ठाकुरांचा आर्त स्वर - ’आज ज्योत्स्नाराते’

   रबिंद्र संगीताबद्दल ऐकून होतो, पण प्रत्यक्षात कधी ऐकले मात्र नव्हते. ऑगस्ट २०११ चा कुठलातरी शुभदिन. खरेतर रात्र, त्यादिवशी रात्रपाळीला होतो. फारसे काम नव्हते. अचानक आठवले की आपल्याला रबिंद्र संगीताबद्दल जाणून घ्यायचे आहे. विचार केला आधी ऐकूया जरा. यूट्य़ूब उघडले. ’रबिंद्र संगीत’ टाकून शोध घेतला. एक गाणे दिसले, ’आज ज्योत्स्नाराते’, लावले. सुरुवात 'इसराज’ या वाद्याच्या दर्दभर्‍या तुकड्याने होते. आणि २ मिनटानंतर शहाना बाजपेईचा आवाज जादू करायला सुरुवात करतो. जसजसे गाणे पुढे सरकते तसतसे ते गाणे, ते संगीत, शहानादिंचा आवाज आणि गुरुदेवांचे ते  शब्द काळीज चिरत  जातात.
    गुरुदेवांनी अशी मन कातर करणारी कविता का लिहीली असेल आणि त्याला तितकीच आर्त चाल का लावली असेल असा प्रश्न पडतो. मग ह्या गीताच्या पार्श्वभूमीबद्दल जाणून घेतले. कळले की, हे गीत ठाकूरांनी त्यांच्या मुलाच्या ’शमिंद्रनाथ’ च्या मृत्यूनंतर लिहीले. शमिंन्द्रनाथ त्यांचा धाकटा मुलगा, वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी कॉलरामुळे वारला. याआधी काही काळापूर्वीच त्यांची पत्नी मृणालिनी आणि मुलगीसुद्धा जग सोडून गेले होते. लाडक्या शमिंद्रचा मृत्यू हा त्यांच्यासाठी मोठाच धक्का होता. ते ट्रेनने कोलकात्याहून शांतीनिकेतनला जात होते. अचानक त्यांचे लक्ष खिडकीबाहेर गेले. ती पौर्णिमेची रात्र होती. बाहेर जग चांदण्यात न्हाऊन निघाले होते. त्यांच्या लक्षात आले की शमिंद्रच्या जाण्याने जग फ़ारसे बदलले नाही. चंद्र तोच आहे. चांदणी तीच आहे. वारा तसाच वाहतोय. चांदण्यात भिजलेली रानवाट, झाडे-वेली-पाने पूर्वी जशी होती तशीच आताही आहेत. मग नेमके काय बदलले आहे ? ह्या सगळ्यांत कुठेतरी  लाडका शमिंद्र हरवला आहे.  कदाचित तोसुद्धा इथेच कुठेतरी असेल; अचानक तो परतेल घरी, त्याच्यासाठी घर सज्ज नसावे का ? आणि हे गीत जन्मले. 
    ठाकुरांच्या इतर गीतांपेक्षा हे गीत जरा वेगळे वाटते. त्यांनी दु:खी स्वर असलेली इतरही गाणी लिहीलीत , पण ह्याचे वेगळेपण जाणवत राहते.  बापाचे अश्रूच ह्या गीतावाटे बाहेर पडलेत.
     आधी मूळ बांग्ला गीत, मग देवनागरी लिपीत उच्चाराच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करत दिले आहे; आणि सरतेशेवटी मी माझ्या कुवतीप्रमाणे केलेला मराठी अनुवाद. काही चुका असतील तर लक्षात आणून द्यावे.

मूळ गीत :
আজ জ্যোত্স্নারাতে সবাই গেচ্হে বনে  
  বসন্তের এই মাতাল সমীরনে |  
যাব না গো যাব না যে রইনু পড়ে ঘরের মাঝে -
   এই নিরালায় রব আপন কোণে
   যাব না এই মাতাল সমীরনে ||
আমার এ ঘর বহূ যতন করে
   ধূতে হবে মূচ্হতে হবে মোরে |
আমারে যে জাগতে হবে, কী জানি সে আসবে কবে
  যদি আমায় পড়ে তাহার মনে
     বসন্তের এই মাতাল সমীরনে   ||मूळ गीत(उच्चारानुसार देवनागरीत)

आज जोस्नाराते शॉबाइ गॅछे बोने
बॉशोन्तेर येइ माताल शोमीरॉने |
जाबो ना गो, जाबो ना जे रोइनू पोड़े घॉरेर माझे
येइ निरालाय रॉबो आपोन कोने
जाबो ना येइ माताल शोमीरॉने ||
आमार ए घॉर बोहू जॉतोन कॉरे
धूते हॉबे मूछते हॉबे मोरे
आमारे जे जागते हॉबे की जानि शे आशबे कॉबे
जोदि आमाय पॉड़े ताहार मोने
बॉशोन्तेर येइ माताल शोमीरॉने ||

मराठी अनुवाद :

आज चांदण्या राती सारे वनी गेले..
वसंताच्या या  धुंद समीरासंगे ..

जाणार नाही रे... जाणार नाही कारण
डोळे मिटून  घरी,
या सुन्या घरी, राहणार आपल्या कोपऱ्यात
जाणार नाही या धुंद वार्‍यासोबत..

माझे हे घर खूप जपायला  हवे  
धुवायला हवे, पुसायला हवे.
मला जागे राहायला हवे...
कोण जाणे तो कधी येईल..
जर माझ्यापाशी आलाच ..
त्याच्या मनात आल्यास
वसंताच्या या  धुंद समीरासंगे..

शहाना बाजपेईंनी गायलेले ’आज ज्योत्स्नाराते’

१३ टिप्पण्या:

 1. सुंदर आहे...दुर्दैव माझं की मूळ भाषेतील गीत मला नाही समजत. आणि तुझे आभार...समजावून सांगितल्याबद्दल. :)
  आधीही कधी सांगितला होतास का तू अर्थ ? मला वाचल्यासारखा वाटतोय.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. हो, मी हे गाणे बझ्झवर टाकले होते, आणि मग तू अर्थ जाणून घ्यायची इच्छा व्यक्त केली होती. मी तेव्हा अनुवाद करून मेल केला होता बघ.

   हटवा
 2. संकेत'आज ज्योत्स्नाराते’हे गीत खूप आवडले...मुळात बंगाली गीते बंगाली भाषेमुळे,उच्चारांमुळे,भाषा मला कळत नसली तरी खूप हळुवार वाटतात.ह्या गीताचा अनुवाद असल्याने अर्थ पण कळतो...पोस्ट छान झाली आहे...

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद श्रिया.. बंगाली गीते सगळीच काही हळूवार नसतात. :) पण रबिंद्र संगीत एकदम खासच हां. हळूवार, तरल आणि अतिशय सुंदर शब्द..

   हटवा
 3. मी अनेकांना तुमच्या लेखाची लिंक पाठवली .. अनेकांनी गीत आणि तुमचा अनुवाद दोन्ही आवडल्याच कळवलं.. आता एक लेखमाला करा या विषयावर!

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. अरे वा ! लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई ! :) तरीच विचार केला की, अचानक या पोस्टचे वाचक कसे काय वाढलेत बुवा ! धन्यवाद !
   लेखमाला करायचाच विचार आहे .. आधीच ते ठरले होते. तुमच्यामुळे या कल्पनेला आता अजून बळ मिळाले. अजून काही रबींद्र गीते आहेत जी मला मराठीत आणायची आहेत. येतील हळूहळू..

   हटवा
 4. प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद श्रीराज !! :)

   मी तुझा नवीन पंखा झालोय! >> तरीच अचानक गारठा वाढलाय माझ्याभोवती ! :))
   भेट देत रहा .

   हटवा
 5. A very well-written post. I read and liked the post and have also bookmarked you. All the best for future endeavors
  IT Company India

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More