’सोपा’ उपाय ??
’फुकट ते पौष्टिक’ च्या ’पिपा’सेला आळा घालणारा ’सोपा’ उपाय
आंतरजालामुळे माहितीची देवाणघेवाण करणे जितके सहज-सुलभ झाले तितके याआधी कधीच नव्हते. ’माहिती’च्या व्याख्येखाली चित्रपट, संगीत, पुस्तके, लेख, संशोधन प्रबंध सारेच आले. माहितीचा मुक्त स्रोत ही आंतरजालाचे नवी ओळख बनली. ’फ़ुकट ते पौष्टिक’ आणि ’जे जे आवडे आपणाला, ते ते द्यावे मित्रांना’ म्हणत जालावर कॉपीराईटेड माहितीच्या अपलोडिंग-डाउनलोडिंगचा सिलसिला सुरू झाला. पिअर-टू-पिअर शेअरिंगच्या तंत्रज्ञानाने तर क्रांतीच आणली. टॉरेंट संकेतस्थळांचा सुळसुळाट झाला. जागतिक चित्रपट, आजोबांच्या तोंडून फ़क्त ऐकलेले त्यांच्या काळातले चित्रपट, जुन्या मालिका सगळे टॉरेंट्सच्या माध्यमातून सहज मिळू लागले. शेकडोंनी असलेल्या संगीत-संकेतस्थळांमुळे हवी ती गाणी हव्या त्या वेळी ऐकण्याची, डाउनलोड करून संग्रही ठेवण्याची सोय झाली. इ-बुक्स डाउनलोड करून लोकांनी आपली वाचनाची भूक भागवण्याचा प्रयत्न केला. इंजिनीअरिंगला असतांना १-२ विषयाची पुस्तकं जेव्हा ऐन परिक्षेच्या तोंडावर मिळाली नाहीत( हो, आम्ही इंजिनिअर्स तहान लागली की विहीर खणतो, पेपर २ दिवसांवर आला की पुस्तके मिळवण्यासाठी धावाधाव करतो. ) तेव्हा अस्मादिकांनी त्या विषयांची इ-बुक्स डाउनलोड करून पेपर काढला. एखाद्या विषयाची अधिक माहिती हवी असली की नकळत विकिपिडीआ उघडले जाऊ लागले.
पण हा सगळा माल कॉपीराइटेड होता. ह्यावर कोणाची तरी मालकी होती. त्यांच्या परवानगीविना आम्ही तो माल वापरून चोरी करत होतो. वेगवेगळ्या पुस्तकांतले, बातम्यांचे संदर्भ देऊन एखादा विषय उकलून काढणारा विकीपेडिआ चोरी करत होता, कारण ती माहिती वापरायला त्यांनी परवानगी घेतली नव्हती. ’युजर जनरेटेड कंटेन्ट’ असणार्या साइट्सवरतर सगळाच आनंदीआनंद होता, इथे मोठ्या प्रमाणावर कॉपीराइटेड मजकूर शेअर केला जात होता, वापरला जात होता. या सगळ्या प्रकाराला ह्या मालाच्या मालकांनी विरोध केला. ह्यात प्रामुख्याने चित्रपट निर्माते आणि संगीत कंपन्या होत्या. आमचा माल चोरी होतोय, आमचा धंदा बुडतोय असा कंठशोष करायला ह्यांनी सुरुवात केली.पुस्तकांची पायरसी होतेय आणि त्यामुळे त्यांच्या पुस्तकांचा खप मंदावलाय. ही कंटेन्ट पायरसी म्हणजे दरोडेखोरीच आहे जणू. ह्याला आळा जर घालायचा असेल तर एखादा कठोर, सशक्त कायदा असावा जेणेकरून ह्या पायरसीला पूर्ण आळा बसेल अशी मागणी ह्या मनोरंजन उद्योगाच्या लॉबीइस्टसनी केली. एखाद्या गोष्टीवर बंधने लादायला कायदे करण्याइतका सोपा उपाय नाही ना ! आठवा चीनने लादलेली ’एक मूल’ पॉलीसी !
खरंच जालीय पायरसीची बाजू इतकी काळी ??
