एन्दिरन स्तोत्र - २

------ भाग १ पासून पुढे ------


दोन विनोदी नर । जे चिट्टीला वारंवार ॥ करण्यासाठी बेजार । प्रयत्नरत ॥५२॥
परि चिट्टी नाही बधला । दोघां धडा  शिकविला ॥ तयांसी बेजार केला । मारूनी पैजारा ॥५३॥
पहा या घटनेतून । मनी घ्या ठासून ॥ कुणा विनोद करून । खिजवू नका ॥५४॥
ते सहकारी राहिले । म्हणून वसीने क्षमा केले ॥ दयाभाव दाखविले । त्या दोघांप्रत ॥५५॥
पहा वसीच्या चित्ती । आहे कणवाळू वृत्ती ॥ हीच खरी शक्ती । मानवाची ॥५६॥
आता चिट्टीच्या लीला । अनुभवी ती बाला ॥ अभ्यास तिज करविला । वैद्यकशास्त्राचा ॥५७॥
देवीच्या नामे गोंधळ । करती जन सकळ ॥ थांबविला तात्काळ । चिट्टीने बघा ॥५८॥
अभ्यास हा प्रथम । मग आले देव-धर्म ॥ हेची खरे मर्म । विद्यार्थ्यांचे ॥५९॥
इतरांना त्रास देउन । ध्वनीप्रदूषण करून ।। देवी ती प्रसन्न । होइल का ॥६०॥
इथे एक संदेश दिला । ध्वनीप्रदूषण करणार्‍याला । धडा शिकविला । देवीरूप दाखवून ॥६१॥
परीक्षा उत्तीर्ण करायला । मदतीचा हात दिला ॥ म्हणूनच ती बाला । उत्तीर्ण झाली ॥६२॥ 
चिट्टी खोटे नाही बोलला । मनुष्यस्वभाव हा भला ॥ कधीच न कळला । भावनाहीन चिट्टीस ॥६३ ॥
मग रेल्वेगाडीच्या करामती । त्या वर्णू मी किती ॥ अशक्य काही जगती । चिट्टीस ना ॥६४॥
दृष्य आधी असले । बघाया ना मिळाले ॥ चित्रपट भारतातले । हे पहिलेच ॥६५॥
चिट्टीच्या करामाती बघाया । आणिक हरखून जाया ॥ धन्य मनुष्यजन्म कराया । अवश्य जाणे ॥६६॥
वैज्ञानिक सगळे गोळा झाले | अचंबित बघू लागले || भान हरखून गेले । चिट्टीला बघुनी ॥६७॥
एक वैज्ञानिक  उभा झाला । चिट्टीस विचारता झाला ॥ देव कोण सांगा मला । तत्काळ हो ॥६८॥
ज्याने मला निर्मीला । वसीगरन माणूस भला ॥ तोची देव झाला । मजसाठी ॥६९॥
टाळ्यांच्या कडकडात । रजनी नामाच्या गजरात ॥ शिट्ट्यांच्या संगीतात । हे दृश्य पाहा ॥७०॥
आपणा जो घडवितो । तोची आपला देव असतो ॥ हा संदेश मिळतो । या दृश्यातून ॥७१॥
गुरु आणि माता-पिता । हेची आपले कर्ताकरविता ॥ म्हणुनि तेचि आता । देव मानावे ॥७२॥
थोर सामाजिक संदेश । दृश्या-दृश्यांतून विशेष ।। आणि गीतेचा सारांश । या चित्रपटात ॥७३॥
वसीगरन हा देशभक्त। सैन्यास देण्या फक्त ॥ अपुले आटवुनि रक्त । चिट्टी निर्मीला ॥७४॥
पण बोहरा वदला । अद्याप पुरा नाही झाला ॥ शोध तुमचा भला ॥ जरी असे ॥७५॥
सारासार विचार । मनुष्याचे आचार ॥ नाहीत हजर । चिट्टीमधे ॥७६॥
पढतमूर्ख हा खरा । कुणी म्हटले मारा ॥ तर होईल हत्यारा । चिट्टी हा ॥७७॥
हा धोका सैन्यासाठी । आणिक मनुष्यासाठी ॥ अद्याप समाजासाठी । उपयुक्त नसे ॥७८॥
