देवबाप्पा सचिन निवृत्तीनंतर (कल्पनाही करवत नाही !)


     काही वर्षांपूर्वी (जास्त दूर जायची गरज नाही, ३-४ च झाली असतील) ,नेमेची यायचा  क्रिकेट सिझन आणि नेमेची चर्चा व्हायची देवबाप्पाच्या निवृत्तीची. "शेर अब बुढ़ा हो गया हैं !"  थोबाडीत मारलीये सचिनने त्यांच्या. आता बघा ना ; २००६ ला  एक  बोका सचिनच्या जखमांवर मीठ चोळत होता. आता मात्र कसे त्याचे दात त्याच्या घशात गेलेत. जखमांनी त्रासलेल्या सचिनला मानसिक आधार देण्याऐवजी हा 'सिक' बोका " मेरी बिल्ली मुझीसे म्याऊ" म्हण सार्थ करत होता .अरे , तुझ्या अवेळी संपलेल्या कारकिर्दीचे खापर सचिनच्या हेल्मेटवर कशाला फोडतोस ? त्याने तेव्हाच hellशी आपली meeting निश्चित केली! मग २००७ ला सचिनवर ऑस्ट्रेलियातून एक चप्पल भिरकावली गेली, "सचिनने आता निवृत्त व्हावे . तो आपल्याच खेळाची सावली बनलाय आता. " त्याच्या भावाने पण त्याच्या चपलेवर चप्पल ठेवत देवबाप्पाच्या प्रामाणिकतेवरच  शंका घेतली .अरे , तू कोचिंग करायचे पैसे घेतले होतेस कि टीम फोडण्याचे ? न्यूझीलंड विरुद्ध ८०-८१ मध्ये आपल्या भावाला underarm टाकायला लावून खिलाडूवृत्तीचे मस्त दर्शन घडवले होतेस !! किती म्हणून उदाहरणे द्यायचीत ? सगळे बघा आता कसे गप्प झालेत !!
       मी सचिनचा नेहमीच डाय हार्ड पंखा राहिलोय ,ते फक्त त्याच्या खेळामुळे नव्हे तर त्याच्या स्वभावामुळे .आदर्श खेळाडू , नव्हे आदर्श माणूस कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे सचिन. प्रसिद्धीच्या शिखरावर असतांना आणि सारी दुनिया तुमच्यावर टीका करते तेव्हादेखील कसे वागावे याचे आदर्श म्हणजे सचिन. ज्याने त्याच्यावर टीकेचा बाउन्सर फेकला तो सहज मैदानात टोलवत त्याच्या घशात टाकणारा खेळाडू सचिन ,मैदानाबाहेर एक शब्दही बोलणार नाही . सगळे उत्तर बॅटने देणारा सचिन, कदाचित म्हणूनच तो १० वी ला नापास झाला असणार !
सचिनच्या या  बॅटने उत्तर द्यायच्या सवयीमुळे तो अनेकांचे सोपा लक्ष्य राहिलाय. कुणीही यावे आणि टपली मारून जावे असा काही प्रकार वरचेवर सचिनसोबत घडत असतो. एक पत्रकार खेळीया (हा शब्द त्या पत्रकाराचाच शोध बरे का ? आणि तो पठ्ठा स्वतःचा खेळीया आहे !) सचिनवर आपल्या "मुखाद्वारे मलनिस्सारण " करण्याचा प्रयत्न करून स्वतःच्या डोक्यात भिनलेल्या मलकेमिस्ट्रीचे रासायनिक पृथःकरण कागदावर मांडतो. त्याला माहित असते सचिनवर टीका म्हणजे आपली फुकट प्रसिद्धी.. अरे पण सूर्यावर थुंकशील तर तुझाच चेहरा घाण होईल रे! सचिनसारखा प्रसिद्ध होऊ शकणार नाहीस तर किमान त्याचासारखा माणूस बनण्याचा प्रयत्न तरी कर !    
      एकेकाळी भारतीय क्रिकेट संघ म्हणजे " सचिन + नियम आहे म्हणून ठेवलेले इतर १० खेळाडू " असा होता. सचिनच तेवढा खेळायचा , बाकी सारे हजेरी लावून परतायचे, आणि हे  म्हणायचे सचिन सामना जिंकवू शकत नाही !! त्याच्यामुळेच तर तुम्ही ते थोडे  सामने जिंकले होते रे !! पुढे सौरभ आला, सेहवाग आला, सचिनच्या डोक्यावरचे ओझे किंचीत कमी झाले. कित्येकांचा आवडता खेळाडू बदलत राहिला , त्यांच्या प्रवास सचिन ते सेहवाग व्हाया गांगुली असा होता . पण माझ्या मनात सचिनच देवबाप्पा राहिला. सचिनच्या पडत्या काळात त्याला धीर देण्याऐवजी त्याचे मनोबल खच्ची करणारी जमात पाहिली, मुंबईच्या सामन्यात त्याला घराचा आहेर दिला यांनी . माय-बाप म्हातारे झाले म्हणून वृद्धाश्रमात ठेवणारे याच जमातीचे.. " जो तो वंदन करी उगवत्या " या म्हणीची प्रकर्षाने जाणीव सचिनच्या त्या दिवसांमध्ये झाली . 
      सचिन रमेश तेंडूलकर - क्रिकेटचा देव !! तो आहे तोपर्यंतच जिंकण्याची संधी आहे हे जाणून असलेला सबंध भारतवर्ष आणि तो बाद होऊ नये जलसमाधी घेतलेले ३३ कोटी देव ! अशी जादू याआधी कोणत्या खेळाडूने केली होती ? तो बाद होऊ नये म्हणून केले जाणारे अंधश्रद्धा प्रकारात मोडले जाणारे उपाय !! सचिन शतकाच्या उंबरठ्यावर आला की मी त्याला जाम शिव्या घालतो. " हा काय खेळणार आता ! हा सेंचुरी मारूच शकणार नाही बघ ! नाही मारत रे तू आता सेन्चुरी सचिन !! केलीस तर मानेन बुवा तुला !! " असे काही म्हटले की सचिनला चेव येतो  आणि तो सेन्चुरी करून दाखवतो असे मला वाटते. सचिनच्या शतकांच्या अविश्वसनीय संख्येचे कारण माझ्या या शिव्या आहेत असे माझे ठाम मत आहे . प्रत्येक सचिनभक्ताचे असे काही उपाय असतीलच, जर नसतील तर मला तुमच्या भक्तीवरच शंका आहे .
        आता शेवटच्या उंबरठ्यावर तर सचिनची खेळी कैच्याकै बहरली आहे. पिकलेल्या फळासारखं आहे तो , अवीट गोडीचा. त्याची खेळी बघतांना अंगावर शहारे येतात. एक वेगळाच आनंद असतो मनात, सगळे दुःख ,सगळ्या चिंता कुठेतरी उडालेल्या असतात . मी तर सचिन खेळत आहे तोपर्यंतच क्रिकेट बघणार.(हा बराच जुना संकल्प आता अधिकच दृढ झालाय .)  सचिनविना क्रिकेटची कल्पनाही करवत नाही.  gentleman's game मधला सचिन हा अखेरचा gentleman आहे . तो आहे खराखुरा "BAT"MAN !! पण सचिनही कधीतरी निवृत्त होणारच !! तो कधीच होऊ नये यासाठी मी देवाला अनंतकाळ जलसमाधी घ्यायला लावली तरीही !! पुढचे वर्ष त्याचे कदाचित अखेरचे असेल  :-(  .    

 सचिन निवृत्तीनंतर काय करावे ??
 
१. IPL :- सुदैवाने या बहाण्याने त्याला खेळताना बघता येईल .

२ . कोच :- सचिन म्हणजे क्रिकेटचे विद्यापीठ, तेही सर्वोत्कृष्ट !! क्रिकेटचे हार्वर्ड , MIT , CAMBRIDGE , IIT ,IIM , जे अव्वल ते सचिन !! सर्वाधिक पिचेसवर खेळायचा अनुभव आहे त्याला. प्रत्येक मैदानाची वैशिष्ट्ये त्याला तोंडपाठ असतील. तो जर कोच झाला तर कदाचित त्याच्या प्रचंड अनुभवाचा फायदा टीमला होईल.

३. सचिन तेंडूलकर क्रिकेट अकादमी :- व्वा व्वा !! प्रत्यक्ष सचिन बॅटिंग शिकवतोय म्हटल्यावर और क्या चाहिये !! त्याच्या अनुभवाचा फायदा सध्याच्या संघात असलेल्या बच्च्यांना होत असल्याची कबुली ते स्वतःच देतात. आणि सचिन
बॅटिंग शिकवतोय म्हटल्यावर तर रांगच लागेल हो !! आमच्यासारखे सचिनभोवती फिरणारे पंखे तर वाटेल ती किंमत मोजायला तयार होतील !!

४ . समालोचक : - मजा नाही ..

५ .
आत्मचरित्र:- निवृत्तीनंतर सचिनने कदाचित  आत्मचरित्र लिहिले तर ते हातोहात खपेल, विक्रीचे सगळे विक्रम मोडेल .

६. क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद वगैरे :- छे छे !! सचिनने या घाणेरड्या राजकारणात पडूच नये .

       निवृत्तीनंतर सचिन एका Legend चे आयुष्य जगणार. माझी पिढी , जी सचिनला खेळतांना पाहत लहानाची मोठी झालीय ती आपल्या नातवंडांना सचिनच्या कथा , त्याच्या खेळ्या bed time story म्हणून , आजोबांच्या गोष्टी म्हणून ऐकवणार ..दंतकथा बनलेला सचिन आम्ही प्रत्यक्ष खेळतांना बघितलाय हे सांगतांना गळणारे दोन थेंब त्यांच्या नकळत पापण्याआड लपवण्याचा प्रयत्न केला जाईल . त्याच्या  रेकॉर्ड करून साठवलेल्या खेळ्यांची पारायणे केली जातील . 
      महागाई, आतंकवाद , भ्रष्टाचार, पगार , रोज झोपेचे खोबरे करणाऱ्या चिंता यांचा विसर पाडायला लावणारी खेळी , अवघ्या भारताला एका सूत्रात बांधण्याची  ताकद असणारी खेळी, करोडो भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची ताकद असलेली खेळी आणि ही खेळी अगदी सहजतेने, क्रिकेटच्या मुलभूत नियमांनी खेळता येते हे दाखवणारा
सचिन रमेश तेंडूलकर !!!  तो फक्त एक gladiator आहे ??? छे छे !! तो ह्याहून बरेच अधिक आहे !!! तो क्रिकेटचा शेवटचा सभ्य खेळाडू आहे !! He is The Last Gentleman of Cricket !!!
    
       निवृत्तीनंतरचा सचिन अजून लिहवत नाहीये माझ्या हातून !! सचिन निवृत्त होऊ नये हीच माझ्या (जलसमाधी घेतलेल्या) देवांकडे प्रार्थना !!


जाता जाता :- सचिनबद्दल बरेच काही लिहीले गेले.....  पण मला आता एक नवीनच सुचले म्हणून मीपण लिहून मोकळा होतो ....

  जगात दोनच प्रकारची माणसे असतात :-

१ . ज्यांना सचिन आवडतो.
२. ज्यांना बरे-वाईट माणूस पारखण्याची बुद्धी नाही. 


( पुण्यात येऊन थोडेच महिने झालेत पण हा " जाज्ज्वल्य अभिमान " रोग मलासुद्धा संक्रमित करत आहे. छ्या !! पुणेकर भलत्याच वेगाने रोग पसरवतात हो !!)

७ टिप्पण्या:

 1. माझं दैवत राहुल द्रविड फार पूर्वीपासून आहे आणि कायम राहिल!
  पण सचिन हेदेखील प्रतिदैवत मानतो मी! :)
  आपलं मिथुन/रजनी बाबतही असंच आहे ना! ;)

  उत्तर द्याहटवा
 2. बा विद्याधरा !!! तू खूप politically correct होत चाललास !! :-)
  सचिननंतर माझी दुसरी पसंत द्रविडच आहे. The Wall, यातच सारे आले !!
  धन्स रे रॅपिड कमेंटसाठी !!
  बाकी आम्ही पण मिथुनला मानतोच !!

  उत्तर द्याहटवा
 3. यावर तुझ्याशी याहून अधिक सहमत होऊ शकत नाही.. "कुड नॉट अग्री मोअर वुईथ यु ऑन धिस" चं स्वैर भाषांतर. !!

  एकदम चपखल. परफेक्ट !!

  >> मुखाद्वारे मलनिस्सारण, मलकेमिस्ट्री
  हा हा हा.. जबराट.. मीही त्या (खाजवून खरुज काढणाऱ्या) खाजू पळपुटेकरला असाच ठोकला होता दोनदा.

  >> सचिन + नियम आहेत म्हणून ठेवलेले इतर १० खेळाडू..
  अगदी अगदी..

  सचिन क्रिकेटचा देवबाप्पाच नाही तर ३३ कोटी + १ आहे..

  मलाही त्याच्याबद्दल फक्त खेळाडू म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणूनही नितांत आदर आहे. सचिनची योग्यता जाणणाऱ्या अजून एका निःसीम सचिनभक्ताला भेटून संतोष जाहला !!

  उत्तर द्याहटवा
 4. निवृत्तीनंतर सचिन...
  कल्पनाच करवत नाही रे. ह्या माणसाने गेली दोन दशकं क्रिकेट आणि क्रिकेटप्रेमींना जे काही दिलं आहे त्याला तोड नाही. नुसता खेळाडू म्हणून नव्हे तर माणूस म्हणून तो किती तरी श्रेष्ठ आहे. त्याच्याबद्दल काय आणि किती बोलावं तेवढं कमीच. सचिनने आपल्या कारकिर्दीत कप उचलायला कप्तान ठेवले होते असे म्हणण्यात काही अतिशयोक्ती नाही. सचिनशिवाय क्रिकेटची कल्पनाच करवत नाही.
  बाकी त्याच्यावर टीका करणार्‍या लोकांबद्दल काही बोलायची गरज नाही कारण अशी लोकं केवळ आपली लायकी दाखवतात.

  उत्तर द्याहटवा
 5. सचिनला तोड नाही हे तर खरंच आहे. आता नुकतीच त्याने आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. २००२ नंतर पहिल्यांदाच. हे वर्ष वास्तविक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहायला हवं... १२७० धावा, ४ शतकं, २ द्विशतकं, १४,००० धावांची पूर्तता, ९५ ची सरासरी, वनडे सामन्यांतलं पहिलं द्विशतक... Records are countless. :-)

  उत्तर द्याहटवा
 6. सचिनचे सारे रेकॉर्ड्स तुटतील. पण आदर्श खेळाडु म्हणुन जो रेकॉर्ड ठेवलाय तो क्रिकेट जगतातला अढळ धृवतारा म्हणुनच. धृवतारापण नाही, तो आकाश आहे. अथांग, अमर्याद, नुसतं पाहता येणारं पण कधीही त्याच्यापर्यंत नं पोहोचता येणारं.

  उत्तर द्याहटवा
 7. संकेत माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा सचिन वरील लेख वाचला. छान आहे. विशेषतः एक माणूस म्हणून तो ग्रेटच आहे.

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More