरी बहुतेक रुग्णांना टाइप १ प्रकारामुळे पक्षाघात होतो. पोलियोचा विषाणू केन्द्रीय चेतासंस्थेवर हल्ला चढवतो ज्यामुळे स्नायूंकडे संवेद पोहचत नाहीत आणि स्नायू शिथिल होतात. पोलियोचा विषाणू रुग्णाच्या विष्ठेने दूषित झालेल्या अन्न व पाण्याद्वारे (फिकल-ओरल मार्ग) पसरतो किंवा रुग्णाच्या लाळेद्वारे दूषित अन्नाद्वारेही पसरू शकतो.(ओरल-ओरल मार्ग) पोलियोचे विषाणू विष्ठेद्वारे पसरत असल्याने गलिच्छ वस्तीस्थाने, मलनिस्सारणाच्या सोयींचा अभाव असलेल्या वस्त्यांमध्ये पोलियोचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. 

           पोलियोच्या नोंदी प्राचीन काळापासून सापडत असल्या तरी पोलियोची साथ मात्र १८८० नंतरच्या काळात पाहण्यात आली. यूरोप आणि अमेरिकेत सुधारलेल्या राहणीमानामुळे पोलियोवायरसशी लहान मुलांचा संपर्क कमी झाला आणि पर्यायाने त्यांची पोलियोविरुद्ध प्रतिकारक्षमता कमी झाली. लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलियोचा उद्रेक झाला. पोलियोविरुद्ध लस शोधण्याच्या मोहिमेला पहिले यश १९५२ साली जोन्स साल्क ह्यांनी शोधलेल्या इनएक्टिवेटिड पोलियोवायरस लसीच्या रूपात मिळाले. ह्या लसीद्वारे मृत विषाणू स्नायूमार्फत दिले जातात. पुढे अल्बर्ट सॅबिन ह्यांनी क्षीणन केलेले जीवंत विषाणू वापरून मुखावाटे देण्यात येणारी ओरल पोलियो वॅक्सीन(OPV) विकसित केली  उत्पादनाचा अतिशय कमी खर्च आणि लसीकरणाची सोपी पद्धत ह्यामुळे OPV मोठ्या प्रमाणात वापरण्यात येऊ लागली. पुढच्या तीन दशकांत यूरोप आणि अमेरिका खंडांतील बहुतेक देश पोलियोमुक्त झाले.

               जागतिक आरोग्य संघटना, रोटरी इंटरनेशनल आणि  UNICEF ह्यांनी १९८८ ला जागतिक पोलियो निर्मूलन मोहीम हाती घेतली. सन २००० पर्यन्त पोलियोचे उच्चाटन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. १९९४ ला भारताने पल्स पोलियो अभियान जाहीर केले. पाच वर्षांखालील मुलांना ओपिव्ही दिली जाणार होती. या मोहिमांचे यश जास्तीत जास्त मुलांना नियमित लस देण्यावर अवलंबून होते. ह्याचे कारण म्हणजे पोलियो वायरसच्या प्रसाराची प्रणाली. पोलियोचे विषाणू व्यक्ति ते व्यक्ति संपर्काद्वारे पसरतात. मानवी शरीराबाहेर पोलियोचे विषाणू काही आठवडे ते काही महिनेच जीवंत राहू शकतात. मानवी वाहक नसेल तर विषाणूचे पारेषणचक्र खंडित होते. एखाद्या समुदायात मोठ्या प्रमाणात पोलियो वायरसविरुद्ध प्रतिकारशक्ती असेल तर योग्य वाहकाअभावी विषाणू नाहीसे होतात आणि संपूर्ण समुदाय पोलियोमुक्त होतो. ह्या प्रकारच्या प्रतिकारक्षमतेला सामुदायिक अथवा हर्ड(कळप) प्रतिकारशक्ती म्हणतात. त्यामुळे लसीकरण मोहिमेद्वारे सुमारे ९० टक्क्याहून अधिक मुलांना तरी लस देण्यात यावी ह्यावर लक्ष केन्द्रित केले जाते. नियमित लसिकरणाद्वारे आणि लसीकरण दिवस निश्चित करून, त्याविषयी जागरूकता वाढवून कोणतेही मूल वगळले जाणार नाही ह्याची दक्षता घेतली जाते. भारतीय पल्स पोलियो अभियान अखेरच्या टप्प्यात सुमारे ९९ टक्क मुलांपर्यंत पोहचण्यात यशस्वी ठरले ह्यावरून पल्स पोलियो अभियानाचे यश लक्षात यावे.

