लसणाचे आक्षे

लागणारे साहित्य:- तांदूळ, लसणाच्या पाती, जीरे, हिरवी मिर्ची, टोमेटो, कोथिंबीर, चवीपुरते मीठ
कृ्ती:-
पावशेर(२५० ग्राम) तांदूळ 3-4 तास पाण्यात भिजवायचे.
मुठीत येतील एवढ्या छान कोवळ्या, लांबसडक लसणाच्या पाती घ्याव्या. बारीक चिरून साधारण 20-30 मिनिटे पाण्यात भिजवावे.
आता भिजलेले तांदूळ, लसणाची चिरलेली पात, थोड़ी कोथिंबीर, हिरवी मिर्ची, एक टोमेटो, आणि चमचाभर जीरे, चवीपुरते मीठ हे सगळे एकत्र करायचे आणि मिक्सरमध्ये थोड़े पाणी टाकून वाटून एकजीव करायचे. बॅटर साधारण डोशाच्या बॅटरएवढे गाढ असावे.
तव्यावर थोड़े तेल शिंपडून एकसर पसरावे. त्यावर बॅटर गोल पसरावे. (त्याआधी तव्याखालची गॅस नक्की पेटवा आणि तवा गरम होऊ द्या.) पसरताना फार जाड पसरवू नये आणि फार पातळही नको. पातळ असेल तर तव्याला चिकटेल आणि जळेल. जाड झाले तर वरची बाजू शिजणार नाही.
तव्यावर झाकण ठेवावे. गॅस मध्यम आचेवर असावी. साधारण 2-3 मिनिटांनी झाकण काढावे. परत आक्ष्यावर थोडे तेल सोडावे. आक्षे उलटून 20-30 सेकण्ड भाजावे. तव्यावरुन काढून तूप ओढून चटणी किंवा लोणच्यासोबत गरमागरम हादडावे.
तांदळाचे पीठ झाले कमी:-


आदर्श आक्षे:- उलट बाजू



आदर्श आक्षे:- सुलट बाजू


टीप्स :-
1. तांदूळ 3- 4 तास भिजू देण्याएवढा वेळ नसेल तर तांदळाचे पीठही वापरता येईल. पण अस्सल चव भिजलेले तांदूळ पातीसोबत वाटल्यानेच येते- इति मातोश्री.
2. बॅटर पसरवायला (एक्सपायर्ड) क्रेडिट कार्ड वापरता येईल. त्याने अगदी एकाच जाडीचे पसरते. पळीच्या उलट बाजूने पसरले तर ते डोशासारखे पसरते. सराटा वापरता येईल. पूर्वी आंब्याची किंवा पेरुची पाने मोडून त्याला काडीने बांधून वापरत. आता आम्ही प्रगत झालो. अच्छे दिन आले.
3. फ़क्त लसणाची पात वापरावी. सोललेल्या पाकळ्या नाही. चवीला उग्रता नको.
4. तांदूळ जर कमी झाले तर आक्षे तव्याला चिकटतात. तव्यावर नीट पसरले जात नाहीत. तेव्हा आक्षे जमले नाहीत तर बॅटरमध्ये थोड़े तांदळाचे पीठ टाकता येईल. ते मिसळा आणि पुन्हा एक प्रयत्न करून पहा. जमेगा बाबा जमेगा!
5. आक्षे बनले की खायला प्रस्तुत लेखकाला अवश्य बोलवावे. नाहीतर पुढच्या वेळी आक्षे बिघडतात.

-- स्वामी संकेतानंद 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय