बोलीले जित्ता ठेवा, मराठीले जित्ता ठेवा


मराठी भासेची खासबात काये जी ? असा तुमाले कोनी विचारलनच तं सांगजाल का इच्या बोल्या ! अजी एखाद्या भासेच्या ४२ बोल्या मंजे तुमाले मज्याक वाट्ते का जी ? असी बोल्याइच्या बारेत अमीर भासा मराठीच आये, हिंदी बी नसे अना बंगाली-तमिल-तेलुगु बी नसे. मंग आप्ल्याले अभिमान पायजे का नाई ? अखिन बोल्याइमंदी बी पोटबोल्या आयेतंच.. आता आमच्या झाड़ीबोलीचाच घ्या ना जी. म्हनावाले गेला तं इनमिन ४ जिल्ल्यात बोलतंत, पर असी अमीरी आये भाऊ का , का सांगू तुमाले. भंडार्‍याची(  मराठीतला पयला ग्रंथ, ’विवेकसिंधु’ मुकुंदराजाने भंडार्‍यातच ’आंभोरा’ गावी संगामावरच्या पहाडीवर बसून लिखला. ) अलग, गोंदियाची अलग ,चंद्रपुराची अलग अन गड़चिरोलीची अलग. पर आये झाड़ीबोलीच. तेच मिठास; जरा सब्द अलग, जरा बोलाचा ढंग अलग आये तं का झाला ? पर काही कम-अकलीच्या मानसाइले वाट्ते का झाड़ीबोली मतलब गावठी लोकायची बोली. मराठीत लमड़ीचे हिंदी घुसाडून बोलतंत. मंग आमाले बी वाटत रायला का हंव भाऊ, हे सिकले-सवरले सयरातले लोकं मन्तेत तं सहीच बात असंल. मंग आमी बी कायले झाड़ी बोल्तो जी ? ते घरी अना दोस्तभाइसंगच बोलावाले वापरतो. पुन्यात गेलो तं आमची अखीनच पंचाइत ! मंग आमी सिद्दा हिंदीतच बोल्तो. मंग तिकड़्ले काही जन बोल्तंत का हे लोकं मराठीत नाइ बोलतं. तुमी हासना बंद करा तं आमीबी मराठीत बोलून ना जी ! स्यारेत बी झाड़ीत बोलला का सर-म्याड़म हातावर सन्नान सड़ी घुमवतंत. मी पाचवीत होतो तईची गोठ सांगतो तुमाले.. माया वर्गातला एक पोट्टा म्याडमले उत्तर देउन रायला होता तं ’हव’ मनलंन तं म्याडम म्हन्ते का ’ हव’ नाही ’हो’ म्हनाचा. ’हव’ असुद्द आये. आता भाऊ माले सांगा झाड़ीबोली तेवडी असुद्द अना परमान बोली तेवडी सुद्द असा कइ होते का ? माया तं मनना आये का मराठीच्या सप्पाच्या सप्पा बोल्याइचे सब्द प्रमान मराठीत आनले तं मराठी असी अमीर भासा बनंल का , का सांगू तुमाले. आता पाहा ना जी, तुमी ’छिद्र’ मन्ता त्याले आमी तो कसा आये हे पावुन ’सेद’ मनावचा का ’दर’ मनावचा हे पायतो. अजून एक मज्या सांगू का भाऊ, तुमी ’साप’ मन्ता तं आमी त्याले ’सरप’ मन्तो; मंजे सन्स्कृतचा ’सर्प’ अखीनबी आमी वापरतो. ’करावले काये ना धोंड्या सरप खाये’ असी एक म्हन बी आये आमच्यात. परमान मराठीत ’बेडूक’ आहे, आमी त्याले ’भेपका’ मनून अगर का तो मोटा असंल, मतलब ’टोड’ वर्गातला असंन तं, नाई तं ’भेपकी’ बी आये ना ’मंडोडरी’ बी आये.( ’फ़्रॉग’ वर्गातला असंन तं ). परमान मराठीत हेवाले सब्द काऊन नाइ आनत?
