जिजीविषा
टॉवरांच्या पांढऱ्या जलाशयात
उगाच उगवून आलेल्या
करड्याकाळ्या टेकड्यांचे तण.
मध्येच झाडांचा
हिरवा तवंगही
थबकलेला कुठे कुठे...
जेसीब्या आणि पोकलेनी घेऊन
आम्ही स्वच्छता अभियान
धडाक्यात राबवत आहोत...
स्वच्छतेतून समृद्धीकडे
घोडदौड सुरू आहे.
या जिंदादिल जलाशयाचा
आठी दिशांना प्रीतिसंगम होतो
खळखळ वाहणाऱ्या
अवखळ काळ्या रस्त्यांबरोबर..
तीन नद्या अन दोन खिंडी
या प्रेमी जीवांना विलग करू पाहतात..
तोंड काळं केलंय आम्ही नद्यांचं
थोबाड फोडलंय खिंडीचं..
अस्साच धडा शिकवला पाहिजे
पाषाणहृदयी प्रतिगाम्यांना.
नाना जातींचे साठ लक्ष जीव
या जलाशयात गुण्यागोविंदाने
नांदत आहेत.
पण कुणीतरी आहे वरती
त्यांच्या स्पेसवर
अतिक्रमण करू पाहत आहे..
अतिवृष्टी, पूर वगैरे
अतिघातक अत्याधुनिक
तंत्रे वापरू पाहत आहे..
आता जलाशयातील जीवांनी
एकजुटीने मुकाबला केला पाहिजे..
या क्रूरकर्मा, काळतोंडया पावसाला
कायमचा ढगात धाडला पाहिजे
-संकेत
१५ जुलै २०१९
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा