पाडाडी - कविता कशा पाडाव्या ??


       "पाडकृती" किंवा ज्याला सामान्यजन "पाडाडी" म्हणतात अशा वर्गीकृत केलेले अनेक जिन्नस आहेत.बुंदी पाडणे, विटा पाडणे, मुख्यमंत्री पाडणे, मंत्री पाडणे,आमदार- खासदार पाडणे,सरकार पाडणे,
प्रेमात पाडणे ,ब्लॉग पाडणे,लेख पाडणे,शब्द पाडणे(ही कृती आमचे  मित्र श्री. सत्यवान वटवटे उत्कृष्ट पाडतात. ते सातत्याने नवीन शब्द पाडत असतात.उदाहरणांसाठी त्यांचा ब्लॉ तपासावा. )अशा अनेक पाडाडी लोकप्रिय आहेत.पण कविता पाडणे ही नाविन्यपूर्ण पाडकृती आम्ही सर्वप्रथम निर्मिली. आमच्या स्नेह्यांना आम्ही ही पाडकृती चाखायला दिल्यावर अनेकांना प्रचंड आवडली. त्यांपैकी एक स्नेही कवी ता. पाडे यांना आम्ही त्याची कृतीही लिहून दिली.मग त्यांनी कविता पाडण्याचा स्वतंत्र व्यवसाय चालू केला जो छान चालतही आहे.त्यांच्या या व्यवसायाला आमच्या शुभेच्छादेखील आहेत.
     मात्र कविता पाडण्याचा मक्ता आमच्याकडेच आहे आणि ते trade secrete आम्ही कुणाला देणार नाही अशी एक भावना त्यांच्यात बळावत आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे. तसेच आमच्या पाडलेल्या कविता सर्वोत्कृष्ट असतात ही त्यांची दर्पोक्तीही अस्मादिकांस पसंत पडली नाही.कविता पाडण्याचा प्रयोग घरी सर्वांनी करून बघावा आणि त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा हीच आमची इच्छा आहे.कवी ता. पाड्यांच्या व्यवसायाला धक्का लावण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. बाकरवडीची कृती जगजाहीर असतांनादेखील चितळे बंधूंच्या विकल्या जातातच ना ? खणखणीत नाणे असले तर ते वाजतेच की, मात्र कोणते नाणे खणखणीत आहे याचा निर्णय पर्याय उपलब्ध असल्यावरच होऊ शकतो. ही पाडाडी लिहिण्यामागे कवितेसारखी नवीन व रुचकर पाडाडी सर्वांनी घरी पाडावी हा उपरोल्लिखित उद्देश तर आहेच पण यामागे अजूनही एक सद्हेतू आहे.
     अस्मादिकांच्या काही मित्रांना जेव्हा कविता पाडण्याबद्दल कळले तेव्हा त्यांच्या मनीदेखील कविता पाडण्याची इच्छा जागृत झाली.काही मित्रांनी कवी ता. पाड्यांकडून कविता पाडून आपला कार्यभाग साधला. मात्र ज्यांना हे शक्य नव्हते तसेच ज्यांना घरीच स्वहस्ते कविता पाडायच्या होत्या ते फार खिन्न राहू लागले. असेच एक परमस्नेही श्री. इटलीकर भिंते ह्यांची कविता पाडण्याची तीव्र इच्छा आणि उत्सुकता जेव्हा बघितली तेव्हा आम्हास राहवले नाही आणि आम्ही ही पाडाडी लिहिण्यास उद्युक्त झालो.
       आता आम्ही कविता पाडण्याचे साहित्य व कृति तसेच आम्ही पाडलेली कविता दाखवू, तरी आपण सर्वांनी आपापल्या लेखण्या तयार ठेवाव्यात.देश-काल-परिस्थितीप्रमाणे, व्यक्ती-परत्वे व मनुष्याच्या आवडी-निवडीनुसार अनेक प्रकारच्या कविता पाडल्या जाऊ शकतात. इथे विस्तारभयास्तव आम्ही त्या सर्व पाडाडींचा उल्लेख करण्यास असमर्थ आहोत.तरी अतिशय चविष्ट अशा दोन कवितांची कृती आम्ही इथे लिहू. 