झाड़ीबोलीचा उदाहरन देल्लो कावून का हे माही बोली आये. पर असी पतली हालत तं मराठीच्या सप्पाच बोल्याइची आहे जी. सिकले सवरले लोकं बोल्याइले अनपड अनं गावठी लोकाइअची समजतंत. सयरात गेले का परमान बोलावची कोसिस करतंत. करा, बोला बी, मी त्याले नाइ नाइ मनत, पर आपल्या बोलीले विसरावाचा नाइ. आता मी का पुन्यात एकदम असली झाड़ी बोल्लो तं तेतल्या लोकाइअले समजलंच नाइ. परमान मराठीचा तोच मतलब आहे. महारास्ट्रातले दोन मराठी मानूस कोटीबी भेटले तं एकमेकाइसोबत बोलावले अड़चन नाइ आली पाइजे. पर याचा मतलब असा नाइ का दुसर्‍याच्या अना खुदच्याबी मायबोलीले नाव ठेवजाल, अना फ़क्त परमान मराठीचाच तुनतुना वाजवाल, हव का नाई ? मराठीतलेच कई सब्द आता वापरातून जाउन रायले आयेत. बोल्याइचे जतन करावले नाइ पायजे का ? तुमीच सांगा ! तं माले असा मनावाचा आये का आपन आपापल्या बोल्याइत बी लिखावाचा, आपल्या पट्ट्यातल्या लोकाइसोबत आपल्याच बोलीत बोलावचा, आपले सब्द वापराचे, दुसर्‍या भागातल्या लोकाइसोबत बोलावाले पर परमान मराठी वापरावाची. जमला तं धीरेधीरे परमान मराठीत बी आपापल्या बोल्याइतले बढियावाले सब्द आनाचे अना मराठी अमीर करून टाकाची.
मराठीच्या ४२ बोल्या , तेच्यातली बी एक बोली परमान, मंजे राहून रायल्या ४१ बोल्या. तं या ४१ बोल्याइतले सब्द, तेच्यातबी ज्या सब्दाइले परमान मराठीत बेस सब्द नसे तेच्यासाठी वापराले सुरुवात केली तं कितीक चांगला होउन जायल , सोचून पाहा जरा. अना येच्यासाठी पयले सप्पा बोल्याइचा एक बढिया सब्दकोस बनवाचा. जई मी पुन्याले आलो तई माही बहोत पंचाइत होऊन गेली होती. ’पोपट’ नावाच्या भाजीले येती ’ पांढरे वाल’ मन्तंत नाइ तं ’पावटा’ मन्तंत अना आमचा ’मिठटू’ नावाचा पक्षी येती ’पोपट’ बनला. मी ’पोपट’ मांगलो तं मन्ते का येती भाज्या भेटते ! मी मन्लो का हव मी भाजीच मांगत आहो. मंग मने का हे कोन्ती भाजी भाऊ ? मंग मी बोट दावून सांगलो का ते वाली. मंग ते सांगते का यिले आमी अलाना-फ़लाना मन्तो, कोटचे भाऊ तुमी ? ’सांभार’ मांगावले जावा तं मन्ते का भाउ हाटेलात जा ! आता सांभाराले ’कोथिंबीर’ मन्तंत आमाले का मालूम ? आमची असी होते गम्मत नं तुमाले वाटते मज्याक ! मनून मी मन्तो का असा सप्पा बोल्याइचा एक कोस पायजे.( मी ’सब्दाइचा’ कोस मनून रायलो नाइ तं तुमाले वाटल ’सापाची’ कोस ! ) आता इन्टरनेट आये, जालाची दुनिया आये, येती तं काम बोहोतच सोपा झाला आये जी. मंग कराची का सुर्वात ?
जागतिक मराठी भास्यादिनाच्या तुमाले बोहोत सुभेच्छा !


______________________________________________________________________________
टीप :
 झाड़ीबोलीत श, ष, छ , ण, ळ नाहीत. श, ष, छ करिता ’स’ वापरले जाते. ’ण’चा उच्चार ’न’ होतो, ’ळ’ चा उच्चार ’र’ होतो, निमशहरी झाड़ीबोलीत मात्र ’ळ’ चा अनेकदा ’ड़’(’सड़क’चा ’ड़’) सारखा उच्चार केला जातो. 

५ टिप्पण्या:

  1. मस्त पोस्ट करून राहिले तुम्ही बाप्पा...आम्हाला मनोभावे आवडल्याचा पुरावा म्हणून ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया!! कळले काय?

    उत्तर द्याहटवा
  2. लै भारी ! झकास लिवलंय ...आता आमास्नी समजत नाय समद पन... "छान वाटलं वाचून !".

    उत्तर द्याहटवा
  3. लै भारी ! झकास लिवलंय ...आता आमास्नी समजत नाय समद पन... "छान वाटलं वाचून !".

    उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More