राशोमोन, कॅसाब्लांका, दि बायसिकल थिफ़, 12 ऍंग्री मेन या सगळ्या सिने्मांमध्ये समान दुवा कोणता आहे ? ह्या सगळ्याच जुन्या, अजरामर अप्रतिम कलाकृती आहेत. ह्या सगळ्या चित्रपटांची नावे मला कॉलेजला असतांना कळली होती आणि त्या काळातच मी बघितली होती. मी इंटरनेटचा वापर त्या काळातच सुरु केला होता हा निव्वळ योगायोग नाही. कदाचित हे सिनेमे हळूहळू विस्मृतीत गेलेही असते, पण आंतरजालाची कृपा म्हणा, ह्या सिनेमांच्या लोकप्रियतेत उलट दिवसेंदिवस वाढच होत आहे, अधिकाधिक लोक डाउनलोड करून बघताहेत, आंतरजालीत चर्चास्थळांवर चर्चा रंगताहेत आणि ह्या सिनेमांच्या डिवीडीचा खपसुद्धा वाढलाय. अनेक जागतिक चित्रपट , मालिका , संगीत ,कलाकृती, ज्या कदाचित त्या-त्या देशांपुरत्याच मर्यादित राहिल्या असत्या, त्यांचा आस्वाद आता कोणीही घेऊ शकतो. त्या कलाकारांना वाखाणले जाते, त्यांच्याबद्दल ब्लॉगवर भरून लिहीले जाते, त्यांच्या पुढच्या कलाकृतींची आतुरतेने वाट पाहिली जाते, त्यांची लोकप्रियता शिखराला पोहचते. हे याआधी कितपत शक्य होते ? बोस्नियात बनलेला एक चित्रपट भारतातल्या एका छोटेखानी शहरातला व्यक्तीसुद्धा बघत आहे आणि ह्यासाठी त्याला कुठल्याही आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला महागडे तिकीट देऊन हजेरी लावायची गरज नाही. कलाकाराची खरी कमाई त्याच्या निर्मीतीला मिळालेली दिलखुलास दाद असते म्हणतात, ती त्याला मिळतेय आणि जागतिक स्तरावर मिळतेय, एखाद्या कलाकारासाठी ह्याहून अधिक आनंदाची गोष्ट काय असणार ? तुमची कलाकृती आंतरजालावर फ़ुकटात वाटली जातेय म्हणजे तुमचे आर्थिक नुकसान होतेय अशातला भाग नाही. आंतरजालामुळे तुमचा सिनेमा जास्त लोकांपर्यंत स्वस्तात , जलद आणि सहज पोहचतो. जर त्या अज्ञात व्यक्तीने यूट्य़ुबवर ’व्हाय धिस कोलावेरी डी’ लिक केला नसता आणि ते वायरल झाले नसते तर मून्ड्र(३) चित्रपटाच्या निर्मात्यांना ते गाणे हाय डेफ़िनिशन विडीओसह यूट्य़ूबवर टाकून वाहत्या गंगेत हात धुण्याची कल्पना सुचली असती का ? पर्यायाने ह्या चित्रपटाला इतकी फ़ुकट प्रसिद्धी मिळाली असती का ? पायरसीचा हा फ़ायदाच नाही का ? नाहीतर इंग्रजी ’अवतार’ किंवा आपले भारतीय ’३ इडिअट्स’ आणि ’रोबो’ नी इतका प्रचंड धंदा केलाच नसता. उलट माझा अनुभव आहे की एखादा सिनेमा जालावर पाहिला, आवडला तर तो थेटरातपण पाहिला जातो किंवा त्याची डिवीडी खरेदी केली जाते. मी ’बोम्मरिल्लू’ हा चित्रपट २०० वेळातरी पाहिला असेल,संवाद पाठ झालेत, पण तरीही मी डीवीडी विकत घेतलीच . हाच नियम संगीत आणि पुस्तकांनासुद्धा लागू होतो; आणि एखाद्या व्यावसायिक उत्पादनालासुद्धा !
जस्टीन बिबर आज एक ’पॉप सेन्सेशन’ आहे ह्याला कारण त्याने कधीकाळी यूट्य़ूबवर स्वत:च्या गायकीचे टाकलेले आणि वायरल झालेले विडीओ नाहीत का ? आता श्रद्धा शर्मा ’भारतीय जस्टीन बिबर”बनण्याच्या मार्गावर आहे ह्याला कारण यूट्य़ुबच !
डॉ. कुमार विश्वास ह्यांच्या ’कोई दिवाना कहता हैं’ ची चित्रफ़ीत(विडिओ) जर वायरल झाली नसती तर किती लोकांना त्यांच्याबद्दल कळले असते ? खरं सांगा, तुमच्यापैकी किती लोकांना ती चित्रफ़ीत पाहण्याआधीच डॉ. कुमार विश्वास ठाऊक होते आणि त्यांचा काव्यसंग्रह तुमच्या संग्रही होता ? आता त्यांच्या संग्रहाच्या आवृत्त्या हातोहात खपत आहेत.
जी.ए. कुलकर्णी प्रसिद्ध आहेत त्यांच्या कथांबद्दल. त्यांचे कथासंग्रह अजूनही विकत घेऊन वाचले जातात. पण त्यांनी ’बखर बिम्मची’ ही त्यांनी एका मुलाच्या दृष्टीकोनातून छोटेखानी आणि सुंदर कादंबरी लिहीली आहे हे बर्याच लोकांना माहीत नसते. मराठी संकेतस्थळांवर आणि ब्लॉग्सवर ह्या पुस्तकाबद्दल लिहीले गेले आणि तिचा खप अचानक वाढला. जर ही कादंबरी जालावर फ़ुकट डाउनलोडिंगला असती तरी लोकांनी पुस्तक विकत घेतलेच असते.
पॉलो कोए’लो हे जगप्रसिद्ध लेखक स्वत:च पायरसीचे समर्थन करतात. ते त्यांच्या पुस्तकांच्या पायरसीला प्रोत्साहन देतात. यामागचे कारण देतांना त्यांनी त्यांच्या ’दि अल्केमिस्ट’च्या रशिअन अनुवादाचे उदाहरण दिले आहे. रशियात ’दि अल्केमिस्ट’च्या वर्षाला साधारण १००० प्रति खपायच्या. कोणीतरी पायरेटेट इ-पुस्तक जालावर टाकले आणि पुस्तकाचा खप वाढतच गेला. मग पॉलो कोए’लो ह्यांनी स्वतःच त्यांच्या पुस्तकांच्या मोफ़त डाउनलोडिंगच्या लिंक्स द्यायला सुरुवात केली. लोक डाउनलोड करतात, वाचतात आणि आवडले तर संग्रही ठेवायला म्हणून मग ते पुस्तक विकत घेतात. माझेच एक उदाहरण देतो. मी जालावर अहमद फ़राज़ ह्यांच्या पहिल्यांदा ग़ज़ला वाचल्या , मला आवडल्या आणि त्या संग्रही असाव्यात म्हणून ’ख़ानाबदोश’ हा त्यांचा दिवान(ग़ज़लसंग्रह) विकत घेतला.
-- आणि विधेयक आले...
एखादी गोष्ट सत्ताधार्यांचे ,बड्या उद्योगपतींचे हितसंबंध बिघडवणारी असेल तर लगेच शासन कायदे करते. ( जनतेच्या हितासाठी कायदा करायला वर्षानुवर्ष जातात ! ) ’ कायदा हा सामान्यांचे जीवन सुखकर व्हावे ह्याकरता असतो ’ आणि ’कायदा पाळणारा नागरिक हाच जबाबदार नागरिक असतो’ हे लहानपणापासून बिंबवले गेल्याने कायद्याला विरोध हा फ़ारसा केला जात नाही. कायदेभंगाच्या गुन्ह्यात अडकण्याची भीती असतेच. जनतेवर बंधने आणायचा, त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालायचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कायदा करणे ! मग आपले हितसंबंध जोपासायला सोयिस्कर कायदे बनवले जातात. बड्या लोकांचे लॉबीइस्ट शासनाकडून आपल्याला सोयीस्कर असे कायदे बनवून घेतात, अस्तित्वात असलेले कायदे बदलले जातात. मी ’अनार्किक समाजाचे’ समर्थन करत नाहीये, पण कायदे जितके जास्त तितके तुम्ही व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला आणता, प्रत्येक कायद्याच्या मागे एक नियंत्रण-व्यवस्था गरजेची असल्याने तुम्ही सारीच शासनव्यवस्था अधिक गुंतागुंतीची करता; कायदे येतात, त्याला पळवाटा येतात, पैसे खाण्याचे नवे मार्ग येतात आणि भरडली जाते सामान्य जनता; आमची बाजू मांडणारा कोणी लॉबीइस्ट नसतो हो ! ज्यांना आम्ही आपले लॉबीइस्ट म्हणून संसदेत पाठवतो तेच आमच्याविरुद्ध काम करतात. आपल्या नकळत एकेक कायदा आपल्या उरावर बसत असतो. किती हा सोपा उपाय !!