यांस न आधारा । हा मत्सर होता खरा ॥ दुष्ट तो डॉ. बोहरा । गुरु असा ॥७९ ॥
मत्सरी लोक जगती । प्रगतीचे वैरी होती ॥ चटकन पाय ओढती । पुढे जाणार्‍याचे ॥८ ०॥
पहा मनुष्यस्वभाव उकलून । दाखविला या घटनेतून ॥ रजनी आहे म्हणून । थोर खरा ॥८१॥
इमारतीत भडकल्या ज्वाला । चिट्टीने जीव वाचविला । तारणहार झाला । अनेकांसाठी ॥८२॥
परि एक घोळ झाला । चिट्टी नाही समजला ॥ स्त्रीशीलाच्या महत्त्वाला । जीव वाचवितां ॥८३ ॥
या घटनेपासून । मनी धक्का खाऊन ॥ चिट्टीला भावना भरून । दिल्या वसीने ॥८४॥
भावना येताच अनुभवाला । चिट्टीत आता बदल झाला । आनंद घेऊ लागला। प्रेमाचा ॥८५॥
प्रेम असे अंतरी । प्रेम असे चराचरी ॥ प्रेम हे बाजारी । मिळत नसे ॥८६॥
चिट्टीने मदतीचा हात दिला । एक जीव जगी आला ॥ सनाने चुंबन दिला । दिट्टीच्या गाली ।।८७॥
प्रेमांकुर फुटले । chip-chip शहारले ॥ प्रोग्रामिंग गडबडले । चिट्टीचे॥८८॥
चिट्टीची ती बघा मेमरी । सनाच्या विचारांनीच भरी । आता काम न करी । प्रोसेसर त्याचा ॥८९॥
आता खेळ सुरू झाला । डॉ. बोहरा वदला ॥ बदल ध्यानी न आला । वसीगरनच्या ॥९०॥
पेमरोग जर झाला । उपाय न तयाला ॥ यंत्रमानव जरी झाला । चिट्टी हा ॥९१॥
मध्यरात्री गेला । सनाला भेटायला ।। तिथे डासाला । धडा शिकविला ॥९२ ॥
डासाचा पिच्छा करत । त्याच्याच भाषेत दरडावत ॥  क्षमा मागाया साक्षात । राजी केले ॥९३ ॥
वेळेचे बंधन नाही । भाषेचे बंधन नाही ।। वेडेपणाची सीमा नाही। प्रेमरोगात ॥९४॥
बघा तो प्रेमपुजारी । डासामागे गटारी ॥ कसा गेला तत्वरी । चिट्टी हा ॥९५॥
प्रभाव असा प्रेमाचा । वसीसोबत वाद भेटवस्तूंचा ॥  सनाच्या वाढदिवसाचा । दिवस तो ॥९६ ॥
सनासोबत नृत्य केले । वसीला नाही आवडले ।। बहु बोल लाविले ।  चिट्टीला ॥९७ ॥
फायदा याचा बोहराने घेतला । चिट्टीला हुशारीने वळविला। वसीच्या नकळतच झाला । हा गंभीर प्रकार ॥९८॥
सैन्यासमोर चिट्टी आला । प्रेम-महिमा कथन केला ॥ युद्ध सोडून द्या वदला । सर्व अधिकार्‍यांस ॥९९॥
प्रेमाचे रूप सुंदर । युद्धाचे परिणाम गंभीर ॥ निर्णय घ्या खंबीर । तुम्ही आता ॥१००॥
आग्रह सोडा हिंसेचा । वर्षाव करा  प्रेमाचा । हाच मार्ग शांतीचा । खरा असे ॥१०१ ॥
बघा संदेश अहिंसेचा । आणिक भूतदयेचा ॥ शांती-सद्भावनेचा । रजनी देतो ॥१०२॥
रजनीदेव बघा महान । सद्गुणांची आहे खाण ।। संदेश किती गहन । चित्रपटात या ॥१०३॥
मूर्खांसी ते न कळती । मनोरंजनास्तव जाती ॥ बोध मुळीच न घेती । या चित्रपटातला ॥१०४ ॥
महान विचारांनी भरलेला । छुपा संदेश असलेला ॥ तत्वज्ञानपर हा भला । वित्रपट बघा ॥१०५ ॥

