ठाकुरांची (आणि माझीही) कृष्णकलि

बंगाली गीतांमध्ये रुचि घेणे सुरु केले तेव्हाची गोष्ट आहे. आबोहोमान चित्रपटातल्या ’For your eyes only ’ गाण्याबद्दल एका बंगाली फ़ोरमवर वाचले नि ते यूट्य़ूबवर ऐकले. त्या गाण्यात रबिंद्रनाथ ठाकूरांच्या ’कृष्णकलि’ आणि जीबोनानन्दो दासांच्या ’बोनोलता सेन’ ( पुढचा लेख हिच्यावरच आहे. ) ह्या दोन काव्यकन्यांचा उल्लेख येतो.  ही मयनापाड्याची मृगनयनी कृष्णकलि कोण असावी हे कुतूहल तेव्हापासूनचे. कृष्णकलि  यूट्य़ूबवर सहज सापडली आणि मी हिच्या प्रेमातच पडलो. आता ही ठाकूरांची न राह्ता माझीही झाली होती. जिंवत चित्रण करणारे काव्य आणि तेही सहजसोप्या भाषेत कसे असावे ह्याचे सुंदर उदाहरण म्हणजे ’कृष्णकलि’. मात्र हे एवढ्यावर थांबत नाही. सुमारे ११० वर्षांपूर्वी लिहीलेली ही कविता अगदी क्रांतिकारी विचारसुद्धा घेऊन आली आहे. कवी एका काळ्या मुलीच्या प्रेमात पडला आहे. मात्र तो तिच्या काळ्या रंगाकडे न बघता फक्त काळ्या, हरिणीसारख्या डोळ्यांकडे बघत आहे. तसेच काळ्या रंगांचे  आणि आनंदाच्या भारतीय संकेतांचे अद्वैत दाखवून तो म्हणतो की  तुम्हाला तिला जे म्हणायचे असेल ते म्हणा, मी तर तिला कृष्णकलिच ( एका प्रकारचे फूल )म्हणेन. गोर्‍या रंगाचे वेड आपल्याकडे अनादि-अनंत काळापासून आहे. आता कमी झाले असेलही,पण ठाकूरांच्या कर्मठ काळात गोर्‍या रंगाचे कौतुक नक्कीच जास्त असावे. सार्‍या गौरांगी ललनांवर कविता रचल्या जात असतांना ठाकूरांनी एका काळ्या मुलीवर कविता लिहीली, ही बाब त्या काळात नक्कीच नवी होती. काळ्या मुलीवर प्रेम करणार्‍या सार्‍या तरुणांना त्या काळी ठाकूरांच्या कृष्णकलिने चांगलाच आधार दिला. काळ्या मुलींकडे पाहण्याची एक नवी दॄष्टी दिली. काळी मुलगीसुद्धा कवितेचा विषय असू शकते हे सांगितले. कृष्णकलि म्हणूनच कदाचित अजूनही जनमानसात आपले स्थान टिकवून आहे, ठाकूरांच्या अजरामर रचनांपैकी एक मानली जाते. ‘For your eyes only’ चा कवीसुद्धा लिहीतो,

’ आज तार नाम जाने बांगाली शॉबाय,
रोबि ठाकूराने जॉय होक
मयनापाडार माठे आजो गिये खोजे
कालो दुटि होरिनेर चोख ’

’ आज रबि ठाकुरांमुळे तुझे नाव सगळे बंगाली जाणतात. मयनापाडाच्या माळावर आजही ते दोन  काळेभोर   हरिणीचे डोळे शोधायला लोक जातात.’

