पोस्ट्स

देव गंधार

तुम जब देव गंधार गाती हो संसारबंधनों में जकड़ जाती है फिर से यह विमुक्त आत्मा  तुम्हारे नीरजनयनों के नीर से भीगे भावुक पल पुन: लौट आते हैं  और तुम से दूर जाने का मेरा हर एक प्रयास तुम्हारे अधरों पर थम जाता है -संकेत

विडंबन- जालाचे भामटं

जालाचे भामटं माझे घरीं प्रकटले। अवघेचि जालें पैसे गुल।। १।। साईटीचे कपट करुनी फसवलें अकाउंट देखिलें भागाकार गे माये।।२।। रोज बसून पूनम बारू सहज 'नीटु' प्याला। कधी ढोसियला खंबाकारे।।३।। -- स्वामी संकेतानंद, १७ फ़ेब्रुवारी, २०१५

लसणाचे आक्षे

इमेज
लागणारे साहित्य:- तांदूळ, लसणाच्या पाती, जीरे, हिरवी मिर्ची, टोमेटो, कोथिंबीर, चवीपुरते मीठ कृ्ती:- पावशेर(२५० ग्राम) तांदूळ 3-4 तास पाण्यात भिजवायचे. मुठीत येतील एवढ्या छान कोवळ्या, लांबसडक लसणाच्या पाती घ्याव्या. बारीक चिरून साधारण 20-30 मिनिटे पाण्यात भिजवावे. आता भिजलेले तांदूळ, लसणाची चिरलेली पात, थोड़ी कोथिंबीर, हिरवी मिर्ची, एक टोमेटो, आणि चमचाभर जीरे, चवीपुरते मीठ हे सगळे एकत्र करायचे आणि मिक्सरमध्ये थोड़े पाणी टाकून वाटून एकजीव करायचे. बॅटर साधारण डोशाच्या बॅटरएवढे गाढ असावे. तव्यावर थोड़े तेल शिंपडून एकसर पसरावे. त्यावर बॅटर गोल पसरावे. (त्याआधी तव्याखालची गॅस नक्की पेटवा आणि तवा गरम होऊ द्या.) पसरताना फार जाड पसरवू नये आणि फार पातळही नको. पातळ असेल तर तव्याला चिकटेल आणि जळेल. जाड झाले तर वरची बाजू शिजणार नाही. तव्यावर झाकण ठेवावे. गॅस मध्यम आचेवर असावी. साधारण 2-3 मिनिटांनी झाकण काढावे. परत आक्ष्यावर थोडे तेल सोडावे. आक्षे उलटून 20-30 सेकण्ड भाजावे. तव्यावरुन काढून तूप ओढून चटणी किंवा लोणच्यासोबत गरमागरम हादडावे. तांदळाचे पीठ झाले कमी:- आदर्श आक्षे:- उलट बाजू ...

चेहरे

आश्वासनास भुलले चेहरे काळोख पीत निजले चेहरे हातात आंधळ्यांच्या, बंदुका.. रक्तात हाय, भिजले चेहरे! त्यांची नज़र ढगांना बोचली अन् वावरात रडले चेहरे मी कळवळून गातो मर्सिया अन् दाद देत बसले चेहरे लिहतोस तू कुणासाठी गझल त्यांचे कधीच थिजले चेहरे -- संकेत, नवी दिल्ली,  ३० ऑगस्ट , २०१५  -------------------------------------------------- आणि जाताजाता ग़ालिबच्या एका शेराचा अनुवाद:- सगळेच काय दडले चेहरे? काही फुलांत दिसले चेहरे मातीत काय शोधीशी अता? झाले विलीन, लपले चेहरे मूळ शेर :- सब कहाँ, कुछ लाल:-ओ-गुल में नुमायाँ हो गईं ख़ाक में क्या सूरतें होंगी, कि पिन्हाँ हो गई -- नवी दिल्ली, १९ ऑगस्ट,२०१५ 

अनाहत

साकळली पावसाळी रात्र गाते गहिऱ्या व्रणाचे गूढ ऐकूनी तो अनाहत नाद गायी गोठ्यातल्या दिग्मूढ़ पाचोळा नीजलेला शांत येई दचकून त्याला जाग शीरांच्या त्या शिळ्या स्वप्नांस मंत्रोच्चारात लावी आग घुबडांचे थांबले घुत्कार छपराला टांगले वाघूळ माळावरच्या कुबट कोषात निर्वाताची व्यथा गाभूळ घाबरला वळचणीचा जीव सैरावैरा पळे फडताळ केविलवाणे दडे ते बीळ काळोखाला चरे विक्राळ पागोळ्यांच्या भिडे हृदयास भिजलेला आर्त अंतर्नाद कातर सूरात देती हाक देणारा ना कुणी प्रतिसाद गहिवरलेल्या घराची भिंत घेते पिऊन ते नि:श्वास डोळे थिजले कुणाची आस पावा वाजेल हा विश्वास --  नवी दिल्ली २ ऑगस्ट, २०१५,

निरर्थक कविता

कधी कधी निरर्थका लिहा बघू ज़रा उगा असाच मी लिहूनिया प्रसिद्ध जाहलो जगा असाच खेळ खेळलो पिळून शब्द काढले अजून केस ओढतो कशास काव्य वाचले इथून चार चोरले तिथून चार ढापले करून भेळ चट्पटी विका म्हणून आपले म्हणेल तो बळेबळे, "कळेल त्यांस चांगले" छळेल प्रश्न हो मला, "कशास लोक पांगले?" तुम्ही मला बघूनिया कशास दूर भागता तुम्हास सोडणार का न काव्य हे सुनाविता? पळा पळा छळेन मी विडंबने करेन मी उदार काव्यप्रेमिका कशास लाइका कमी? -- स्वामी संकेतानंद नवी दिल्ली,  २४ जुलै, २०१५ 

समाधी

ओली शेवाळलेली दगडी जन्मठेप कदंबकाठावर कोण उसळून घेई झेप चोरटा एक कटाक्ष मध्यान्ही काळोखात पेंगले निवांत नेत्र मायाळू मंद सूरात गारढोण श्वासस्पर्श युगे धरला अबोला अजागळ अजस्र देह आतून अथांग ओला स्पर्शून गंगामाई घाबरे परत फिरे दुधाळ स्तनामधुनि पाझरती नीलहिरे चुनखड़ी गा त्याचा अनंत उच्छवास सालीना मिळतो आहे लोबानी मुखवास -- संकेत  नवी  दिल्ली,  २२ जुलै, २०१५