           ओरल पोलियो लसीचा एक तोटा म्हणजे लसजन्य पोलियो वायरस म्हणजेच वॅक्सीन-डिराइव्ड पोलियो वायरस ने संक्रमण होण्याचा धोका. ओपीव्ही मध्ये क्षीणन केलेले पण जीवंत विषाणू असतात. जेव्हा बाळाला लस दिली जाते तेव्हा विषाणू आतड्यांत पुनर्विभाजन करतात आणि रक्तप्रवाहात जातात. शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा कार्यान्वित होऊन ते पोलियोच्या संभाव्य धोक्यापासून रक्षण करते. पुढे हे विषाणू शौचावाटे बाहेर पडते आणि इतरांच्या संपर्कात आल्यास त्यांचीही रोगप्रतिकार यंत्रणा कार्यान्वित करतात. काही दुर्मिळ घटनांमध्ये मात्र विषाणूमध्ये जनुकीय बदल घडून पोलियो घडवू शकणार्‍या विषाणूमध्ये रूपांतर होते आणि लसजन्य पोलियो होऊ शकतो. अशा घटना सुमारे २७ लाखात १ एवढ्या दुर्मिळ आहेत. जर एखाद्या समुदायात पुरेसे लसीकरण झाले नसेल तर लसजन्य पोलियो वायरस त्या समुदायात पसरू लागतात. ह्यांना सर्क्युलेटिंग वॅक्सीन डिराइव्ड पोलियो वायरस म्हणून ओळखले जाते. जर संपूर्ण समुदायाचे लसीकरण झाले असेल तर ह्याचा प्रसार रोखता येतो. दुसरा प्रकार प्रतिकारक्षमतेच्या अभावामुळे होणारा लसजन्य पोलियो.(इम्यूनो-डीफीसिएन्सि डिराइव्ड) जर एखाद्या बाळात रोगप्रतिकारक्षमतेचाच अभाव असेल, तर त्याचे शरीर लसीं तल्या वायरसशी लढा देऊ शकत नाही आणि त्यांना पोलियो होतो. ओपिव्हीच्या ह्या धोक्यामुळे निसर्गतः आढळणारे पोलियो वायरस नाहीसे झाल्यानंतर पोलिओच्या पुनर्प्रादुर्भावाचा हाच एक मार्ग उरतो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ओपीव्हीचा वापर बंद करणे आणि त्याऐवजी इनएक्टिवेटिड पोलियो लस ज्यामध्ये जीवंत विषाणू नसतात ती देणे हा मार्ग योग्य ठरतो.

            भारत पोलियोमुक्त झालेला असला तरी पोलियोच्या धोक्यापासून मुक्त झालेला नाही. जोवर इतर देशांमध्ये पोलियोचे विषाणू नैसर्गिक स्वरूपात आढळून येत आहेत, तोवर हा धोका कायम राहील. अशा देशांतून भारतात पोलियोचे विषाणू प्रवेश करू शकतात. पोलिओमुक्त झालेल्या मध्यपूर्व देशांत आफ्रिकेचे शिंग म्हणून ओळखल्या जाणार्‍या देशान्त नव्याने आढळून आलेल्या पोलियोच्या रुग्णां मुळे ही बाब परत अधोरेखित केली आहे. त्यामुळे ज्या देशांत अद्याप पोलियोचे विषाणू आढळून येतात अशा देशांतून भारतात प्रवास करणार्‍यांना पोलियोची लस घेण्याची अट टाकणे गरजेचे आहे. तसेच यापुढेही पोलियो लसीकरण मोहीम जुन्याच उत्साहाने राबवणे गरजेचे आहे.

          पोलियो लसीकरणाच्या यशामुळे ह्या मोहिमेचा अनुभव वापरून इतरही संसर्गजन्य रोगांविरुद्ध लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबवता येईल. पोलिओवर मिळवलेला विजय हा भारतीय लसीकरण कार्यक्रमाचे मनोबल वाढवणारा विजय आहे. 

-- संकेत,
२ एप्रिल,  २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More