रबि ठाकूरांनी या कवितेत काळा रंग आणि त्याच्याशी निगडित संकेतांचा अगदी सढळ हस्ते वापर केला आहे आणि त्यामुळे कविता अगदी खुलली आहे. काळ्या रंगाचे  भारतीय परंपरेत आनंदाला समानार्थी मानल्या गेलेल्या पावसाशी जे नाते आहे ते सूचवून कृष्णकलि म्हणजे आनंदाचे दान आहे हे कवी इथे मांडतो.   कृ्ष्णकलि आहे काळी, तिच्या गाई काळ्या, ती आपल्या झोपडीबाहेर बाहेर येते ती आकाशात काळे ढग भरून आले म्हणून.  काळे ढग, त्याने भरून आलेला अंधार, माळावर चरणार्‍या दोन काळ्या गाई, आणि लगबगीने बाहेर येणारी काळ्या डोळ्यांची काळी मुलगी, कवीने तिला पाहिले आणि तो त्या काळ्या हरिणीसारख्या डोळ्यांत हरवला अन्‌ तो म्हणतो,
’कृष्णकलि आमि तारेइ बोलि, कालो तारे बोले गाँयेर लोक ’  
गावातले लोक तिला ’काळी’ म्हणत असतीलही , मी मात्र तिला ’कृष्णकलि’ म्हणणार आहे.  कवी तिला कृष्णकलि या सुंदर फुलाची उपमा देतो.  

ती कितीही काळी असली तरी मी फक्त तिचे काळे, हरिणीचे डोळेच बघतो हेसुद्धा कवी शेवटच्या कडव्यात स्पष्ट करतो. ’ काळी ?’ हा प्रश्न खुबीने कवीच्या मनातल्या भावनांना वाट करून देतो. तुम्ही फक्त तिचा काळा रंगच पाहिला, तुमच्या दृष्टीने ती फक्त एक काळी मुलगी कशी असू शकते? तुम्ही तिचे टपोरे हरिणीच्या डोळ्यांसारखे काळेभोर डोळे पाहिले नाहीत का ? हा सवालच कवी इतरांना करतो.
’कालो ? ता शे जतोइ कालो होक, देखेछि तार कालो होरिन-चोख’     कवीची आणि तिची नजरानजर झाली तेव्हा ( कारण कवि पुढे मिश्कीलपणे म्हणतो, ’माझ्याकडे तिने पाहिले की  हे तिला किंवा मलाच ठाऊक आहे ! ’  झालीच असावी, कारण पुढच्याच कडव्यात कवीने मनातल्या भावनांना ज्येष्ठ-आषाढ-श्रावण महिन्यांची उपमा दिली आहे,) तो शेतातल्या बांधावर एकटाच उभा होता. पूर्वेकडून अचानक वारा आला.( पूर्व दिशेने येणारा वारा(हिंदी- पूर्वाई) म्हणजे खास मान्सूनचा वारा, आनंदाला उधाण आणणारा), शेतात कोवळी धानपिके डोलू लागली .( म्हणजे पेरणी झाली होती, श्रावण महिना असावा, निवांत वेळ असतो तेव्हा. हिरवी पिके शेतात डोलत असतात, शेतकरी आनंदात असतो.  ’ घोनो मेघ आँधार ’ मधला काळाघन मेघ साधारणत: श्रावणात बरसतो, श्रावणधारा आपल्या सर्वांच्या आवडत्या, गावोगावी ’सावन के मेले’ लागतात, सासुरवाशिणी माहेरी येतात, गावोगावी आंब्याच्या झाडावर ’झूले’ पडतात. ) ठाकुरांनी ही जी वातावरणनिर्मिती केली आहे ती अगदी विचारपूर्वक केल्याचे लक्षात येते. कृष्णकलि बाहेर येते. बाहेर अंधार भरून आलंय, ढगांचा गडगडाट सुरू झाला आहे, गायी माळावर आहेत. ती त्यांना आणायला जराशी व्याकुळ, त्रस्तच लगबगीने बाहेर आली आहे. आपण डोक्यावर पदर घेतला की नाही ह्याचेही तिला भान नाही, तिची वेणी पाठीवर खेळत आहे. बाहेर आल्यावर आधी ती भुवया आकाशाकडे करून वातावरणाचा एक अंदाज घेते, आणि मग दोघांची नजरानजर झाली. ’ आमार पाने देखलो कि ना चेये , आमि जानि आर जाने शेइ मेये ’ , ’माझ्याकडे तिने पाहिले की नाही हे एकतर मला माहीत आहे किंवा त्या मुलीला तरी’ कवी म्हणतो, कारण ’ माठेर माझे आर छिलो ना केउ ’  माळावर इतर कोणीच नव्हते.

   नजरभेट झाल्यावर काय घडले ?   ’ज्येष्ठ महिन्यात काजळकाळे मेघ ईशान्य दिशेला दाटून आल्यावर मनाची जी अवस्था होते तसेच झाले आहे’ किंवा ’आषाढ मासी काळे कोमल ढग तमालबनांवर उतरतांना पाहून जो आनंद होतो तसाच आनंद झाला आहे’ किंवा ’एखाद्या श्रावणराती अचानक मुसळधार पाऊस कोसळतो आणि मनातही आनंदाचा पाऊस कोसळू लागतो ’ असे काही तिला पाहिल्यावर घडले.   इथे ठाकूरांनी जाणीवपूर्वक मनातल्या भावनांना पावसाळी महिन्यांची उपमा दिल्याचे लक्षात येते.  भारतासारख्या कृषीप्रधान आणि उष्ण देशात वर्षाऋतू म्हणजे खरा आनंदऋतू. आपला सर्वोच्च आनंद श्रावणधारांत कोसळतो. घन ओथंबून आले की आपले मनही ओथंबून येते. ही सगळी किमया ’काळे’ ढग करतात. इथे काळा रंग आनंद घेऊन येतो.  काळा रंग निव्वळ शोकाचे, उदासिनतेचे प्रतिक नाही तर ते आनंदाचेही प्रतिक असू शकते हेच तर इथे कविगुरु सुचवत नाहीत ना ?.   काळ्या कृष्णकलिचे झोपडीबाहेर येणेही असेच काळ्या घनांसारखे आनंद घेऊन आले आहे.   वर मी ज्या ’काळ्या रंगाच्या आणि आनंदाच्या भारतीय कल्पनेच्या अद्वैताचा’ उल्लेख केला ते हेच.

शेवटच्या कडव्यांत कवी अजून निश्चयी झाला आहे. ’कृष्णकलि आमि तारेइ बोलि, आर जा बोले बोलुक अन्यो लोक ’ ; मी तिला कृष्णकलिच म्हणणार, बाकी लोकांना जे म्हणायचे असेल ते खुशाल बोलू देत ! इथे ’गाँयेर लोक ’ नाही, ’अन्यो लोक’ आहे !   आता पुन्हा कवी भूतकाळात जाऊन तिच्या आठवणींत हरवतो. ’ पाहिले होते मयनापाडाच्या माळावर, काळ्या मुलीचे काळे हरिणीचे डोळे’,  ’तिच्या माथ्यावर पदर नव्हता की अनोळखी माणसापुढे आपण पदर न घेता आलो ह्याची जाणीव होऊन लज्जीत व्हायला तिच्यापाशी वेळही नव्हता’.  कदाचित कवीची आणि तिची नजरानजर होताच ती परत आपल्या गाईंकडे पळाली असेल आणि या क्षणिक भेटीत कवीच्या मनात घर करून बसलेत ते दोन काळेभोर हरिणीचे डोळे ! कविता संपते आणि आपल्याही मनात घर करून बसतात ते दोन ’कालो होरिन चोख’ !


अनुवाद :-

कृष्णकली म्हणेन मी तिला, ’काळी’ म्हणती गावकरी जिला
ढगाळ दिनी माळावर पाहिले ,काळ्या मुलीचे काळे हरिणीसम डोळे
पदर नव्हता तिच्या माथ्यावर, मुक्त वेणी खेळे पाठीवर
काळी  ? असो  ती कितीही काळी, पाहिले तिचे मी काळे हरिणीसम डोळे

काळ्या मेघांच्या अंधाराने , कवेत घेतल्या दोन काळ्या गाई
काळी मुलगी व्याकुळ पाऊली, चिंतीत कुटीबाहेर येई  
भुवया उंचावून आकाशाकडे, अन्‌ ऐकी ‍ मेघांचा गडगडाट
काळी  ? असो  ती कितीही काळी, पाहिले तिचे मी काळे हरिणीसम डोळे

आला अकस्मात्‌ वारा पूर्वेचा,  खेळला भातपिकांत कोवळ्या
बांधावर मी एकटाच उभा , माळावर नव्हते आणिक कोणी
मला तिने पाहिले न पाहिले,  हे गुपित आम्हां दोघांमधले
काळी  ? असो ती कितीही काळी, पाहिले तिचे मी  काळे हरिणीसम डोळे

असेच येतात काजळकाळे मेघ, ज्येष्ठ मासी ईशान्येला
अशीच येते काळी कोमल छाया, आषाढ मासी तमालबनांवरती
अशाच येती श्रावणराती,  आनंद उचंबळति  अकस्मात्‌ चित्ती
काळी  ? असो  ती कितीही काळी, पाहिले तिचे मी काळे हरिणीसम डोळे

कृष्णकली म्हणेन मी तिला,  म्हणोत अन्य लोक काहीही तिला
पाहिले होते मयनापाडाच्या माळावर, काळ्या मुलीचे काळे हरिणीचे डोळे
तिच्या माथ्यावर पदर नव्हता  ,लज्जित व्हायला वेळही नव्ह्ता
काळी  ? असो  ती कितीही काळी, पाहिले तिचे मी काळे हरिणीसम डोळे


मूळ कविता :-


कृष्णकलि आमि तारेइ बोलि, कालो तारे बोले गाँयेर लोक
मेघला दिने देखेछिलेम माठे, कालो मेयेर कालो होरिण-चोख
घोमटा माथाय छिलो ना तार मोटे, मुक्तोबेणी पिठेर पारे लोटे
कालो ? ता शे जतोइ कालो होक, देखेछि तार कालो होरिन-चोख

घोनो मेघे आँधार होलो देखे, डाकतेछिलो श्यामोल दुटि गाई
श्यामा मेये ब्योस्तो ब्याकुल पॉदे, कुटिर होते त्रस्तो एलो ताई
आकाश-पाने हानि जुगोल भुरु , शुनले बारेक मेघेर गुरुगुरु
कालो ? ता शे जतोइ कालो होक, देखेछि तार कालो होरिन-चोख

पूबे बाताश एलो हठात्‌ धेये , धानेर खेते खेलिये गेलो  धेउ
आलेर धारे दाँडियेछिलेम ऍका, माठेर माझे आर छिलो ना केउ
आमार पाने देखलो कि ना चेये , आमि जानि आर जाने शेइ मेये
कालो ? ता शे जतोइ कालो होक, देखेछि तार कालो होरिन-चोख

एमनि कोरे कालो काजोल मेघ, ज्येष्ठो माशे आशे ईशान कोणे
एमनि कोरे कालो कोमोल छाया, आषाढ़ माशे नामे तमाल-बोने
एमनि कोरे श्राबोनो-रजोनिते,  हठात्‌ खुशी घनिये आशे चिते
कालो ? ता शे जतोइ कालो होक, देखेछि तार कालो होरिन-चोख

कृष्णकलि आमि तारेइ बोलि, आर जा बोले बोलुक अन्यो लोक
देखेछिलेम मयनापाड़ार माठे, कालो मेयेर कालो होरिण-चोख
माथार पोरे देयो नि तुले बाश, लोज्जा पाबार पाय नि ओबोकाश
कालो ? ता शे जतोइ कालो होक, देखेछि तार कालो होरिन-चोख



यूट्यूबच्या कृपेने आपण ठाकूरांच्या आवाजात ही कविता ऐकू शकतो.



किंवा

स्वागतलक्ष्मी दासगुप्तोंच्या आवाजात छान चाल लावलेले गीतही ऐकू शकतो.




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय