बलबन का मकबरा

 क़ुतुब मीनारपासून थोड्याच अंतरावर महरौली Archaeological Park आहे. तिथे आडवाटेला , काटेरी झुडपांत अनेक भग्नावशेष विखुरलेले दिसतात. आपण त्यातून मार्ग काढत पुढे जावे.एका मकबर्‍याचे भग्नावशेष दिसतील. खचलेल्या भिंती दिसतील. भिंती कसल्या ? दगडमातीचा निव्वळ रचलेला थर ! त्यावर दिलेला मुलामा पार उडालाय. कधीकाळी भिंतींना मुलामा दिलेला होता, त्यावर नक्षीकाम होते ह्याची साक्ष देणारा एक छोटासा तुकडा तेवढा एका भिंतीवर दिसेल. छत कधीचेच उडालेय. या चार भिंतींच्या आत, आकाशाच्या छताखाली , लाल वालुकाश्मात बांधलेली एक कबर दिसेल. कबरीचे काही दगड गायब झाले आहेत, काही मोडकळीस आलेले आहेत. कधीतरी कबरीवर चढवलेली चादर ऊन-वारा-पाउस झेलत विरजलेली, एका फटीत अडकल्याने , नावापुरती का होईना ,कबरीवर दिसेल.

              ही कबर घियासुद्दीन 'बलबन'ची. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेला ग़ुलाम घराण्याचा एक प्रबळ सुलतान. दिल्ली आणि परिसरावर बलबनने वीस वर्षे सत्ता गाजवली. बलबन अतिशय कठोर, न्यायप्रिय('न्यायकर्कश' म्हटलं तरी चालेल.) सुलतान होता. सुलतानाला साष्टांग दंडवत घालायची फ़ारसी 'ज़मीनबोस' पद्धत त्यानेच आणली. स्वत:ला ’ज़िल-ए-इलाही’ म्हणवून घ्यायचा. सरंजामांची 'चहलगनी' मोडून राज्याची सगळी सूत्रे स्वतःच्या नियंत्रणात राहतील अशी व्यवस्था केली. त्याचा शब्द अंतिम असायचा. प्रत्येकाने त्याच्याशीच निष्ठावान रहावे, फंदफ़ितुरीला थारा मिळू नये म्हणून त्याने अतिशय कार्यक्षम गुप्तचर यंत्रणा उभी केली होती. दिल्लीत येऊन लूटमार करणार्‍या मेवाती टोळ्यांचा त्याने बंदोबस्त केला. अशी जरब बसवली की, त्याच्या काळात परत ह्या मेवाती लोकांनी दिल्लीकडे वाकड्या नजरेने पाहिले नाही. त्याचा न्यायप्रियपणा तर प्रसिद्धच आहे. त्याच्या दरबारात न्याय मिळतच असे.

               बलबनच्या मृत्यूनंतर त्याचा नातू 'क़ैक़ूबाद' सत्तेवर आला खरा, पण त्याच्यापाशी बलबनचा करिश्मा नव्हता. तो बलबनच्या उलट म्हणजे मवाळ, दुर्बळ आणि अकार्यक्षम होता. तो ना काही कमावू शकला ना बलबनने कमावलेले टिकवू शकला. जेमतेम तीन वर्षे त्याने कसाबसा कारभार साम्भाळला. शेवटी त्याला तख्तावरून हटवून फ़िरोज़ खिलजीने दिल्लीचा कारभार हाती घेतला. दिल्लीवरची गुलाम घराण्याची सत्ता संपली.

               बलबनचा मकबरा भारतात नवी वास्तुशैली घेऊन आला होता. भारतातले पहिले खरे 'कमान आणि घुमट'(arch and dome) शैलीचे बांधकाम म्हणजे बलबनचा मकबरा. ह्याचे श्रेय अर्थातच बलबनला द्यावे लागेल.( मुसलमान शासक जिवंतपणीच स्वतःचा मकबरा बनवून ठेवत. बलबनदेखील अपवाद नव्हता.)

               आज घुमटाचा लवलेशही नाही. कुठेकुठे कमानी उरल्या आहेत. परिसरात असलेले अनेक अवशेष बघता ही जागा कधीकाळी गजबजलेली होती,लोकांचा इथे राबता होता हे सहज लक्षात येते. आता मात्र मकब-याला भेट द्यायला कोणी येत नसावं. एखादा इतिहासवेडा वाट वाकडी करून इथे येतो, मकब-याचे अवशेष बघतो, उध्वस्त कबर बघतो आणि हळहळतो. दिल्लीवर २० वर्षे राज्य करणारा हा सम्राट खुद्द दिल्लीकरांनाच आठवत नसणार. बलबन गेला, कोणे एके काळी लोकांची येजा असलेला त्याचा मकबराही विस्मृतीत गेला. उरलेले अवशेषही जाणार. उरणार फक्त इतस्ततः विखुरलेल्या दगडांमध्ये वाढलेले दाट काटेरी रान..








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय