एन्दिरन स्तोत्र - १

श्री गणेशाय नम: हे पार्वतीनन्दन । अग्रपूजा तुझा मान ।। करितो तुज वन्दन । स्वामी संकेतानन्द ।।१॥
व्यासा बुद्धी तुच दिली । तयाची लेखणी चालविली ।। म्हणूनच त्याने निर्मीली । महाभारत काव्यरचना ।।२।।
आता तुज वन्दून । स्तोत्र करितो लेखण ॥ जयाचे नाव एन्दिरन । चित्रपट असे ॥३॥
श्री रजनीकांताय नमः हे देवा रजनीकांता । हे साक्षात अरिहंता ॥ करितो दूर चिंता । अपुल्या भक्तांची ॥४॥
वर्णू मी किती । अशी तव महती॥ तुझीच असे भीती । दुष्टांना ॥५॥
तू हात ठेविला ।तत्त्क्षणी उद्धार झाला ।। महिमा प्रत्ययाला । आला असे ॥६॥
तूच महामेरू । तूच कल्पतरू ॥ दुबळ्यांचा आधारू । तूची असे ॥७॥
तुझिया सिनेमाद्वारे । रजनीभक्तीचे भिनले वारे ॥ तूच तूच  कैवारे ।  आता मज ॥८॥
आता हे रजनीदेवा। तुझा करितो धावा॥ सामर्थ्य मज द्यावा । स्तवनासाठी ॥९॥
तुझा मी भक्त साचा । उदो उदो रजनीनामाचा ॥ mind it मंत्राचा । गजर असो ॥१०॥
तुझी ती संवादफेक । आणि नजर भेदक ॥ धूम्रदंडिका सूचक । तुझ्या ओठी ॥११॥
हे  देवा रजनी । असतो निशदिनी ॥  तुझ्याच चरणी । स्वमी संकेतानन्द ॥१२॥
न दवडिता वेळ । न लावता पाल्हाळ ॥ वर्णितो सकळ । एन्दिरन अवतार ॥१३॥
आले रजनीदेव । लीला करण्यास्तव ॥ एन्दिरन हा तव । अवतारपट असे ॥१४॥
दिग्दर्शन शन्कर करी । रहमान संगीत उद्धारी । सोबतीला विश्वसुंदरी । ऐश्वर्या असे ॥१५॥
सुजाताची पटकथा । वैरामुत्तुची गीतगाथा ॥ संकेत ठेवितो माथा । तुमच्या चरणी ॥१६॥
सन पिक्चर्स द्वारे निर्मीत । भक्तांद्वारे बहुप्रतिक्षीत ॥ अद्भुत आणि आश्चर्यचकीत । करणारी गाथा ॥१७॥
तमिळ भाषेत एन्दिरन । रोबो नामाभिधान ॥ तेलुगु हिंदी कारण । दिले असे ॥१८॥
नामे भिन्न, भिन्न भाषा । परि रजनीदर्शनाची अभिलाषा ॥ भक्तांची निराशा । न होणे ॥१८॥
चिरतरुण देवाजी । द्विभूमिका जयांची ॥ वसीगरन आणि चिट्टी जी । नाम तयांचे ॥१९॥
डॅनी तोच डॉ. बोहरा । गुरु वसीगरनचा होय खरा ॥ परी मत्सराचा वारा । भिनलेला अंगी ॥२०॥
वसीगरन वैज्ञानिक थोर । मोहापासून राहून दूर ॥ संशोधन केले घोर । दहा वर्षे ॥२१॥
सना त्याची मैत्रीण । परी वसीगरन तिजविण ॥ संशोधन कारण । दूर राहिला ॥२२॥
मोहाचा वसीगरनला । स्पर्श नाही झाला ॥ म्हणून त्याने बनविला । अद्भुत यंत्रमानव ॥२३॥
सुखाची कामना । आली नाही मना॥ जरी विश्वसुंदरी ललना । सना असे ॥२४॥
अशा या दृष्यातून । बोध घ्यावा आपणहून ॥ श्रेष्ठ नाही कर्माहून । अन्य काही ॥२५ ॥
लक्ष्यापुढे शरीरसुख कैसा । आणि क्षुद्र तो पैसा ॥ देवाजींनी संदेश ऐसा । दिला असे ॥२६॥
भौतीक सुखाकडे दुर्लक्ष केले । तेव्हा यंत्रमानव निर्मीले ॥ तया आपले रूप दिले । वसीगरनने ॥२७॥
सर्वकलापारंगत केले । युद्धशास्त्र शिकवले ॥ सहस्त्रगज सामर्थ्य दिले । यंत्रमानवा ॥२८॥
सर्व भाषा पण आल्या। परी भावना नाही दिल्या ।। आणिक नाही शिकविल्या । जगाच्या चाली-रिती ॥२९॥
देवाजींचे मत । मनुष्याचे रीतभात ॥ शिकावे साक्षात । जगी राहून ॥३० ॥
चमच्याने भरविता । जगण्याची क्षमता ॥ लढण्याची क्षमता । नष्ट होते ॥३१॥
तो जगतनियंता । देव तुम्ही म्हणविता ॥ मनुजासी सर्व शिकविता । दिसला नाही ॥३२॥
जगी जन्म घ्यावे । बरे -वाईट ओळखावे ॥स्वतःला घडवावे । ही खरी बुद्धीमत्ता ॥३३॥
वसीगरन हेच सांगतो । मनुष्यासी संदेश देतो ॥ जो मुलांसी चमच्याने भरवितो । तो मूर्ख असे॥३४ ॥
मग रोबोसी घरी नेले । जन्मदात्यांसी दाखविले ॥ चरणस्पर्श केले । दोघांनी ॥३५॥
मोठा कितीही कोणी। परि जोडावे पाणि ॥ सांगते रजनीवाणी । आई-वडिलांना ॥३६ ॥
संशोधनाअंती प्रथम घरी आला । जन्मदात्यांसी भेटला ॥ अजिबात न ढळला । त्याचा सदाचार ॥३७॥
अधिकार नामकरणाचा । असतो माता-पित्यांचा ॥ हे दाखवण्याचा । हेतू बघा ॥३८॥
वसीगरनने बनविले । आईने नामकरण केले ।। "चिट्टीबाबू" नाव दिले ।  प्रेमळ ते ॥३९॥
चिट्टी गोजीरवाणा । खरे बोलावे हा बाणा ॥ झाला केवीलवाणा । या खोट्या जगी ॥४० ॥
मनुष्य जो अती सरळ । होते त्याची आबाळ ॥ सर्वत्र होतो छळ । या जगती ॥४१ ॥
संदेश हाच अभिप्रेत । होता चिट्टीकथेत ॥ अतीसरळ या जगात । टिकत नाही ॥४२॥
मग सनाला समजवायला । वसीगरन तोची गेला ॥ थोडा प्रेमसंवाद झाला । दोघांमधे ॥४३ ॥
गाईले दोघांनी गाणे । वेड्या अणुकणांचे तराणे ॥ प्रितीचे हे बहाणे । जुनेच असती ॥४४ ॥
या गाण्यामधूनी । वसीचे प्रेम विज्ञानी ॥ असे उफाळूनी । येते बघा ॥४५॥
चिट्टी इकडे विनोद करतो । वाहतूक पोलीसाला धडा शिकवितो ।  लाचेविरुद्ध शिकवण देतो। नकळतच ॥४६॥
गाणे संपल्यावर। चिट्टीशी भेटल्यावर ॥ सनाच्या आश्चर्यात भर । पडली बघा ॥४७॥
तू रोबो बनविला । एक चमत्कार केला ॥ मज भारी आवडला । तुझा हा चिट्टी ॥४८॥
याला घेउन जाते । आपल्यासोबत ठेवते । याची क्षमता तपासते । अपुल्या सदनी ॥४९॥
सना ही  चतुर बाला । ज्या शोधासाठी वसीला बोल लाविला ॥ तोच रोबो स्वतः वापरिला । वसीआधी ॥५० ॥
इथे नारी स्वभाव दिसतो । विद्वान सुद्धा फसतो ॥ हेच तुम्हा सांगतो । रजनीदेव ॥५१ ॥

                                                एन्दिरन स्तोत्र - भाग २ वाचायला टिचकी मारा -->

१० टिप्पण्या:

 1. काय द्यावी प्रतिक्रिया, शब्दपांगळे आम्ही,
  स्वामी संकेतानंद तुम्ही, भावना जाणाव्या||
  नतमस्तक आम्ही, आहो तुम्हा समोर,
  रजनिचरित लिखाणाचा आता, तुम्ही ध्यास घ्यावा||

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. स्ट्य़ुपेंडो फ़ेंटाब्युलसली फ़ॅनटॅस्टीकल.....माईंड इट...

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. धन्य असे स्वामींची कल्पनाशक्ती !
  तव चरणी बापुडे लीन झालो !!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. Swami, dhanya zalo he vachun amhi!
  jasa chitrapat gruhat rajni samor alya war kahi suchat nahi, agdi tasach effect sadhla.....

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. @ saurabh : स्वामी बाबाकांतची वाणी । आम्हाला अमृतावानी । असू द्यावी मेहरबानी । सदैव ॥ ॥

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. @ smit gade :-
  हा मोठेपणा अपुलाच असे ।
  अमुचि कल्पनाशक्ती अणुमात्रही नसे ॥॥

  प्रत्युत्तर द्याहटवा
 7. @ kaustubh kulkarni :-
  धन्यवाद रे.. आभार्स.. तू माझा बालमित्र कौस्तुभ काय रे???

  प्रत्युत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More