व्यक्तीस्वातंत्र्याच्या पंढरीत म्हणजेच ’च्यामारिकेत’ असाच एक कायदा आणण्याचे ’धाडस’ सिनेटर(खासदार) पॅट्रिक लीही ह्यांनी केले. ’PROTECT IP ACT’(PIPA) नावाचे हे विधेयक म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर प्रकार आहे. .( IP म्हणजे Intellectual Property, आपला Internet protocol नाही. हे कसले डोंबलाचे इंटरनेट प्रोटोकॉलला प्रोटेक्ट करताहेत !). मुसीबत आती हैं तो अकेले नहीं आती, अपने रिश्तेदारों को साथ लेकर आती हैं’ या न्यायाने बौद्धिक संपदेच्या सुरक्षिततेसाठी ’पिपा’ चा भाऊ ’सोपा’ 'Stop Online Piracy Act' (SOPA) सिनेटर लॅमार स्मिथ ने आणला.( ह्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली . सहा महिन्य़ांत आंतरजालावर बंधने आणणारी २ विधेयके आल्याने ह्याची प्रेरणा ’अरब स्प्रिंग’मुळे तर मिळाली नाही ना अशी शंका येतेय. अरब स्प्रिंगमुळे जालाच्या ताकदीची ह्यांना चांगलीच चूणूक मिळाली होती.
हंगामा हैं क्य़ूँ बरपा ?
’सोपा’ आणि ’पिपा’ या दोन विधेयकांवरून एवढे रान उठण्याचे कारण काय ? तर ह्यांच्या तरतुदी . ’सोपा’ म्हणतोय की, जर तुम्ही एखादा कॉपीराईटेड मजकूर आपल्या संकेतस्थळावर सहा महिन्यांत किमान दहावेळा दाखवला तर , ते बंद करावे लागेल आणि तुम्ही ५ वर्षे तुरुंगात खडी फ़ोडाल.एक वेब पेज सहा महिन्यांत काय , सहा तासांतच १० पेक्षा जास्त वेळा उघडतो. प्रसिद्ध आणी मोठे संकेतस्थळ असेल तर ६ सेकंदातच ! आणि हे फक्त अमेरिकेतल्याच साईट्सपुरते मर्यादित नाही, तर बाहेरचे डोमेन असले तरी त्यांना अमेरिकन जाहिरातदार जाहिराती देऊ शकणार नाही, त्यांच्याशी कुठलेही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. म्हणे पेपलला , गूगल ऍडवर्ड्सला त्या साईटसोबतचे सगळे व्यवहार बंद करावे लागतील. अगदी सर्च इंजिनलाही त्या साईटला आपल्या सर्च रिजल्ट्समध्ये त्यांना दाखवता येणार नाही. आणि तुमच्या साईटवर एखाद्याने जर कॉपीराईटेड मटेरिअल टाकला तर ह्याबद्दल तुम्हालाच जबाबदार धरले जाईल आणि तुमच्यावर खटला होईल. झाली ना यूट्य़ूब-फ़ेसबुक ची गोची !
’पिपा’नुसार कॉपीराइटचा भंग करण्यार्या अमेरिकेबाहेरच्या डोमेन नेम्सना ब्लॉक करता येईल, सर्च इंजिनला त्या साईटला जाणार्या लिंक्स उडवाव्य़ा लागतील. आयला, माझा ब्लॉगसुद्धा अमेरिकेत ब्लॉक केला जाईल !!

आता उठवू सारे रान ....
ह्या विधेयकाचे प्रामुख्याने चित्रपट निर्माते आणि संगीत कंपन्यांनी समर्थन केले असल्याने ह्या गदारोळाला हॉलीवूड विरुद्ध डॉट कॉम कंपन्यांने रुप आले. १८ जानेवारी हा जालीय इतिहासातलाच नव्हे तर सार्या मानवी इतिहासातला एक अभूतपूर्व दिवस होता म्हणायला हरकत नाही. आतापर्य़ंत जी जालीय आंदोलने झालीत ती आपल्या भौतिक जगातल्या गळचेपीविरुद्धची होती. पण पहिल्यांदाच जालीय अधिकारांसाठी, जालीय स्वातंत्र्यासाठी जालावर आंदोलन झाले. आजपर्यंतचे सर्वात मोठे ब्लॅकाऔट ! हजारो साइट्सनी ज्यात विकीपेडिआसारख्या मोठ्या साइट्ससुद्धा होत्या, त्यांनी किमान १२ तासांसाठीतरी ब्लॅकऔट केले. इतरांनी निषेधाच्या फ़िती लावल्या. गूगलने सोपाचा विरोध करायला डूडल वापरले. मीटअप चे सदस्य रस्त्यावर आले, ’एनोनिमस’ ह्या गटाचे सदस्य ,व्हि फ़ॉर वेंडेट्टा’ च्या नायकाने घातलेला मुखवटा घालून रस्त्यावर आले.त्यांनी जालीय इतिहासातले सर्वात मोठे सिरिअल हॅकिंग केले. एकूणच जर हे विधेयक मंजूर झालेच तर काय होऊ शकते ह्याची झलक मिळाली. शेवती व्हाइट हाउसने पण विधेयकाच्या तरतुदींना विरोध केला. लढ्याला यश मिळाले आणि अनिश्चितकालाकरता हे विधेयक थंड्या बस्त्यात गेले. ह्या आंदोलनाने एक स्पष्ट केले की आम्हीच आमचे लॉबीस्ट आहोत. आम्हाला कोटी रुपये खर्च करून लॉबीस्ट नेमण्याची गरज नाही.
फ़क्त कॉपीराइटेड कंटेन्ट्सच्या अपलोडिंग- डाउनलोडिंगला बंधने येतील म्हणून हे आंदोलन नव्हते, अभिव्यक्ती-स्वातंत्र्याला नख लावायचा प्रकाराविरुद्धचा लढा होता. जालावर लोकांना चेहरा नसतो म्हणतात, पण चेहरा नसला तरी आवाज नक्कीच आहे आणि हा आवाज कोणी दाबू शकत नाही, हे या लढ्याचे तात्पर्य.
कॉपीराइटेड मजकुराच्या वापराला आळा तर घालता येत नाही, मग काय करावे ?
१. पारंपारिक प्रताधिकार कायदा बदला. आजच्या काळात तो चालणारा नाही.
२. चित्रपट, चित्रफ़ीत आणि गाण्यांच्या शेअरिंगवरची बंधने काढावी. आम्ही जेव्हा तुमची कृती शेअर करतो तेव्हा आम्ही तिला लोकप्रियच करत असतो, अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवत असतो. माउथ पब्लिसिटी ही सर्वोत्कृष्ट असते, इथे तुम्हाला जागतिक पातळीवर आणि काही तासांतच मिळते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ती आमच्या नावावर खपवत नसतो, चोरी करत नसतो. ते काम करायला तुमच्या इंडस्ट्रीतच बरेच लोक समर्थ आहेत. जर मी तुमचे गाणे आपल्या आवाजात गाऊन युट्य़ूबवर टाकले किंवा त्या संगीताचा वापर विडंबन गाण्यासाठी केला तर पारंपारिक कायद्यानुसार तो प्रताधिकार कायद्याचा भंग असतो. कालबाह्य कलम आहे हे. मूळ गाणे कोणाचे आहे हे सार्यांनाच माहीत असते. इथेही हे माझेच गाणे, प्रितम ने माझे चोरले असा आम्ही दावा करत नाही. (हां, हाच दावा जर लिथुआनिआतल्या माणसाने केला तर त्यात तथ्य असूही शकते. ) आंतरजालाचा हुशारीने वापर केला तर तुम्ही याचा वापर उत्पन्न वाढवायलासुद्धा करू शकता.
३. ओपन सोर्स सॉफ़्टवेअर्सचा पुरस्कार करा. अधिकाधिक ओपन सोर्स सॉफ़्टवेअर काढा आणि वापरा.
४. कविता,लेख, फ़ोटो ह्या प्रकारात सर्वात जास्त चौर्यकर्म केले जाते. चित्रपट-संगीताच्या बाबतीत श्रेयाची चोरी नव्हती, ती इथे आहे. आपली चित्रे, लेख जर ऑनलाइन असतील तर ती क्रिएटिव कॉमन्सखाली आणा. सर्वाधिकार सुरक्षित नको. म्हणजे त्याला तुमचा मजकूर वापरायला तुमच्या परवानगीची गरज भासणार नाही, फ़क्त तुमच्या नावाचा उल्लेख पुरेसा ठरेल. समजा ते सर्वाधिकार सुरक्षित असले तरी काय कृती करायची हे तुमच्या हातात असल्याने कोणी तुमच्या मजकुराची चोरी केली असेल तर फ़क्त त्याला ’बाबारे ,ते माझे आहे, मला त्याचे श्रेय दे’ हीच मागणी करा. उगाच कोर्टात खेचणे, त्याला मजकूर काढायला सांगणे हे नको. प्रादेशिक भाषांच्या बाबतीत हे करू शकता, पण इंग्रजीच्या बाबतीत असे करणे म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधणे आहे. इथे जालीय संकेत म्हणून कुठलाही लेख , फ़ोटो एखाद्या साइटवरुन घेतला असेल तर त्या साइटची लिंक आणि ’जर’ कलाकाराचे नाव माहीत असेल तर त्याचा उल्लेख करणे ह्याची सवय करा. तेसुद्धा शक्य नसेल तर किमान ’जालावरून साभार’ चे दोन शब्द लिहा. ’जालावरुन साभार’ च्या स्वातंत्र्याच्या समर्थनाचे कारण की, कधीकधी एखादा इंग्रजी लेख तर अगदी २-३ हजार जागी असतो, इथे मूळ लेख/फ़ोटो कुठल्या साईटचा हे शोधणे प्रचंड जिकीरीचे असते, त्यापेक्षा आपण ज्या साईटवरुन उचलले तिचाच उल्लेख करा हवे तर.( जरी लेख मूळचा तिथला नसला तरी.)नाहीतर ’जालावरून साभार’! नव्या प्रताधिकार कायद्यात हे स्वातंत्र्य द्या.
५. इबुक्सच्या डाउनलोडिंगलासुद्धा प्रताधिकार कायद्यातून मुक्त करा. आम्ही इबुक डाउनलोड केले तरी जर पुस्तक आवडले की खरेदी करतोच. स्वत:च्या लेखन-प्रतिभेवर विश्वास असू द्या. तुम्ही चांगले लिहीत असाल तर आम्ही पुस्तक विकत घेऊच ! हवे तर तुम्ही तुमच्या ऑफ़ीशिअल वेबसाइटवर इबुक मोफ़त डाउनलोडिंगला ठेउन एक ’डोनेट’चे बटन ठेवा. जर तुमचे काम लोकांना आवडले तर ते डोनेट करतात(भलेही हजारपैकी एखादाच करेल पण तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्तसुद्धा मिळू शकते.) लोक इतकेही काही ’फ़ुकटे’ नसतात. विश्वास ठेवा, इट वर्क्स ! हे काम करतं !! शेकडोंनी अशी उदाहरणं आहेत. हेच तुमच्या संगीतफ़ितीला, विडीओजनासुद्धा लागू होतं. आंतरजाल हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. जुन्याला नव्याची जोड देऊन बघा.
काही प्रश्नांची उत्तरे सोपी असतात, काही समस्यांवरचा उपाय सोपा असतो, फ़क्त दॄष्टीकोण बदलणे गरजेचे असते.
फ़ारच चांगला लेख ,आत्तापर्यंत कुठेहि वाचला नाही अगदी विकत घेतलेल्या
उत्तर द्याहटवाउद्याच्या भविष्य पत्रात किंवा महाराष्ट्रातल्या अग्रगण्य दैनिकात.
धन्यवाद
विजय बुद्धिसागर
धन्यवाद विजयजी ! इतक्या पाठबळाबद्दल आभारी आहे ! :)
हटवाUttam lekh ahe. Khoop lokanna fakt tikaa karaychi saway aste pn tu tr ithe tyavar kaay kele jaau shakte he hi dile ahes tyamule tr aanakhin ch chhan...
उत्तर द्याहटवाधन्यवाद ME !( असे वाटतंय की मी स्वत:लाच ’धन्यवाद’ देतोय ! :P )
हटवामस्तच पोस्ट....आवडले...
उत्तर द्याहटवाधन्यवाद श्रिया ! :)
हटवासुपर्ब !! अत्यंत माहितीपूर्ण पोस्ट !!
उत्तर द्याहटवाधन्यू रे भावा !!
हटवाkaay chhan lihilas re...!!
उत्तर द्याहटवाधन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत ! :)
हटवा