ज्याने आशेचे बीज पेरले

एक फ्रेंच कथा आहे -  " L'homme qui plantait des arbres  " ( The  Man Who  Planted  Trees   ). लेखक  आहेत - ज्योँ गिओनो . ही  कथा मी लहानपणी साधारणतः ७ वी -८ वीत   असतांना हिंदीत वाचली होती. कथेचे नाव होते,  " जिसने उम्मीद के बीज बोये " , अनुवाद श्री. अरविंद गुप्ता ह्यांनी केला होता. ह्या कथेने मी तेव्हा प्रचंड प्रभावित झालो होतो. पुढे माहित झाले  की मीच नव्हे तर जगात शेकडो लोक ह्या कथेने प्रभावित झाले आहे, झाडे लावत सुटलेत. मी ह्या कथेचा मराठी अनुवाद करायचे तेव्हाच ठरवले होते, पण लहानपणी ठरवलेल्या सारयाच गोष्टी आपण अमलात आणत नाही ना ? पण ह्या कथेची जादूगारीच अशी की मी कधीच ही  कथा  विसरु शकलो नाही. डिसेम्बर, २०१० ला मी ही कथा  जालावर शोधली  आणि  अनुवाद करायला घेतले. प्रत्यक्ष अनुवादाला सुरुवात फेब्रुवारीत  केली.  माझ्या आळशी स्वभावामुळे कथेचा अनुवाद बराच लांबला. सरतेशेवटी एप्रिलमध्ये  अनुवाद पूर्ण झाला आणि मी तो तपासायला हेरंब , राजे , आणि विद्याधर   ह्या माझ्या तिघा मित्रांना ( आणि ज्यांची मराठी भाषेवर पकड ही  माझ्यापेक्षा जास्त चांगली आहे असे मी मानतो ) दिला. त्यांनी होकार कळवल्यावर मी आता हा अनुवाद प्रकाशित करायला तयार आहे. धन्यवाद भिंतीवरल्या  बाबा, राजे !! "हाबार्स " सत्यवाना !!! ( बाबा, राजे, तुमचा असा एखादा सिग्नेचर "हाबार" नाही का ? ). कथा अतिशय सुंदर, प्रभावित करणारी  आहे, तुम्हाला न आवडल्यास दोष माझ्या अनुवादाचा असेल, कथेचा असणार नाही.
       अनुवाद करतांना मी इंग्रजी आणि हिंदी दोन्ही अनुवादांचा  आधार घेतलाय. किंचित स्वातंत्र्य  घेतलेय.
       पर्यावरणाच्या रक्षणासाठी लिहिल्या गेलेल्या काही प्रचंड लोकप्रिय  कथांमध्ये ह्या कथेचा  समावेश होतो. त्यामुळे ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी असे मला वाटते. 
    कथा सलग देतोय . ही कथा  तुकड्यांत देण्यात मजा नाही. असो, आता कथेला सुरुवात करतो.

               
                  ज्याने आशेचे बीज पेरले


कुणा माणसाच्या माणुसकीचा योग्य अंदाज लावायचा असेल तर त्याची बराच काळ पारख करणे आवश्यक असते.जर कोणी फळाच्या आशेविना दुसर्‍यांचे भले करत असेल तर त्याहून अधिक चांगले काय असेल बरे ? मी ज्या माणसाची गोष्ट आपल्याला सांगतोय त्याने तर आपल्या श्रम आणि चिकाटीने या जगाचे चित्रच पालटले.



खरे तर बरीच जुनी गोष्ट आहे.सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मी सेनेत भर्ती झालो होतो.वर्षभराच्या ट्रेनिंगनंतर मला १५ दिवसांची सुटी मिळाली होती.सुटीमधे घरी जाण्याऐवजी भटकंतीचा विचार मनात आला.आपल्या सैनिकी पिशवीत थोडे खाण्याचे सामान आणि एक पाण्याची बाटली ठेवून भटकंतीला निघालो. ज्या भागातून मी जात होतो ते मला एकदम नविन होते.अगदी ओसाड माळरान होते.कुठे कुठे पिवळ्या धोत्र्याची काटेरी झुडुपे होती.बाकी जागी सुकलेल्या गवताखेरीज अजून काहीच नव्हते.


मला या भागात भटकंती करून दोन दिवस झाले होते.हा भाग अजिबात वसलेला नव्हता आणि वातावरणातसुद्धा एक भयाण शांतता भिनलेली होती.मी आता जिथे उभा होतो तिथे कदाचित कधीकाळी गाव वसलेले असावे. एका कोपर्‍यात सहा-सात घरे होती जी आता उद्ध्वस्त झाली होती.ह्यांना बघून मला असे वाटले की जवळपास नक्कीच कुठेतरी एखादी विहीर किंवा पाण्याचे स्रोत असावे.थोडे शोधल्यावर मला एक ओहोळसुद्धा दिसले, पण आता ते कोरडे होते. तिथेच थोडा वेळ आराम करायचा विचार केला.माझ्याकडील पाणी संपले होते आणि गळा अगदी कोरडा पडला होता. गावाच्या एका कोपर्‍यात एक भग्न मंदिरपण दिसले. पण आता तिथे कोणी राहत नव्हता.


जूनचा महिना होता. सूर्याच्या उष्णतेने जमीन तापली होती.जोरात सुटलेल्या वार्‍याने धुळीचे वादळ घोंघावत होते. अशा निराशादायी वातावरणाला मी जास्त वेळ सहन करू शकलो नाही.मी एक अरुंद पायवाट पकडली आणि चालता झालो.


पाच तास सतत चालल्यावरसुद्धा मला कुठेच पाणी मिळाले नाही.आता तर माझी पाण्याची आशाच लोपली होती.चारी बाजूंना कोरड्या धरतीवर उगवलेल्या काटेरी झुडुपांखेरीज काहीच नव्ह्ते.या भयाण शांततेत मला दूर एका काळ्या सावलीसारखे काहीतरी दिसले.मला दूरुन ते एका झाडासारखे भासले आणि मी त्याच्याकडे जाऊ लागलो.जवळ गेल्यावर तो एक मेंढपाळ निघाला.त्याच्या आजूबाजूला ३० मेंढ्या जमिनीवर बसल्या होत्या.


त्याने भोपळ्याच्या पात्रातून मला पाणी पाजले आणि थोड्या वेळात तो मला आपल्या घरी घेऊन गेला.तो एका खोल नैसर्गिक विहीरीतून पाणी शेंदायचा.


तो माणूस मितभाषी होता.तो अगदी एकटाच राहायचा आणि त्याच्याशी बोलणारा कोणीच नसल्यामुळे असे असावे कदाचित. पण त्याचा आत्मविश्वास बघून असे वाटायचे की तो आपल्या कामात अगदी निपुण आहे.या ओसाड निर्जन भागात त्याची भेट होण्याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. तो एका पक्क्या घरात राहायचे जे त्याने त्या भागातल्या दगडांपासून स्वतः बांधले होते. घराची छत मजबूत होती.छताला वारा आदळून घोंघावणारा आवाज करायचा.


घरात सगळ्या वस्तू व्यवस्थित मांडल्या होता. भांडी घासून-पुसून लख्ख ठेवली होती आणि आणि फ़रशी स्वच्छ होती. एका कोपर्‍यात धारदार कुर्‍हाड ठेवली होती. चुलीच्या मंद आचेवर एक पातेले ठेवले होते आणि ज्यात खिचडी शिजत होती.आपल्या कोटावर त्याने इतक्या निपुणतेने ठिगळ लावले होते की ते लक्षातही येत नव्हते.त्याने मलापण खिचडी खायला दिली. जेवण झाल्यावर मी सिगारेट पेटवली आणि एक त्यालापण दिली. तो म्हणाला की तो सिगारेट पीत नाही. त्याचापाशी एक केसाळ कुत्रापण होता. पण तोसुद्धा आपल्या मालकाप्रमाणेच गप्प राहायचा.


पहिल्याच भेटीनंतर मला असे वाटले की त्याने रात्री थांबायची मला परवानगी दिली आहे.कारण पुढचे गाव सुमारे दीड दिवस दूर होते, त्यामुळे माझ्या दमलेल्या पायांना आराम देणेच जास्त चांगले होते.या डोंगराळ भागात दूर-दूर वसलेल्या काही छोट्या-छोट्या वस्त्या होत्या.ह्या वस्त्या आपापसांत कच्च्या रस्त्याने जुळल्या होत्या.या वस्त्यांमधे राहणारे लोक लाकडापासून कोळसा बनवण्याचा उद्योग करायचे.कोळश्याच्या धंद्यामुळे आसपासची सगळी वनराई नष्ट झाली होती. निर्दयी वार्‍याला थांबवणारे एकही झाड आता उरले नव्हते.टेकड्यांवर सदैव धुळीचे वादळ नाचायचे. कोळश्याच्या धंद्यात आता जास्त फायदा नव्हता. कोळश्याला गाडीने शहरात पोचवायला दोन दिवस लागायचे. बदल्यात दलाल जो पैसा द्यायचे त्याने क्वचितच घर चालायचे.कर्ज, रोगराई, नापिक,ओसाड जमीनीमुळे कोळश्याचा धंदा करणारी कुटुंबंसुद्धा आता मरणपंथाला लागली होती.