                                      --एन्दिरन स्तोत्र - ३ वाचायला टिचकी मारा -->

८ टिप्पण्या:

 1. स्वामी ठाया ठाया |
  मनही वढाया |
  अशक्य ही माया | रजनीदेवांची ||

  एन्दिरन स्तोत्र वाचू |
  रजनीव्रते नाचू |
  चित्रपट आता | पाहणे नको ||

  माईंड इट !!!!

  उत्तर द्याहटवा
 2. संकेत, एकदम भारी. रजनीच्या इतमामाला साजेसं होतंय स्तोत्र. जबरा.

  उत्तर द्याहटवा
 3. अरेरे हेरंबराया... चित्रपट पाहाच हो... तोच तर उद्देश आहे स्वामींचा !!!

  उत्तर द्याहटवा
 4. @ devdesh :-
  धन्यवाद... एक सहज म्हणून प्रयत्न केला, तो जमला इतकेच..

  उत्तर द्याहटवा
 5. भाग ३ कुठेय? येऊद्या लवकर.. रजनीदेवांच्या भाषेत आला तर अजूनच उत्तम ;)

  उत्तर द्याहटवा
 6. एंदिरन स्तोत्र वाचून । झाले रजनींचे स्मरण । हरपले देहभान । म्या पामराचे ॥ १ ॥
  संकेतानंदस्वामींनी । स्तोत्र रचिले रजनी । पामरांस समजावुनी । त्यांनीच सांगावे ॥ २ ॥
  करिता स्तोत्राचे पठण । होई पापांचे क्षालन । ब्रह्ममय हे जीवन । होई साचे ॥ ३ ॥
  नमस्कार माझा स्वामींसी । भाव वाहिला चरणांशी । आता या प्रतिक्रियेसी । आटपतो मी ॥ ४ ॥

  उत्तर द्याहटवा
 7. @ हेरंब,

  अरे अरे हेरंबराया । नको जाऊ ऐसा वाया। चित्रपट पहावया । एकदा तरी जाणे ॥ १ ॥
  रजनीचित्रपट पाहूनी । दुःखे जाती जळूनी । कायावाचामनी । धन्य तू होसी ॥ २ ॥
  निश्चय कर अंतरी । जा एकदा थिएटरी । शुल्क असले जास्त जरी । मागे हटू नको ॥ ३ ॥
  आवडला तर मनोरंजन । नाही तर निद्राग्रहण । फायदा दोन्हीकडून । तुझाचि असे ॥ ४ ॥

  उत्तर द्याहटवा
 8. @ sanket apte : -
  श्रेष्ठ असे अमुच्याहुनी । चालणारी अपुली लेखणी । चित्ती वसला तुमच्या रजनी । शंकाच नसे ॥१॥
  स्तुतीसुमनांची उधळण पुरी । तुम्ही माझ्याहून भारी । आहे आपला आभारी । स्वामी संकेतानंद ॥२॥
  हेरंबरायासी जबाब दिला । तया रजनी सांगितला । हा उपकार भला । अमुच्यावरी हो ॥३॥

  उत्तर द्याहटवा

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More