१. यमक पाडलेली कविता (यपाक):-  

लागणारे साहित्य :-
 
१.  कोरे कागद-जितके जास्त तितके उत्तम, किंवा एक कोरी वही.
२.  पेन(शाई असलेला, काळी,निळी, लाल कोणतीही चालेल. ) किंवा ..
३. सगळ्या कळा व्यवस्थित दाबल्यास आवश्यक तो शब्द टायपेल असा कळफलक असलेला, चालू       स्थितीतला कॉम्पुटर किंवा laptop आणि तो वापरता येण्यापुरती अक्कल.
४. शब्द लिहेपर्यंत किंवा टाय्पेपर्यंत लक्षात राहील एवढी स्मरणशक्ती.
५. यमक जुळवता येईल इतका शब्दसंग्रह. हाताशी शब्दकोश असणे उत्तम.
६. दुर्बोधता चवीनुसार
७. भय,विनोद, खट्याळपणा, चावटपणा,सामाजिक, धार्मिक, संवेदनशील,प्रेम, शृंगार, नाजूक भावना, राजकीय वक्तव्य, छुपा संदेश आवश्यकतेप्रमाणे.

कृती :- 
 
१. सर्वप्रथम पेनाचे टोपण काढून हाती धरावे, टोक कागदाच्या बाजूने.
२. डोक्यात एखादा विषय आणावा, तो विषय लगेच कागदावर लिहून काढावा.
३. मग पुढे सुचत नसल्याचे आव आणत कागद फाडून त्याचे बोळे बनवावे व ते जमिनीवर भिरकावे.
४. दुसऱ्या कागदावर परत तोच विषय लिहावा.
५. आता कोणतीही एक ओळ लिहावी.
६. कृती क्र. ३ परत करावी.
७. २री ओळ सुचल्यावर आता घाई-घाईत दुसऱ्या बोळ्याचा शोध घ्यावा. तिथे लिहिलेले शब्द एकत्रित करून आणि नव्या सुचलेल्या ओळी नव्या कागदावर लिहाव्यात. शेवटी यमक जुळेल अशा पद्धतीने शब्दांची रचना करावी. अशा रीतीने आपले पहिले कडवे पाडून झाले आहे.
८. विषयानुसार एखादी अतिदुर्बोध ओळ टाकावी.दुर्बोधता आवडत असेल तर दुर्बोध ओळींची संख्या वाढवता देखील येईल.
९. एखादा मोठा संदेश देत असल्याचा सुरेख रंग दिसावा म्हणून संदेशपर ओळी टाकाव्या.
१०. प्रत्येक यमकाला यमक जुळवण्याची काळजी घेत कमीतकमी तीन कडवे पाडावेत.
११. ह्या सर्व ओळी व कडवे लिहित असतांना कृती क्र.३ व ७ वारंवार करण्याची काळजी घ्यावी. अन्यथा यपाकची चव बिघडू शकते व सर्व मेहनत वाया जाऊ शकते.
१२. आता तुमचे यपाक तयार आहे.
१३. हे यपाक गरजेनुसार कॉम्पुटरवर टंकू शकता.
         अशाप्रकारे आपण इतरही प्रकारच्या कविता पाडू शकता. उदा. जर  ओळींमध्ये सामाजिकतेचा रस जास्त ओतला तर सामाजिक यमक पाडलेली कविता (सायपाक) तयार होईल.
          कृती तर सांगितली, मात्र यपाकचा योग्य अंदाज यावा यास्तव आम्ही एक यपाक सादर करत आहोत.
                     तो खुदकन हसतो


    तो माझ्याकडे पाहून खुदकन हसतो
    आणि मग तो एक कविता करतो              --- नाजूक भावना 

    त्याची कविता आवडते मला फार
    त्याच्यासोबतच आता माझा संसार
    पण तो मला विचित्र प्रश्न करतो,
    फ़क्त  कवितेवर कुणी कसा जगू शकतो           -- सामाजिक प्रश्न उचललाय बघा
    आणि मग तो एक कविता करतो

    काजळकाळ्या भयाण निःशब्द राती
    त्याच्या कवितेत गूढ  रातकिडे गाती
    अडखळत अडगळीत तो दिवा शोधतो
    आगकाडीने अंधार घुसमटलेला विझवतो
    आणि मग तो एक कविता करतो                    --चवीपुरती दुर्बोधता
 

     तो एक वेडापीर होता खरा
     कोमेजलेला माळण्याआधीच गजरा
     समुद्र हिमशिखरावर चढू पाहतो
     वारा वडवानल विझवू पाहतो
     आणि मग तो एक कविता करतो

      ओल्या पापण्यांआड मी खुदकन हसते
      आणि मग मीपण एक कविता करते
 
आता आपणही उत्कृष्ट अशी यपाक पाडू शकता असा आमचा विश्वास आहे. चला तर मग, लागा कामाला! आणि हो , आपल्या यपाकची चव आम्हाला चाखायला नक्की द्या बरे.

आता आपण दुसरी पाडकृती बघू.

२. गद्य पाडलेली कविता (
गपाक) :-

साहित्य :-
   वरीलप्रमाणेच, फक्त यमकाची अट शिथील आहे.

कृती:-
 
       गपाक ही करण्यास अतिशय सोपी अशी पाडाडी आहे. त्यामुळे नवोदितांसाठी ही पाडाडी उत्तम ! 

१.कोणत्याही विषयावर  एखादा छोटेखानी १०-१५ ओळींचा निबंध लिहावा.
२. निबंध लिहिताना कर्ता-कर्म-क्रियापद यांची फेरफार करावी, नाही केली तरी हरकत नाही.
३. आता प्रत्येक वाक्यासमोर जास्तीचे टिंब जोडावेत आणि कुठेकुठे उद्गारवाचक वा प्रश्नार्थक चिन्ह जोडावेत.
४. पुढचे वाक्य त्यासमोर न लिहिता खालच्या ओळीत लिहावे.
५. सरतेशेवटी तुमचे गपाक तयार असेल.
६. आता या गपाकला कोणतेही शीर्षक द्यावे.
७.
हे यपाक गरजेनुसार कॉम्पुटरवर टंकू शकता.
  
   आता एक छोटेसे गपाक सादर करतो 
 
  निबंध :- 
 
     बाजाराचा काल  दिवस होता. मित्रांसोबत एक फेरी मारावी म्हणून निघालो. आणि समोर ती उभी होती.लाल ड्रेसमध्ये कातील दिसत होती. एक कटाक्ष टाकला तिने माझ्याकडे फक्त, आणि मी घायाळ झालो. काय सांगू यार मी, तिची एक-एक अदा म्हणजे उधाणलेला वसंत. मी हा असा गबाळ. ती माझी कशी होईल. आम्ही बघावीत फक्त दिवास्वप्ने. तिची दुनियाच वेगळी.माझ्या नशिबी फक्त एक चोरटी झलक. चंद्रप्रकाशाची सवय असलेल्या चांदण्या सुर्यासोबत राहतील का? मनाच्या आकांक्षा फेर धरून नाचतील का? ती उद्या कुणाचीतरी होईल. माझे प्रेम अधुरेच राहील.खंत मानावी का मी? मानावी तर कशाची? तिच्यावर प्रेम केल्याची? की ती माझी होऊ शकली नाही याची? ती मिळाली मला म्हणजे माझे प्रेम सफल झाले, कसे म्हणता येईल असे? किती महान प्रेमकथांची मिलनात सांगता झाली? प्रेम हे कदाचित अधुरेच असावे लागते, महान होण्यासाठी... माझे प्रेम अधुरेच आहे, नाकारत नाही मी. पण महानही आहे.सगळ्या महान प्रेमकथा या अधुऱ्याच आहेत.म्हणूनच कदाचित, प्रेम या शब्दात एक अर्धा शब्द आहे.प्रेमाचे अधुरेपण दर्शवणारे. आणि प्रीती , प्यार, इश्क, मोहब्बत सगळ्या शब्दांत कसा काय किमान एक अर्धा शब्द आहे? पण या शब्दांत एक जोडाक्षरपण आहे. दोघे सोबत असतील तर ते प्रेम.कोणतेही  एक नसले तर शब्द पूर्ण होणार नाही.मग मी पुन्हा एक प्रयत्न करावा का? दोघांचे मिळून एक प्रेमाचे जोडाक्षर बनवावे का? 

गपाक :-
                    बाजाराचा कालचा दिवस 

  बाजाराचा काल  दिवस होता........
 मित्रांसोबत एक फेरी मारावी म्हणून निघालो..........
 आणि समोर ती उभी होती.......
 लाल ड्रेसमध्ये........
 कातील दिसत होती !!!!!
 एक कटाक्ष टाकला.......
 तिने माझ्याकडे फक्त....
 आणि मी घायाळ झालो.........
 काय सांगू यार मी, तिची एक-एक अदा........
 म्हणजे उधाणलेला वसंत !!!!!!
 मी हा असा गबाळ...........
 ती माझी कशी होईल........
 आम्ही बघावीत फक्त दिवास्वप्ने..............
 तिची दुनियाच वेगळी.........
 माझ्या नशिबी फक्त एक चोरटी झलक........
 चंद्रप्रकाशाची सवय असलेल्या चांदण्या सुर्यासोबत राहतील का?
 मनाच्या आकांक्षा फेर धरून नाचतील का?
 ती उद्या कदाचित कुणाचीतरी होईल.......
 माझे प्रेम अधुरेच राहील........
 खंत मानावी का मी?
 मानावी तर कशाची?
 तिच्यावर प्रेम केल्याची?
 की ती माझी होऊ शकली नाही याची?
 ती मिळाली मला म्हणजे माझे प्रेम सफल झाले.........
 कसे म्हणता येईल असे?
 किती महान प्रेमकथांची मिलनात सांगता झाली?
 प्रेम हे कदाचित अधुरेच असावे लागते.......
 महान होण्यासाठी...
 माझे प्रेम अधुरेच आहे............
 नाकारत नाही मी............
 पण महानही आहे.......
 सगळ्या महान प्रेमकथा या अधुऱ्याच .....
 म्हणूनच कदाचित........
 प्रेम या शब्दात आहे एक अर्धे अक्षर ........
 दर्शवणारे प्रेमाचे अधुरेपण ........
..... आणि प्रीती , प्यार, इश्क, मोहब्बत........
 सगळ्या शब्दांत कसे काय किमान एक
अर्धे अक्षर आहे?
.......पण........
 .....पण या शब्दांत एक जोडाक्षरपण आहे.......
 दोघे सोबत असतील तर ते प्रेम........
कोणतेही  एक नसले तर शब्द पूर्ण होणार नाही.........
मग मी पुन्हा एक प्रयत्न करावा का?
दोघांचे मिळून एक प्रेमाचे जोडाक्षर बनवावे का? 

    या उदाहरणानंतर  गपाकबद्दलच्या  आपल्या सर्व शंकांचे निरसन झाले असेलच. आता आपणही घरच्याघरी गपाक पाडू शकता.
पाडण्याची सवय झाल्यास हळूहळू आपण कविता करू शकता. कित्येक "पाडाडे" पुढे यशस्वी "कर्ते" झाल्याची उदाहरणे आहेत. तथापि आम्ही आपल्याला सदैव पाडाडे राहण्याचे सुचवतो.
    
होममेड चविष्ट यपाक आणि गपाक यांच्या प्रतीक्षेत...
                                                                               आपला स्नेहांकित,
          स. दा. हितकरे      
                                                                                      

    

टिप्पण्या

 1. प्रचंड भारी क्रॅश कोर्स...
  खूप आवडलं...
  एस्पेशियली तो एक कविता करतो तर एकदम अपील झाली...एकदम एकदम!!!
  आणि बाजाराचा कालचा दिवस द बेस्ट!!
  कृतीसकट दिल्याबद्दल आभार! :D

  उत्तर द्याहटवा
 2. अरे व्वा!! अगदी अश्याच एका कोर्सच्या शोधात होते मी! ;) आभार बुवा तुमचे!!! :)

  उत्तर द्याहटवा
 3. वा! क्या बात है! गुरुजी, कविता पाडण्याच्या ज्ञानाची कवाडं आमच्यासारख्या अज्ञ लोकांसमोर खुली केल्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. येत्या गुरुपौर्णिमेला येतो आपला चरणस्पर्श करायला... :-)

  उत्तर द्याहटवा
 4. >> बाकरवडीची कृती जगजाहीर असतानादेखील चितळे बंधूंच्या (बाकरवड्या) विकल्या जातातच ना?

  हा हा खणखणीत :)

  यपाक काय सायपाक काय गपाक काय.. सही एकदम..

  भारी पाडली आहेस आपलं सॉरी लिहिली आहेस पोस्ट ;)

  रच्याक, गपाकचा 'शिण' वाचून आम्हास आमच्या एका मित्रवर्यांची आठवण जहाली :P

  - आपला 'शब्दपाडे'

  उत्तर द्याहटवा
 5. @vidyadhardada:-
  मनापासून आभार रे!! प्रेरणास्रोत तूच असल्याने शेपरेट आभार!!! हा लेख त्या तुझ्या लेखानंतर लगेच सुचला होता आणि खरे तर त्या बोंगाळे महात्म्य च्या लेखानंतर १० तारखेला लगेच पोस्ट करणार होतो. पण reliance ने दगा दिला.मराठी ब्लोग विश्वची वाट लागलेली असल्याने काल पोस्ट केले नाही(कोणी वाचणार नाही ही भीती!).सकाळी(भारतातल्या) हत्या-४ वर तुझी कमेंट वाचली आणि मग राहवले नाही आणि म.ब्ल.वि. गायब होते तरी मी पोस्ट केले. पुन्हा एकदा धन्यवाद रे.

  उत्तर द्याहटवा
 6. @Anaghatai:-
  अगदी मोफत कोर्स आहे!! आता तू पण कविता पाडणे चालू कर !!

  उत्तर द्याहटवा
 7. @Sanket Apte:-
  धन्यवाद रे हरभऱ्याच्या झाडावर चढविल्याबद्दल !! उतरलो लगेच खाली !!

  उत्तर द्याहटवा
 8. @Herambda:-
  मनापासून आभार्स रे !! तुझ्या शब्दपाड क्षमतेचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे.
  गपाक चा तो शीण लिहितांना "तो मित्र" डोळ्यासमोर होता. आम्ही त्याची लव ष्टोरी रोजच follow करत असल्याने गपाकची सुरुवात नकळत त्याच्या भावनेचा आदर करत झाली आणि शेवटी दोन उपदेशाचे शब्ददेखील लिहून झालेत.

  उत्तर द्याहटवा
 9. खुपच खमंग झालीये रे पोस्ट...मस्तच पाडलीयस...यपाक आणि गपाक दोन्ही भारी...
  कृतीसकट दिल्याबद्दल आभार्स .. :D +1

  उत्तर द्याहटवा
 10. Lai Bhari..
  Hats off to your sense of humor!
  Kavi Rosesh baddal mahit aahe ka tula?
  Aani Comedy Express madhle Kaviraaj?

  उत्तर द्याहटवा
 11. प्रसाद, धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत..
  नाही, मला कवी रोसेश माहीत नही की कॉमेडी एक्सप्रेस मधले कवीराज माहीत नाही. माहिती काढावी लागेल..
  पुन्हा एकदा धन्यवाद..

  उत्तर द्याहटवा
 12. देवेन: धन्स रे दादा.....
  अजून खमंग कृती येतील भविष्यात..

  उत्तर द्याहटवा
 13. हितकरे , तुम्ही तुमची पाडाडी ची कृती सर्वांसाठी इथे दिलीत मंडळ आपले लय लय आभारी आहे.

  जरूर आम्ही हि कृती करून पाहू.

  उत्तर द्याहटवा
 14. धन्यवाद सचिनराव, ब्लॉगवर आहे आपले स्वागत..
  प्रशंसा केली आमची,मी झालो आपला शरणागत...
  हेहेहे.. पाडा, कविता पाडा...

  उत्तर द्याहटवा
 15. आताच आपल्या काव्य निर्मितीचा लाइव्ह अभ्यास केला..मला वाटत ही कला मी आपल्यामुळेच शिकलोय स्वामी..
  धन्यवाद :)

  उत्तर द्याहटवा
 16. प्रचंड भारी! स्वामीजी, आपका जवाब नही!

  उत्तर द्याहटवा
 17. स्वामीजी तुम्ही कवितेची दिक्षा देऊन आता गुरुदेव हे पद प्राप्त करुन घेतले आहे. धन्य जाहलो. आधी आम्ही भक्त होतो आता आपले शिष्य जाहलो.

  उत्तर द्याहटवा
 18. प्रचंड म्हणजे प्रचंड जबरी...
  उभ्या जन्मात मला कविता सुचणार (होणार) नाही अशी माझी खात्री होती पण आज आपले दोन अध्याय वाचून मला स्फूर्ती आलेली आहे. बस्स आत्ता काही कोरे कागद, (खाली) टोक असलेले पेन आणि कागद फाडून गोळा बनवण्या इतपत शक्ति आली की लगेच किलोच्या हिशेबाने कविता पाडतो...

  उत्तर द्याहटवा
 19. सुझेदा, खूप खूप धन्यवाद रे!! किती हरभर्‍याच्या झाडावर चढवणार?

  उत्तर द्याहटवा
 20. ऒंकारदा:- ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार्स!!

  उत्तर द्याहटवा
 21. सिद्धार्थदा:- ब्लॉगवर स्वागत, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. मी तुझ्या गजाल्या वाचत असतो, भन्नाटच लिहीतोस.. आता तू पण कविता पाडायला सुरुवात कर.

  उत्तर द्याहटवा
 22. बाबाकांत महाराज, अरे आम्हाला गुरुत्व देऊ नका, आपण खुद्द सक्षम आहात...

  उत्तर द्याहटवा
 23. मला माझ्या कवितेत सुधारणा करण्याचे उत्तम मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद.
  आता लेख कसे पाडावेत यावर लिहून होऊद्या काय??

  उत्तर द्याहटवा
 24. धन्य...कुठे होतात आपण इतके दिवस ? ( म्हणजे हे वाक्य मी स्वत:ला म्हटले पाहिजे कारण तुझ्या ब्लॉग सापडला नाही म्हणून)
  कैच्याकै...मजा आली...गपाक तर अगदी योग्य !

  उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय