पाडाडी - कैपाक(कैच्याकै पाडलेली कविता)

     आम्ही यापूर्वी आपणांस यपाक व गपाक या दोन पाडकृती कृतीसकट दिलेल्या आहेत.तसेच यपाकपासून सायपाक कसे तयार करावे तेदेखील सांगितले.आता आम्ही ज्या पाडाडीची ओळख करून घेणार आहोत तिचे नाव आहे "कैपाक" म्हणजेच "कैच्याकै पाडलेली कविता".
     कैपाक हा तसा बर्‍यापैकी लोकप्रिय असलेला प्रकार आहे. कैपाक करण्यात अगदीच पारंगत असलेले एक कैपाडे म्हणजे "मन्नू चलिक" हे होत. आपल्या कैपाकाने ते सातत्याने श्रोत्यांचे मनोरंजन करत असतात. मात्र त्यांनी कैपाकाची ही दीक्षा आमच्याकडूनच घेतली आहे हे आम्ही नमूद करू इच्छितो. अजून दुसरे  कैपाडे म्हणजे मर्‍हाटी मुलुखात गाजत असलेले हास्य-द्रुतवाहनाचे कवीराज होत.हे आमच्या नकळतच कैपाक बनवत असल्याचे आमच्या ध्यानात आले आहे. कदाचित त्यामुळेच त्यांचे कैपाक तितकेसे प्रभावी नसतात.त्यामुळे तुम्हालादेखील कैपाडे बनावयाचे असल्यास आमच्याकडे दीक्षा घेणेच योग्य ठरेल.
   कैपाक ही यपाकचेच छेटे रूप आहे. इथेसुद्धा यमकाचे नियम कटाक्षाने पाळावे लागतात. मात्र यपाक आणि कैपाकमधे काही मूलभूत फ़रक आहेत.

१. कैपाक ही कितीही ओळींची, कुठल्याही विषयावरून कुठल्याही विषयाचे फ़ाटे फ़ुटलेली, कोणतेही शब्द वापरलेली असू शकते.
२. कैपाककरिता कागदाचे बोळे बनविण्याची गरज नाही.
३. कैपाककरिता विचार करण्याची गरज नाही.यपाकमधे आपण अगदीच थोडा विचार करत असू, तोदेखील इथे करू नये.

लागणारे साहित्य :- 

१.  कोरे कागद-एक असला तरी पुरेसा, कागद नसला तरी चालेल.
२.  पेन(शाई असलेला, काळी,निळी, लाल कोणतीही चालेल. ) किंवा ..
३. सगळ्या कळा व्यवस्थित दाबल्यास आवश्यक तो शब्द टायपेल असा कळफलक असलेला, चालू       स्थितीतला कॉम्पुटर किंवा laptop आणि तो वापरता येण्यापुरती अक्कल.
४. शब्द लिहेपर्यंत किंवा टायपेपर्यंत लक्षात राहील एवढी स्मरणशक्ती.
५. यमक जुळवता येईल इतका शब्दसंग्रह. हाताशी शब्दकोश असण्याची गरज नाही.

कृती:- 

१. सर्वप्रथम पेनाचे टोपण काढून हाती धरावे, टोक कागदाच्या बाजूने.
२. कुठलीही एक ओळ लिहावी.ही ओळ लिहितांना अजिबात विचार करू नये, गद्य-पद्य कुठलीही ओळ चालेल.
३. आता त्या ओळीखाली लगेच दुसरी ओळ लिहावी.लक्षात घ्या पहिल्या व दुसर्‍या ओळीचा संबंध असला-नसला तरी बिघडत नाही. फ़क्त तिथे यमक जुळायला हवे.
४. खरेतर आता तुम्ही एक कैपाक बनविलेला आहे. मात्र समाधान झाले नसल्यास खाली अजून एक- दोन ओळी पाडू शकता.


   आता आपण हे कैपाक मित्रमंडळींना किंवा शत्रूंना वाढू शकता. आपल्या कैपाकची चव त्यांच्या डोक्यावर बराच काळ रेंगाळत राहील. ते आपल्या कैपाकने प्रभावित होऊन स्वतः कैपाक बनवतील आणि आपल्याला वाढण्यास उताविळ असतील. अशाप्रकारे कैपाडीचा सिलसिला चालू होतो. कैपाक बनवणे आणि वाढणे हा अतिशय लोकप्रिय छंद होतो.जर आपण कैपाक बनवत नसाल तर फ़ारच मागासलेले म्हणून ओळखले जाउ शकता. त्यामुळे आपण लगेच कैपाक बनवायला सुरुवात करा व कैपाडे म्हणून प्रसिद्धी मिळवा.

    वेगवेगळ्या प्रकारचे कैपाक आम्ही सुचवतो..

१. कैशपाक(कैच्याकै शेर पाडलेली कविता) :- हा प्रकार आमचे शिष्य "मन्नू चलिक" यांनी लोकप्रिय केलेला आहे. इथे कैपाक हा दोनच ओळींचा असतो.

२. कैहापाक(कैच्याकै हायकू पाडलेली कविता) :- या प्रकारात कैपाक हा तीन ओळींचा असतो.

३. कैचापाक(कैच्याकै चारोळी पाडलेली कविता):- आपण ओळखले असेलच की येथे कैपाकमधे चार ओळी लिहील्या जातात.

इशारा:- जर तीन वा चार ओळींचे यमक पाडण्याची कुवत वा शब्दसंग्रह नसेल तर कैहापाक आणि कैचापाक पाडू नये.

    आता आम्ही आपल्याला तिन्ही प्रकारांचे काही उदाहरण देतो. यावरून आपली कैपाकाची कल्पना अधिकच स्पष्ट होईल.

१. कैशपाक :-  

१.  काफ़िया काफ़िया खेळतो आम्ही, रदीफ़ आम्हाला आवडत नाही..
     माफ़िया वॉर्स खेळतो आम्ही, फ़ार्मविल आम्हाला आवडत नाही..

 २. उधाणलेल्या वार्‍याने दवबिंदू गेला उडत..
      हरकतनाय म्हणत, भिंतीवर बसला रडत..

३.  सर्व ब्लॉगर्समधे स्वामी दिसतात वेगळे..
     आमच्यासोबत रहा , कैपाडे बनतील सगळे..

४.   लवकरच आप्पाची बोहल्यावर स्वारी..
       चूक करेल ती, तरी हाच म्हणेल सॉरी..
 
२. कैहापाक :-
   
 १.   कैपाकची कृती मी ब्लॉगवर देतो
       फ़ुकटात आहे तर फ़ायदा घेतो..
      रजनीच्या नावाने ,सगळ्यांना पिडतो..

 २.  यपाक,गपाक,कैपाकचा सुरू झालाय खेळ
       मी खाल्ली होती काल गणेश भेळ...
      आज खातोय तुमचा कवडीमोल वेळ

३. कैचापाक:- 

१.  वरच्या कैपाकात, ही अजून एक भर..
    मी आहे कवितेतला सचिन तेंडूलकर..
    माझी कविता आवडली नसेल तुला जर..
    ओंजळभर पाण्यात जा आणि बुडून मर..

२.  मी कैपाकीचा भयंकर रवंथ केला..
     आज नक्कीच कुणीतरी आहे मेला..
    आता फ़क्त अजून एक ओळ झेला..
    पुढची पाडाडी येईल डिसेंबरला..


      या उदाहरणांतून आपल्या कैपाकाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या असतीलच. सध्या बझ्झविश्वात कैपाकींचा पूर येत आहे. आमच्यापासून प्रेरणा घेऊन कित्येक जण कैपाडत आहेत. निकट भविष्यात आम्ही आपल्याला आमच्या कैपाड्या शिष्यांनी निर्मीलेल्या कैपाकांचा आस्वाद घेण्याची संधी देऊ..

आपला स्नेहांकित,
स. दा हितकरे ( कैपाडे स्वामी )

१४ टिप्पण्या:

 1. हाहाहा... लय भारी. आता खरंच यायला हवं गुरुपौर्णिमेला. :-)

  उत्तर द्याहटवा
 2. सुपरफ़ास्ट प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे संकेत,
  माझ्या पाडाडीला मुळीच नाही आता अंत...

  हेहेहे.. तू बझ्झवर ये, सध्या धमाल कैपाकांचा रतीब घातला जातोय तिथे कालपासून !!! swami sanketanand शोध आणि देवेन . सुद्धा..

  उत्तर द्याहटवा
 3. कैकैयीच्या नावात आले दोन कै
  कैरीतुन री गेला उरला फक्त कै
  पाडाडीच्या पाकातपण लावला एक कै
  झाली की नाही आमची कविता कै..च्या...कै

  (गुरुदक्षिणा म्हणुन गुरुदेवांना आदरभावनेने समर्पित)

  उत्तर द्याहटवा
 4. स्वामी संकेतानंदांना हा बाबामहाराजांकडून संदेश!
  पाडापाडी सर्वत्र चालूच रहावी हाच प्रभुजी आणि रजनीदेवाचा आदेश!

  उत्तर द्याहटवा
 5. स्वामी या पामराला आपल्या चरणी लीन होण्याची एक संधी द्या.
  आपल्या संप्रदायात आम्हाला सामावून घ्या. आम्हाला आपली दीक्षा द्या

  उत्तर द्याहटवा
 6. अलभ्य लाभ :)
  कैपाडे स्वामी की जय ....

  उत्तर द्याहटवा
 7. परत एकदा अप्रतिम काव्याविष्कार!
  मागच्या प्रतीक्रियेमध्ये मी रोसेश आणि कवी बद्दल सांगितले होते.
  कविराज रोसेश हे साराभाई सेरीअल मधले एक पात्र आहे!
  http://www.youtube.com/watch?v=buey4POslRc
  त्यांच्या ओळखी साठी हा एक छोटासा प्रयत्न!
  आणि कॉमेडी express मधले कवी
  http://www.youtube.com/watch?v=ZdUVenXFXUw

  उत्तर द्याहटवा
 8. काही वर्षांनी (किंबहुना महिन्यांनीच) कोणी 'काही' असं लिहिलं तर आपण काय अशुद्ध लिहितोय असं म्हणून "कै लिही रे" असं म्हणून त्याची चूक दुरुस्त करायला जाऊ..

  काहीच्याकाही आवरा ;)

  उत्तर द्याहटवा
 9. सौरभ:-
  तुझी गुरुदक्षिणा मी विनम्रतेने स्वीकारली..
  डोळे पाणावले,आणीक वाचा माझी बसली..

  तू अप्रतिम कैपाडले आहेस रे!!

  उत्तर द्याहटवा
 10. भिंत चालवणार्‍या बाबा, पाडाडीचे लेख येतच राहतील..
  आणि तुमच्यासारखी भक्त मंडळी कृपान्वित होतील.

  उत्तर द्याहटवा
 11. सपादादा, आमचा संप्रदाय तुझ्याकरता सदैव उघडा आहे.
  तुम्हीपण कैपाडा, मंडळ तुमचे आभारी आहे.

  उत्तर द्याहटवा
 12. सुझे, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
  मेरा तो हो गया,अब तेरी बारी हैं

  उत्तर द्याहटवा
 13. प्रसाद:-
  प्रतिक्रियेबद्दल आभार्स रे!!
  तुझ्या मागच्या प्रतिक्रियेनंतर लगेच कॉमेडी एक्सप्रेसच्या कवीबद्दल माहिती काढली आणि त्याचे विडीओ बघितले, भन्नाट आहेत.. मी वर "हास्यद्रुतवाहनाचे कवीराज" म्हणून त्यांचाच उल्लेख केला आहे.
  रोसेशचा विडीओ बघितला नव्हता, लिंक दिल्याबद्दल खूप आभारी आहे .. अशीच भेट देत रहा.

  उत्तर द्याहटवा
 14. हेरंबा, "कै" चा मी केलेला हा (कदाचित)पहिला आणि शेवटचा वापर.. यापुढे कै वरून लेख येणार नाही, अर्थात "कैपाडणे" हा शब्द पडला आहे तर तो तसाच रा्हणार... एक दुसरा मुद्दा, भाषा ही प्रवाही असते, आहे त्याच रुपात ती काय्म राहत नाही. "मजला" हा शब्द आपण "मला" असा लिहीतो, "ज" कुठे गेला? असा प्रश्न कुणी विचारत नाही.

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More