जेवणानंतर मेंढपाळाने एक छोटी पिशवी उचलली आणि त्यातील सार्‍या बिया मेजावर विखुरल्या.मग तो खूप काळजीपपूर्वक त्यांचे निरीक्षण करू लागला.तो एका-एका बिजाला उचलायचा,पारखायचा आणि मग त्यांतल्या चांगल्या बियांना तो वेगळे ठेवायचा.मी सिगारेटचा एक झुरका घेतला आणि विचार केला की त्याला बिया निवडण्य़ाच्या कामी थोडी मदत करावी. पण तो म्हणाला की, हे काम तो स्वतःच करेल.तो ज्या उत्कटतेने आणि एकाग्रतेने आपले हे काम करत होता ते बघून मलासुद्धा माझे हे नाक खुपसणे आवडले नाही. आम्हा दोघांत एकूण एवढेच बोलणे झाले. बियांना वेगळे केल्यावर तो चांगल्या बियांचा १०-१० चा समूह बनवू लागला. समूह बनवतांना तो बियांना खूपच काळजीपूर्वक निरखायचा. त्यातल्या जराही डागाळलेल्या किंवा भेगा पडलेल्या बियांना तो वेगळे करायचा.अशाप्रकारे त्याने शंभर बिया निवडल्या, त्या एका पिशवीत टाकल्या आणि तो झोपी गेला.


मला कळेना पण मला ह्या इसमासोबत खूप शांती लाभत होती.दुसर्‍या दिवशी सकाळी मी त्याला विचारले की मी त्याच्या घरी अजून एक दिवस आराम करू शकतो काय. त्याने चटकन होकार दिला.त्यानंतर तो पुन्हा आपल्या कामात व्यग्र झाला. आता पुढे अजून कुठल्या संवादाची आवश्यकता नव्हती. पण माझ्या मनात कुतुहल जागे होत होते आणि मी त्या मेंढपाळाची जीवनगाथा ऐकायला उत्सुक होतो.


सर्वप्रथम त्याने त्या निवडलेल्या बियांना एका पाण्याच्या भांड्यात भिजू टाकले.मग त्याने मेंढ्यांचे कुंपण उघडले आणि त्यांना तो कुरणाकडे नेऊ लागला.मी बघितले की त्याच्याजवळ लाकडी काठीऐवजी पाच फ़ूट लांब लोखंडी काठी होती. काठी माझ्या अंगठ्याइतकी जाड असेल. मीदेखिल गुपचुप मेंढपाळाच्या मागे जाऊ लागलो. मेंढ्यांचे कुरण खाली खोर्‍यात होते. थोड्या वेळात मेंढ्यांना आपल्या केसाळ कुत्र्याच्या देखरेखीखाली सोडून तो स्वतः डोंगरावर माझ्याकडे आला. मला वाटले माझ्या या लुडबुडीने तो चिडेल. पण त्याने असे काही केले नाही. त्याने आपला रस्ता धरला आणि माझ्यापाशी करायला काहीच नसल्याने मीसुद्धा त्याच्या मागे-मागे जाऊ लागलो. तो अंदाजे १०० फुट दूर एका टेकडीवर चढला. तिथे त्याने लोखंडी काठीने जमीन खोदून खड्डा खणला. त्यात त्याने एक बी पेरले आणि खड्डा मातीने भरला. तो देशी झाडांच्या बिया पेरत होता. मी त्याला विचारले की, काय ही जमीन त्याच्या मालकीची आहे. त्याला ती जमीन कोणाच्या मालकीची आहे हेसुद्धा ठाऊक नव्हते. कदाचित ती गावाची सार्वजनिक जागा असेल वा अशा श्रीमंतांची ज्यांना या जमिनीची काहीच चिंता नसेल. जमिनीचा मालक कोण आहे हे जाणण्यात त्याला रस नव्हता. त्याने त्या शंभर बियांना अगदी प्रेमाने पेरले.


दुपारच्या न्याहारीनंतर तो बिया पेरण्याच्या आपल्या कामात परत व्यग्र झाला. कदाचित मी आपला प्रश्न परत परत विचारला असेल, कारण मला शेवटी त्याच्याविषयी थोडी माहिती नक्कीच मिळाली. मागील तीन वर्षांपासून तो त्या निर्जन भागात झाडांच्या बिया पेरत होता. आतापर्यंत त्याने एक लक्ष बिया पेरल्या होत्या. या एक लक्ष बियांमधून फ़क्त वीस हजारच अंकुरली होती.त्याला वाटायचे की या वीस हजार रोपट्यांपैकी अर्धेच वाचतील. अर्धे एखाद्या नैसर्गिक संकटाचे बळी जातील वा उंदीर त्यांना कुरतडतील. पण जिथे आधी काहीच उगवत नव्हते तिथे आता किमान दहा हजार वृक्षतरी उभे राहतील.


हे सगळे ऐकून मी त्या माणसाच्या वयाचा अंदाज लावू लागलो. तो नक्कीच पन्नाशीच्या वरच्या असावा.त्याने मला स्वतःच सांगितले की तो ५५ वर्षांचा आहे.एके काळी खोर्‍यात खालच्या क्षेत्रात त्याची शेती होती.मग अचानक त्याच्या एकुलत्या एका मुलाचे आणि मग त्याच्या पत्नीचे निधन झाले.या घटनांनी त्याला जबर मानसिक धक्का बसला होता. तेव्हापासून तो एकांतासाठी आपला कुत्रा आणि मेंढ्यांसोबत इकडे आला.त्याचे म्हणणे होते की झाडांविना जमीन हळूहळू मरत आहे.त्याच्यापाशी इतर कोणतेही महत्त्वाचे काम नसल्याने त्याने धरणीची ही दुरावस्था दूर करण्याचा निश्चय केला.


मी त्या काळी तरुण होतो आणि एकटाच भटकंतीसाठी निघालो होतो, त्यामुळे मी त्याच्या निर्णयाचे मर्म थोडे समजू शकलो. पण माझे तारुण्य एका सुखी भविष्याच्या शोधात होते.मी त्याला म्हटले की तीस वर्षानंतर त्याचे हे दहा हजार झाडांचे दृश्य भव्य दिसेल. माझ्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याने अगदी सहज उत्तर दिले की जर देवाने त्याला तेवढे आयुष्य दिले तर तो पुढच्या तीस वर्षांत इतके वृक्ष लावेल की ही दहा हजार झाडे समुद्रात पाण्याच्या एखाद्या थेंबासारखे दिसतील.


याव्यतिरिक्त तो काही फळझाडांच्या लागवडीचे प्रयोग करत होता व त्यासाठी त्याने आपल्या घराबाहेरच एक रोपवन बनवले होते.काही झाडांना त्याने काटेरी कुंपण लावून मेंढ्यांपासून सुरक्षित ठेवले होते.ती रोपे खूप छान वाढत होती.दरीत लावायला म्हणून त्याने बर्चची निवड केली होती कारण तिथे जमिनीच्या थोड्याच खाली ओलावा होता.


दुसर्‍या दिवशी मी त्याचा निरोप घेतला.


पुढच्या वर्षी १९१४ चे प्रथम महायुद्ध सुरु झाले; जिथे मी पुढची पाच वर्षे लढत राहिलो.सैन्याच्या एका जवानाला झाडांबद्दल विचार करायला वेळ तो काय मिळणार.खरे सांगायचे तर त्या घटनेने माझ्या मनावर फारसा प्रभाव टाकला नव्हता.माझ्या लेखी त्याच्या या मोहिमेला एका छंदाएवढेच महत्व होते. उदा. टपाल-तिकिटे गोळा करणे; आणि त्यामुळे मी ते विसरलोही होतो. युद्ध संपले होते आणि मला बऱ्यापैकी पैसा आणि सुट्टी मिळाली. मी विचार केला की चला जरा मोकळ्या शुद्ध हवेत श्वास घ्यावे.फक्त याच उद्देशाने मी परत एकदा त्या ओसाड रानात भटकायला निघालो.त्या भागात काही बदल झाला नव्हता.पण, त्या ओसाड गावाच्या पलीकडे मला दूरवर डोंगरमाथ्यावर गालीच्याप्रमाणे पसरलेले धुके दिसले.आता माझ्या मनात त्या झाडे लावणाऱ्या मेंढपाळाच्या आठवणी ताज्या होऊ लागल्या होत्या. "दहा हजार झाडे" मी विचार केला, " खरंच खूप जागा घेतात. "


मी युद्धात अगणित लोकांना मरतांना बघितले होते.त्यामुळे तो मेला असेल ही कल्पना करणे फारसे कठीण नव्हते.विशेषतः विशीतले तरुण तर हाच विचार करतात की हाताशी इतर काम नसलेला पंचावन्न-साठ वर्षांचा म्हातारा मरणारच.


पण तो मेला नव्हता. खरे तर तो एकदम ठणठणीत होता.त्याने काम बदलले होते.आता त्याच्याकडे फक्त चारच मेंढ्या होत्या पण मधमाशांचे शंभर पोळे होते.त्याने मेंढ्या पाळणे सोडले कारण त्या रोपट्यांना खातील ही एक भीती होती. त्याने सांगितले (आणि मी स्पष्टपणे बघितलेही ) की युद्धाचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता आणि सातत्याने झाडे लावत होता.


१९१० ला लावलेली झाडे आता दहा वर्षांची झाली होती आणि आम्हा दोघांपेक्षा उंच झाली होती . ते दृश्य अगदी भान हरपणारे होते.मी निशब्द झालो होतो आणि तो तसाही अबोलच होता, आम्ही दोघे त्या जंगलात दिवसभर शांतपणे भटकत राहिलो. तीन भागांत विभागलेले ते जंगल अकरा किलोमीटर लांब आणि चार किलोमीटर रुंद होते. हे सगळे त्या अशिक्षित मेंढपाळाच्या दोन हातांच्या कठोर परिश्रमाचे आणि दृढनिश्चयाचे फळ होते; आणि त्याने हे कोणत्याही तांत्रिक साधनांच्या मदतीविना केले होते. ह्यावरून लक्षात येईल की, जर माणसाने मनात आणले तर युद्ध आणि विध्वंसाचा मार्ग सोडून, तोसुद्धा देवासारखेच सुंदर जग निर्माण करू शकतो.


तो जगात घडणाऱ्या घडामोडींकडे पूर्ण दुर्लक्ष करत आपले स्वप्न साकार करत होता. हवेत सळसळणारे , माझ्या खांद्याएवढे उंच, नजर पोहचेल तिथवर दिसणारे बीचचे वृक्ष ह्याची साक्ष देत होते. पाच वर्षांपूर्वी लावलेले काही देवदार त्याने मला दाखवले. त्यावेळी, १९१५ ला मी युद्धात लढत होतो. त्याने ही झाडे दरीत लावली होती, जिथे जमिनीत बराच ओलावा होता. एखाद्या तरुणीप्रमाणे कोमल अशा त्या झाडांनी जमिनीवर छान आच्छादन केले होते.


वृक्षारोपणामुळे ह्या ओसाड माळरानात एक नवे चैतन्य आले होते. अनेक चांगल्या बदलांच्या मालिकेची ही नांदी होती. पण हे सर्व बघायला त्याच्यापाशी वेळ नव्हता. तो आपले काम निर्धाराने करण्यात व्यग्र होता. पण परत येतांना मला गावाजवळ काही झर्‍यान्तुन वाहणाऱ्या पाण्याची खळखळ ऐकू आली. किती काळापासून हे झरे कोरडे पडले होते हे त्या देवालाच ठाऊक ! वृक्षारोपणाने सुरु केलेल्या बदलांच्या मालिकेतला हा सर्वाधिक प्रभाव पाडणारा बदल होता. कोणी एके काळी ह्यांतून नक्कीच पाणी वाहत असावे. भग्नावस्थेत असणार्‍या ज्या गावांचा उल्लेख मी पूर्वी केला होता, ती गावे कधीकाळी ह्यांच्याच किनार्‍यावर वसली असावीत.


वारा आपले बीज- प्रसारणाचे काम चोख बजावत होता. वार्‍याने बिया दूर-दूर पसरल्या जात होत्या. पाणी पुन्हा वाहू लागण्याने किनार्‍यावर विविध प्रकारची रोपटी आणि गवत उगवले होते. जमिनीखाली झोपलेल्या बिया आता जाग्या झाल्या होत्या. रानफुले त्यांच्या रंगीबेरंगी डोळ्यांनी आकाशाकडे बघत होती.आता जीवन जगायला एक अर्थ गवसला होता. पण हा बदल अगदी हळुवार आणि नैसर्गिक गतीने झाला होता त्यामुळे आश्चर्यचकित करणारा वाटत नव्हता. ससे आणि रानडुकरांच्या शिकाऱ्यांनी हा हिरव्या कौतुकाचा पूर बघितला होता खरा, पण त्यांनी ह्याला पृथ्वीचा नैसर्गिक वेडेपणा समजून दुर्लक्ष केले होते. त्यामुळेच मेंढपाळाच्या कामात कोणी ढवळाढवळ केली नव्हती. जर त्याला कोणी पहिले असते तर नक्कीच त्याला विरोध केला असता. पण त्याला शोधणे खूप कठीण होते. शासनात किंवा शेजारच्या गावांमध्ये कुणीच हा विचार करू शकत नव्हता की, हे विशाल जंगल कुणीतरी स्वतःच्या हाताने लावले होते.


ह्या जगावेगळ्या व्यक्तीच्या स्वभावाचा जर तुम्हाला अगदी योग्य अंदाज घ्यायचा असेल तर हे लक्षात घ्या की, हा अगदीच एकता, एका वैराण भागात आपले काम करत होता. इतका एकाकी की शेवटी - शेवटी तो बोलणेसुद्धा विसरला. कदाचित त्याच्या लक्षात आले असावे की, त्याला शब्दांची गरजच उरली नव्हती.


१९३३ ला पहिल्यांदा त्याला एक वनाधिकारी भेटला. त्याने त्या मेंढपाळाला त्या आदेशाची जाणीव करून दिली ज्याअन्वये जंगलाच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची वस्तू पेटवण्यास बंदी आणली होती कारण ज्वलनशील पदार्थांनी ह्या नैसर्गिक जंगलाला धोका होता. ह्या वनाधिकार्‍याने मेंढपाळाजवळ आश्चर्य प्रकट केले की तो पहिल्यांदाच एखादे जंगल स्वतःहून वाढतांना बघत होता. त्यावेळी तो मेंढपाळ आपल्या घरापासून सुमारे १२ किमी. दूर काही बीच वृक्ष लावायचा विचार करत होता. एवढे अंतर रोज येणे-जाणे करण्याऐवजी तिकडेच घर बांधायचा त्याने विचार केला. पुढच्या वर्षी त्याने तेथे आपले छोटेखानी दगडी खोपटे बांधले आणि तो नव्या घरी राहायला गेला.


१९३५ ला त्या "नैसर्गिक वनाचे" निरीक्षण करायला एक मोठी शासकीय समिती आली. वन खात्याचे मोठे अधिकारी, उपाधिकारी आणि काही तंत्रज्ञ आले होते. त्यांनी नेहमीचीच निरर्थक बडबड केली.त्या निरर्थक चर्चेने इतर कोणता लाभ तर झाला नाही, पण एक मात्र झाले, ते सगळे क्षेत्र "सुरक्षित वन क्षेत्र " म्हणून घोषित करण्यात आले. त्याचा एक फायदा हा झाला की, लाकडापासून कोळसा बनवण्याच्या उद्योगावर बंदी आली. ह्या जंगलाच्या सुंदरतेने प्रभावित झाल्याविना राहता येत नव्हते. ह्या सुंदरतेने शासकीय अधिकाऱ्यांचेही हृदयपरिवर्तन केले होते. निरीक्षण समितीचा एक सदस्य माझा मित्र होता. जेव्हा मी त्याला जंगलाचे खरे रहस्य सांगितले तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. पुढच्याच आठवड्यात आम्ही दोघे त्या मेंढपाळाला भेटायला गेलो. तो आपल्या कामात व्यग्र होता. ही जगा निरीक्षणाच्या जागेपासून सुमारे १० किमी दूर होती.


तो वनाधिकारी असाच माझा मित्र बनला नव्हता. तो एक भला माणूस होता आणि चांगल्या कामाचा आदर करायचा. आपल्या तोंडाला कुलूप केव्हा लावायचे हे त्याला कळायचे. मी मेंढपाळाला भेट म्हणून सोबत आणलेली अंडी दिली. तिघांनी सोबत बसून जेवण केले. मग आम्ही तासनतास ती सुंदरता न्याहाळत भटकलो.


ज्या दिशेने आम्ही आलो होतो त्या डोंगरउतारावर लावलेली झाडे आता २०-२५ फुट उंच झाली होती. मला स्पष्ट आठवते की, १९१३ ला हीच जमीन अगदी नापीक आणि निष्प्राण होती. मानसिक शांती, कठोर परिश्रम, डोंगरावरची फुप्फुसांना तरुण करणारी स्वच्छ हवा आणि साधे-सात्विक जेवण ह्यामुळे त्या मेंढपाळाला उत्कृष्ट आरोग्य लाभले होते. या धरतीवर तो कदाचित देवदूत होता. मी फक्त विचार करत राहिलो की, हा अजून किती एकर जमिनीवर झाडे लावेल.


निरोप घेण्यापूर्वी माझ्या मित्राने मातीचे परीक्षण करून काही विशिष्ट जातींची झाडे लावायचा सल्ला दिला, पण त्याने आपल्या सल्ल्यावर फारसा जोर दिला नाही. नंतर तो मला म्हणाला, " माझ्या आग्रह न करण्यामागे एक चांगले कारण आहे, तो मेंढपाळ झाडांविषयी माझ्याहून अधिक जाणतो. " तासभर चालल्यावर माझा मित्र परत मला म्हणाला, " तो माणूस कदाचित झाडांविषयी या जगात सगळ्यांपेक्षा जास्त जाणतो. महत्त्वाचे म्हणजे त्याने आनंदी राहण्याचा एक अद्भुत मार्ग शोधला आहे. "


त्या अधिकार्‍यामुळेच जंगल सुरक्षित राहू शकले आणि मेंढपाळाचा आनंदही! त्या अधिकार्‍याने जंगलाच्या सुरक्षेसाठी तीन वनरक्षक नेमले. त्यांच्यावर अशी जरब बसवली की, कोळश्याचा धंदा करणाऱ्यांकडून मिळणाऱ्या दारूच्या लाचेपासून ते दूर राहावेत.


फक्त १९३९ च्या युद्धादरम्यान या कामाला गंभीर धोका पोहचला होता. वाहने त्या काळी gazogenes वर ( लाकडे किंवा कोळसा जाळून चालणारे जनित्र, जनरेटर) चालू लागली होती. त्यामुळे लाकडे कधीच पुरेशी नसत. १९१० ला लावलेल्या ओकच्या जंगलात लाकूडतोड सुरु झाली होती, पण तो भाग कोणत्याही रेल्वेमार्गापासून एवढा दूर होता की, हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरला. त्यामुळे त्यांना लाकूडतोड सोडावी लागली. मेंढपाळाला ह्या घटनेची गंधवार्ताही मिळाली नाही. तो ३० किमी दूर, शांतपणे काम करत राहिला. ज्याप्रमाणे त्याने १९१४ चे युद्ध दुर्लक्षिले होते, त्याचप्रमाणे ३९ च्या युद्धाकडेही त्याने दुर्लक्ष केले होते.


जून, १९४५ ला मी त्या म्हातार्‍या मेंढपाळाला शेवटचे भेटलो. तेव्हा त्याचे वय ८७ होते. मी त्या ओसाड भागाच्या मार्गावरूनच आपला प्रवास सुरु केला. युद्धाने बरेच नुकसान केले असले तरी ह्या मार्गावर बस धावतांना बघून मला आश्चर्य वाटले. किंबहुना बसने प्रवास करतांना मला माझ्या पूर्वीच्या प्रवासातली कित्येक स्थळे ओळखतही आली नाहीत. मला असे वाटले की, जणू एका नव्याच भागात हा मार्ग घेऊन जातोय. जेव्हा मी त्या गावाचे नाव वाचले जे कधीकाळी भग्न आणि निर्जन होते, तेव्हाच मी योग्य ठिकाणी पोहचलो असल्याची खात्री पटली.


मी त्या गावी उतरलो. १९१३ ला १०-१२ घरांच्या ह्या वस्तीत फक्त तिघे राहायचे. ते गरिबीने ग्रासलेले निराश जीव होते, एकमेकांचा द्वेष करायचे, शरीराने आणि मनाने थकलेले, आदिम युगातले जीवन जगायचे. भग्न घरांवर काटेरी झुडपांचे राज्य होते. त्यांची परिस्थिती आशेपलीकडे बिघडलेली होती. या निराश जीवनातून मुक्तीसाठी मृत्यूची वाट बघणे हेच त्यांच्या हाती होते.


सगळे बदलले होते. अगदी हवेतला बदलही प्रफुल्लीत करणारा होता. गरम, कठोर वार्‍याच्या माराऐवजी आता मंद, थंड आणि सुगंधी वाऱ्याची झुळूक वाहत होती. पाण्याच्या प्रवाहाचा वाटावा असा आवाज डोंगरावरून येत होता, तो खरेतर रानवारा होता. माझ्या आश्चर्याला पारावर उरला नाही जेव्हा मी छोट्याश्या तळ्यात पडणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकला. मी बघितले की एक कारंजा बांधण्यात आला होता, थुइथुइ कारंजी उडत होती. एक हृदयस्पर्शी दृश्य बघितले - कुणीतरी कारंज्याच्या बाजूला सोनचाफा लावला होता. या रखरखत्या वाळवंटात जीवन पुन्हा परतल्याचे प्रतिक हे ४ वर्षांचे सोनचाफ्याचे झाड होते.


गावाकडे बघून वाटायचे की, तिथल्या रहिवाश्यांच्या मनात एका उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आहे. त्यांच्या मनात एक नवी आशा जागी झाली होती. पडक्या घरांना मोडून पाच घरांची दुरुस्ती करून पक्के करण्यात आले होते. गावात आता २८ लोक राहायचे ज्यांत चौघे नवविवाहित जोडपेसुद्धा होते. नव्या घरांची नुकतीच रंगरंगोटी झाली होती आणि त्यांच्याभोवती छोट्या छोट्या बागांत पालेभाज्या, फुले जोमात वाढत होती. कुठे गुलाब, कुठे कोबी, कुठे शेंगा, नाना प्रकारच्या भाज्या, फुले-फळे होती. कोणालाही राहायची इच्छा व्हावी, असे ते गाव आता झाले होते.


महायुद्ध नुकतेच संपले होते त्यामुळे जीवनाचे गाड़े अजून सुरळीत चालायचे होते, पण इकडे जीवनात चैतन्य होते. डोंगरउतारावर मी जवाचे आणि बाजरीचे शेत पहिले. खाली चिंचोळ्या दरीत कुरण हिरवे होत होते.


फक्त आठ वर्षांतच या भागात आरोग्य आणि भरभराटीचे वातावरण आले होते. १९१३ ला जेथे भग्नावशेष होते, तेथे आता हिरवे शेत हसत होते. लोक आता सुखी आणि आनंदी होते. कधीकाळी कोरडे असलेले ओहोळ आता डोंगरावरून येणार्‍या वितळलेल्या बर्फाच्या पाण्याने खळाळत होते. छोट्या छोट्या कालव्यांनी हे पाणी शेतांना पुरवले जात होते. शेतांवर वेगवेगळ्या झाडांची प्रेमळ सावली होती. हळूहळू पूर्ण गावाचा कायापालट झाला होता. मैदानी भागात जमिनी महागल्या होत्या.त्यामुळे लोक इकडे वसू लागले. ते आपल्यासोबत नवा उत्साह आणि झळाळी, धाडसी वृत्ती घेऊन आले होते. रस्त्यावर तुम्हाला असे स्त्री-पुरुष, मुले-मुली भेटायचे ज्यांच्या चेहर्‍यावर हास्य होते, डोळ्यांत नवे तेज होते. जर इथली लोकसंख्या मोजायची तर या १० हजार लोकांच्या आनंदाचे श्रेय फक्त त्या एकट्या निरक्षर मेंढपाळाला जाते.


जेव्हा मी विचार करतो की, ही सगळी कायापालट फक्त एका माणसाच्या मानसिक आणि शारीरिक श्रमाने घडली आहे, तेव्हा मी नतमस्तक होतो. एका साधारण माणसाने एकट्यानेच ह्या ओसाड माळरानावर चैतन्य फुलवले होते. जेव्हा हा सगळा विचार मनात येतो, तेव्हा सगळ्या त्रासदायक गोष्टींना बाजूला सारून, मानवतेवरचा माझा विश्वास अजूनच दृढ होतो. त्या निरक्षर पण महान माणसाच्या जीवनातून मी एक धडा मात्र शिकलो, - जर माणसाने मनात आणले तर पृथ्वीवर राहूनच तोसुद्धा देवाच्या तोडीचे महान कार्य करू शकतो.


१९४७ ला एका झाडाखाली त्या मेंढपाळाने शांतपणे डोळे मिटले. 




 ( समाप्त )

______________________________________________________

ही कथा खाली दिलेल्या दुव्यावर वि-पुस्तक( e-book) स्वरूपात वाचू शकता आणि मोफ़त डाउनलोड करू शकता.



टिप्पण्या

  1. >> पुढे माहित झाले की मीच नव्हे तर जगात शेकडो लोक ह्या कथेने प्रभावित झाले आहे

    सहमत. काही वर्षांपूर्वी या कथेचा इंग्रजी अनुवाद एका फिरत्या मेलद्वारे माझ्या मेलबॉक्सात आला होता. तेव्हा ती कथा वाचून मीही प्रचंड प्रभावित झालो होतो. इनिशिएटिव्ह घेऊन मराठी अनुवाद केल्याबद्दल धन्स !! मस्तच ...

    उत्तर द्याहटवा
  2. एक माणूस मनात आणले की काय 'निर्माण' करू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे ..

    उत्तर द्याहटवा
  3. "हाबार्स " हेरंबा !
    ही कथा आहेस अशी प्रभाव पाडणारी !

    उत्तर द्याहटवा
  4. सविताताई , अगदी मनातले बोललात ! दंडकारण्य चळवळीचे प्रेरणास्रोत ही कथाच आहे .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय